कलियुगात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आणि साधकांना सर्वांगांनी घडवणारी सनातन संस्थेची एकमेवाद्वितीय गुरु-शिष्य परंपरा !

Article also available in :

‘गुरु-शिष्य परंपरा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. या परंपरेमुळेच हिंदु धर्म अनेक परकिय आघात होऊनही समर्थपणे टिकून राहिला आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी ही परंपरा विशेषत्वाने जोपासली आहे. ‘गुरु शिष्याला प्रसंगांतून किंवा अनुभूतींतून शिकवतात, तसेच ते शिष्याची स्वतःच्या अस्तित्वाने प्रगती करवून घेतात’, याची प्रचिती सनातन संस्थेमध्ये पहायला मिळते. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सनातन संस्थेच्या साधकांना अनेक अंगांनी घडवले आहे. यामुळे आज १०० हून अधिक साधक संत झालेले आहेत. ‘सनातन संस्थेचे संत हे गुरूंप्रमाणेच साधकांना कसे घडवतात ?’, याविषयीचे विवेचन पुढील लेखातून जाणून घेऊया.

साधकांना व्यष्टी आणि समष्टी स्तरावर मार्गदर्शन करणार्‍या सनातन संस्थेच्या गुरु-शिष्य परंपरेच्या चरणी कोटी कोटी वंदन !

 

१. बाह्य अवडंबर नसून सहजता असणारे सनातन संस्थेचे संत !

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे बाह्य अवडंबर नाही. तसेच सनातन संस्थेच्या संतांचेही नाही. अन्य संतांच्या संदर्भात मात्र वेगळा पेहराव, चांगल्या व्यवस्था, उंच स्थानावर बसण्याची व्यवस्था, समवेत सेवेकरी, लवाजमा, हार-तुरे घालणे, हे चित्र पहायला मिळते. सनातन संस्थेच्या संतांचे अगदी सहज स्थितीत एखाद्या साधकाप्रमाणे अथवा शिष्याप्रमाणे सर्वांशी वागणे, बोलणे, मिसळणे असते. आश्रमात प्रसाद-महाप्रसाद यांच्या वेळीही ते साधकांच्या समवेत बसतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना कुणालाही ताण येत नाही. सनातन संस्थेचे संत स्वतःचे वेगळेपण न जपता इतरांमधीलच एक होतात. आश्रमात सर्वांसाठी ज्या सुविधा असतात, त्यांचाच ते उपयोग करतात. स्वतःसाठी वेगळ्या सुविधांचा वापर करत नाहीत.

 

२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची
प्रक्रिया राबवून घेऊन साधकांना खर्‍या अर्थाने घडवणारे संत !

२ अ. साधकांना चुकांविषयी जाणीव करून देणे

ईश्‍वराकडून एकही चूक होत नाही. त्यामुळे त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर साधकानेही तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. संत साधकांच्या चुकांकडे अधिक लक्ष देऊन ‘चुकांमागे कोणते स्वभावदोष आहेत ?’, हे सांगतात. ‘साधकाने काय केले ?’, याऐवजी ‘त्याच्याकडून काय राहिले ? त्याचे काय चुकले ?’, याकडे लक्ष देऊन त्याला मार्गदर्शन करतात. त्यामुळे साधक लवकर घडत जाऊन तो उत्तरोत्तर आनंदी होतो.

२ आ. ‘संत साधकांना कसे घडवतात ?’, याचे बोलके उदाहरण !

श्री. यज्ञेश सावंत

साधनेत अत्यंत महत्त्वाचे अंग म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया. यावरच सनातन संस्थेचे संत अधिक भर देतात. त्यासाठी प्रत्येक साधकाला तळमळीने साहाय्य करतात. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन झाल्याविना साधनेत प्रगती नव्हे, तर अधोगतीच होते. त्यामुळे या प्रक्रियेकडे ते अधिक लक्ष देतात. एकदा एका साधकाकडून वारंवार एकाच प्रकारच्या चुका व्हायच्या, उदा. सेवांच्या ठरवून दिलेल्या कार्यपद्धतींत स्वतःच्या मनाप्रमाणे पालट करणे, निरोप विसरणे, कुणी भ्रमणभाष केल्यास तो न घेणे इत्यादी. एक संत शांतपणे आणि साधनेचे नवनवीन दृष्टीकोन देऊन त्या साधकाला चुकांची जाणीव करून द्यायचे. वास्तविक पहाता एखाद्या साधकाकडून होणार्‍या त्याच त्याच चुका ऐकून कुणीही कंटाळेल किंवा त्याच्यावर पुष्कळ चिडेल; मात्र ‘त्या साधकाला त्याच्या स्थितीतून बाहेर काढणे’, ही साधना आहे’, असा दृष्टीकोन संतांनी ठेवला असल्याने साधकामध्ये पालट घडवण्याची तळमळ त्यांना अधिक होती. संतांनी घेतलेल्या अनेक सत्संगांतून अन्य साधकांवरही चुका न करण्याचे महत्त्व वारंवार बिंबले गेले. संत चुकांविषयी वेळप्रसंगी कठोर होतात; मात्र पुढच्या क्षणी संबंधित साधकाशी ते तेवढ्याच प्रेमानेही बोलतात. साधकांना घडवण्याची ही आगळीवेगळी पद्धत केवळ अन् केवळ सनातन संस्थेमध्येच पहायला मिळू शकते.

२ इ. चुकांचे परिमार्जन करवून घेणे

‘मनात येणारे अयोग्य विचार कसे पालटायचे ? त्यांवर योग्य दृष्टीकोन कसे घ्यायचे ? स्वभावदोष-निर्मूलन आणि गुणसंवर्धन कसे करावे ?’, यांविषयी संत साधकाला शिकवतातच; मात्र ‘चुकांचे परिमार्जन कसे करावे ?’, याविषयीही मार्गदर्शन सांगतात. चूक स्वीकारणे, संबंधितांची क्षमा मागणे, फलकावर चुका लिहिणे, खंत वाटणे, अशा विविध माध्यमांतून चुकांचे परिमार्जन होते. यामुळे साधकांची साधनेत होणारी घसरण वेळीच टळते. नवीन प्रारब्धकर्म निर्माण होत नाही, तसेच तो साधक पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतही अडकत नाही.

 

३. साधनेच्या विविध तत्त्वांविषयी संतांकडून देण्यात येणारी मार्गदर्शक शिकवण !

३ अ. साधना, मनाची निर्मळता आणि अध्यात्मीकरण यांविषयी सांगणे

‘व्यवहार आणि साधना यांतील भेद, प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण कसे करायचे ? काळानुसार कोणती साधना करायची ? प्रकृतीनुसार साधना कशी करायची ? चित्तावरील संस्कार स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेद्वारे कसे दूर करायचे ?’, याची शिकवण संतांकडूनच मिळते. मन निर्मळ आणि भावभक्तीमय बनवण्याची शिकवण संतांकडून दिली जाते. परिणामी स्वयंपाक, कला, संगीत, नृत्य, बांधकाम, असे कोणतेही क्षेत्र असो, तेथे सेवा करणारा साधक साधनेत वेगाने पुढे जातो. विविध क्षेत्रांतील साधक, तसेच घरी राहून साधना करणारेही अनेक साधक संत झाले आहेत.

३ आ. ‘गुरु हे तत्त्व म्हणून पहा’, असे बोधामृत संतांनी देणे

आधीच्या युगांमध्ये ‘गुरु-शिष्य’ या नात्याविषयी विचार केल्यास आणि सध्या काही संप्रदायांमध्ये पाहिल्यास ‘एखादे गुरु शिष्यांना एकत्र घेऊन मार्गदर्शन करत आहेत’, असे चित्र समोर येते. सनातन संस्थेमध्ये ‘गुरु हे तत्त्व म्हणून पहा’, अशी शिकवण दिली जाते. त्यामुळे साधक त्याला मार्गदर्शन करणार्‍या संतांकडे अथवा अन्य सहसाधकांकडे तत्त्व म्हणून पहातो. कुणीही कुणामध्ये अडकत नाही, तसेच एकाच वेळी अनेक जण साधनेच्या दृष्टीने घडतात.

श्री दत्तात्रेयांनी जसे २४ गुणगुरूंकडून शिकण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे साधक समवेतच्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतो. प्रसारात असणारे साधक समाजातील व्यक्तींकडून शिकतात, तसेच ते जे शिकले, ते आचरणात आणण्यापूर्वी संबंधितांनाही विचारतात. परिणामी ते शिकण्याच्या स्थितीत राहून पुढे जातात. साधकांची शिकण्याची वृत्ती वाढते. गुरूंनी प्रत्यक्ष मार्गदर्शन न करताही ‘सनातन प्रभात’मध्ये साधनेविषयीच्या प्रत्येक चौकटीचे साधकांकडून आज्ञापालन केले जाते. गुरूंनी प्रत्येक वेळी प्रत्यक्ष शिष्याला सांगण्याची आवश्यकता उरत नाही. ‘आज्ञापालन’ हा शिष्याच्या सर्व गुणांचा राजा आहे. सनातन संस्थेच्या साधकांनी हा गुण अंगी बाणवल्यामुळे ते तात्काळ कृती करतात.

