सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जडिगेनहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री कालभैरव देवतेचे घेतले भावपूर्ण दर्शन !

Article also available in :

उडुपी येथे २९ नोव्हेंबर २०२६ या दिवशी होणार्‍या ‘श्री धन्वन्तरि यागा’ची निमंत्रण पत्रिका केली अर्पण !

जडिगेनहळ्ळी – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ६ ऑक्टोबर २०२६ या दिवशी जडिगेनहळ्ळी (जिल्हा बेंगळुरू) या गावातील प्रसिद्ध आणि प्राचीन श्री कालभैरवेश्वर मंदिरातील भगवान कालभैरव देवतेचे भावपूर्ण दर्शन घेतले. याप्रसंगी बेंगळुरू येथील सनातन संस्थेचे पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह संतद्वयींनी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, सर्वत्रच्या साधकांना उत्तम आरोग्य लाभावे, हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी आणि उडुपी येथे २९ नोव्हेंबर २०२६ या दिवशी होणारा ‘श्री धन्वन्तरि याग’ निर्विघ्नपणे पार पडावा’, अशी श्री कालभैरवदेवाच्या चरणी प्रार्थना केली. या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी उडुपी येथे होणार्‍या ‘श्री धन्वन्तरि यागा’ची निमंत्रण पत्रिका कालभैरवदेवाच्या चरणी अर्पण केली. याप्रसंगी मंदिराच्या पुजार्‍यांनी मंदिराच्या चोलकालीन ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती सांगितली.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

मंदिराचा इतिहास आणि पार्श्वभूमी

श्री कालभैरवेश्वर मंदिराची निर्मिती चोल राजांनी अनुमाने २ सहस्र वर्षांपूर्वी केली होती. चोल राजांनी भैरवेश्वराकडे ‘स्वतःचे राज्य कायमस्वरूपी रहावे’, अशी प्रार्थना केली, तेव्हा त्यांना एका रात्रीत अष्टभैरव मंदिरे बांधण्यास सांगण्यात आले; मात्र त्यांना केवळ तीनच मंदिरे बांधणे शक्य झाले. कपाल भैरव मंदिर (सध्याचे मंदिर), कोलार येथील सिटी भैरवेश्वर मंदिर आणि तंजावूर येथील भैरवेश्वर मंदिर ही मंदिरे बांधता आली. चोल राजांनी त्यांचा खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी भूमीखाली सहस्रो फूट खोल खजिना पुरून ठेवला. त्यावर एकच अखंड शिळा टाकून त्यावर कालभैरव, ईश्वर (शिव), गणपति आणि द्वारशक्ती यांची प्रतिष्ठापना केली.

डावीकडे श्री मालम्मादेवी आणि श्री कालभैरवदेव यांची मूर्ती

मूर्तीची वैशिष्ट्ये आणि इतर विशेष

कपाल भैरव मूर्तीच्या उजव्या बाजूच्या २ हातांमध्ये डमरू आणि त्रिशूळ, तर डाव्या २ हातांमध्ये पाश अन् कपाल (करोटी) आहे. डोक्यावर जटा आणि खाली सर्प आहे. कोणतेही वाहन नसल्यामुळे या रूपाला ‘कपाल भैरव’ म्हटले जाते. (सामान्यतः लोक यांना ‘कालभैरवेश्वर’ म्हणूनही ओळखतात.) मंदिराच्या भिंतीवर सापाचे चित्र कोरलेले असून ‘रात्रीच्या वेळी साप येऊन मंदिराचे रक्षण करतात’, अशी भक्तांची श्रद्धा आहे. हे अत्यंत प्राचीन मंदिर सध्या कर्नाटक सरकारच्या ‘धार्मिक देवस्थान विभागा’च्या अखत्यारीत येते.

 

बहीण मालम्माविषयीची कथा

या मंदिरात भगवान कालभैरवासह श्री मालम्मादेवी आणि श्री चंद्रमौलेश्वर स्वामी यांची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, मालम्मा नावाची एक परमभक्त पूर्वजन्मीच्या वरदानामुळे या मंदिरात येऊन मूर्तीरूपात विलीन झाली. त्यामुळे येथे कालभैरवांसह त्यांची बहीण म्हणून मालम्मादेवीची पूजा होते.

मुख्य उत्सव आणि धार्मिक विधी

प्रत्येक मासात येणार्‍या अष्टमी तिथीला (विशेषतः राहु काळात) येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते. या दिवशी मंदिरात कोहळ्याचे (Ash Gourd) दिवे लावण्याची विशेष परंपरा आहे. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.