आनंदी जीवनासाठी आयुर्वेद समजून घ्या !

Article also available in :

जागतिक आरोग्य संघटनेचीही आरोग्याविषयीची व्याख्या केवळ ‘रोग नसणे म्हणजे आरोग्य’ अशी नसून सर्वतोपरी म्हणजेच ‘शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य, म्हणजे सुखसंवेदना अनुभवण्याची अवस्था म्हणजे आरोग्य’, अशी आहे.

आयुर्वेदात केवळ औषधच नव्हे, तर दैवी उपायांचाही समावेश आहे. यात मंत्रोपचाराचाही समावेश आहे. काही असाध्य रोग हे तीव्र प्रारब्धामुळे होतात. व्यक्तीला असाध्य रोग होणे हे तिच्या गेल्या काही जन्मांतील पापकर्माचे फळही असते. कुठल्या पापकर्मामुळे कुठला रोग होतो, हेही अध्यात्मशास्त्र सांगते. करणी किंवा दृष्ट लागणे आदी काही त्रासांमुळे काही रोग उद्भवलेले असतात. त्यावर त्यावर उतारा देणे किंवा दृष्ट काढणे यांसारखे उपाय करावे लागतात.

एकच रोग असला, तरी रोग्याचे वय, ताकद, वाढलेला दोष, ऋतु, प्रकृती इत्यादी अनेक गोष्टींचा विचार करून उपचार करावा लागतो. म्हणून आयुर्वेदाने ‘युक्ती’ हेही एक प्रमाण मानले आहे.

 

भवरोगातून मुक्ती !

आयुर्वेदाचा अंतिम उद्देश

आयुर्वेद केवळ रोगातूंनच नव्हे, तर भवरोगातून मानवाला मुक्ती देण्यासाठी आहे. शरीरस्वास्थ्य राखून साधना करत ईश्वरप्राप्ती करावी, हाच आयुर्वेदाचा अंतिम उद्देश आहे. त्यामुळे ऋतुचर्या आणि दिनचर्या आयुर्वेदानुसार आदर्श ठेवल्यास धर्माचरण अन् साधना होते आणि त्या माध्यमातून मानव सात्त्विक होत जाऊन त्याला ईश्वरप्राप्ती सुलभ होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले

भावी हिंदु राष्ट्रात आयुर्वेद हीच मुख्य उपचारपद्धत असेल ! – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

 

शरिरात रोग का आणि कसे निर्माण होतात ?


आयुर्वेदात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र) आणि अवयव यांची कार्यपद्धती वात, पित्त आणि कफ यांच्या भाषेत सांगितली आहे. वात, पित्त आणि कफ या कणांचे प्रमाण, तसेच गुणवत्ता यात फरक पडल्याने रोग कसे निर्माण होतात अन् ते साम्यावस्थेत आणल्याने रोग कसे नाहीसे होतात, याचे वर्णन आयुर्वेदाने केले आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचे, प्यायलेल्या पाण्याचे आणि श्वासातून घेतलेल्या वायूचे पचल्यानंतर वात, पित्त अन् कफ या कणांत रूपांतर होते. धातूंना अन्न म्हणजेच शक्ती पोचवण्याचे कार्य, तसेच पेशींच्या विविध क्रिया करण्याचे कार्य हेच कण करतात. शरिरातील या कणांचे प्रमाण वाढले किंवा अल्प झाले किंवा त्यांच्या गुणांत पालट झाल्यामुळे ते दूषित झाले, तर हेच कण शरिरात रोग उत्पन्न करतात. अशा अवस्थेत त्यांना वात, पित्त किंवा कफ दोष (वाढले असे) म्हणतात.

शरिरातील कार्य संपल्यावर याच कणांचे मळात रूपांतर होते आणि शौच, लघवी, घाम, उच्छ्वास इत्यादी रूपाने हे कण शरिराबाहेर पडतात. या अवस्थेत त्यांना वात, पित्त किंवा कफ मळ असे म्हणतात.

