पाण्याची शक्ती आणि सकारात्मकता

Article also available in :

सर्व जणांप्रमाणे मलासुद्धा स्वयंपाकघर लख्ख केल्याखेरीज झोप येत नाही; पण स्वच्छ करून झाल्यानंतर गेले ६ मास मी एक गोष्ट आवर्जून करत आहे, ज्याचा मला प्रचंड लाभ झाला आहे. मी रात्री झोपतांना स्वयंपाकघरात असलेल्या देवघरामध्ये सायंकाळी लावलेला दिवा जर विझला असेल, तर तो लावतेच; पण त्यासह पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांजवळ देखील एक दिवा लावते आणि ज्या दिवशी शक्य असेल, त्या दिवशी तेथे एक फुलही वहाते, तसेच मनोभावे पाण्याच्या सर्व भांड्यांप्रती हात जोडून कृतज्ञता व्यक्त करते.

​काही जणांना वरील भाग वाचतांना विचित्र किंवा हास्यास्पद वाटेल; पण मी स्वतः एक डॉक्टर आहे. विज्ञानाच्या परीक्षेतून तावून सुलाखून बघितल्याखेरीज सहसा कोणत्याही गोष्टीवर विश्‍वास ठेवत नाही; पण ६ मासांपूर्वी ‘पाणी’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असे संशोधन माझ्या हाती लागले. त्यानंतर काही धार्मिक पुस्तकांमध्ये त्याचे जसेच्या तसे संदर्भही मिळाले. ते येथे सोप्या भाषेत देत आहे.

 

१. पाण्यामध्ये बाहेरून येणार्‍या प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेप्रमाणे पालट होणे ​

पाणी म्हणजे जीवन. पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते. पाणी पितांना ज्या प्रकारचे स्वतःचे विचार असतात किंवा ज्या मानसिक स्थितीमध्ये आपण पाणी पितो, त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि पर्यायाने स्वतःवर होतो. पाण्यामध्ये बाहेरून येणार्‍या प्रत्येक प्रकारच्या ऊर्जेप्रमाणे पालट होत असतात आणि त्या पालटाप्रमाणे ते तुमच्या शरिरावर परिणाम करत असते.

 

२. प्रत्येक व्यक्तीच्या शरिरावर पाण्याद्वारे होणारे विविध प्रकारचे कार्य

​पाणी हे प्रत्येक व्यक्तीच्या शरिरावर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. आपल्या शरिराचा जवळपास ७० ते ७५ टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे, म्हणजेच शरिराचे कार्य कसे चालावे, हे मुख्यत्वे आपण जे पाणी ग्रहण करतो, तेच ठरवत असते. पाणी पितांनाचे तुमचे विचार, पाण्याकडे बघण्याची तुमची दृष्टी, पाणी पितांना आजूबाजूला येणारे आवाज, पाणी पितांना तुमच्या मनातील भावना किंवा तुमच्या तोंडातून निघणारे उच्चार या सर्वांचा पाण्यावर प्रचंड परिणाम होतो. जे प्रत्यक्षात ‘मायक्रोस्कोप’ खाली सुद्धा बघता येते. तुमची मानसिक स्थिती जर प्रचंड सकारात्मक असेल आणि हातातील पाण्याविषयी जर तुम्ही प्रचंड कृतज्ञ असाल, तर गढूळ किंवा दूषित पाणीदेखील तुम्हाला काहीही अपाय करू शकत नाही. तसेच जर तुमची मानसिक स्थिती नकारात्मक असेल आणि पाणी पितांना जर तुम्ही पाण्याविषयी बेफिकीर असाल, तर अतिशय शुद्ध पाणीदेखील प्रचंड अपायकारक ठरू शकते.

 

३. पाण्याची ‘पेशीसंस्था’ मानवाच्या मज्जासंस्थेप्रमाणे कार्य करत असणे

पाणी हे ‘जिवंत’ असून मानवाची मज्जासंस्था ज्याप्रमाणे कार्य करते, त्याप्रमाणे पाणी आणि त्याची ‘पेशीसंस्था’ कार्य करते. जे पाणी हातात धरून किंवा जवळ ठेवून प्रेमाच्या भावना मनामध्ये आणल्या जातात, त्या पाण्याच्या पेशींचा किंवा कणांचा (मॉलेक्युल) आकार खूपच सुंदर असतो आणि जे पाणी हातात धरून किंवा जवळ ठेवून राग किंवा द्वेष अशा भावना मनात आणल्या जातात, त्या पाण्याच्या कणांचा आकार खूपच विचित्र अन् ओबड धोबड असतो. ज्या प्रकारे पाणी पितांना तुम्ही पाण्याला ‘ट्रीट’ (वागणूक) करता, ते पाणी खूप अधिक काळापर्यंत ‘लक्षात ठेवते’ आणि त्याप्रमाणे तुमच्या शरिरावर चांगले किंवा वाईट परिणाम करते.

 

४. ‘वॉटर थेरपी’ उदयास येणे

पाण्याचा विचार सध्या ‘लिक्विड कॉम्प्युटर’ म्हणून देखील केला जात असून त्यामध्ये पाण्याचा ‘लक्षात ठेवणे’ (मेमरी) हा गुणधर्म वापरला जात आहे. सध्या पाण्याच्या याच गुणधर्माचा वापर करून ‘तुम्हाला जो काही चांगला उद्देश साध्य करायचा आहे, तो उद्देश एका हातात पाण्याचा ग्लास घेऊन मग मनामध्ये बोलून मग ते पाणी पिणे’ यासारख्या विविध ‘वॉटर थेरपी’ उदयास येत आहेत. ही सगळी वैज्ञानिक माहिती असून ज्यांना अजून विस्तृत माहिती हवी असेल, त्यांनी इंटरनेटवर डॉ. मसारू इमोतो यांचे पाण्यावरील संशोधन वाचावे.

 

५. पाण्याची दिव्य आणि शक्तीशाली क्षमता लक्षात येण्यासाठी करायचे प्रयत्न

​पाण्याच्या या दिव्य आणि शक्तीशाली क्षमतांची सांगड हिंदु संस्कृती अन् चालीरिती यांच्याशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यातून जे काही हाती लागले, त्यावरून मी पुढील गोष्टी गेले ६ मास करत आहे.

१. पिण्याचे पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवूनच साठवावे आणि शक्यतो तांब्याच्या ग्लासानेच प्यावे; कारण तांबे हा धातू ऊर्जेचा ‘सुवाहक’ आहे.

२. प्रतिदिन रात्री ते तांब्याचे भांडे चिंच आणि हळद वापरून धुवावे.

३. त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी सुती कपड्यामधून गाळून भरावे.

४. यानंतर या पाण्याच्या भांड्याच्या बाजूला एक दिवा लावून भांड्यावर एक फूल ठेवावे आणि पाण्याविषयी मनामध्ये अत्यंत कृतज्ञतेचे भाव आणून हात जोडावेत.
(‘आम्हाला आयुष्य, आरोग्य आणि जीवन प्रदान केल्याविषयी कृतज्ञ आहोत’, असे किंवा या प्रकारचे कोणतेही चांगले विचार मनात आणून कृतज्ञता व्यक्त करू शकता.)

५. सकाळी उठल्यानंतर याच भांड्यातील पाणी पिऊन दिवसाला प्रारंभ करावा.

६. पाणी पिण्याचा सर्वांत योग्य मार्ग म्हणजे दोन हातांच्या ओंजळीत घेऊन पिणे; परंतु ते आपल्याला शक्य नसते. त्यामुळे पाणी पितांना ज्या भांड्यामध्ये किंवा पेल्यामध्ये प्याल, तो दोन्ही हातांनी पकडून पाणी पिणे.

