गुरुपौर्णिमा निमित्त संत संदेश !

Article also available in :

१. महायुद्ध अटळ असल्याने प्राणरक्षणाच्या कृती आणि साधना यांना सर्वोच्च प्राधान्य द्या !- सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सध्या जागतिक पातळीवर प्रचंड उलथापालथ होत आहे. जागतिक स्तरावर महायुद्ध हे अटळ असून, पुढील ५ ते ७ वर्षे अत्यंत भीषण अशी युद्धजन्य परिस्थिती सर्वत्र असणार आहे. हा काळ म्हणजे एक प्रकारे ‘संधीकाळ’ (संक्रमण काळ) आहे. पुढे अत्यंत वाईट आपत्काळ येणार आहे, हे गेली २० वर्षे ‘सनातन संस्था’ सांगत आहे. तो वाईट काळ आता यापुढे प्रत्यक्ष अनुभवावा लागणार आहे. या संकटकाळात जिवंत रहाण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी कोणत्या पूर्वसिद्धता कराव्यात ? तसेच कोणती साधना करावी ? याचे मार्गदर्शन सनातन संस्था वेळोवेळी ग्रंथ, नियतकालिके, संकेतस्थळे आदींच्या माध्यमांतून करत आली आहे. संस्थेद्वारे केले गेलेले हे मार्गदर्शन केवळ वाचण्यासाठी नसून ते कृतीत आणण्याची योग्य वेळ आता आली आहे. त्यामुळे कुठलाही विलंब न करता प्राणरक्षणासाठी आवश्यक असणार्‍या कृतींना सर्वोच्च प्राधान्य द्या, तसेच संकटकाळात भगवंत केवळ भक्ताचेच रक्षण करतो, हे लक्षात ठेवून कठोर साधना करा आणि भगवंताचे अनन्य भक्त बना !

गेल्या ५-७ वर्षांपासून, विशेषतः कोरोना महामारीच्या काळापासून ‘संपत्काळ’ (चांगला काळ) संपून ‘आपत्काळा’ला आरंभ झाला. आता गेल्या वर्षीपासून, म्हणजेच भारत-पाक युद्धापासून युद्धकाळ प्रारंभ झाला आहे. प्रत्येक काळाचे नियम वेगळे असतात. संपत्काळात मनोरंजन, प्रवास, नोकरी-व्यवसाय यांना जसे प्राधान्य असते, तसेच युद्धकाळात राष्ट्रीय कर्तव्ये पार पाडणे, जीवितरक्षणासाठी प्रयत्न करणे आणि साधना करणे यांना प्राधान्य असते. संधीकाळात साधना केल्याने अनेक वर्षांची साधना थोड्या कालावधीत होते. त्यामुळे पुढील ५-७ वर्षांच्या कठीण काळात साधनेवर भर दिल्यास तुम्हाला मोठा आध्यात्मिक लाभ होईल आणि ईश्वरी रक्षण लाभेल.

या भीषण युद्धकाळात केवळ स्वतःचा विचार न करता, समाजातील सात्त्विक हिंदूंचे (जिवांचे) रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा कठीण परिस्थितीत सात्त्विक हिंदूंच्या (जिवांच्या) प्राणरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे, हीच या काळातील खरी समष्टी साधना ठरणार आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था.

 

२. शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वभावदोष, प्रमाद आणि संभ्रम दूर करा ! – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

 

‘साध्यति निष्पादयति कार्यमिति इति साधकः।’ म्हणजे, जो (आध्यात्मिक उन्नती) साध्य करण्यासाठी निष्पत्ती (अपेक्षित फळ) मिळेपर्यंत सातत्याने कर्म (साधना) करत राहतो, तो साधक होय. असा खरा साधक बनण्याच्या प्रक्रियेतील सर्वांत मोठे अडथळे म्हणजे स्वभावदोष, प्रमाद आणि संभ्रम हे आहेत.

१. स्वभावदोष : आळसादी अनेक स्वभावदोषांमुळे साधनेची निष्पत्ती (गती आणि फळ) कमी होते. यासाठी साधकांनी ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. या प्रक्रियेद्वारे ‘स्वभावदोष’ या अडथळ्याचे निरसन करता येते.

२. प्रमाद : प्रमाद म्हणजे जाणूनबुजून किंवा अजाणतेपणी झालेले अयोग्य वर्तन. कर्मफलसिद्धांतानुसार प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागत असल्याने, कुठलाही प्रमाद साधकाची साधना खर्च करतो. परिणामी त्याची अपेक्षित आध्यात्मिक उन्नती होत नाही. प्रायश्चित्तादी कर्म करून प्रमादाचे परिमार्जन (निवारण) करता येते; म्हणून साधकाने घडलेल्या प्रमादासाठी प्रायश्चित्त घ्यायला हवे.

३. संभ्रम : साधकाच्या दृष्टीने सर्वांत मोठा अडथळा ठरणारी गोष्ट म्हणजे संभ्रम! संभ्रम ही साधकाने स्वतःहून निर्माण केलेली एक नकारात्मक मानसिक अवस्था असते. यात प्रामुख्याने तीन गोष्टी असतात.

अ. भ्रम (खोटे ते खरे वाटणे),

आ. द्वंद्व (‘हे योग्य कि अयोग्य’ अशा अनिर्णित अनिर्णयित अवस्थेत राहणे.),

इ. विकल्प (गुरु आणि साधना यांच्याविषयी मनात नकारात्मक विचार करणे.)

स्वभावदोष आणि प्रमाद यांवर आपण प्रयत्नांनी मात करू शकतो; पण संभ्रमावस्था दूर होण्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन किंवा गुरुकृपाच आवश्यक असते. गुरुरूपातील संतांचे मार्गदर्शन घेणे, हाच संभ्रमावस्था दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. या गुरुपौर्णिमेला शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी आपल्यातील अडथळारूपी स्वभावदोष, प्रमाद आणि संभ्रम दूर करण्याचा दृढ निश्चय करूया!’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी)

 

३. आपत्काळात रक्षण होण्यासाठी ईश्वराचे भक्त बना !  – श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘अनेक द्रष्टे आणि संत यांनी सांगितल्याप्रमाणे आपत्काळास प्रारंभ झाला आहे. पुढे येणार्‍या अत्यंत भीषण आपत्काळातून तरून जाण्यासाठी ‘सर्वांनी ईश्वराची भक्ती करणे’, हाच एकमेव उपाय असेल आहे !

भक्तीची पहिली पायरी म्हणजे जीवनात प्रत्येक कर्म करतांना ईश्वराप्रती अंतःकरणात भाव निर्माण करणे. यासाठी नित्य साधना करणे आवश्यक असते. गुरूंच्या चरणांची सेवा करतांना गुरुसान्निध्यात जिवाच्या अंत:करणात देवाप्रती आपोआप भाव निर्माण होतो. यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. गुरूंचे चरण न सोडणे, हे प्रत्येक जिवाचे जीवनातील अंतिम ध्येय असले पाहिजे. काहीजण म्हणतील, ‘आम्हाला गुरु नाहीत.’ अशा वेळी ‘आपली इष्ट देवता म्हणजे आपले गुरु’, असा भाव ठेवावा. यामुळे आपले संपूर्ण जीवनच बदलून जाते.

‘भाव तेथे देव’ या उक्तीप्रमाणे सतत देवाच्या अनुसंधानात रहाता येते. अनुसंधानाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनुसंधानामुळे जिवाला मायेचा विसर पडतो आणि त्याच्यासाठी जीवन एक ‘आध्यात्मिक आनंदाचा सागर’ बनते. यामुळे वर्तमानात त्याच्यावर कितीही संकटे आली, तरी तो त्याला हसत हसत सामोरे जातो. यालाच ‘देवकृपा होणे’ किंवा ‘गुरुकृपा होणे’, असे म्हणतात.

मनात ईश्वराप्रती अथवा गुरूंप्रती भाव असेल, तर ‘सर्वकाही देवाच्या इच्छेने होत आहे’, अशी श्रद्धा मनात निर्माण होते. आपत्कालात हीच श्रद्धा आणि भक्ती आपल्या जीवनाचा आधार बनते. श्रद्धेविना आणि भक्तीविना जीवनाचे तारू भरकटते.

आपत्काळात भावभक्तीच्या संगतीनेच आपण तरून जाऊ शकतो. ‘तिसरे महायुद्ध भयंकर असेल’, असे संतांचे सांगणे आहे. त्यासाठी आधीच मनाची आणि बुद्धीची सिद्धता करणे आवश्यक आहे. ‘नित्य साधना करणे’, हाच एक त्यावरील उत्तम उपाय आहे.

या गुरुपौर्णिमेला गुरूंना शरण जाऊन व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा योग्य मेळ घालण्याचा प्रयत्न करून तीव्र साधना करण्याचा संकल्प करूया ! गुरुदेव नक्कीच आपल्याला या कठीण काळात तारून नेतील, अशी निश्चिती बाळगूया !

आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून केवळ स्थूल सिद्धता नव्हे, तर भाव, त्याग, शरणागती आणि अहं-निर्मूलन यांद्वारे आत्मिक सिद्धताही करा ! तसे करण्याचा दृढ संकल्प या गुरुपौर्णिमेला करा आणि एक सहस्र पटींनी कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा आध्यात्मिक लाभ प्राप्त करून घ्या !’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी)

Leave a Comment