अन्न आणि औषधे यांनी शरिरातील त्यांच्यासारखे गुण अन् रचना असलेले दोष, धातू आणि मळ वाढतात, तसेच त्यांच्याविरुद्ध गुण आणि रचना असलेले दोष, धातू आणि मळ कमी होतात; उदाहरणार्थ उष्ण गुणांचा आहार अन् औषध यांनी शरिरातील पित्त वाढते आणि कफ अन् वात दोष न्यून होतात. तसेच शीत गुणाच्या द्रव्यांनी शरिरातील पित्त न्यून होते, तसेच वात आणि कफ दोष वाढतात. रोगाचे विशिष्ट कारण आणि त्यावरील विशिष्ट उपचार माहीत असल्यास आधुनिक वैद्यकशास्त्राने सांगितलेले उपचार करावेत. अन्यथा आयुर्वेदाने सांगितलेले उपचार करणे अधिक हितावह असते.

 

आयुर्वेदाने केलेले वात-पित्त-कफ यांचे वर्गीकरण पूर्णपणे वैज्ञानिक !

आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत शाश्वत तत्त्वांवर आधारित असल्याने आयुर्वेद कधीही कालबाह्य होणार नाही. याउलट आधुनिक प्रगतीचा आयुर्वेद नीट समजण्यासाठी उपयोग होईल !

स्वस्थ म्हणजेच आरोग्यवान माणूस कोण ?

समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः ।
प्रसन्नत्मेद्रियमनः स्वस्थ इत्यभिधीयते ।। – सुश्रुत सूत्रस्थान १५-४८

अर्थ : ज्याचे रस, रक्त इत्यादी सात धातू, वात, पित्त आणि कफ हे ३ दोष, शौच, लघवी, घाम इत्यादी मळ आणि अग्नी, पचनशक्ती योग्य प्रमाणात असून कार्यरत आहेत आणि ज्याची इंद्रिये, मन अन् आत्मा प्रसन्न आहेत. त्यास स्वस्थ, म्हणजेच आरोग्यवान माणूस समजावे.

 

आहार-विहार कटाक्षाने पाळला, तर प्रकृती ‘सम’ होत जाते !


आहार, विहार, वातावरण, देश (रहाण्याचे ठिकाण) इत्यादींचाही प्रकृतीवर परिणाम होतो, उदा. विश्रांती आणि अधिक ऊर्जा देणारा आहार अन् विहार वात आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना हितकर असतो. याउलट कफ प्रकृतीच्या व्यक्तींना थंड हवा मानवते, तर वात आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींना थंड हवा सहन होत नाही. योग्य आहार, विहार कटाक्षाने पाळला गेल्यास हळूहळू प्रकृती ‘सम’प्रकृतीकडे झुकू लागते.

 

समप्रकृती करण्यासाठी प्रयत्न करा !


वात, पित्त आणि कफ यांचे कण गुणवत्तेने चांगले अन् योग्य प्रमाणात असलेल्या व्यक्ती समप्रकृतीच्या असतात. खरे पहाता समप्रकृतीच्या व्यक्तीच आरोग्यवान असतात. वात, पित्त आणि कफ प्रकृतीला रोगी प्रकृती म्हणतात.

समप्रकृतीच्या व्यक्ती शरिराने सुदृढ आणि मनानेही स्थिर अन् शांत असतात. उन्हाळ्यातील गरम हवा, कडाक्याची थंडी आणि मुसळधार पाऊस यांचे ते आनंदाने स्वागत करतात. ते पुष्कळ अन्नही सहज पचवू शकतात आणि भूक अन् तहानही सहन करू शकतात. त्यांना रोग क्वचितच होतात. त्यांचा स्वभाव शांत आणि आनंदी असतो. समप्रकृतीच्या व्यक्ती पालटणार्‍या परिस्थितीला अधिक कणखरपणे तोंड देतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment