पांडवांच्या वास्तव्याने पावन झालेला एरंडोल (जळगाव) येथील पांडववाडा !

Article also available in :

पुरातन वास्तूंद्वारे भारताला मिळालेली वैभवसंपन्न इतिहासाची देणगी !

जळगाव शहरापासून २७ कि.मी. अंतरावर एरंडोल हे तालुक्याचे गाव आहे. हे गाव म्हणजे महाभारतकालीन एकचक्रनगरी ! एरंडोलचे प्राचीन नाव ऐरणवेल किंवा अरुणावती असे होते. ते अंजनी नदीच्या काठी वसले आहे. महाभारताच्या आधी पांडव अज्ञातवासात असतांना ते याच एक चक्रानगरीमध्ये वास्तव्यास होते. ते ज्या वाड्यात राहिले, तो वाडा म्हणजे पांडववाडा ! आजही एरंडोलमध्ये ऐतिहासिक वास्तू म्हणून पांडववाडा प्रसिद्ध आहे. एरंडोलपासून १५ किलोमीटरवर असलेल्या पद्मालय येथे जाऊन भीमाने बकासुराचा वध केला. आजही पद्मालयापासून दीड किलोमीटरवर भीमकुंड, भीमाचे जाते, तसेच भीम आणि बकासुर यांच्या युद्धांच्या खुणा पहायला मिळतात. एरंडोल येथे भीमाची वाटी अजूनही दिसते. वाड्याच्या जवळच असलेल्या विहिरीला द्रौपदीकूप असेही म्हणतात. अनेक पर्यटक महाभारतकालीन पांडववाडा आणि पद्मालय येथे भेट देतात. या महाभारतकालीन पांडववाड्याचा शासकीय गॅझेटमध्ये (राजपत्रामध्ये) पांडववाडा असा उल्लेख आहे. काही वर्षांपूर्वी शालेय अभ्यासक्रमातही पांडववाड्याचा एक धडा अभ्यासासाठी होता. त्यामुळे शालेय मुलांच्या सहलीही पांडववाडा पहाण्यासाठी यायच्या.

पांडववाडा ही वास्तू ४५१५.९ चौरस मीटर क्षेत्रफळात उभी आहे. पांडववाड्याच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडेच दगडांमध्ये प्राचीनकालीन कोरीव नक्षीकाम आहे. यात कमळफुलांची नक्षी स्पष्ट दिसते. वाड्याच्या शेजारी धर्मशाळा आहे. असे केवळ हिंदू मंदिरांच्या शेजारीच आढळते. आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला मोकळी जागा आहे. तेथील भिंतींना अनेक खिडक्या आहेत. या प्राचीन खिडक्यांना समईच्या, तसेच कमळाच्या आकाराचे नक्षीकाम आहे. वाड्याच्या शेवटी मंदिराप्रमाणे गर्भागृह आहे. त्याच्या शेवटी मूर्ती ठेवण्याची जागा ही हिंदु वास्तूरचनेप्रमाणे आहे.

– श्री. सुनील घनवट