सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव – द्वितीय दिवस

हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी) – स्वत: साधना करणे ही व्यष्टी साधना, तर समाजाला साधनेला लावणे, ही समष्टी साधना आहे. सनातन संस्था समष्टी साधना शिकवते. त्यामुळे आज सनातनचे १३१ साधक संतपदी विराजमान झाले आहेत अन् १ हजार साधक पुढील १० वर्षांत संत होतील ! सर्वच समाज सात्त्विक झाला, तर हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल. हिंदु राष्ट्राची स्थापना, ही समष्टी साधना आहे, त्यासाठी सर्वांनी साधना करावी, हे सांगण्यासाठी समाजात जायला हवे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी केले. ते गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त मार्गदर्शन करत होते. या वेळी २० हजारांहून अधिक साधक आणि हिंदू उपस्थित होते. या प्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांची वंदनीय उपस्थिती होती.

समाजात अधिकाधिक लोक सात्त्विक वृत्तीचे निर्माण झाले की हिंदु राष्ट्र निश्चित ! 

समाजातील डॉक्टर हे केवळ शारीरिक आणि मानसिक आजारावर औषध देतात; मात्र अनिष्ट शक्तींच्या त्रासासह अनेक रोग हे स्वभावदोष, प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास यांमुळे होतात. हे त्यांना माहितच नसते. त्यामुळे या त्रासावर त्यांच्याकडे कोणतीच उपाययोजना नसते. परिणामी अनिष्ट शक्तींचा त्रास दूर करण्यासाठी नामजप अर्थात् साधनाच करावी लागते. ‘हिंदु’ या शब्दाचा अर्थ ‘हिनानी गुणानी दुषयती इति हिंदु’ म्हणजे स्वत:तील दोष दूर करतो, तो हिंदु होय. समाजात अधिकाधिक लोक सात्त्विक वृत्तीचे निर्माण झाले की, हिंदु राष्ट्र निश्चित येईल. आता आपत्काळ, तिसरे महायुद्ध होईल, यासाठी आपण स्वत:ला सिद्ध करावे लागेल. आपत्काळात जी युद्धजन्य परिस्थिती होईल, त्यात नागरिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागेल. त्या प्रसंगी त्यांना आपल्याला साहाय्य करावे लागेल. त्याची तयारी आपल्याला आतापासून करावी लागेल. ही सिद्धता म्हणजे समष्टी साधना आहे. सनातन राष्ट्राची स्थापना ही हिंदु राष्ट्राची स्थापनाच आहे, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी ‘अनंतकोटि ब्रह्मांडनायक राजाधिराज……श्री गुरुकृपाधिपति सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेजी की जय’ या विस्तृत बिरदावलीचे वाचन करण्यात आले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले यांनी त्यांच्या संदेशात म्हटले की, सच्चिदानंद परबह्म डॉ. आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व संकल्प, विशेषतः धर्मसंस्थापना आणि सनातन राष्ट्र स्थापनेचे संकल्प सिद्धीस जावोत. तर या वेळी पू. (डॉ.) कुंदा आठवले म्हणाल्या की, सनातनच्‍या कार्याला मिळत असलेली ही कीर्ती हे आमचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्‍या कृपेचेच फलित आहे.

विविध संप्रदाय, संत व मान्यवर यांच्याकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सन्मान !

श्री अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदूर चे पदाधिकारी यांनी सच्चिदानंद परब्रम्ह डॉक्टर जयंत आठवले यांचा सन्मान केला

इंदूर येथील ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक ट्रस्ट’च्या वतीने विश्वस्त श्री. गिरीश दीक्षित, तसेच अन्य पदाधिकारी अन् प.पू. रामानंद महाराज यांची सून सौ. शिल्पा निरगुडकर यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि त्यांच्या पत्नी पू. (डॉ.) सौ. कुंदा आठवले यांचा विशेष सन्मान केला, तसेच संत भक्तराज महाराज आणि प.पू. अनंतानंद साईश यांची प्रतिमा असलेला चांदीचा शिक्का या प्रसंगी भेट दिला. या प्रसंगी ‘अंतर्योग फाऊंडेशन’चे अध्यक्ष आचार्य उपेंद्रजी आणि सौ. नीता, तसेच भाग्यनगर येथील ‘तिरुमला तिरुपम कंपनी’चे संस्थापक श्री. नंगुनेरी चंद्रशेखर यांनीही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सन्मान केला.

