२३ देशांतील लोकसहभाग : शंखनाद महोत्सव ठरणार आध्यात्मिक पर्यटनाचा नवा अध्याय !

Article also available in :

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने पणजी (गोवा) येथे पत्रकार परिषद

डावीकडून सर्वश्री युवराज गावकर, जयेश थळी, राज शर्मा, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, संजय घाडगे, नितीन फळदेसाई आणि अनिल नाईक

पणजी (गोवा) – १७ ते १९ मे या कालावधीत सनातन संस्थेच्या वतीने फर्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘इन्फिनिटी मैदाना’त होणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ धार्मिक नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आध्यात्मिक जागृतीचा महोत्सव ठरणार आहे. २३ देशांतील प्रतिष्ठित मान्यवर, विविध संप्रदायांचे संत-महंत, मंदिरांचे विश्‍वस्त आणि २५ सहस्रांहून अधिक साधक अन् भाविक यांचा सहभाग आणि यज्ञयागामुळे हा महोत्सव काशी, उज्जैन, अयोध्या यांप्रमाणे आध्यात्मिक पर्यटनाचा नवा अध्याय असणार आहे. त्यामुळे विकासालाही गती मिळेल, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी आज पणजी येथील पत्रकार परिषदेत दिली.

येथील ‘हॉटेल मनोशांती’मध्ये आयोजित पत्रकार परिषदेला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री. संतोष घोडगे, सांस्कृतिक न्यासाचे श्री. जयंत मिरिंगकर, आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. नितीन फळदेसाई, कुंडई तपोभूमी येथील पद्मनाभ संप्रदायाचे श्री. सुजन नाईक, ब्राह्मण महासंघाचे श्री. राज शर्मा, जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे अनुयायी श्री. अनिल नाईक, गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. युवराज गावकर उपस्थित होते.

मंदिरे ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा आत्मा नि कणा !

श्री. राजहंस पुढे म्हणाले की, काशी विश्‍वनाथ कॉरिडॉर आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरामुळे उत्तरप्रदेशाला प्रतिवर्षी अनुमाने २२ सहस्र कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात ७ व्या क्रमांकावर असलेले उत्तरप्रदेश आता अग्रस्थानावर पोचले आहे. यावरून केवळ आध्यात्मिक पर्यटनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना कशी मिळू शकते, हे स्पष्ट होते. पूर्वी ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोव्यालाही असा लाभ निश्‍चितच मिळू शकतो. मंदिरे किंवा धार्मिक कार्ये यांना अंधश्रद्धा समजणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, मंदिरे ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा आत्मा आणि कणा आहेत. आज जागतिक स्तरावरील औद्योगिक शहरे लयाला जात असतांना उज्जैन, तिरुपती, रामेश्‍वरम्, काशी यांसारखी तीर्थक्षेत्रे असलेली शहरे सहस्रो वर्षांपासून टिकून आहेत, तसाच त्यांच्या परिसराचाही विकास झाला आहे.

या तीन दिवसीय महोत्सवासाठी देश-विदेशातून २५ सहस्रांहून अधिक भाविक, साधक, प्रतिष्ठित लोक गोव्यात दाखल होणार आहेत. हे सर्वजण येथे ३ ते ५ दिवस निवास करतील, प्रवास करतील, स्थानिक वाहने वापरतील, मंदिरांना भेटी देतील, हॉटेल, बाजार, रेस्टॉरंट्स, पर्यटनस्थळे यांचा लाभ घेतील. यामुळे सर्व स्थानिक व्यवसाय आणि रोजगार यांना चालना मिळेल. या सर्व प्रक्रियेतून जो जी.एस्.टी. (वस्तू आणि सेवा कर) भरला जाईल, त्यामधून राज्य सरकारलाही मोठे उत्पन्न मिळणार आहे.

महोत्सवातून होणार उज्ज्वल आध्यात्मिक भविष्यासाठीचा शंखनाद !

अन्य व्यवसायांच्या तुलनेत आध्यात्मिक पर्यटन हे एक सुरक्षित आणि शाश्‍वत विकासासमवेत समाजातील नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना करणारे माध्यम आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून मंदिर परंपरा, लोककला, सांस्कृतिक ओळख, तसेच साधना, आध्यात्मिक विचारसरणी आणि राष्ट्रनिष्ठ मूल्ये यांचा जागर करण्यात येणार आहे. एकूणच ‘शंखनाद महोत्सव’ हा उज्ज्वल आध्यात्मिक भविष्यासाठीचा शंखनाद आहे. या महोत्सवाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळाला भेट द्या, असे आवाहनही श्री. राजहंस यांनी या प्रसंगी बोलतांना केले.

१ सहस्र वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे होणार दुर्मिळ दर्शन !

१ सहस्र वर्षांपूर्वीच्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे होणार दुर्मिळ दर्शन !

या वेळी बोलतांना श्री. राजहंस म्हणाले की, ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त १ सहस्र वर्षांपूर्वीच्या सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी सर्वांना मिळणार आहे. हे शिवलिंग मूर्तीभंजक गझनी याने तोडले होते आणि नंतर त्याचा पुढे अग्निहोत्र संप्रदायाच्या साधकांनी सांभाळ केला. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने आता हे शिवलिंग महोत्सवाच्या ठिकाणी लोकांच्या दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

‘न भूतो न भविष्यती’ असा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

डावीकडून सर्वश्री संजय जोशी, अनंत आगाशे, अभय वर्तक, अरविंद बारस्कर, गणेश गायकवाड

रत्नागिरी, १० मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यांच्या निमित्ताने गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र, गोवा, उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री, तसेच संत उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाला सनातन धर्माकडे आकृष्ट झालेले १५ देशांतील अनेक जण येणार आहेत. या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ‘न भूतो न भविष्यती’ अशा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिली. १० मे या दिवशी शहरातील मारुति मंदिर येथील ‘हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख श्री. गणेश गायकवाड, शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, रत्नागिरी येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. अनंत आगाशे आणि सनातन संस्थेचे श्री. महेंद्र चाळके उपस्थित होते.

 

रत्नागिरी जिल्ह्यातून महोत्सवासाठी १ सहस्र ३०० हून अधिक हिंदू उपस्थित रहाणार ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

या ऐतिहासिक महोत्सवाला जिल्ह्यातून १ सहस्र ३०० हून अधिक हिंदू सहभागी होणार आहेत. यामध्ये मठाधिपती प.पू. उल्हासगिरी महाराज; भगवान परशुराम देवस्थान, चिपळूणचे विश्वस्त ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे; महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे; हिंदु जागरण मंचाचे श्री. चंद्रकांत राऊळ; पतंजलि योग समितीचे जिल्हा प्रभारी अधिवक्ता विद्यानंद जोग; क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरीचे कार्याध्यक्ष श्री. राकेश नलावडे; भाजपचे चिपळूण तालुकाध्यक्ष श्री. विनोद भुरण आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

‘मी भगवंताचे देणे आहे’, असे समजून अखंडित कार्य करायला हवे ! – अनंत आगाशे, रत्नागिरी येथील प्रसिद्ध उद्योजक

सनातन संस्थेच्या माध्यमातून २५ वर्षे राष्ट्र आणि धर्म कार्य चालू आहे. याचाच एक भाग म्हणून सनातन राष्ट्रासाठी १ कोटी जपयज्ञ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. संतांच्या तेजस्वी वाणीतून सनातन राष्ट्राचा उद्घोष करणारे संत संमेलनही आयोजित करण्यात आले आहे. धर्मामुळे राष्ट्राचा विजय होतो. त्यामुळे मी धर्माचे म्हणजेच भगवंताचे देणे आहे, असे समजून अखंडित कार्य करायला हवे.

शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन म्हणजे धर्माभिमानी हिंदूंसाठी पर्वणीच ! – गणेश गायकवाड, जिल्हाप्रमुख, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी.

माझ्या ऐकण्यात नुकतेच आले की, आताचा योग महाभारताच्या काळाप्रमाणे आहे. धर्माला ग्लानी आलेली असतांना ईश्वराच्या संकल्पाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा शंखनाद गोवा येथे होणार आहे. सनातन संस्था सर्व संघटनांना एकत्र करून मोठे कार्य करत आहे. हिंदु देवतांनी हातात शस्त्रे धारण केली आहेत. राष्ट्राच्या सीमा या शस्त्रांनीच आखायच्या असतात, हे ध्यानात घेऊन या महोत्सवात शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. सर्व धर्माभिमानी हिंदूंसाठी ही पर्वणी आहे.

१० हून अधिक संतांच्या चरण पादुकांचे दर्शन ! – अरविंद बारस्कर, शिवचरित्र कथाकार

या कार्यक्रमाच्या माध्यमातून प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधर स्वामी, कानिफनाथ महाराज, साईबाबा, प.पू. गगनगिरी महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, प.पू. भक्तराज महाराज अशा १० हून अधिक संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला होणार आहे.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी बोलणे, हे माझे सद्भाग्य समजतो. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली, तेव्हा तेव्हा भगवंताने अवतार धारण केला आहे. ज्याप्रमाणे महर्षि व्यास यांनी वेद, उपनिषदे या साहित्याचे संपादन केले, तेच कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले २१ व्या शतकात करत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जनसामान्यापर्यंत पोचवण्यासाठी साधक निर्माण केले. त्यामुळे हे कार्य घराघरांत पोचले. सनातन संस्थेचे मोठे कार्य असून ते वहात्या नदीप्रमाणे आहे. ज्यामुळे प्रदेश ‘सुजलाम्’, ‘सुफलाम्’ होतो. यामुळे मन, बुद्धी आणि चित्त यांची मशागत होते.

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना डावीकडून अधिवक्ता भरत देशमुख, श्री. वसंत पाटील, अधिवक्ता प्रविण जंगले आणि अधिवक्ता निरंजन चौधरी

जळगाव – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यांचे औचित्य साधून विश्‍वकल्याणार्थ रामराज्यासमान ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोव्यात १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी जळगाव जिल्ह्यातून ४०० हून अधिक साधक, तसेच धर्मप्रेमी हिंदु उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे श्री. वसंत पाटील यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला ‘महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल’चे माजी अध्यक्ष अधिवक्ता भरत देशमुख, अधिवक्ता प्रविण जंगले, तसेच अधिवक्ता निरंजन चौधरी हेही उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले की, १९ मे या दिवशी विश्‍वकल्याणार्थ तथा सनातन धर्मियांच्या आरोग्यासाठी महाधन्वंतरि यज्ञ होणार आहे.

 

Leave a Comment