Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : मैदानात पूर्वसिद्धतेला, तर गोवा राज्यातील प्रसाराला वेग !

Article also available in :

सनातन राष्ट्राचा शंखनादाचा कार्यक्रम अवघ्या ५ दिवसांवर !

भगवान श्रीकृष्ण शंखनाद करतांनाचे लावण्यात आलेले लक्षवेधी ‘कटआऊट’

फोंडा (गोवा), १२ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यांचे औचित्य साधून येथील फर्मागुडी येथील इन्फिनिटी मैदानावर १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला आता अवघे ५ दिवस शेष असल्याने सोहळ्याच्या मैदानात पूर्वसिद्धतेला वेग आला आहे. तसेच संपूर्ण गोवा राज्यातील परिसर या महोत्सवाच्या जागृतीने दुमदुमून गेला आहे.

मैदानाच्या मार्गावर उभारण्यात आलेली भव्य कमान

मैदानात मांडव घालणे, मैदानाच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमानी उभारणे, मैदानात वाहने येण्यासाठी प्रशस्त रस्ते करणे अशा प्रकारची सिद्धता वेगाने चालू आहे. व्यासपीठ, आसंद्यांची मांडणी, माध्यम प्रतिनिधींसाठी कक्ष, वाहनतळ आदी विविध भागांचे रेखांकन पूर्ण झाले असून त्यांच्या उभारणीचे काम वेगाने चालू आहे. मैदानावर धर्मध्वज उभारण्यासाठी चौथर्‍याचे बांधकाम करण्यात आले आहे. मैदानावरील व्यासपिठाच्या उभारणीचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

मैदानात उभारण्यात येत आलेले भव्य प्रवेशद्वार

राज्यात शेकडो होर्डिंग्ज (मोठे फलक) ठरले आकर्षणाचे केंद्र !

फोंडा येथे दर्शनी भागात लावण्यात आलेले भव्य होर्डींग

गोवा राज्यात मुख्यत्वे शहरांमध्ये ठिकठिकाणी या महोत्सवाचे वेगवेगळ्या आकारांचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. संपूर्ण गोवा राज्यात ६०० हून अधिक फलक, तसेच १०० हून अधिक होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. विमानतळ, बसस्थानक, रेल्वेस्थानक या मार्गांवर लक्षवेधी ठिकाणी लावण्यात आलेले हे होर्डिंग्ज सर्वांचे लक्ष आकर्षून घेत आहेत. फोंडा शहरातील मुख्य ठिकाणी (बोरी येथील पेट्रोलपंपाच्या अलीकडचा चौक) भगवान श्रीकृष्ण शंखनाद करत असल्याचे लावण्यात आलेले ‘कटआऊट’ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हेच या महोत्सवाचे बोधचिन्हही आहे. अनेक धर्मप्रेमी आणि पर्यटक यासमवेत ‘सेल्फी’ घेत आहेत, तसेच छायाचित्र काढत आहेत. ‘गोव्याला आध्यात्मिक पर्यटनात अग्रेसर करणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हे होर्डिंगवरील लिखाण गोव्याची आध्यात्मिक ओळख निर्माण करत आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशांतील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी दिली.

मडगाव येथील रस्त्यांवर लावण्यात आलेले होर्डिंग्ज

फोंडा, १३ मे (वार्ता.) – एरव्ही पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे गोवा राज्य सध्या मात्र एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. ही चर्चा आहे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची ! सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव यांच्या निमित्ताने १७ ते १९ मे या कालावधीत येथील फर्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात या भव्य-दिव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या महोत्सवाची सिद्धताही अत्यंत गतीने चालू आहे. राज्यात ठिकठिकाणी लावण्यात आलेले फलक, भित्तीपत्रके, होर्डिंग्ज, भगवे ध्वज, भव्य स्वागत कमानी यांमुळे वातावरणनिर्मिती झाली आहे. एकूणच गोव्यात शंखनाद महोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत.

फर्मागुडी, फोंडा येथील रस्त्यावर दुतर्फा लावण्यात आलेले भगवे ध्वज

मडगाव रेल्वे स्थानकाच्या परिसरातील कटआऊट ठरत आहेत लक्षवेधी !

गजबजलेल्या मडगाव रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच दृष्टीस पडते ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेले महोत्सवाचे फलक ! मडगाव रेल्वे स्थानकाच्या प्रमुख प्रवेशद्वाराच्या पुढील चौकात लक्ष वेधले जाते, ते तेथे असलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या बोधचिन्हाच्या वर्तुळाकार ठेवलेल्या ‘कटआऊट’ने. या कटआऊटची रचना वैशिष्ट्यपूर्ण केली असल्याने तेथून ये-जा करणारे लोक या कटआऊटचे केवळ निरीक्षणच करत नाहीत, तर अनेक जण त्याचे छायाचित्रही काढत आहेत. त्यापुढे रस्त्यात प्रत्येक ५ मिनिटावर महोत्सवाला येणार्‍या संतांची छायाचित्रे असलेली भव्य होर्डिंग्ज लोकांना खुणावतात.

हाच भाग गोवा विमानतळावरून शहरात जाणार्‍या द्रुतगती मार्गांवरही पहाण्यास मिळतो. तेथे तर भव्य आणि अतीभव्य होर्डिंग्ज महोत्सवाची भव्यता अन् दिव्यता आपल्याला लक्षात आणून देतात.

सिंधुदुर्गवासीयही उत्सुक !

महोत्सवासाठी सिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओजचाही सामाजिक माध्यमांतून व्यापक प्रमाणात प्रसार चालू आहे. गोवा राज्याच्या शेजारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश गावांतील भजनी मंडळे, अनेक व्हॉट्सअ‍ॅप गट यांमध्ये या व्हिडिओजचा प्रसार चालू आहे. त्यामुळे या महोत्सवाच्या आयोजनामुळे सिंधुदुर्गवासीयही उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

ब्रह्म, विष्णु आणि महेश या तिन्ही शक्तींच्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी पिवळ्या रंगातील आकर्षक भव्य स्वागत कमान उभी !

या महोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी येथील सनातनच्या रामनाथी आश्रमासमोरील प्रवेशद्वारावर पिवळ्या रंगातील भव्य अशी स्वागत कमान उभी करण्यात आली आहे. ब्रह्म, विष्णु आणि महेश या तिन्ही शक्तींचे एकरूप म्हणजे साक्षात् श्री गुरुदेव दत्त आहे. श्री दत्तानांही पिवळा रंग प्रिय आहे आणि सनातनचा रंगही पिवळा आहे. त्यानुसार या कमानीवर पिवळा रंग आहे. जणूकाही या तिन्ही शक्तींचा अनुभव या कमानीला पाहिल्यावर येतो. कलियुगात गुरुकृपायोगानुसार साधना महत्त्वाची असल्याने या कमानीवर गुरु शिष्याला आशीर्वाद देत असलेले बोधचिन्ह लावून भारताची गुरु-शिष्य परंपरा अधोरेखित करण्यात आली आहे, तसेच या कमानीवर कमळाच्या फुलाचेही चित्र आहे. याचाच अर्थ या कमानीवर भगवान श्री विष्णु आणि श्रीकृष्ण यांसह महालक्ष्मी देवीचेही वास्तव्य असल्याचे दिसून येते.

‘पिवळ्या रंगातील आकर्षक स्वागत कमानीतून आज जातांना श्रीकृष्णाच्या द्वारकानगरीत जात आहोत’ असा भाव मनी जागृत होत आहे. या कमानीतून जातांना  जणू द्वारकानगरीतील श्रीकृष्णाला म्हणजे, महर्षींनी जीवनाडीपट्टीत वर्णिलेले श्री विष्णूचे अंशात्मक अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत, असा भाव जागृत होतो.

Leave a Comment