केवळ कायदे नव्हे, तर संपूर्ण व्यवस्था पालटायला हवी ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी, १८ मे (वार्ता.) – हिंदूंवर झालेल्या अनेक आघातांविषयीचे खटले अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. या खटल्यांचे निर्णय व्हायला किती वेळ लागणार, हे आपल्या सर्वांना ठरवायचे आहे. आज देशातील व्यवस्था हिंदुविरोधी आहे. वक्फ बोर्डविषयी जेव्हा संसदेत कायदा पारित झाला, तेव्हा सर्वोच्च न्यायालयात याविरोधात प्रविष्ट झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय विचार करते की, हा कायदा कसा थांबवला जाईल; परंतु संसदेने पारित केलेला कायदा थांबवताच येत नाही. या सर्व घटनांमुळे असे लक्षात येते की, केवळ कायदेच नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थाच हिंदुविरोधी असल्याने ती पालटायला हवी, असे प्रखर उद्गार ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे प्रवक्ते आणि सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी काढले. १८ मे या दिवशी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या दुसर्‍या दिवशी ‘सनातन राष्ट्र पथदर्शन’ हा कार्यक्रम पार पडला. त्या वेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते. या वेळी व्यासपिठावर केंद्रीय सूचना विभागाचे माजी आयुक्त आणि ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’चे संयोजक श्री. उदय माहुरकर, ‘नॅशनल सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च अँड ॲनालिसिस’चे अध्यक्ष श्री. नीरज अत्री, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हेही उपस्थित होते.

अधिवक्ता विष्णु शंकर जैन पुढे म्हणाले, ‘‘हिंदूंच्या विरोधात नकळतपणे प्रचंड कायदे निर्माण केले गेले आहेत. राज्यघटनेतील कलम २९-३० मध्ये अनेक असंवैधानिक त्रुटी आहेत. कलम ३० चा दुरुपयोग केला जात आहे. कलम २६ प्रमाणे मशिदी, चर्च मात्र सरकारी अधिग्रहणापासून सुटतात; मात्र हिंदूंची मंदिरे सरकारी अधिग्रहण होतांना हेच कलम बाजूला केले जाते. शिवाचे मंदिर पाडण्याचे आदेश देतांना देहली उच्च न्यायालय म्हणते की, भगवान शिवाने आम्हाला क्षमा करावी ! हिंदु समाजानेही या लढ्यासाठी दबावगट निर्माण केला, तरच आपण हिंदु मंदिरे सुरक्षित ठेवू शकतो. त्याचसमवेत हिंदुविरोधी कायदे असल्याने आपली कुचंबणा होत आहे. निधर्मी, समाजवादी यांची व्याख्या न्यायाधिशांनाही व्यवस्थित ठाऊक नाही. अल्पसंख्यांक आयोग असंवैधानिक असूनही त्याविषयी कुणीही समजून घेत नाही, ही शोकांतिका आहे. आज देशातील सहस्रो अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांमध्ये दिलेल्या सुविधा मिळवण्यासाठी लोक धर्मपरिवर्तन करून तेथे प्रवेश घेत आहेत. देहली सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांच्या घरात मोठी रक्कम सापडते; पण याविषयी एक साधी तक्रार प्रविष्ट होत नाही. ते त्यागपत्र देत नाहीत. चौकशी समिती अयशस्वी होते. ते न्यायाधीश स्वतः म्हणतात की, मी न्यायाधिशाचे पद सोडणार नाही. असे न्यायाधीश असतील, तर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते कसे लढू शकतील ? आपले हिंदु राष्ट्र शस्त्रसंधी करणारे नाही, तर पाक, बांगलादेश, अफगाणसह अखंड हिंदु राष्ट्र निर्माण करणारे सनातन राष्ट्र असावे. आपण हिंदु आपल्या श्रद्धा केंद्रांसाठी अतिशय सहिष्णू, शांत आहोत. ‘आपली श्रद्धा केंद्रे मुक्त व्हायला हवीत’, अशी एकमुखी मागणी सर्व हिंदूंनी करायला हवी.’’

