आपत्काळात मीठ-मोहरीची टंचाई असतांना दृष्ट काढण्याची पद्धत

Article also available in :

 

हातांच्या मुठींमध्ये प्रत्यक्ष मीठ-मोहरी न घेताही समोर असलेल्या,
तसेच समोर नसलेल्या व्यक्तीची दृष्ट काढणे परिणामकारक असल्याचे अनुभवणे

‘मी एका साधकासाठी नामजपादी उपाय करत होतो. मी नामजपादी उपाय करत असतांना त्यातील चैतन्य सहन न झाल्याने साधकाचा त्रास अधिक वाढला, तसेच त्याच्याकडून माझ्याकडे त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होऊ लागली. ‘त्याच्या डोळ्यांतूनही माझ्याकडे त्रासदायक शक्ती येत आहे’, असे मला सूक्ष्मातून जाणवले. तेव्हा मी एक प्रयोग म्हणून ‘दोन्ही हातांच्या मुठींमध्ये प्रत्यक्ष मीठ-मोहरी न घेता ते दोन्ही घटक मुठींमध्ये असल्याचा भाव ठेवून त्या साधकाची दृष्ट काढल्याने काय परिणाम होतो ?’, हे बघण्याचे ठरवले. दृष्ट काढतांना मी नेहमीप्रमाणे ‘आल्या-गेल्याची, वाटसरूची, पशू-पक्ष्यांची, गुरा-ढोरांची (वाईट शक्ती त्यांच्या माध्यमातून त्रास देऊ शकतात; म्हणून त्यांचाही उल्लेख करण्याची पद्धत आहे.), भुता-खेतांची, मोठ्या वाईट शक्तींची आणि विश्‍वातील कोणत्याही प्रकारच्या शक्तींची दृष्ट लागली असेल, तर ती निघून जाऊ दे’, असे मनात म्हणत त्याची नेहमीप्रमाणे दृष्ट काढली. त्यानंतर माझ्या दोन्ही हातांच्या मुठींमध्ये जमा झालेली त्रासदायक शक्ती नष्ट करण्यासाठी मी ‘माझ्यासमोर अग्नी पेटवलेला आहे आणि मुठींमधील त्रासदायक शक्ती अग्नीमध्ये टाकत आहे’, असा भाव ठेवून त्रासदायक शक्ती नष्ट होण्यासाठी प्रार्थना केली. अशा प्रकारे दृष्ट काढल्याचा चांगला परिणाम झाल्याचे जाणवले. त्या साधकाचा त्रास पुष्कळ प्रमाणात न्यून झाला.

अशाच प्रकारे दृष्ट मी देवद, पनवेल येथील आश्रमात असलेल्या पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांची काढली. त्यांनी मला दूरध्वनीवरून ‘माझी प्राणशक्ती पुष्कळ न्यून झाली आहे. मी झोपून आहे’, असे कळवले होते. मी त्यांची वरील पद्धतीने दृष्ट काढल्यावर दूरध्वनी करून ‘बरे वाटले का ?’, अशी चौकशी केली. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मला ७० टक्के बरे वाटले. आधी मी उठू शकत नव्हते, ते आता उठून बसले आहे.’’ दृष्ट काढण्याच्या २ मिनिटांच्या कृतीमुळे एवढा चांगला परिणाम झाला होता.

प्रवासात कुणाला त्रास होत असतांना मीठ-मोहरी उपलब्ध होऊ शकत नाही. तेव्हा या पद्धतीने दृष्ट काढू शकतो. तसेच आपत्काळात सर्व गोष्टींची टंचाई असतांना दृष्ट काढण्याची ही पद्धत अवलंबता येईल.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२५.८.२०२०)

Leave a Comment