७. पाणी पितांना जाणीवपूर्वक काही सेकंद पाण्याचा ग्लास दोन्ही हातात धरून मनामध्ये चांगले विचार, चांगल्या भावना आहेत, याची खात्री करूनच पाणी प्यावे.

८. हीच गोष्ट कुणाच्या घरी गेल्यावर किंवा बाहेर गेल्यावर कुठले पाणी पिण्याची वेळ आली, तर जाणीवपूर्वक थोडी जास्त वेळ करावी.

९. केवळ तहान लागल्यावरच पाणी प्यावे. विनाकारण सारखे सारखे पाणी पिऊ नये.

१०. आहारामध्ये पाणी अधिक प्रमाणात (८०-९० टक्के) असलेल्या फळांचा समावेश करावा.

 

६. योग्य प्रकारे पाणी प्यायल्याने झालेले लाभ

वरीलप्रमाणे पाणी पिण्यामुळे आणि ६ मास सलग प्रयत्न केल्यामुळे मला झालेले लाभ पुढीलप्रमाणे :

अ. माझी लहान मुलगी, जी प्रति मासाला आजारी पडत होती आणि तिला ‘अँटीबायोटिक्स’ (प्रतिजैविके) प्रत्येक मासाला द्यावे लागत होते, ते पूर्णतः बंद झाले.

आ. माझे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य खूप चांगले झाले, जे काही मासांपूर्वी प्रचंड बिघडलेले होते.

इ. माझ्या घरातील लोकांचा पित्ताचा (‘अ‍ॅसिडिटी’चा) त्रास जवळपास बंद झाला आहे.

ई. प्रतिदिन सकाळी घरातील वातावरण खूपच छान, हसते खेळते आणि ऊर्जेने भरलेले असते.

उ. माझा पाण्याकडे आणि एकूणच स्वयंपाकघराकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटला आहे.

ऊ. एखाद्या दिवशी दिवा लावायचा विसरला, तर पाण्याच्या चवीमध्ये जणावण्याइतका फरक असतो.

ए. मी माझ्या लहान मुलीलाही ही सवय लावली आहे. ती या गोष्टी आनंदाने करते.

 

७. पाण्याविषयी केलेले प्रयोग वैज्ञानिक आणि तार्किक पद्धतीने सिद्ध झालेले असणे​

अशा पद्धतीने पाणी पिण्यास प्रारंभ केल्यास कायम निरोगी रहाण्यासाठी याचा लाभ होऊ शकेल. या लिखाणाला अंधश्रद्धा समजण्याचा प्रश्‍न येत नाही; कारण वरील सर्व सूत्रे वैज्ञानिक आणि तार्किक पद्धतीने सिद्ध झालेली आहेत. आपली तीर्थक्षेत्रे किंवा नद्यांचे कुंड अथवा देवळांमध्ये दिले जाणारे तीर्थ किंवा जेवणापूर्वी पाण्याने ५ वेळा घेतली जाणारी अपोष्णी आदी सर्व काही हिंदु संस्कृतीने पुरातन काळापासून पाण्याच्या अमर्याद अफाट आणि जिवंत शक्तीच्या अभ्यासातूनच आपल्यापर्यंत पाण्याचे महत्त्व अन् लाभ पोचवण्यासाठी सिद्ध केलेले प्रकार आहेत. याची जाणीव ठेवणे, हे आपले आद्यकर्तव्य आहे. स्वयंपाकघरातीलच काय, आयुष्यातील एकही काम पाण्याविना होऊ शकत नाही. त्यामुळे आजपासूनच पाण्याची शक्ती जाणून घेऊन तिचा पुरेपूर वापर करण्यास प्रारंभ करूया.

– डॉ. गौरी कैवल्य गायकवाड, बार्शी, जिल्हा सोलापूर.

Leave a Comment