सांस्कृतिक आक्रमण आणि संस्कृती हनन करणारे यांवर कठोर निर्बंध आणायला हवेत ! – उदय माहुरकर, संयोजक, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत’

देशावरील सांस्कृतिक आक्रमण हे सर्वांत मोठे संकट आहे. सामाजिक माध्यमे, ‘ओटीटी’, ‘पोर्नोग्राफी’ (अश्लीलता) यांसारख्या माध्यमांतून अश्लील चलचित्रे दाखवली जातात आणि हिंदु संस्कृतीवर थेट आक्रमण केले जात आहे. अशा गोष्टी सिद्ध करणारे लोक बलात्कारालाच प्रोत्साहन देत आहेत. देशात ८० टक्के बलात्कार हे अश्लील चलचित्रे पाहून होत आहेत. या सर्व माध्यमांच्या विरोधात मी देहली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती; परंतु प्रथमदर्शी अहवाल नोंद केला नाही. संस्कृती हननाचे प्रमाण पुष्कळ गतीने वाढत आहे. सांस्कृतिक आक्रमण परतवून लावण्यासाठी संस्कृती हनन करणार्‍यांवर कठोर निर्बंध आणायला हवते. आमची मागणी आहे की,
अ. ‘इंडिसेन्ट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन्स ॲक्ट’च्या अंतर्गत ३ वर्षांऐवजी १० वर्षांची शिक्षा करावी अन् ३ वर्षांपर्यंत जामीन दिला जाऊ नये. ३ वर्षे जामीन न मिळणे, हा आतंकवाद्यांसाठी केलेला नियम आहे आणि हा नियम या सांस्कृतिक आतंकवाद्यांना लावायलाच हवा.
आ. ‘लॉ ऑफ एथिक्स कोड’ सिद्ध करून चित्रपट, चलचित्रे यांतील दृश्य, विषय, कपडे आणि भाषा यांवर मर्यादा असावी अन् ही मर्यादा ओलांडल्यास १० ते २० वर्षांची शिक्षा केली जावी.

अनेक संतांनी ‘भारत देश महान राष्ट्र बनेल’, अशी भविष्यवाणी केली आहे. जर या कार्यात काही अडचणी येत असतील, तर आपण त्या पुढाकार घेऊन थांबवायला हव्यात. ही लढाई आपण निश्चित जिंकणार !

भारत फोफावत चाललेला काल्पनिक ख्रिस्ती प्रसार रोखण्यासाठी अभ्यासपूर्ण लढा आवश्यक ! – नीरज अत्री, अध्यक्ष, नॅशनल सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च अँड ॲनालिसिस

हिंदूंसमोर जसे जिहादींचे संकट आहे, त्यापेक्षा मोठे संकट ख्रिस्ती पंथाने रचले आहे. त्यांचे धर्मांतराचे कार्य अतिशय धोकादायक आहे; पण ते वरकरणी दिसून येत नाही. ख्रिस्ती पंथाने जगाला गेली २०२५ वर्षे जगाला मूर्ख बनवले. अस्तित्वात नसलेल्या येशूला क्रॉसवर चढवल्याची कपोलकल्पित कथा सांगितली. याच कथेला अनुसरून नाताळ, ईस्टर यांसारखे सण साजरे करण्याची प्रथा पाडली; पण कुणीही सदा सर्वकाळ सर्वांना मूर्ख बनवू शकत नाही. आता जगाला हे सत्य सांगण्याची वेळ आली आहे. जो देश नेहमी सत्याचा शोध घेतो, अनुभवसिद्ध ज्ञानाला अधिक महत्त्व देतो, त्या देशात केवळ एकाच पुस्तकातील माहिती सत्य असल्याचे सांगून परिवर्तन केले जात आहे. ख्रिस्ती पंथ हा असत्यावर आधारीत आहे. हे पश्चिमी देशातील बहुतांश इतिहास संशोधकांनी सप्रमाण स्पष्ट केले आहे. येशूला क्रॉसवर चढवल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला; पण ३ दिवसांनी तो पुन्हा जिवंत झाला. अशा काल्पनिक कथा सांगून नाताळ साजरा करण्याची प्रथा या देशात पाडण्यात आली.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव भगवान परशुरामाचे कार्य करत आहेत ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था


सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी या भव्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा सनातन राष्ट्राचा शंखनाद आहे. या टप्प्यापर्यंत पोचण्यासाठी सनातनला अनेक दिव्यातून जावे लागले. अनेक विरोधक आणि मोठमोठ्या अन्वेषण यंत्रणा यांनी सनातन संस्थेला संपवण्याचा प्रयत्न केला, तरीही सनातन संस्था संपली नाहीच; पण तीच संस्था आज सनातन राष्ट्राचा शंखनाद करत आहे; कारण संस्थेवर भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद आहे. गोवा ही भगवान परशुराम भूमी आहे. भगवान परशुरामाचे कार्य आज सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी २५ वर्षांपूर्वी सनातन संस्थेचे बीज रोवले होते. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे, ज्याचे विराट स्वरूप आज या कार्यक्रमाच्या रूपाने आपल्या समोर दिसत आहे. सनातनच्या प्रत्येक साधकामध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम रोमारोमांत भिनवले आहे. आपण केवळ श्रीरामसेनेतील एक वानर आणि खार बनून स्वतःचा लहानसा वाटा उचलत आहोत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना मूर्तीकाराप्रमाणे घडवून देवाचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

परशुराम भूमीत झालेल्या शंखनादाने सनातन राष्ट्र निश्चित येईल ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती


बांगलादेशात शेख हसिना सरकारविरोधी आंदोलनात हिंदूंनाच मारण्यात आले. काश्मीर, केरळ आणि बंगाल येथून हिंदूच संपत चालले आहेत. कर्नाटकमध्ये हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना निवडून ठार मारले जात आहे. नुकत्याच पहलगाम येथेही झालेल्या आक्रमणात धर्म विचारून हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी हिंदूंनाच लक्ष्य केले जात आहे. बहुसंख्यांक असलेले हिंदू मार खाणारा भारत एकमात्र देश बनला असतांना हिंदु मात्र केवळ जागृती करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे आता केवळ जागृती करत बसण्यापेक्षा त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे समर्थ रामदासस्वामींनी जनजागृती करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यात समाजाला सहभागी केले, त्याचप्रमाणे आज संत जागृती करत असल्याने आपल्यालाही या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या माध्यमातून सनातन राष्ट्राच्या स्थापनेसाठी लढण्यासाठी सिद्ध व्हावे लागेल. रामेश्वरममध्ये शंखनाद झाला, तेव्हा लंकादहन निश्चित झाले; जेव्हा हा शंखनाद कुरुक्षेत्रामध्ये झाला, तेव्हा कौरवांचा संहार निश्चित झाला; जेव्हा हा शंखनाद छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला, तेव्हा हिंदवी स्वराज्य साकार झाले. आता हाच शंखनाद परशुरामभूमीत झाला, तर सनातन राष्ट्र निश्चितच येईल.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात सनातन धर्माचा ध्वज फडकला !

 ध्वजावर कल्पवृक्ष आणि कामधेनू यांची प्रतिमा

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी ऐतिहासिक घटना घडली. या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या शुभहस्ते सनातन धर्माच्या ध्वजाचे आरोहण शंखनाद आणि वेदमंत्रांच्या गजरात करण्यात आले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह सनातनच्या संतांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी कार्यक्रमाला २३ देशांतील २० हजारांहून अधिक साधक आणि हिंदू धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी ‘सनातन हिंदु धर्माचा विजय असो’, ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमले.


‘सनातन धर्माचा ध्वजा’चे वैशिष्ट्य : प्रत्येक मंदिरात जशी ध्वजस्थापना होते, तसे सनातन राष्ट्राशी संबंधित ‘सनातन धर्मध्वजा’चे आरोहण करण्यात आले. हा ध्वज राजकीय किंवा संविधानिक नसून आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. हा ‘धर्मध्वज’ आहे. ‘सनातन हिंदु राष्ट्राची स्थापना’ या ध्येयाची विश्वाच्या कानाकोपर्‍यात असलेल्या हिंदूंना हा ध्वज जाणीव करून देईल. महाभारताच्या युद्धात श्रीकृष्ण आणि अर्जुन ज्या रथावर आरुढ झाले होते, त्या रथावर बसून हनुमंताने जो ध्वज हातात धरला होता, तो सनातन धर्माचा ध्वज होता. हनुमंताचा रंग शेंदरी म्हणजे केशरी आहे; म्हणून सनातन राष्ट्राचा ध्वज केशरी रंगाचा आहे. या ध्वजावर ‘कल्पवृक्षाच्या खाली कामधेनु उभी आहे’, असे चित्र आहे. कल्पवृक्ष आणि कामधेनु ही दोन्ही ‘समृद्धी, पालन-पोषण, संरक्षण अन् श्रीविष्णूचा अभय वरदहस्त’ यांची प्रतिके आहेत.

‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात ‘पद्मश्री’प्रमाणे ४ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ व २० जणांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार !

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात हिंदु धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षणासाठी कार्य करणार्‍या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या शुभहस्ते हस्ते ४ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’, तर २० जणांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी कार्यक्रमाला २३ देशांतील २० हजारांहून अधिक साधक आणि हिंदू धर्मप्रेमी उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती होती.


सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ.जयंत बाळाजी आठवलेजी यांच्या शुभहस्ते भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री.टी.राजा सिंह ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार स्वीकारताना

या प्रसंगी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले, “देशात विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना ‘पद्म’ ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्कार दिले जातात; मात्र हिंदु धर्मासाठी जीवन समर्पित करून कार्य करणार्‍यांना अद्याप कोणताही सन्मान दिला जात नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी सनातन संस्थेने हा पुरस्कार आरंभला आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातील.”

‘हिंदु राष्ट्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित –

1. उत्तरप्रदेश येथील आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड
2. बांगलादेश येथील ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक पू. अधिवक्ता रवींद्र घोष
3. कर्नाटक येथील पंचशिल्पकार पू. काशीनाथ कवटेकर
4. महाराष्ट्रातील मुंबई येथील प्रख्यात प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ.जयंत बाळाजी आठवलेजी यांच्या शुभहस्ते सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णू शंकर जैन ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार स्वीकारताना

‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करणार्‍यांमध्ये आहेत –

1. भाग्यनगर येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह
2. काशी-मथुरा येथील मंदिर मुक्तीसाठी लढा देणारे सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु जैन
3. गोवा येथील घनपाठी आचार्य योगेश्वर बोरकर
4. गोवा येथील पंडित महामहोपाध्याय डॉ. देवदत्त पाटीलजी
5. कर्नाटक येथील श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक
6. कर्नाटक येथील ‘युवा बिग्रेड’चे मार्गदर्शक श्री. चक्रवर्ती सुलीबेले
7. दिल्ली येथील चाणक्य फोरमचे संपादक मेजर गौरव आर्यजी
8. दिल्ली येथील ‘सुदर्शन वाहिनी’चे प्रधान संपादक डॉ. सुरेश चव्हाणके
9. उत्तर प्रदेश येथील ‘प्राच्यम्’चे संस्थापक कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी
10. तामिळनाडू येथील हिंदू मक्कल कत्छी’चे संस्थापक श्री. अर्जुन संपथ
11. दिल्ली येथील ‘सेव कल्चर सेव भारत फाऊंडेशन’चे श्री. उदय माहुरकर
12. कर्नाटक येथील माजी अतिरिक्त महाअधिवक्ता अधिवक्ता अरुण श्यामजी
13. बेल्जियम येथील लेखक डॉ. कोएनराड एल्स्ट
14. ओडीसा येथील ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲण्ड कल्चरल हेरिटेज’चे श्री. अनिलकुमार धीर
15. दिल्ली येथील अग्नि समाजा’चे संस्थापक श्री. संजीव नेवर
16. दिल्ली येथील ‘सरयु ट्रस्ट’चे संस्थापक श्री. राहुण दिवाण
17. हरियाणा येथील विचारवंत श्री. नीरज अत्री
18. मुंबई येथील समाजसेवक तथा लेखक डॉ. अमित थडानी
19. इंडोनेशिया येथील ‘धर्मस्थापनम्’ फाऊंडेशनचे रस आचार्य पू. धर्मयशजी महाराज
20. छत्तीसगड येथील श्री. प्रबल प्रतापसिंग जुदेव

काही पुरस्कार प्राप्त कर्त्यांनी व्यक्त केलेले मनोगत

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत ! – आमदार टी. राजासिंह, तेलंगणा

संत-गुरुजन नेहमी सांगायचे, ‘आगामी काळ युद्धाचा आहे. त्या युद्धात विजय मिळवण्यासाठी, ते युद्ध लढण्यासाठी प्रत्येक हिंदूने तयार होण्याची आवश्यकता आहे.’ पहेलगामच्या हल्ल्यात धर्म विचारून माणसे मारली गेली. पूर्वीही औरंगजेब असो, अकबर असो किंवा इतर अनेक शत्रूंनी हिंदूंचे नाव विचारून, धर्म विचारून त्यांचे धर्मांतर केले. जे धर्मांतर करत नव्हते, त्यांना मारले गेले. आज त्याचेच बिघडलेले वंशज त्यांच्याच मार्गदर्शनावर चालत आहेत. अशा प्रवृत्तीचे लोक केवळ पहेलगाममध्येच नाही, तर प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात लपलेले असू शकतात. त्यामुळे हिंदूंनी आपल्या मुलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण द्यायला हवे. जो लढेल तोच वाचेल. जो लढणार नाही त्यांच्यासाठी येणारा काळ खूप कठिण आहे. त्यामुळे येथून जाण्यापूर्वी समस्त हिंदूंनी एक असा संकल्प घ्या की, आगामी काळात भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी आवश्यक ते प्रत्येक पाऊल उचलू आणि संघटितपणे राहू, असे आवाहन तेलंगणा येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. ते ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त बोलत होते.

Leave a Comment