सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव – प्रथम दिवस

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ : २३ देशांतील १९ हजार  भाविकांची उपस्थिती !

दीपप्रज्वलन करताना डावीकडून श्री. अभय वर्तक, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामीजी, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, पू .(सौ.) कुंदा आठवले, डॉ. सुरेश चव्हाणके, पू. देवकीनंदन ठाकूरजी, गोव्याचे मंत्री श्री. सुदिन ढवळीकर, श्री. दामू नाईक व श्री यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडियार

 

गोव्याचा समुद्र पहाण्यासाठी येणारे लोक आता सनातनच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती पहाण्यासाठी येतात ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा  

 

 

गोवा सरकारच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा विशेष सन्मान !

 

गोवा सरकारच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा विशेष सन्मान करताना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – पूर्वी गोव्यात लोक समुद्र, तसेच अन्य गोष्टी पहाण्यासाठी येत होते; याउलट गोव्यात सनातन संस्थेचे कार्य चालू झाल्यावर नागरिक भारतीय संस्कृती आणि मंदिरे पहाण्यासाठी गोव्यात येतात. गोवा भोगभूमी नसून ही देवभूमी आहे. सनातन संस्कृती आणि शंखनाद महोत्सव यांमुळे येथील अर्थकारण आणि सांस्कृतिक पर्यटन वाढेल. गेल्या २५ वर्षांपासून सनातन संस्था हिंदु धर्माचा प्रसार करण्याचे मोठे कार्य करत असून सनातनने केलेली आध्यात्मिक ग्रंथनिर्मिती युवक यांना प्रेरणा देणारी आणि पुढील १०० वर्षांपर्यंत दिशादर्शक आहे. सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे गौरवोद्गार गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

 

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा शासनाच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन विशेष सन्मान केला, तर देशाच्या संरक्षण कार्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते मुख्ममंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे साहाय्यता निधी सुपूर्द करण्यात आला.

या महोत्सवासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सौ. कुंदा जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीसह २३ देशांतील १९ हजारांहून अधिक भाविक उपस्थित आहेत. प्रकृतीस्वाथ्य ठिक नसतांनाही साधक आणि भक्तांच्या प्रेमासाठी महोत्सवासाठी उपस्थित असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या दर्शनाने उपस्थित साधक, हिंदुत्वनिष्ठ भावविभोर झाले. महोत्सवाच्या प्रारंभी शंखनाद, गणेशवंदना आणि वेदमंत्रपठाण झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

या प्रसंगी गोवा येथील कुंडई येथील दत्त पद्मनाभ पीठाचे पद्मश्री सद्गुरु बह्मेशानंद स्वामीजी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पू. देवकीनंदन ठाकूर, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, गोव्याचे वीजमंत्री श्री. सुदीन ढवळीकर, गोवा राज्याचे समाजकल्याणमंत्री श्री. सुभाष फळदेसाई, भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. दामोदर नाईक, कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार श्री. यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार, ‘सुदर्शन न्यूज’चे प्रधान संपादक श्री. सुरेश चव्हाणके, सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि श्री. अभय वर्तक उपस्थित होते.

सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत आहे, हा ऐतिहासिक क्षण ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री 

याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले , ‘‘सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ गोवा येथून होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने गोवा भूमी पावन झाली आहे. गोव्यात आक्रमकांनी लाखो हिंदूंच्या हत्या केल्या; मात्र तरीही येथील हिंदूंनी सनातन हिंदु संस्कृती अखंड ठेवण्याचे कार्य केले आहे. अशा पावन भूमीत सनातन राष्ट्रासाठी शंखनाद होणे, हा शुभसंकेत आहे. सनातन राष्ट्र निर्मितीच्या कार्यात गोव्यातील धर्मप्रेमी सनातन संस्थेसोबत आहेत.’’

गोवा ही ‘बीच’वर बसण्याची नव्हे, तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी ! – पू. देवकीनंदन ठाकूर


गोवा ही ‘बीच’वर (समुद्रकिनारी) बसण्याची नाही, तर परशुरामाची उपासना करण्याची भूमी आहे. पाकिस्तानचे सरकार जे स्वत: भीक मागणारे आहे, ते आतंकवादी प्रशिक्षित करून इतरांची हानी करतात, तर दुसरीकडे भारतात मंदिरे, गोशाळा आणि वेदविद्यालय यांचे निर्मिती होत आहे. त्यानंतर आमचे राष्ट्र हिंदु राष्ट्र होते आणि पुढेही रहाणार आहे.

हिंदूंनो, राम-कृष्ण यांचा आदर्श ठेवून शक्तीची उपासना करा ! –  पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी, गोवा


आज गोव्याची समाजात जी मलिन प्रतिमा होती, ती दूर होऊन एक सात्त्विक परशुराम भूमी म्हणून गोव्याची ओळख सनातन संस्थेच्या कार्यामुळे निर्माण झाली आहे. श्री हनुमान, श्री राम, श्री कृष्ण यांच्या हातात आयुधे आहेत. ही आयुधे धर्माच्या रक्षणासाठी आहेत. आम्हाला शांती हवी आहे. सनातन धर्म टिकल्यानंतरच जगात विश्वास अन् शांती निर्माण होईल. आज हिंदू जागा न झाल्यास, तर उद्याचा दिवस आपला रहाणार नाही. सर्व समाजाने सनातनच्या राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. आम्हीही या कार्यात सहभागी आहोत. या कार्याला आमचेही आशीर्वाद आहेत.

राष्ट्राचे सनातनत्व टिकवून ठेवण्यासाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’! – चेतन राजहंस

पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या हिंदूंची त्यांचा धर्म विचारून हत्या केली. त्यामुळे भारतासमोर उभी असलेली आव्हाने पाहिली, तर ‘सनातन धर्मियांचे अस्तित्व आणि सनातन धर्माचे संरक्षण’ अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सनातन धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव धर्मभक्तांना आध्यात्मिक बळ देईल, एक नवचैतन्य आणि ऊर्जा प्रदान करेल.

कर्नाटक येथील म्हैसूर राजघराण्याचे युवराज तसेच म्हैसूरचे खासदार श्री. यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार म्हणाले, ‘‘अध्यात्म हाच आपला सर्वांचा मूळ गाभा आहे आणि तीच आपल्या सनातन राष्ट्राची मूळ संकल्पना आहे. सनातन राष्ट्र ही राजकीय सत्ताव्यवस्था नसून आध्यात्मिक सेवाभावाने केलेली व्यवस्था आहे.’’ या प्रसंगी गोव्याचे वीजमंत्री श्री. सुदीन ढवळीकर, भाजपचे गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. दामोदर नाईक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. महोत्सवाच्या प्रारंभी धर्मसंस्थापनेसाठी १ कोटी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजपास प्रारंभ करण्यात आला.

क्षणचित्रे : 

१. या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेजी का संक्षिप्त चरित्र’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे, तसेच ‘ई-बुक’चे मान्यवरांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.

२. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी’च्या मुख्य प्रवेशद्वाराचे नामकरण ‘भगवान परशुराम सुवर्णद्वार’, नगरीतील सात मार्गांना ‘सप्तर्षीं’ची, तर तीन मुख्य मोठ्या सभामंडपांना ‘श्रीनिवास मंडपम’, ‘श्रीदेवी मंडपम’ आणि ‘भूदेवी मंडपम’ अशी नावे देण्यात आली आहेत. महोत्सवस्थळी भोजनासाठी एकूण १५ मंडप उभारण्यात आले असून त्यांची नावेही देवतांच्या नावाने देण्यात आली आहेत. भगवान श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह गोवर्धन पर्वत उचलतांनाचे श्रीकृष्णाचे, तसेच अफजलखान वधाचे कटआऊट उभारण्यात आले आहेत.

 

समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी तयार करावे लागेल ! – प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज

‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सव : २० हजारांच्या उपस्थितीत ‘सनातन राष्ट्र संकल्प धर्मसभा’

प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, गीता परिवार तसेच महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचे संस्थापक

फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – केवळ जप करत बसलो, तर काम होणार नाही. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते, ‘माझे स्मरण कर पण युद्ध कर !’ स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे आपल्या देशावर काळ्या इंग्रजांची सत्ता होती. आपला देश धर्मशाळा बनला आहे. आता समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी तयार  करण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्माच्या आड येणार्‍या कायद्यांमध्ये पालट करून देशात कोणते कायदे हवेत, यावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्माच्या प्रसाराचे कार्य ही साधना, ईश्वराची उपासना आहे. आपण आपल्या व्यक्तीत्वाची बाजी लावून आणि संघटित होऊन परमात्म्याच्या सेवेत स्वतःला अर्पण केले पाहिजे. तर स्वर्णिम काळ दूर नाही, असे मार्गदर्शन श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी यांनी केले. या वेळी देशविदेशातील २० हजारांहून अधिक हिंदू उपस्थित होते.

सनातन राष्ट्र संकल्प धर्मसभेमध्ये उपस्थित मान्यवर आणि भाविक

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवातील ‘सनातन राष्ट्र संकल्प’ सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर सनातनचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष श्री. सतीश महाना, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते पू. देवकीनंदन ठाकूर, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत पू. रवींद्र पुरी महाराज, आचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित श्री श्री १००८ स्वामी बालकानंद गिरीजी महाराज, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, अयोध्या येथील सिद्धपीठ हनुमान गढी मंदिराचे महंत राजूदासजी महाराज, इंडोनेशिया येथील धर्मस्थापनम् फाऊंडेशनचे पू. धर्मयशजी महाराज, स्वामी आनंद स्वरूप आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. दर्शक हाथी हे उपस्थित होते. या वेळी मान्यवरांमध्ये सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचीही वंदनीय उपस्थिती होती.

प.पू. गोविंददेवगिरीजी महाराज पुढे म्हणाले , ‘‘सनातन संस्थेचे संपूर्ण कार्य आध्यात्मिकतेच्या पायावर उभे आहे. भारत राष्ट्राला एक समजून काम करत आहेत. भगवद्गीता युद्धाच्या भूमीवर सांगितलेला ग्रंथ आहे. सनातन संस्थेनेही या ग्रंथाप्रमाणेच अध्यात्मापासून युद्धापर्यंत जागृती केली आहे. मी या महोत्सवामध्ये युद्धकलांचे प्रदर्शन पाहिले. मला वाटते की देशातील सर्व संतांनी त्यांच्या शिष्यांना हे शिकवले पाहिजे.’’

सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करा! – सतीश महाना, विधानसभा अध्यक्ष, उत्तरप्रदेश

सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी जागृती करणे आवश्यक आहे. या जागृतीसाठी केवळ वाणी नव्हे, तर साहस आणि शौर्य हेही आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक हिंदूने शक्तीची उपासना केली पाहिजे. सनातन संस्कृतीने नेहमी सर्वांचे हितच चिंतिले आहे. तथापि काही पंथांमध्ये ‘अन्य धर्मियांना मारा’ अशी शिकवण दिली जाते. याविषयी हिंदूंमध्ये जागृती होणे आवश्यक आहे.

लोकसंख्या नियंत्रण कायदा हाच अनेक समस्यांवर उत्तर ! – अधिवक्ता अश्विनी उपाध्याय

देशात अल्पसंख्याकांची संख्या प्रचंड वाढत असून हिंदूंची संख्या अल्प होत आहे. अल्पसंख्याकांची संख्या कोट्यवधीमध्ये वाढत असतांना त्यांना अल्पसंख्याक कसे म्हणायचे ? अल्पसंख्यांकांमुळेच लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर यांसह अनेक समस्यांना हिंदू बळी पडत आहेत.  प्रतिदिन १० हजार लोकांचे धर्मांतर होत आहेत. हवालाद्वारे पैशाचे फंडीग होत असल्याने धर्मांतर होत आहे. घुसखोर सिंगापूर, चीन, अरब राष्ट्रात घुसखोरी न करता ते भारतातच का येतात ? कारण काँग्रेसने केलेल्या अनेक कायद्यांद्वारे त्यांना केवळ सुविधाच मिळतात असे नाही, तर कायदेशीर संरक्षणही मिळते. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा हाच अनेक समस्यांवर उत्तर आहे.

‘सनातन राष्ट्रा’साठी ‘धर्मदूत’ बनण्याचा संकल्प करूया ! – सद्गुरु चारुदत्त पिंगळे

भारताला ‘सनातन राष्ट्र’ बनवणे, हा संतांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे लागेल. विभीषण रामनाम घेत होता, तो श्रीरामाचा भक्त होता; पण हनुमंताने सांगितले, ‘‘केवळ रामनाम घेतल्याने प्रभूंची कृपा होणार नाही, तर प्रभूंचे कार्य केले, तरच प्रभूंची कृपा होईल !’’ आपल्यालाही आज रामकाजाचा, म्हणजे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य करण्याचा संकल्प करावा लागेल. ‘सनातन राष्ट्रा’साठी ‘धर्मदूत’ बनण्याचा संकल्प करावा लागेल !

धर्मासाठी हिंदूंना कट्टर व्हावेच लागेल ! – महंत श्री राजूदासजी महाराज, अयोध्या

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामध्ये हिंदुत्वाचा जागर होत आहे. हिंदुत्व वाचले, तर राष्ट्र वाचेल आणि भारत टिकला, तर विश्व वाचेल. अन्य पंथ हे मौजमजेसाठी आहेत. केवळ सनातन धर्मामध्ये विश्वकल्याणाची भावना आहे. यासाठीच सनातन धर्माचे रक्षण आवश्यक आहे. सर्व संतांनी धर्मरक्षणासाठी भक्तांना जागृत करायला हवे. धर्मासाठी हिंदूंना कट्टर व्हायलाच लागेल.

धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या संयोगानेच सनातन राष्ट्राची स्थापना! – स्वामी बालकानंद गिरीजी महाराज

शंकराचार्यांचे सैन्य असलेल्या आखाड्यांवर आजपर्यंत कोणीही कब्जा करू शकलेले नाही. आज आपल्या हृदयात जागृती आली पाहिजे की, धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या संयोगानेच सनातन राष्ट्राची स्थापना होऊ शकते.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातून विश्वरूपाचे दर्शन मला झाले आहे ! – श्री. सुरेश चव्हाणके 

वर्ष २००८ मध्ये भगवा आतंकवाद, साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक आणि त्यांच्यावर झालेले अत्याचार अशा प्रकारे हिंदु धर्माची अपर्कीती चालू असतांना मी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट घेऊन यावर चर्चा केली होती. त्या वेळी त्यांनी दिव्यदृष्टीने जी माहिती दिली, त्याची प्रचिती आजही मला येत आहे. इतर अध्यात्मिक संघटना विज्ञानाच्या आधारे हिंदूंना मार्गदर्शन करतात; मात्र सनातन संस्था ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे ज्ञान देऊन धर्मकार्य करत आहे. खर्‍या अर्थाने धर्म आणि अध्यात्म यांचा प्रचार करत आहे. यासाठी शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातून विश्वरूपाचे दर्शन मला होत आहे.

सनातन संस्थेच्या विचार प्रत्येक हिंदूच्या मनात येईल, तेव्हा भारत हिंदु राष्ट्र होईल ! – स्वामी आनंद स्वरूप

साधू-संतांच्या आखाड्यांची शौर्यगाथा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा प्रत्येकाला सांगितली पाहिजे. मी सनातनच्या साधकांच्या चेहर्‍यावर तेज पहातो आणि प्रत्येक सनातनच्या साधकामध्ये प.पू. डॉ. आठवले यांना पहातो. सनातन संस्थेच्या विचार प्रत्येक हिंदूच्या मनात येईल, तेव्हा भारत हिंदु राष्ट्र होईल.

पुढच्या पिढीला रामायण आणि गीतेच्या शिकवणीपासून वंचित ठेवू नका ! – पू. धर्मयशजी महाराज


हिंदु धर्म हा हिरा आहे. त्यामुळे त्याचे सतर्कतेने रक्षण करून धर्म पुढे वाढवायचा आहे. आपली मुले सनातन धर्म पुढे घेऊन जाणार आहेत. त्यामुळे मुलांना गीता आणि रामायण तर शिकवावेच लागेल.

 

हिंदूंनी प्रत्येक वेळी संघर्ष केला, आता पुन्हा तशीच वेळ ! – दामू नाईक, गोवा राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष

आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. येथे शंखनाद चालू झाला आहे. या कार्यात माझेही योगदान असेल. भारत देशात सोन्याचा धूर यायचा,  जागोजागी मंत्रपठण व्हायचे. त्यानंतर आलेल्या आक्रमणकर्त्यांनी सनातन संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी ती संस्कृती आजपर्यंत टिकून आहे. हिंदु राष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे श्रीराममंदिर आहे. हिंदूंनी प्रत्येक वेळी संघर्ष केला, बलीदान दिले. आता पुन्हा हिंदूंची वेळ आली आहे. सर्व संत एकत्र येऊन सनातन राष्ट्र कार्यासाठी पुढे येत आहेत, आता आपण दायित्व घेऊन सक्रीय झाले पाहिजे.

 

अध्यात्म हीच सनातन राष्ट्राची संकल्पना ! – यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार, युवराज तथा खासदार, मैसूर राजघराणे, कर्नाटक

विश्वातील सर्वांत प्राचीन परंपरेचे आपण रक्षक आहोत. आपली मूळ सभ्यता ही सनातन धर्मामध्ये विदित आहे. आपल्याला आर्थिक, सैनिकी आणि आध्यात्मिक स्तरावर भविष्य निश्चित करायचे आहे. अध्यात्म हाच आपला मूळ गाभा आहे आणि तीच आपल्या सनातन राष्ट्राची संकल्पना आहे. हा पंथाधारित देश नसून आपल्या सभ्यतेची ओळख आहे. विजयनगर साम्राज्य हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. सनातन राष्ट्र ही राजकीय सत्ताव्यवस्था नसून आध्यात्मिक सेवाभावाने केलेली व्यवस्था आहे. सनातन राष्ट्राची संकल्पना ही आधीपासून व्याप्त आहे. सनातन राष्ट्र विविधतेला नाकारत नाही, तर आपल्याकडे वाद-प्रतिवादाची परंपरा आहे. हाच तर सनातन धर्माचा आत्मा आहे. सनातन राष्ट्र अमर असून ते सर्वसमावेशक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ सबका विकास’, असे म्हणतात. याचाच अर्थ सर्वांच्या विकासासह सर्वांच्या परंपरेलाही समाविष्ट करावे. यानेच वर्ष २०४७ मधील विकसित भारताचे स्वप्न खर्‍या अर्थाने पूर्ण होईल.

 

सनातन संस्थेने गोव्याला वेगळी ओळख दिली ! – गोव्याचे ऊर्जामंत्री सुदीन ढवळीकर

सनातन संस्थेने आगळावेगळा सोहळा आयोजित केला आहे. मला अभिमान आहे की, माझ्याच मतदारसंघात राष्ट्र आणि हिंदु धर्म सांभाळणार्‍या २ संस्था आहेत. सनातन संस्था बांदिवडे पंचायतीमध्ये, तर सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांची संस्था कुंडई पंचायतीमध्ये आहे. सनातन संस्था आणि सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी या दोन्ही संस्थांनी गोव्याला वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला. ४५० वर्षे गोव्यावर विदेशी संस्कृतीचे आक्रमण झाले; मात्र ते रोखले गेले. राष्ट्र जर पुढे जायचे असेल, तर धर्मातील लोकांनी एकत्र आले पाहिजे, यासाठी ही संस्था कार्यरत आहे. सनातन संस्था आणि गुरुदेवांनी मला दैवी बळ दिले आहे. मी एकाच पक्षात २५ वर्षे आहे. आपल्या सर्वांना अजून पुढे जायचे आहे आणि एकत्रित हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करायचे आहेत.

विश्वकल्याणकारी सनातन राष्ट्राच्या स्थापनेसाठीच हा शंखनाद ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था मागील २५ वर्षे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गोमंतकाच्या पवित्र परशुराम भूमीतून सनातन राष्ट्रासाठी आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रामराज्यस्वरूप आदर्श राष्ट्र निर्माण करण्याचा सामूहिक संकल्प करण्यासाठी हा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आहे. सध्या भारतासमोरील आव्हाने पाहिली, तर ‘सनातन धर्मियांचे अस्तित्व आणि सनातन धर्माचे संरक्षण’ अत्यंत महत्त्वाचे आहे. पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या हिंदूंची त्यांचा धर्म विचारून हत्या केली. काशी-मथुरा या आमच्या दैवतांसाठी न्यायालयात जाऊन याचना करावी लागणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे. ‘ब्रेकिंग इंडिया फोर्सेस’कडून गोमाता, गंगा, मंदिरे, देवता, धर्मग्रंथ’ आदी सनातन मानबिंदूंवर सातत्याने आघात होत आहेत. राष्ट्राचे सनातनत्व टिकवून ठेवण्यासाठी, तसेच गोमाता, गंगा, गायत्री, मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ आदींना पुनर्वैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे. ‘धर्मेण जयति राष्ट्रम् ।’ म्हणजे ‘सनातन धर्मामुळे राष्ट्र विजयी होते’, हे या महोत्सवाचे ब्रीद आहे. आमचे राष्ट्र सदैव विजयी होण्यासाठी सनातन धर्माची आवश्यकता आहे आणि त्यासाठीच हा शंखनाद आहे.

 

 हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राविना या देशाला दुसरा पर्याय नाही ! – तथागत रॉय, माजी राज्यपाल, त्रिपुरा आणि मेघालय

फोंडा (गोवा) – मला अत्यानंद होत आहे की, सनातन संस्था हिंदूंच्या हितासाठी चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. बंगाल आणि शेजारील बांगलादेश येथे हिंदूंवर ज्या प्रकारे अत्याचार होत आहेत, त्याची काही गणतीच नाही. दुर्दैवाने अन्यत्रच्या हिंदूंना वाटते की, बंगालमध्ये हिंदूंच्या विरुद्ध थोडे काहीतरी, कधीतरीच घडते आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काही प्रमाणात पक्षपात करतात. प्रत्यक्षात स्थिती पुष्कळ बिकट आहे. हत्या आणि बलात्कार हे बांगलादेशातील हिंदूंच्या कपाळावरच लिहिलेले आहे. या सर्व दृष्टीकोनातून शंखनाद महोत्सवाद्वारे सनातन राष्ट्र नि हिंदु राष्ट्राचा आवाज उठवला जाणे, हे योग्य दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या अनुषंगाने आपल्याला पुढे जायचे आहे. याचे कारण हिंदु राष्ट्राविना या देशाला दुसरा पर्याय नाही, असे रोखठोक वक्तव्य त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी केले. येथे आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये त्यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना वरील वक्तव्य केले.

‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने तथागत रॉय यांना ‘हिंदु इकोसिस्टम सिद्ध करण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत’, असे म्हटल्यावर त्यांनी त्वरित म्हटले, ‘आपल्याला केवळ हिंदूंची इकोसिस्टम नाही, तर आता हिंदु राष्ट्रच हवे. त्यापेक्षा अल्प असे काहीच नको.’ त्यांच्या या वक्तव्यातून त्यांची हिंदु राष्ट्र स्थापनेप्रतीची एकनिष्ठता आणि श्रद्धा दिसून आली.

* बांगलादेशासमवेत करार करून ‘चिकन नेक’ रूंद केल्यास पूर्वाेत्तर राज्यांच्या सुरक्षिततेची हमी देता येईल !

(चिकन नेक म्हणजे ईशान्य भारतातील ७ राज्यांना उर्वरित भारताशी जोडणारा अरूंद प्रदेश)

रॉय पुढे म्हणाले की, ‘चिकन नेक’च्या दोन्ही बाजूंना असलेली दोन राष्ट्रे बांगलादेश आणि नेपाळ ही अत्यंत दुर्बळ राष्ट्रे आहेत. तरीही आपल्याला सतर्क रहाणे आवश्यक आहे. असे असले, तरी बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत आहे आणि बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याकडे कानाडोळा करत आहेत. सीमा सुरक्षा दल हे थांबवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करत असले, तरी बंगाल सरकार घुसखोरांना साहाय्य करत आहे. त्यामुळेच ‘चिकन नेक’ला अधिक रूंद करायला हवे. यासाठी बांगलादेशासमवेत करार केला पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भातील एक समस्या काही वर्षांपूर्वीच दूर केली आहे, ज्या अंतर्गत बांगलादेशातील काही प्रांत हे भारतामध्ये होते, तसेच काही भारतीय प्रांत हे बांगलादेशात होते. करार करून ही समस्या सोडवण्यात आली. त्याप्रमाणेच ‘चिकन नेक’ला सशक्त करता येऊ शकते, अशी भूमिका रॉय यांनी या समस्येवर मांडली.

 

१ सहस्र वर्षांपूर्वीचे सोमनाथाचे शिवलिंगाचे घेतले भावपूर्ण दर्शन !

या कार्यक्रमाला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचे प्रतिनिधी म्हणून श्री. दर्शक हाथी हे उपस्थित होते. या वेळी श्री. दर्शक हाथी यांनी त्यांच्या समवेत सोरटी सोमनाथ येथील १ सहस्र वर्षांपूर्वीचे मूळ शिवलिंग उपस्थित संत आणि वक्ते यांना दाखवण्यासाठी व्यासपिठावर आणले होते. या वेळी श्री. दर्शक हाथी यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना हे शिवलिंग दाखवले.

 

शिवलिंगाचे वैशिष्ट्य उत्स्फूर्तपणे गुरुदेवांना माहिती देणारे श्री. चव्हाणके, तसेच त्याविषयी जिज्ञासेने जाणून घेणारे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत !

सोरटी सोमनाथाचे शिवलिंग त्या काळी चुंबकीय ऊर्जेमुळे आधांतरी रहात असे. शिवलिंगाचे व्यासपिठावर आगमन झाल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासह व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांनी त्याचे दर्शन घेतले. त्या वेळी सुदर्शन वाहिनीचे प्रमुख श्री. सुरेश चव्हाणके यांनी उत्स्फूर्तपणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना त्याविषयीची माहिती सांगितली आणि चुंबकीय ऊर्जेचे प्रात्यक्षित तिथे करून दाखवण्यास सांगितले. गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांनीही या वेळी शिवलिंगाचे हे वैशिष्ट्य जिज्ञासेने भावपूर्णरित्या समजून घेतले.

 

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त रामराज्यासाठी सामूहिक जपयज्ञ

* उपस्थितांनी घेतली प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाची अनुभूती

फर्मागुडी (गोवा), १७ मे (वार्ता.) – रामराज्यासम ‘सनातन राष्ट्रा’च्या स्थापनेमध्ये श्रीरामनाम जपाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. या भारतभूमीत पुन्हा एकदा धर्म, मर्यादा आणि सत्य यांचे सनातन राष्ट्र, अर्थात् रामराज्य यावे, यासाठी १ कोटी रामनामाचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण होण्यासाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या प्रारंभी उपस्थित साधकांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप सामूहिकरित्या आणि भावपूर्णपणे केला. या यज्ञामुळे रामराज्याचा संकल्प अधिक दृढ झाला.
‘आम्ही सर्व जण तुमच्या चरणी आश्रय घेतला आहे. आपल्या पवित्र नामस्मरणाने ही भारतभूमी धर्म, सत्य आणि संस्कार यांनी समृद्ध व्हावी, सनातन राष्ट्राच्या स्थापनेसाठी आम्हा सर्वांना आध्यात्मिक ऊर्जा मिळावी आणि हे राष्ट्र लवकरात लवकर ‘सनातन राष्ट्र’ व्हावे’, अशी प्रभु श्रीरामाच्या पवित्र चरणी भावपूर्ण प्रार्थना करून जपयज्ञाला प्रारंभ करण्यात आला. सनातन राष्ट्राच्या स्थापनेसाठी सहस्रो साधकांनी एकत्रितपणे श्रीरामाचा नामजप करणे, हा या महोत्सवातील अतिशय महत्त्वाचा भाग होता. असाच जपयज्ञ महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच १८ मे या दिवशीही करण्यात येणार आहे.

Leave a Comment