संस्कृत भाषेचा अभिमान वाटणारी किमया !

Article also available in :

संस्कृत भाषा संगणकासाठी सर्वांत योग्य भाषा असण्याचे कारण

इंग्रजी भाषेचा अभ्यास करतांना एक वाक्य सतत सांगितले जाते, ते म्हणजे ‘ A QUICK BROWN FOX JUMPS OVER THE LAZY DOG.’ या वाक्याचे विशेषत्व हे आहे की, या वाक्यात इंग्रजी वर्णमालेतील सर्व वर्ण आले आहेत; पण आपण जर पाहिले, तर या वाक्यात काही त्रुटी आढळून येतात. जसे की, इंग्रजी वर्णमालेत २६ वर्ण असतांना इथे मात्र ३३ आले आहेत. O,A,E,U,R यांचा परत परत वापर केला गेला आहे, तसेच A,B,C,D हा क्रम पाळला गेलेला नाही. तेच जर आपण खालचा श्‍लोक पाहिला तर संस्कृत भाषेची किमया आपल्याला लक्षात येईल –

क:खगीघाङ्चिच्छौजाझाञ्ज्ञोटौठीडढण: ।
तथोदधीन पफर्बाभीर्मयोऽरिल्वाशिषां सह ॥

अर्थ : पक्ष्यांविषयी प्रेम, शुद्ध बुद्धीचा, दुसर्‍याच्या बलाचे अपहरण करण्यात पारंगत, शत्रू संहारात अग्र, मनाने निश्‍चल आणि निर्भीड अन् महासागराचे सर्जन करणारा कोण आहे ? असा राजा मय ज्याला त्याच्या शत्रूंचेदेखील आशीर्वाद प्राप्त आहेत.

यात जर आपण पाहिले, तर संस्कृत वर्णमालेतील सर्व ३३ व्यंजन आली आहेत आणि तीही अगदी क्रमाने ! तसेच जर आपण संस्कृत वर्णमाला पाहिली, तर ती सर्वांत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली आहे, असे आपल्या लक्षात येईल.

स्वर – अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अः ।
व्यंजन –
कंठ्य – क ख ग घ ङ ।
तालव्य – च छ ज झ ञ ।
मूर्धन्य – ट ठ ड ढ ण ।
दन्त्य – त थ द ध न ।
ओष्ठ्य – प फ ब भ म ।
मृदु व्यञ्जन – य र ल व श ष स ।
महास्फुट प्राण- ह क्ष ।

वरील वर्गीकरण जरी पाहिले, तरी आपल्या लक्षात येईल की, संस्कृत भाषा किती वैज्ञानिक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वर आणि व्यंजन वेगवेगळे असून इंग्रजीसारखे सर्व एकत्र नाही. परत व्यंजनातही अजून वर्गीकरण – कंठातून येणारे व्यंजन कंठ्य, तालातून येणारे तालव्य, टाळू आणि जीभ यांच्याद्वारे मुर्ध्न्य आणि ओठाद्वारे ओष्ठ्य. त्यातही कंठ ते ओठ क्रम अगदी योग्य आहे. परत पुढे जर पाहिले, तर प्रत्येक वर्गातील १ आणि ३ व्यंजन अल्पप्राण (अल्प श्‍वास लागणारे) आणि २ अन् ४ व्यंजन महाप्राण (जास्त श्‍वास लागणारे). प्रत्येक वर्गातील पाचवे व्यंजन म्हणजे अनुनासिक अर्थात् नाकाचा वापर करून उच्चारावे लागते. त्यामुळेच संस्कृत भाषा ही संगणकासाठी सर्वांत योग्य भाषा आहे, असे वैज्ञानिकांचे मत आहे.

सर्वोत्कृष्ट संस्कृत भाषेचा प्रत्येकाला अभिमान हवा !

संस्कृत भाषेची जादू बघायची झाल्यास आपण संस्कृतमधील वेगवेगळ्या साहित्याचा अभ्यास करून पाहू शकतो. त्यातील काही विशिष्ट उदाहरणे खाली देत आहे.

अ. ‘माघ’ नावाचे एक महाकवी भारतामध्ये होऊन गेले. त्यांनी त्यांच्या ‘शिशुपालवधम्’ या महाकाव्यात केवळ ‘भ’ आणि ‘र’ यांचा वापर करून एक श्‍लोक सिद्ध केला. तो असा –

भूरिभिर्भारिभिर्भीरैर्भूभारैरभिरेभिरे ।
भेरीरेभिभिरभ्राभैरभीरुभिरिभैरिभाः॥

– शिशुपालवधम्, सर्ग १९, श्‍लोक ६६

अर्थ : भूमीलाही वजनदार वाटेल, अशा वाद्ययंत्राप्रमाणे आवाज काढणार्‍या आणि मेघाप्रमाणे कृष्णवर्ण असणार्‍या निर्भीड हत्तीने आपल्या शत्रू हत्तीवर आक्रमण केले.

आ. तसेच ‘किरातार्जुनीयम्’ या काव्य संग्रहात महाकवी ‘भारवि’ यांनी केवळ ‘न’ चा वापर करून श्‍लोक सिद्ध केला.

न नोननुन्नो नुन्नोनो नाना नानानना ननु ।
नुन्नोऽनुन्नो ननुन्नेनो नानेना नुन्ननुन्ननुत् ॥

– किरातार्जुनीयम्, सर्ग १५, श्‍लोक १४

अर्थ : हे अनेक मुखे असलेल्या गणांनो, जो मनुष्य युद्धात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून पराजित होतो, तो खरा मनुष्य नाही; जो आपल्यापेक्षा दुर्बलांना पराजित करतो, तोही खरा मनुष्य नाही. युद्धात ज्या मनुष्याचा स्वामी पराजित नाही, तो पराजित होऊनही पराजित म्हटला जात नाही आणि घायाळ मनुष्याला घायाळ करणारा खरा मनुष्य नाही. (निर्दोष नाही.)

इ. पुढे जर पहायला गेले, तर ‘महायमक’ अलंकारातील एक श्‍लोक आहे. याचे चारही पद एकसारखे आहेत; पण प्रत्येक पदाचा अर्थ भिन्न आहे.

विकाशमीयुर्जगतीशमार्गणा
विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः ।
विकाशमीयुर्जगतीशमार्गणा
विकाशमीयुर्जगतीशमार्गणाः ॥

किरातार्जुनीयम्, सर्ग १५, श्‍लोक ५२

अर्थ : पृथ्वीपती अर्जुनाचे बाण सर्वत्र व्याप्त झाले आहेत, ज्यामुळे शंकरांचे बाण खंडित झाले आहेत. या प्रकारे अर्जुनाचे रणकौशल पाहून दानवांचा पराभव करणारे शंकरांचे गण आश्‍चर्यचकित झाले आहेत. शंकर आणि तपस्वी अर्जुनाचे युद्ध पहाण्यासाठी शंकरांचे भक्त आकाशात आले आहेत.

हे वाचून तुम्हाला संस्कृत भाषेची किमया लक्षात आलीच असेल. तेव्हा ‘भाषाणां जननी’ असणार्‍या संस्कृत भाषेचा प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा.

शेवटी माघ कवींनी केलेल्या कृष्णाच्या स्तुतीने थांबतो.

दाददो दुद्ददुद्दादी दाददो दूददीददोः।
दुद्दादं दददे दुद्दे दादाददददोऽददः ॥

शिशुपालवधम्, सर्ग १९, श्‍लोक ११४

अर्थ : प्रत्येकास वरदान देणार्‍या, दुराचारी माणसांचे निवारण करणार्‍या आणि त्यांना शुद्ध करणार्‍या, परपीडा करणार्‍यांचे निर्दालन करण्यास समर्थ अशा बाहूंनी युक्त अशा भगवान श्रीकृष्णाने शत्रूंवर आपला मर्मभेदी बाण मारला.

जयतु संस्कृतम् ॥

– विश्‍वंभर मुळे (गोंदीकर)

(संदर्भ : व्हॉट्सअ‍ॅप)

Leave a Comment