धूमपान : श्‍वसनसंस्थेच्या विकारांवर प्रतिबंधात्मक आयुर्वेदीय उपचार !

Article also available in :

‘धूम’ म्हणजे ‘धूर’ आणि ‘पान’ म्हणजे ‘पिणे’. ‘औषधी धूर नाकातोंडाने आत घेऊन तोंडाने बाहेर सोडणे’ याला ‘धूमपान’ असे म्हणतात. श्‍वसनसंस्थेशी संबंधित वात आणि कफ यांचे विकार, उदा. सर्दी, खोकला, दमा होऊ नयेत आणि ते झाले असल्यास लवकर बरे व्हावेत, यांसाठी ‘धूमपान (औषधी धूर घेणे)’ हा उपचार सांगितला आहे.

 

१. धूमपान (औषधी धूर घेणे) करण्याची पद्धत

सकाळी उठून दात घासल्यावर लगेच, तसेच रात्री झोपण्यापूर्वी औषधी धूर नाकातोंडाने आत घ्यावा आणि तोंडाने बाहेर टाकावा. धूर नाकाने बाहेर सोडणे डोळे आणि घ्राणेंद्रिय यांना मारक असल्याने तो नाकाने बाहेर सोडू नये. ‘धूर आत घेऊन बाहेर सोडणे’ ही क्रिया एका वेळी केवळ तीनदा करावी. काही वेळा श्‍वसनमार्गात अधिक कफ साठलेला असेल, तर ५ – ६ वेळा ही क्रिया करता येते; पण त्यापेक्षा अधिक वेळा एका वेळी धूर घेणे टाळावे.

 

२. धूमपान करतांना घ्यायची काळजी

उन्हाळा, तसेच शरद ऋतूमध्ये (म्हणजे ऑक्टोबर मासात) दुपारच्या वेळी धूमपान करू नये.

 

३. धूमपानाचे प्रकार, त्यासाठी वापरण्याजोगी औषधे आणि ते करण्याची कृती

३ अ. स्निग्ध (सौम्य) धूमपान

यामध्ये तूप आणि सौम्य औषधांचा धूर वापरला जातो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या प्रकाराचा नित्य वापर करता येतो. पुढीलपैकी कोणतीही एक कृती वापरावी.

१. गॅसवर खोलगट चमचा किंवा पळी किंचित गरम करावी आणि ती गरम झाल्यावर त्यात कापराचे तुकडे टाकून त्याची येणारी वाफ हुंगावी. (कापूर ज्वलनशील असल्याने गॅस चालू ठेवून कापूर घालू नये.)

२. गॅसवर लहान कढई चांगली गरम करून गॅस बंद करावा आणि त्यात तूप टाकून येणारा धूर हुंगावा.

३. ज्येष्ठमधाच्या काडीला तूप लावून ती जाळावी. ती पेटल्यावर विझवावी. असे केल्याने जो धूर येतो, तो हुंगावा.

३ आ. तीक्ष्ण (तीव्र) धूमपान

श्‍वसनमार्गात अधिक कफ साठला असेल, तर तो काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. यासाठी पुढीलपैकी कोणतीही एक कृती वापरावी.

१. तूप लावलेले हळकुंड जाळून त्याचा धूर घ्यावा किंवा कढईत तूप गरम करून त्यात हळदपूड टाकून धूर घ्यावा.

२. स्वच्छ पांढर्‍या कागदाच्या सुरळीत ओव्याची पूड भरून ही ‘विडी’ जाळून तिचा धूर घ्यावा.

३. ‘मान्स प्रॉडक्टस्’ या आस्थापनाची ‘निर्दोष धूमपान’ या नावाची आयुर्वेदीय ‘सिगारेट’ मिळते. ही आयुर्वेदीय औषधांच्या दुकानांत, तसेच बहुतेक औषधालयांत (मेडिकल स्टोअर्समध्ये) मिळते. या तंबाखूविरहित सिगारेटमध्ये तुळस, ज्येष्ठमध, हळद, असे औषधी घटक असतात. तिचा वापरही करू शकतो.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.५.२०२०)

 

विषाणूंमुळे सर्दी, खोकला यांसारखे विकार होण्याची शक्यता असेल, तर प्रतिदिन
धूमपान करण्यासह घरातील वातावरणाच्या शुद्धीसाठी धूपनही (धुराने वातावरणाची शुद्धी) करा !

धुपाटणे

विषाणूंमुळे सर्दी, खोकला यांसारखे विकार होण्याची शक्यता असेल, तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, तसेच असे विकार झाले असल्यास ते लवकर बरे व्हावेत, यासाठी या लेखात दिल्याप्रमाणे प्रतिदिन धूमपान करावे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘स्निग्ध (सौम्य) धूमपान’, तर सर्दी किंवा खोकला असल्यास ‘तीक्ष्ण (तीव्र) धूमपान’ करावे. यांसह घरातील वातावरणाच्या शुद्धीसाठी सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळेत धुपाटण्यामध्ये (म्हणजे धुपासाठी निखारे ठेवतो त्या भांड्यामध्ये. हे भांडे मातीचे किंवा धातूचे असते.)  निखारे पेटवून त्यावर धूप, कडूनिंबाची पाने, कांद्याची साले, ओवा, वेखंड, दालचिनी, तुळशीची पाने, पुदीना यांपैकी कोणतेही पदार्थ घालून धूर करावा आणि तो पूर्ण घरात फिरवावा. देशी गायीच्या शेणाच्या गोवर्‍या जाळून बनलेला धूरही वातावरणाच्या शुद्धीसाठी उपयुक्त मानला आहे. ‘धुराने वातावरणाची शुद्धी करणे’, याला आयुर्वेदात ‘धूपन’ असे म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment