प.पू. समर्थ शिवानंद स्वामी महाराज (भीष्माचार्य) यांचे समाधीगमन !

७ नोव्हेंबरला ‘षोडशी’ विधी आणि भावपूर्ण श्रद्धांजली सभा यांचे आयोजन

पुणे – हिंदु धर्मप्रसार, योगसाधना आणि अध्यात्मप्रसार यांसाठी स्वत:चे संपूर्ण आयुष्य वेचणारे संन्यासी प.पू. सद्गुरु समर्थ शिवानंद स्वामी महाराज (भीष्माचार्य) (वय ४७ वर्षे) यांनी नुकताच क्रियायोगाद्वारे देहत्याग करून समाधी घेतली. २४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ९.३० वाजता त्यांचे उत्तराखंड येथे देवलोकगमन झाले असून त्यांच्या जाण्याने आध्यात्मिक आणि योगक्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.  त्यांच्या संन्यासी परंपरेनुसार अंतिम संस्कार पार पडले असून येत्या ७ नोव्हेंबर या दिवशी स्वामीजींचा अंतिम संस्काराशी संबंधित ‘षोडशी’ विधी, तसेच भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वामीजींनी पुण्यात येऊन ‘इंचगिरी संप्रदाया’नुसार तब्बल १२ वर्षे एकाग्रतेने खडतर साधना केली आणि संन्यास दीक्षा ग्रहण केली. साधनेचे बळ प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ‘अष्टांग योग परिवार’ आणि ‘क्रियायोग परिवार’ यांच्या माध्यमातून विशाल आध्यात्मिक कार्याची उभारणी केली. हिंदु धर्माचा प्रचार आणि क्रियायोगाच्या प्रसारासाठी त्यांनी भारतभर निरंतर प्रवास केला. देशभरात त्यांचा मोठा शिष्यवर्ग जोडला गेला. पुण्यातील धनकवडी आणि कात्रज परिसरासह अनेक भागांत त्यांचा प्रदीर्घ सत्संग प्रवास झाला होता.

अनुमाने एका वर्षापूर्वी देहली येथील ‘एम्स’ रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले होते, तेव्हा त्यांना कर्करोगाचे (कॅन्सर) निदान झाले; मात्र शिष्यांच्या किंवा समाजाच्या साधनेमध्ये व्यत्यय येऊ नये आणि कुणालाही चिंता वाटू नये, म्हणून त्यांनी हे आजारपण कुणासही कळू दिले नाही. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतरही देहाच्या व्याधींची तमा न बाळगता त्यांनी पूर्वीप्रमाणेच वर्षभर देशभरात अखंड प्रवास करत धर्मप्रसाराचे कार्य चालू ठेवले.

सनातन संस्थेच्या कार्यात सहभाग आणि साहाय्य !

प.पू. समर्थ शिवानंद स्वामी महाराज यांचे सनातन संस्थेच्या कार्यात सहभाग आणि साहाय्य असायचे. संस्थेच्या धर्मप्रसार आणि समाजकल्याणपर कार्याची ते नेहमी आत्मीयतेने विचारपूस करत. त्यांनी गोवा येथील सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमातही सदिच्छा भेट दिली होती. आश्रमाला भेट दिल्यानंतर तेथील शिस्तबद्ध, भावपूर्ण आणि सात्त्विक वातावरण अनुभवून त्यांनी गौरवोद्गार काढले होते. संस्थेच्या साधकांची निष्काम वृत्ती पाहून ते म्हणाले होते, ‘‘तुम्ही सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग करून हे महान ईश्वरी कार्य करत आहात, तुमचे गुरुदेव खरोखरच फार थोर आहेत. आश्रम पाहून मला आनंदाची अनुभूती आली आणि हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला गती मिळाली. साधना, स्वाध्याय यांसह आश्रमातील सेवा आणि शोधकार्य हिंदु राष्ट्राचा मार्ग आणखी प्रबळ करील.’’