भाग्यनगर (तेलंगाणा) येथे जागतिक अध्यात्म महोत्सवाला प्रारंभ; सनातन संस्था सहभागी !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे जागतिक अध्यात्म महोत्सवाला प्रारंभ !

भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड हे अनुक्रमे १५ आणि १६ मार्च या दिवशी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

या महोत्सवाच्या माध्यमातून ३०० आध्यात्मिक संस्था आणि ७५ सहस्रांहून अधिक प्रतिनिधी जागतिक समरसता प्रकट करण्याच्या समान ध्येयाने एकत्र आले आहेत. या अध्यात्म परिषदेत जगभरातून अनुमाने १० लाख लोक ऑनलाईन सहभागी होणार आहेत.

‘हार्टफुलनेस’चे मार्गदर्शक प.पू. चिन्नाजीयर स्वामीजी आणि दाजी (कमलेशजी पटेल), श्री रामचंद्र मिशनचे अध्यक्ष स्वामी बोधमयानंदजी, जगभरातील सर्व प्रमुख धर्मांतील आध्यात्मिक गुरु, संत अन् धर्मगुरु या महोत्सवाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे 14 ते 17 मार्च पर्यंत आयोजित ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’त सनातन संस्था सहभागी होणार !

‘जगाला अध्यात्मच एकत्र आणू शकते’, हा संदेश देण्यासाठी महोत्सव !

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि ‘हार्टफुलनेस’ नावाची आध्यात्मिक संस्था ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’चे आयोजन करत आहे. हा महोत्सव १४ ते १७ मार्च या ४ दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. ‘कान्हा शांति वनम्’ नावाच्या ध्यानधारणेसाठीच्या जगातील सर्वांत मोठ्या सभागृहात हा महोत्सव होणार आहे. यामध्ये विविध योगमार्गांनी साधना करणार्‍या ३०० हून अधिक आध्यात्मिक संस्थांचा सहभाग असणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात येईल. या वेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हेही उपस्थित रहाणार आहेत. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी येथे ९ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या पत्रकार परिषदेला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी, प.पू. चिन्नाजीयर स्वामीजी, ‘हार्टफूलनेस’ संस्थेचे मार्गदर्शक दाजी (कमलेशजी पटेल), तसेच श्री रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी बोधमयानंदजी यांनी संबोधित केले. या वेळी अन्यही आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या महोत्सवात सनातन संस्था सहभागी होणार आहे.

वैचारिक प्रदूषणांवर उपाय योजण्यातच सर्व समस्यांचे निराकारण ! – दाजी, मार्गदर्शक, ‘हार्टफुलनेस’

या वेळी ‘हार्टफुलनेस’चे मार्गदर्शक दाजी (कमलेशजी पटेल) म्हणाले की, विविध योगमार्गांनुसार साधना करणारे या ४ दिवसांत एकत्र येणार आहेत. या महोत्सवाद्वारे विचारांचे आदान-प्रदान होऊन वैयक्तिक शांती कशी प्राप्त करता येईल ?, यावर प्रायोगिक स्तरावर उपाय आणि दृष्टीकोन तयार होऊ शकेल. या माध्यमातून समाजात एकोपा निर्माण होण्यास साहाय्य होईल. आपल्याला जगाला संदेश द्यायचा आहे की, धर्म हे एकमेकांच्या विरुद्ध नाहीत. अध्यात्म हे लोकांना एकत्रित आणू शकते. वैचारिक प्रदूषण ही सर्वांत मोठी समस्या आहे. यावर उपाय योजण्यातच सर्व समस्यांचे निराकारण आहे.

संस्कृती आणि अध्यात्म ही भारताची ‘सॉफ्ट पावर’ ! – केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी

संस्कृती आणि अध्यात्म ही भारताची ‘सॉफ्ट पावर’ आहे. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा हा कोट्यवधी लोकांच्या जीवनातील प्रतिदिनचा अविभाज्य घटक बनला आहे. भारतामध्ये आध्यात्मिक पर्यटन विकसित झाले असून वेगवेगळ्या देशांतील लोक अध्यात्म शिकण्यासाठी भारतातील विविध आश्रमांत येत आहेत. या ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’चे ब्रीदवाक्य हे ‘जी-२०’च्या ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या सामायिक सूत्रावरच आधारित आहे.

Leave a Comment