गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि ‘एटीएस’ चे अधिकारी असल्याचे सांगून सनातनच्या साधकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्याची भीती दाखवली जात आहे. यात गंभीर म्हणजे या चौकशीतून नाव वगळण्यासाठी लाच देखील मागितली जात आहेत. सनातन संस्था आणि तिचे साधक यांचा कोणत्याही गुन्ह्यात दुरान्वयेही संबंध नसतांना अशा प्रकारे बेकायदेशीर चौकशा होणे, अत्यंत दुर्दैवी आणि अन्याय्य आहे. नेमक्या कोणत्या कारणांसाठी या चौकशा केल्या जात आहेत, खरंच पोलीस प्रशासन या चौकशा करत आहे कि काही भ्रष्ट वा सनातन विरोधी पोलीस अधिकारी यामागे आहेत, या दृष्टीने आम्ही महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली. या अत्यंत गंभीर प्रकरणी त्वरित दखल घेऊन सामान्य कुटुंबातील साधना करणाऱ्या सत्त्वगुणी निष्पाप साधकांच्या चौकशा तत्काळ थांबवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मुंबई पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेला हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर हे देखील उपस्थित होते.
या प्रकरणी आम्ही महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, एटीएस विभागाचे महासंचालक, तसेच सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांना भेटून याविषयी निवेदन देऊन ‘सनातन संस्थेच्या साधकांची कोणत्या कारणांमुळे चौकशी चालू आहे’ अशी विचारणा केली असता, अशी कोणतीही चौकशी करण्याविषयी आदेश देण्यात आलेले नाहीत, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. हे अत्यंत गंभीर असून नेमके कोण अधिकारी या बेकायदेशीररित्या चौकशा करण्याचे आदेश देत आहेत? ज्यांनी कधी पोलीस ठाण्याची पायरी देखील चढली नाही, अशा सनातनच्या निष्पाप साधकांना त्रास देत आहेत, याचीच चौकशी व्हायला हवी. तसेच अशी बेकायदेशीर चौकशी करून, धमकावून, लाच मागून सामान्य निष्पाप साधकांना त्रास देणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली. संस्थेचे हितचिंतक, साधकांचे नातेवाईक, अर्पणदाते यांच्यादेखील अनाठायी चौकशा केल्या जात आहेत, हे अत्यंत गंभीर आणि वेदनादायी आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया श्री. वर्तक यांनी व्यक्त केली.
सनातन संस्था यांचे साधक अन् हितचिंतक यांना सूचना
सध्या पोलीस, तसेच सीबीआय यांच्याकडून भ्रमणभाष करत असल्याचे सांगून चौकशी करण्याच्या नावे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक, ‘डिजिटल अरेस्ट’ (आभासी अटक) आदी गुन्हे केले जात असल्याचा खुलासा केंद्र सरकारने, तसेच विविध बँकांनी केला आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे साधक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांच्या संदर्भातही अशाच प्रकारच्या काही घटना घडल्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
आपण कोणताही गुन्हा वा गैरप्रकार केला नसतांनाही केवळ पोलिसांनी भ्रमणभाष केला म्हणून घाबरून जाऊन भ्रमणभाष करणारे खरेच पोलीस आहेत कि भामटे आहेत ? याची खात्री न करताच काही ठिकाणी या प्रकारांना फसण्याचा भाग होत आहे. पोलिसांकडून जर एखाद्याची चौकशी करावयाची असेल, तर त्यासाठी अधिकृत नोटीस किंवा संदेश पाठवणे आवश्यक असते. त्यामुळे चौकशीसाठी किंवा अन्य कारणांमुळे पोलिसांनी भ्रमणभाष केल्यास किंवा पोलीस ठाण्यात बोलावल्यास कोणती कृती करावी, याविषयी येथे माहिती देत आहोत.
१. पोलिसांनी नाव विचारल्यास काय करावे ?
पोलिसांनी साधकाला नाव, ओळख विचारल्यास आपणही त्यांचे नाव, पद, पोलीस ठाणे याची माहिती विचारून स्वतःची ओळख सांगणे, हे कर्तव्य आहे. पोलीस प्रत्यक्ष घरी आल्यास त्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगावे. चौकशी करण्यामागील कारण नम्रपणे विचारावे.
२. पोलिसांनी लेखी न कळवता दूरभाषद्वारे अथवा अन्य माध्यमातून संपर्क करून पोलीस ठाण्यात येण्यास सांगितल्यास काय करावे ?
पोलिसांनी लेखी न कळवता दूरभाषद्वारे अथवा इतर कोणत्याही माध्यमातून संपर्क करून पोलीस ठाण्यात येण्यास सांगितल्यास साधकांनी गोंधळून जाऊ नये. साधकांनी शांतपणे संबंधित पोलिसाला त्यांचे नाव आणि ते कोणत्या पोलीस ठाण्यातून बोलत आहेत, हे प्रथम विचारून घ्यावे. त्यानंतर कोणत्या कारणासाठी पोलीस ठाण्यामध्ये बोलावले आहे, हे विचारावे. पोलिसाने सांगितलेले कारण अपुरे असल्यास किंवा कारण सांगण्यास त्यांनी टाळाटाळ केल्यास त्यांना लेखी सूचना देण्याविषयी विनंती करावी. लेखी सूचना देण्याचे पोलिसांनी टाळल्यास पोलीस ठाण्यामध्ये जाणे नागरिकांवर बंधनकारक नाही.
३. शारीरिक समस्या, एखादे महत्त्वाचे काम असल्यास किंवा बाहेरगावी जायचे असल्यास, तसेच अन्य कारणांमुळे पोलीस ठाण्यात जाणे शक्य नसल्यास तशी कल्पना पोलिसांना देणे
शारीरिक समस्या, एखादे महत्त्वाचे काम, बाहेरगावी जायचे असल्यास किंवा अन्य कारणांमुळे पोलीस ठाण्यात जाणे शक्य नसल्यास तशी कल्पना पोलिसांना द्यावी. शक्य असल्यास त्यांच्या क्रमांकावर संदेश पाठवून लेखी कळवावे. पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावले; म्हणून स्वतःचे एखादे महत्त्वाचे काम करण्याचे टाळू नये.
४. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना न घाबरता, संयमाने आणि सत्य माहितीच्या आधारे उत्तरे द्यावीत.
५. चौकशीचा तपशील नोंदवून ठेवावा. संभाषणाचे ध्वनीमुद्रण करायचे असल्यास त्याची पोलिसांना पूर्वकल्पना द्यावी. प्रत्यक्ष चौकशी झाल्यास दिनांक, वेळ आणि संबंधित तपशील नोंदवून ठेवावेत. ‘सीसीटीव्ही’ चित्रण उपलब्ध असल्यास ते सुरक्षित ठेवावे.
६. पोलिसांनी भ्रमणभाषवर संपर्क केल्यास, पोलीस घरी आल्यास किंवा त्यांनी कोणत्याही कारणाने पैशांची मागणी केल्यास त्याची माहिती त्वरित जिल्ह्यातील उत्तरदायी साधकांना द्यावी.
७. कोणत्याही पोलीस चौकशीविषयी अधिवक्त्यांचा कायदेशीर सल्ला घेणे, हा नागरिकांचा अधिकार आहे.


पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !
पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर...
श्री गणेश चतुर्थी निमित्त सनातनने प्रकाशित केलेले गणपती विषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत...
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !