विविध संतांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्यक्ष कृती करून अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणारे प.पू. डॉक्टर !

१. डहाणू येथील संत प.पू. अण्णा करंदीकर
यांची माहिती मिळणे आणि त्यांना भेटल्यावर
त्यांंच्याकडून मार्गदर्शन मिळेल, अशी प.पू. डॉक्टरांना खात्री वाटणे

PP_Dr_2012_nirgun_01jun2014डहाणू येथील एक संत प.पू. अण्णा करंदीकर आयुर्वेदीय चिकित्सालयात रुग्णांना पहाण्यासाठी प्रत्येक मासात (महिन्यात) ३ दिवस दादर येथे येत असत. प.पू. (डॉ.) आठवले त्या वेळी अध्यात्माचा प्रायोगिक तत्त्वाने अभ्यास करत होते. प.पू. डॉक्टरांना त्यांच्या एका मित्राने प.पू. अण्णा करंदीकर यांच्याविषयीची माहिती सांगितली. प.पू. अण्णांना भेटल्यावर त्यांच्याकडून अपेक्षित असे मार्गदर्शन मिळेल, अशी खात्री प.पू. (डॉ.) आठवले यांना झाली.

२. प.पू. डॉक्टरांना अमेरिकेतील
एका विद्यापिठाकडून व्याख्यानासाठी निमंत्रण मिळणे

पू. वैद्य विनय भावे
पू. वैद्य विनय भावे

प.पू. अण्णा करंदीकर यांच्याशी परिचय होण्याच्या काही दिवस आधी अमेरिकेतील एका विद्यापिठाकडून प.पू. डॉक्टरांना व्याख्यानासाठी निमंत्रण देण्यात आले होते. त्याच काळामध्ये नाताळची सुट्टी असल्याने आपली योग्य ती सोय होणार नाही, असे वाटल्यामुळे प.पू. डॉक्टरांनी विद्यापिठात चौकशी केली. विद्यापिठाकडूनही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा मिळाला आणि पुढील मासात आल्यास बरे होईल, असे विद्यापिठाकडून प.पू. डॉक्टरांना सांगण्यात आले.

३. अध्यात्माविषयीचे ज्ञान भारतातच मिळेल,
अशी खात्री झाल्याने प.पू. डॉक्टरांनी अमेरिकेतील नोकरी न स्वीकारणे

विद्यापिठाकडून एक मासानंतर येण्याची सूचना मिळाल्यानंतर मधल्या काळात प.पू. डॉक्टर प.पू. अण्णा करंदीकर यांच्याकडे जायचे. प.पू अण्णांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे अमेरिकेत पैसा, मान, प्रसिद्धी मिळेल; मात्र आपल्याला हवे असलेले अध्यात्माविषयीचे ज्ञान इथे भारतातच मिळेल, अशी निश्‍चिती प.पू. डॉक्टरांना झाली. त्यामुळे प.पू. डॉक्टरांनी अमेरिकेत न जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी तसे विद्यापिठाला प्रांजळपणे कळवले.

४. अमेरिकेत जाणे रहित केल्यानंतर
प.पू. अण्णा करंदीकर यांच्याकडे नियमितपणे जाणे

प.पू. अण्णांचे वास्तव्य दादर येथे असलेल्या तीनही दिवशी प.पू. डॉक्टर प.पू. अण्णांना विचारण्यासाठी आधीच प्रश्‍न लिहून घेऊन जायचे. या तीन दिवसांत दुपारी आणि सायंकाळी रुग्ण तपासणी झाल्यानंतर प.पू. डॉक्टर लिहून आणलेले प्रश्‍न पू. अण्णा करंदीकरांना विचारत असत.

५. प.पू. अण्णा करंदीकर यांचे प.पू. डॉक्टरांप्रतीचे प्रेम

काही दिवसांनंतर प.पू. अण्णा करंदीकर प.पू. डॉक्टरांसाठी एक दिवस आधी येऊ लागले. काही वेळा पू. अण्णा करंदीकर त्यांच्या पत्नीला सांगत की, डॉ. आठवले यांना येऊ नको, असे दूरभाष करून सांग. त्या लगेच म्हणत, मी यात पडणार नाही. कारण अर्ध्या घंट्यातच (तासातच) प.पू. अण्णा पत्नीला सांगत, डॉक्टरांना दूरभाष करून लवकर यायला सांग. यातून प.पू. अण्णांसारख्या थोर संतांना प.पू. डॉक्टरांप्रती वाटणारे प्रेमच दिसून येते.

६. प.पू. अण्णा करंदीकर यांनी आपल्याकडे येण्यास
उशीर झाला, असे म्हणणे आणि त्याचा उलगडा नंतर होणे

काही कालावधीनंतर पू. अण्णा प.पू. डॉक्टरांना म्हणाले, तुम्हाला माझ्याकडे यायला पुष्कळ उशीर झाला. त्या वेळी आपले वय ४५ वर्षांच्या पुढे आहे; म्हणून अण्णा असे म्हणत आहेत, असे प.पू. डॉक्टरांना वाटले. नंतर पू. अण्णा करंदीकर यांना मोठ्या आतड्याचा कर्करोग असल्याचे निदान झाले आणि शस्त्रकर्म करून त्यांच्या आतड्याचा काही भाग काढून टाकावा लागला. तेव्हा पू. अण्णांनी उशीर झाला, असे म्हणण्याचा खरा अर्थ समजला.

७. अध्यात्मातील पुढील अभ्यास
करण्यासाठी चांगले चालणारे रुग्णालय एक वेळ बंद करणे

पू. अण्णा करंदीकर यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे प.पू. डॉक्टरांना अध्यात्मातील पुढील अभ्यास करायचा होता. त्यासाठी प.पू. डॉक्टरांनी स्वतःचे चांगले चालत असलेले रुग्णालय एक वेळ बंद करण्याचा निर्णय घेतला आणि सकाळच्या वेळचे रुग्णालय बंद केले. प.पू. डॉक्टरांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. कुंदाताई आणि मोठे ति. भाऊ अप्पा (प्रसिद्ध बालरोगतज्ञ कै. (पू.) डॉ. वसंत आठवले) सगळेच पू. अण्णांकडे येत असत.

८. प.पू. अण्णा करंदीकर यांनी
प.पू. डॉक्टरांना सूक्ष्मातील अभ्यास करण्यास शिकवणे

प.पू. डॉक्टर अध्यात्मशास्त्र या विषयावरील शंकांचे निरसन करून घेण्यासाठी प.पू. अण्णांकडे जाऊ लागल्यानंतर त्यांनी सूक्ष्मातील ज्ञान होण्यासंदर्भात स्वतः प्रयोग करायला प्रारंभ केला. प.पू. अण्णांनीही प.पू. डॉक्टरांकडून सूक्ष्मातील कळणे या प्रायोगिक अंगाचा अभ्यासही करून घेतला. त्यांंनी प.पू. डॉक्टरांना सूक्ष्मातून निरीक्षण कसे करायचे ?, ईश्‍वराला प्रश्‍न विचारून उत्तर कसे मिळवायचे ?, सूक्ष्मदेहाने प्रवास कसा करायचा ?, आवश्यक त्या ठिकाणी प्रकट कसे व्हायचे ? आणि सूक्ष्मातून दुसर्‍याला अनुभूती कशी द्यायची ?, या गोष्टी शिकवल्या.

९. जिज्ञासेपोटी अन्य संतांचे मार्गदर्शनही घेणे

प.पू. डॉक्टरांना असलेल्या जिज्ञासेपोटी ते मलंगशाह बाबा, पू. काणे महाराज, हरि ॐ बागवे आणि प.पू. थोरले जोशीबाबा अशा अन्य संतांकडेही मार्गदर्शन मिळवण्यासाठी जात असत.

१०. प.पू. अण्णा करंदीकर यांनी
प.पू. भक्तराज महाराजांना गुरु मानण्यास प.पू. डॉक्टरांना सांगणे

प.पू. अण्णा करंदीकर यांचे प.पू. भक्तराज यांच्याशी जुने स्नेहसंबंध होते. प.पू. अण्णा त्यांच्याकडे येणार्‍या बहुसंख्य साधकांना प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे स्वतः घेऊन जात असत. त्यांनी प.पू. डॉक्टरांना सांगितले, तुम्ही प.पू. भक्तराज महाराजांना गुरु माना. त्यांनी प.पू. भक्तराज महाराजांनाही प.पू. डॉक्टरांना शिष्य करून घेण्यास सांगितले.

११. विविध संत प.पू. डॉक्टरांची वेळोवेळी काळजी घेत असणे

प.पू. डॉक्टरांच्या संपर्कात असलेले एक संत अघोरी उपासना करत. त्यांच्यापासून त्रास होऊ नये, यासाठी प.पू. अण्णा प.पू. डॉक्टरांना तसे सांगत असत आणि त्यासाठी स्वतःही प्रयत्न करत. याचे एक उदाहरण म्हणजे एकदा प.पू. काणे महाराजांना त्यांनी शीव येथे प.पू. डॉक्टरांच्या निवासस्थानी ३५ दिवस रहाण्यास सांगितले होते. त्यानंतर एकदा ते संत शीव येथे प.पू. डॉक्टरांच्या निवासस्थानी असतांना स्वतः प.पू. अण्णा आणि प.पू. भक्तराज महाराज यांनी प.पू. डॉक्टरांकडे जाण्याचे ठरवले. ते शीव येथे जाऊन पोचताच अघोरी उपासना करणारे संत प.पू. डॉक्टरांच्या निवासस्थानातून निघून गेले, ते पुन्हा कधीही आले नाहीत. अशा प्रकारे अनेक संत वेळोवेळी प.पू. डॉक्टरांची काळजी घेत असत आणि अजूनही घेत आहेत.
– (पू.) वैद्य विनय भावे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात