‘वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’च्या वतीने सनातन संस्थेचा ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्कार देऊन सन्मान !

देहरादून – ‘वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’च्या वतीने देशभरातील सांस्कृतिक, सामाजिक आणि हिंदुत्वाच्या क्षेत्रात समर्पित भावाने उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवर व्यक्ती आणि संस्था यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सनातन संस्थेला ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ (पिलर्स ऑफ हिंदुत्व) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देहरादून (उत्तराखंड) येथील सांस्कृतिक विभागाच्या ऑडिटेरीयममध्ये हा सन्मान सोहळा पार पडला. या वेळी ‘देवभूमी रत्न पुरस्कार’ आणि ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ‘वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’च्या अध्यक्षा डॉ. वैदेही ताम्हण यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले होते.


या वेळी श्री. अभय वर्तक यांनी पुरस्कार स्वीकारतांना ‘वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’ आणि अध्यक्षा डॉ. वैदेही ताम्हण यांचे सनातन संस्थेच्या वतीने आभार मानले. ते पुढे म्हणाले की, सनातन संस्था ही एकमात्र अशी संस्था आहे, जी संतांच्या मार्गदर्शनानुसार अध्यात्मावर सखोल संशोधन करते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना केली. त्यांनी अध्यात्माच्या विविध विषयांवर 364 हून अधिक ग्रंथ 13 भाषांत प्रकाशित केले आहेत. आपण सनातनच्या आश्रमाला भेट देऊन अध्यात्मावरील संशोधनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे मी सर्वांना आवाहन करतो.

डॉ. भगतसिंह कोश्यारी यांनी ‘वेदशास्त्र रिसर्च ॲण्ड फाऊंडेशन’ आणि त्यांच्या अध्यक्षा डॉ. वैदेही ताम्हण यांच्याविषयी म्हणाले की, भारतभरातील विविध राज्यांतील सामाजिक, सांस्कृतिक आणि हिंदुत्वाच्या क्षेत्रातील मान्यवरांची निवड करून त्यांना सन्मानित केले, यासाठी व्यापक संशोधनाची आवश्यकता असते. हे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्याप्रमाणे वेदांचे शिक्षण देणार्‍या अनेक संस्थांची आज आवश्यकता आहे.

या सोहळ्याला श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्यासह श्री सतपाल महाराज, श्री. तीरथ सिंह रावत, श्री हरी चैतन्य पुरी महाराज आणि डॉ. उमाकानंद सरस्वती महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी श्री सतपाल महाराज, श्री. चंडी प्रसाद भट, स्वामी दिनेशानंद भारती, मधु भट, कुसुम खंडवाल, उर्मि नेगी, आय.ए.एस्. डॉ. आशिष चौहान, कर्नल डी.एस्. बर्तवाल, डॉ. यशवीर सिंग आणि लेफ्टनंट जनरल जयवीर सिंग नेगी या मान्यवरांना ‘देवभूमी रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच सनातन संस्थेसह स्वामी श्री हरि चैतन्य महाराज, भाजपचे खासदार श्री. गोपाल शेट्टी, श्री. गोलंदे महाराज, श्री. उद्बोध महाराज पैठणकर, श्री. अतुल जेसवानी, श्री. प्रदोष चव्हाणके, गीता प्रेस आणि कुर्माग्राम आश्रम यांना ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ (पिलर्स ऑफ हिंदुत्व) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

– श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

Leave a Comment