वांग्याचे औषधी उपयोग

Article also available in :

वांगे फार पौष्टिक आहे. पेठेत (बाजारात) मिळणारी मोठी वांगी आणि गावरान वांगी यांचे औषधी गुणधर्म वेगवेगळे आहेत. त्यामुळे वांगी खायची झाल्यास डोरली वांगी, कोंबडीच्या अंड्यासारखी असणारी पांढरी वांगी, काटेरी वांगी किंवा गावरान वांगी खावीत. आगाशीतील (गच्चीतील) कुंडीतही वांग्याचे रोप लावता येते.

१. वांग्याची निवड

‘वांगे फार कच्चे किंवा पिकलेले नसावे. ते परिपक्व झालेले असावे.

 

२. वांग्यापासून बनणारे काही पदार्थ

२ अ. वांग्याची भाजी

ताजी वांगी वाफवून त्यात चवीपुरते सैंधव मीठ आणि आले घालून छान भाजी होते. यात तिखट घालू नये. काही जण वांग्याच्या बिया काढूनही भाजी करतात.

२ आ. वांग्याचे भरीत

धुतलेले वांगे चुलीवर किंवा गॅसवर चांगले भाजावे. त्याच्या वरचे जळलेले साल काढावे. भाजलेल्या वांग्यावर मिरीपूड, हिंग आणि सैंधव मीठ घालून चांगले घोटावे आणि ज्वारीच्या भाकरीसह खावे. याने अन्नाचे पचन होऊन चांगली भूक लागते. यात तेल घालू नये. तेल घातल्याने भरीत पचायला जड होते. डोरल्या वांग्याचे भरीत उत्तम बनते. विशेषतः चुलीवर वांगे भाजून बनवलेले भरीत उत्कृष्ट लागते.

 

३. वांग्याचे गुणधर्म

३ अ. लहान आकाराचे वांगे पित्त आणि कफ न्यून करते.

३ आ. मोठे वांगे पचायला हलके असले, तरी थोडे पित्तकर असते.

 

४. वांग्याचे औषधी उपयोग

४ अ. ताप आणि खोकला

तापात वांग्याची भाजी तोंडी लावण्यासाठी घ्यावी. वांग्याच्या भाजीने तोंडाला चव येते. शरिरातील वाढलेला ओलावा, म्हणजे क्लेद, तसेच कफ या भाजीमुळे न्यून होतो. तांदुळ भाजून केलेला मऊ भात आणि वांग्याची भाजी ताप अन् खोकला यांमध्ये लाभदायक आहे.

४ आ. पोट फुगणे

पोट फुगल्यावर काही वेळा हृदयावर दाब पडतो. याने अस्वस्थपणा वाढतो, तसेच सतत पोटात दुखते. त्या वेळी वांग्याचे भरीत खाल्ल्याने लाभ होतो. यासाठी डोरले वांगे, ज्याला संस्कृतमध्ये ‘बृहती’ असे म्हणतात, ते वापरावे.

४ इ. मूळव्याध

मूळव्याधीत पांढरे वांगे खाल्ल्याने, तसेच हे वांगे भाजून फडक्यात बांधून त्याने गुदद्वाराकडील जागा शेकल्याने लाभ होतो; मात्र हेे शेकणे काळजीपूर्वक करावे.

४ ई. वृषण वृद्धी (अंडकोष सुजणे)

वांग्याचे मूळ उगाळून त्याचा लेप वृषणांवर (अंडकोषांवर) लावल्याने काही दिवसांतच चांगला लाभ होतो.

४ उ. झोप न लागणे

१. २ चमचे वांग्याच्या पानांचा रस खडीसाखरेसह घेतल्यास उत्तम झोप लागते.

२. रात्री वांग्याचे भरीत खावे.

४ ऊ. गळू

वांगे भाजून गळवावर बांधावे.

४ ए. अशक्तपणा

वांगे स्वादिष्ट, पौष्टिक आणि शुक्रधातू (वीर्य) वाढवणारे आहे. शरिरातील मेद वाढून ज्यांचे शरीर फुगते; परंतु त्या तुलनेत ज्याच्यात अंगात बळ नसते, अशांनी वांग्याची भाजी अवश्य खावी. याने काही दिवसांत बळ वाढते. आठवड्यातून १ – २ वेळा वांग्याची भाजी खावी. यामुळे शरीर काटक (प्रतिकारक्षम) होण्यास साहाय्य होते.’

– वैद्य विलास जगन्नाथ शिंदे, जिजाई आयुर्वेद चिकित्सालय, खालापूर, जिल्हा रायगड.

Leave a Comment