३ इ. ‘समस्येचे दायित्व केवळ संबंधित साधकांचेच नसून
ती समजलेल्या किंवा ठाऊक असलेल्या सर्वांचेच आहे’, ही शिकवण संतांनी देणे

एकदा एका आश्रमाच्या बाहेर पाणी जमा झाले होते. तेथून ये-जा करणार्‍या अनेक साधकांनीही ते पाहिले होते. हा प्रसंग संतांनी एका सत्संगात घेतला. संतांनी साधकांना सांगितले, ‘‘येथे पाणी जमा झाले आहे, हे त्याची दुरुस्ती करणार्‍या संबंधित साधकाचे दायित्व आहेच; मात्र ज्या साधकांनी पाणी जमा झाल्याचे पाहूनही काही कृती केली नाही, तेसुद्धा याला उत्तरदायी आहेत. त्यांच्याही साधनेची हानी झाली आहे.’’ या दृष्टीकोनामुळे साधकांना ‘केवळ आपल्याशी संबंधित सेवा’, एवढेच पहायचे असे नसून समोर दिसणारी चूक, मग ती कोणतीही असो, ती स्वतःची समजून सुधारण्याचा प्रयत्न केल्यावर साधना होणार आहे’, याची जाणीव झाली. यातून साधना म्हणून प्रत्येक घटनेकडे पहाण्याचे अंग विकसित होते. हीच समष्टी साधना आहे. या चुकीमधून ‘दिसेल ते कर्तव्य’ हे साधनेचे अंग साधकांच्या मनावर बिंबवले गेले. त्यातून साधकाचा समाज आणि राष्ट्राचे प्रश्‍न यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन विकसित होतो.

३ ई. स्वतःच्या वर्तनातून समष्टी जीवनाचे धडे देणारे सनातन संस्थेचे संत !

एका संतांच्या खोलीत वातानुकूलित यंत्र आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ते रहात असलेल्या परिसरात पुष्कळ उकडते; मात्र त्या संतांनी आश्रमात अन्य ठिकाणी साधकांना वातानुकूलित यंत्र नसल्याने स्वतःही वापरणार नाही’, असे ठरवले. यातून साधकांनी समष्टी जीवनाचे धडे घेतले. ‘इतरांना एखादी सुविधा नाही, तर ती आपणही वापरणे योग्य होणार नाही’, हा बोध साधकांना मिळाला, तसेच संतांनी स्वतःचे वेगळेपणही ठेवले नाही.

 

४. संत आणि साम्यवाद

‘सर्वांना सर्वकाही समान हवे’, असे सांगत निर्माण केलेल्या साम्यवादाच्या नावे कंठशोष करणारे स्वतः गब्बर झाले आहेत आणि गरीब मात्र गरीबच राहिला आहे. साम्यवादीच त्यांचे शोषण करतात. याउलट संत स्वतःच्या छोट्या-छोट्या कृतींतून समष्टीचा विचार करायला शिकवतात. हाच खरा साम्यवाद आहे.

सनातन संस्थेच्या गुरु-शिष्य परंपरेची वैशिष्ट्ये आपण थोडक्यात पाहिली. खरेतर ही वैशिष्ट्ये अमर्याद आणि अनंत आहेत. सनातन संस्थेचे संत, तसेच गुरु-शिष्य परंपरा या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे एकमेवाद्वितीय ठरते. अशी गुरुपरंपरा निर्माण करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेऊन त्यांना पुढच्या टप्प्यांत नेणारे संत !

‘साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेऊन साधकांना सर्व स्तरांवर मार्गदर्शन करणे’, हे सनातन संस्थेच्या संतांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साधनेचा आढावा घेतल्याने ‘त्याची ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाकडे वाटचाल योग्य गतीने होत आहे ना ? त्याला साधनेत काही शारीरिक, मानसिक, कौटुंबिक अडचणी नाहीत ना ? साधकाला आनंद मिळत आहे ना ?’ इत्यादींविषयी ते त्याला अचूक मार्गदर्शन करून साधनेत पुढच्या टप्प्याला नेतात. अंतर्यामी संतांना सर्वच कळत असल्यामुळे तेच साधकांना अचूक मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे ते दिवसभरातील प्रत्येकच कृती साधना म्हणून किंवा देवाला अपेक्षित अशी होण्याविषयी मार्गदर्शन करतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment