होळी / होलिका दहन (Holika Dahan 2024)

होळी हा उत्सव देशपरत्वे फाल्गुन पौर्णिमा पासून पंचमी पर्यंत ५ – ६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे.

उत्तर भारतात याला होरी, दोलायात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव अन् होलिकादहन आणि दक्षिणेतील केरळ मध्ये कामदहन (कुमानी पुन्नमी / काम पौर्णिमा) अशा संज्ञा आहेत. बंगालमध्ये दौलायात्रा, असम मध्ये दौल उत्सव, बिहार मध्ये फगुवा म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतागमनोत्सव’ म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नावही देता येईल.

सण साजरा करण्यामागील इतिहास आणि तो साजरा करण्याची पद्धत जरी भिन्न-भिन्न असली, तरी त्यामागील उद्देश मात्र सारखाच असतो. होळीचा उद्देश, होळीचे महत्त्व, तो साजरा करण्याची पद्धत, होळीची रचना तसेच कचर्‍याच्या होळीपेक्षा पारंपारिक धार्मिक पद्धतीने होळी का साजरी करावी ? होळी पेटवल्यावर बोंब का मारावी ? याविषयीची माहिती खाली दिली आहे.

होळीचा इतिहास

१. `पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण ती जाईना. ‘नगरातील मुलांना त्रास देणार्‍या ‘ढुंढा’ नावाच्या राक्षसिणीचा प्रतिकार कसा करावा ?’, याविषयी नारद मुनि सम्राट युधिष्ठिराला पुढील उपाय सांगतात. ते युधिष्ठिराला म्हणतात, ‘नगरातील सर्व लोकांना तू अभय दे. त्यामुळे ते आनंदित होतील. त्यांची मुले आनंदाने घराबाहेर पडू देत. त्यानंतर –

सञ्चयं शुष्ककाष्ठानाम् उपलानां च कारयेत् । तत्राग्निं विधिवत् बुद्ध्वा रक्षोघ्नैः मन्त्रविस्तरैः ॥
ततः किलकिलाशब्दैः तालशब्दैः मनोरमैः । तम् अग्निं त्रिः परिक्रम्य गायन्तु च हसन्तु च ॥
जल्पन्तु स्वेच्छया लोकाः निःशङ्का यस्य यन्मनः । तेन शब्देन सा पापा होमेन च निराकृता ॥
अदृष्टिघातैः डिम्भानां राक्षसी क्षयम् एष्यति । सर्वदुष्टापहो होमः सर्वरोगोपशान्तिदः ॥
क्रियतेऽस्यां द्विजैः पार्थ तेन सा होलिका स्मृता । – भविष्योत्तरपुराण

अर्थ : वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या यांचा ढीग रचावा. तेथे रक्षोघ्न (राक्षसांना नष्ट करणार्‍या) मंत्रांनी अग्नी प्रज्वलित करावा. त्यानंतर लहान मुलांप्रमाणे हर्षभरित शब्द करत (किलकिलाशब्दैः), मनोरम अशा टाळ्या वाजवत (तालशब्दैः मनोरमैः) अग्नीला ३ प्रदक्षिणा घालून गाणे गावे आणि आनंदाने हसावे. लोकांनी निःशंकपणे आणि स्वेच्छेनुसार त्यांच्या मनातील पाहिजे तेवढे बोलावे. अशा आनंदी शब्दांनी आणि (रक्षोघ्न) होमाने लहान मुलांना त्रास देणारी ती पापी राक्षसीण लोकांची दृष्टी पडल्याविनाच क्षीण होईल. हे राजा ! फाल्गुन पौर्णिमेला सर्व दुष्ट शक्ती पळवून लावणारा आणि सर्व रोगांचे शमन करणारा होम करतात; म्हणून या तिथीला विद्वानांनी ‘होलिका’ असे म्हटले आहे.

या श्‍लोकांत अग्नीला प्रदक्षिणा घालतांना कुठेही शिवीगाळ करावी, असा उल्लेख नाही. याउलट ‘किलकिल’, ‘मनोरम तालशब्द’ असे शब्द आले आहेत. यांचे अर्थ वर दिले आहेत.

२. ‘उत्तरेमध्ये होळीच्या आधी तीन दिवस अर्भक कृष्णाला पाळण्यात निजवतात आणि त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला पूतना राक्षसीची प्रतिकृती करून ती रात्री पेटवतात.

३. एकदा भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधी अवस्थेत असतांना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. तेव्हा ‘मला कोण चंचल करत आहे’, असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले. दक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे.

४. ‘ओरिसामध्ये तेथील चैतन्यपंथी लोक कृष्णाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढतात. प्रत्येक घरातील सुवासिनी त्या मूर्तीला अत्तर लावून गुलाल उधळतात. ऐपतीप्रमाणे दक्षिणा देतात. काही ठिकाणी लहान मुलांना कृष्णाची वेशभूषा करून त्याच्याभोवती टिपर्‍या खेळतात.’

होळी कशी साजरी करावी ?

होळी कुठे आणि कधी प्रज्वलित करावी ?

देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी प्रज्वलित करायची असते. बहुधा ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते.

होळीची रचना कशी करावी ?

१. पूजनाचे स्थान शेणाने सारवून, तेथे रांगोळी काढणे.

२. मधोमध एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करावा.

३. त्याच्या भोवती गोवर्‍या आणि सुकी लाकडे रचावी.

४. कर्त्याने शुचिर्भूत होऊन आणि देशकालाचा उच्चार करून ‘सकुटुम्बस्य मम ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं तत्पीडापरिहारार्थं होलिकापूजनमहं करिष्ये ।’ असा संकल्प करावा. नंतर पूजा करून नैवेद्य दाखवावा.

५. त्यानंतर ‘होलिकायै नमः ।’ असे म्हणून होळी पेटवावी.

६. होळीला प्रदक्षिणा घालावी आणि पालथ्या हाताने बोंब मारावी.

७. होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध अन् तूप शिंपडून शांत करावी.

८. श्री होलिका देवतेला पुरणपोळीचा नैवेद्य, तसेच नारळ अर्पण करावा.

९. जमलेल्या लोकांना त्याचा प्रसाद द्यावा. नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत.

१०. संपूर्ण रात्र नृत्यगायनात व्यतीत करावी.

होळीची पूजा अशी करावी…

प्रदीपानन्तरं च होलिकायै नमः इति मन्त्रेण पूजाद्रव्य-प्रक्षेकात्मकः होमः कार्यः । – स्मृतिकौस्तुभ

अर्थ : अग्नी प्रज्वलित केल्यावर ‘होलिकायै नमः’ या मंत्राने पूजाद्रव्ये वाहून होम करावा.

निशागमे तु पूज्येयं होलिका सर्वतोमुखैः । – पृथ्वीचंद्रोदय

अर्थ : रात्र झाल्यावर सर्वांनी होलिकेचे (वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या रचून पेटवलेल्या अग्नीचे) पूजन करावे.

होलिकेची पूजा करतांना म्हणायचा मंत्र

अस्माभिर्भयसन्त्रस्तैः कृता त्वं होलिके यतः । अतस्त्वां पूजयिष्यामो भूते भूतिप्रदा भव ॥ – स्मृतिकौस्तुभ

अर्थ : हे होलिके (वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या रचून पेटवलेल्या अग्ने), आम्ही भयग्रस्त झालो होतो; म्हणून आम्ही तुझी रचना केली. यामुळे आता आम्ही तुझी पूजा करतो. हे होळीच्या विभूती ! तू आम्हाला वैभव देणारी हो.

होळीच्या दुसर्‍या दिवशी करायच्या धार्मिक कृती

प्रवृत्ते मधुमासे तु प्रतिपत्सु विभूतये । कृत्वा चावश्यकार्याणि सन्तर्प्य पितृदेवताः ॥
वन्दयेत् होलिकाभूतिं सर्वदुष्टोपशान्तये । – स्मृतिकौस्तुभ

अर्थ : वसंत ऋतूतील पहिल्या प्रतिपदेला समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी सकाळी प्रातर्विधी आटोपून पितरांना तर्पण करावे. त्यानंतर सर्व दुष्ट शक्तींच्या शांतीसाठी होलिकेच्या विभूतीला वंदन करावे. (काही पंचांगांनुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी येणार्‍या प्रतिपदेपासून वसंत ऋतूला आरंभ होतो.)

होलिकेच्या विभूतीला वंदन करतांना म्हणायचा मंत्र

वन्दितासि सुरेन्द्रेण ब्रह्मणा शङ्करेण च । अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ॥ – स्मृतिकौस्तुभ

अर्थ : हे विभूती देवी ! तुला ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे त्रिदेवही वंदन करतात. त्यामुळे हे देवी, तू आमचे रक्षण कर आणि आम्हाला वैभव देणारी हो.

टीप : भक्त प्रल्हादाला घेऊन आगीत बसलेली ‘होलिका’ ही राक्षसीण होती. होळीच्या दिवशी म्हटल्या जाणार्‍या मंत्रांमध्ये जो ‘होलिका’ असा उल्लेख येतो, तो फाल्गुन पौर्णिमेला उद्देशून आहे; त्या राक्षसिणीला उद्देशून नव्हे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लाकडे रचून होम करतात; म्हणून त्या तिथीला होलिका म्हणतात, असे वरील श्‍लोकांत आलेच आहे.

होळीला बोंब का मारतात ?

होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पहायला मिळते. ही विकृती नसून त्यामागेही शास्त्र दडलेले आहे; मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जातो.

१. `मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरिता हा विधी आहे.

२. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. त्या नक्षत्राची देवता ‘भग’ ही आहे. तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची, ही एकप्रकारची पूजाच होय. तो त्या देवतेचा सन्मानच समजावा.

३. हुताशनी निनादाचे स्थुलातून प्रकटीकरणाचे प्रतीक म्हणून सध्याच्या काळातही होळीच्या भोवती मोठ्या घोळक्याने एकत्रित धावत बोंबाबोंब केली जाते. (उंचावरून प्रचंड वेगाने हेलकाव्यांसहित खाली खाली येतांना आपोआपच बाहेर पडलेल्या किंकाळीला ‘हुताश्‍न’ असे म्हणतात, उदा. गोल फिरणार्‍या झोपाळ्यात उंचावर गेल्यानंतर वेगाने खाली येतांना पोटात कलकल होते, म्हणजेच पोटातील वायू-पोकळीत काही ठिकाणी दाब निर्माण होतो आणि त्यामुळे काही ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. निर्माण झालेल्या पोकळ्या भरून निघतांना पोटातील वायूपोकळीतील प्रचंड वेगाने होणार्‍या वायूच्या हालचालींमुळे आपल्याही पोटात सूक्ष्म निनाद निर्माण होतो. या नादाला शब्द नसल्याने त्याला ‘सूक्ष्म हुताश्‍न’ म्हणतात. सूक्ष्म हुताश्‍न स्थुलातून किंचाळण्याच्या माध्यमातून बाहेर पडतो.’)

१. शंकूसारख्या आकारामुळे अग्नीस्वरूपी तेज-तत्त्व भूमंडलावर अधिक प्रमाणात घनीभूत होऊन आच्छादीत होते. यामुळे पाताळातून प्रसारीत होणार्‍या त्रासदायक स्पंदनांपासून भूमीचे रक्षण होते. तसेच तेथील स्थानदेवता, वास्तूदेवता आणि ग्रामदेवता यांचे तत्त्व जागृत होऊन अनिष्ट शक्‍तींच्या उच्चाटनाचे कार्य सहज साधले जाते.

२. शंकूसारखा आकार इच्छाशक्‍तीचे प्रतीक आहे. या आकारात होळी पेटवल्यावर, अग्नीस्वरूपी तेज-तत्त्वाचे त्या आकारात घनीकरण होते. त्यामुळे तेथे उपस्थित लोकांची मनःशक्‍ती जागृत होते, त्यांच्या कनिष्ठ स्वरूपातील मनोकामना पूर्ण होतात, त्यांना इच्छित फलप्राप्ती होणे शक्य होते.

१. एरंड : एरंडाचा धूर वाईट शक्‍तींनी वातावरणात पसरवलेल्या दुर्गंधीयुक्‍त वायूला नष्ट करतो.

२. नारळ : नारळाकडे आकृष्ट होणार्‍या ब्रह्मांडमंडलातील सात्त्विक लहरींमुळे होळीतील अग्नीरूपी तेजस्वरूप शक्‍तीतील देवत्व टिकून रहाण्यास साहाय्य होते.

३. सुपारी : सुपारीचा मूळ गुणधर्म रजोगुण धारण करण्याचा असल्याने या रजोगुणाच्या साहाय्याने होळीतील तेजाच्या कार्य करण्याच्या गुणधर्मात वृद्धी होते.

४. ऊस : ऊस हाही प्रवाही रजोगुणी लहरींचे प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असल्याने याच्या सान्निध्यामुळे वायूमंडलात होळीतील शक्‍तीरूपी तेज प्रक्षेपित होण्यास आणि वायूमंडलाची शुद्धी अल्प कालावधीत होण्यास साहाय्य होते.

१. ऊस ऊस संपूर्ण घ्यावा. उसाच्या खोडातून, तसेच पानातून प्रवाही रजोगुणी लहरींचे प्रक्षेपण होत असते. हे खोड होळीत घनीभूत झालेल्या अग्नीरूपी तेजाला प्रवाही बनवून त्याचे वायूमंडलात कारंजासारखे प्रक्षेपण करते. हा रजोगुणात्मक लहरींचा तेजरूपी कारंजा परिसरातील रज-तमात्मक लहरींचा नाश करतो. यामुळे वायूमंडलाची शुद्धी होण्यास साहाय्य होते.

२. झाडाचे खोड झाडाच्या खोडाची उंची ४ फुटापर्यंत असावी.

होळीचे महत्त्व

१. आयुर्वेदानुसार होळीचा लाभ करून घ्या !

‘थंडीच्या दिवसांत शरिरात साठलेला कफ दोष होळीच्या काळात सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि त्याच्यामुळे विकार उत्पन्न होतात. होळीच्या औषधी धुरामुळे कफ न्यून होण्यास साहाय्य होते. सूर्याच्या उष्णतेमुळे पित्त काही प्रमाणात वाढते. गाणे, हसणे आदींनी मन प्रसन्न होते आणि पित्त शांत होते. होळीच्या वेळी म्हटलेल्या रक्षोघ्न मंत्रांनी वाईट शक्तींचा त्रासही न्यून होतो.’ – वैद्य मेघराज माधव पराडकर, गोवा. (१२.३.२०१९)

२. आयुर्वेदानुसार होळीचा लाभ करून घ्या !

विकारांची होळी करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण
‘होळी’ हा विकारांची होळी करण्याचा फाल्गुन मासातील सण आहे. ‘विकारांची जळमटे जाळून टाकून नवीन उत्साहाने सत्त्वगुणाकडे जाण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत’, याचे जणू तो प्रतीकच आहे. राहिलेला सूक्ष्म-अहंकार हाही होळीतील अग्नीत नाहीसा होतो. तो शुद्ध सात्त्विक होतो. त्यानंतर रंगपंचमी आनंदाची उधळण करत येते. नाचत-गात एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटायचा. श्रीकृष्ण-राधा यांनी रंगपंचमीद्वारे सांगितले, ‘आनंदाची उधळण करा.’ – प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

३. होळी आपले दोष, व्यसने आणि वाईट सवयी यांना घालवण्याची सुसंधी आहे.

४. होळी सद्‍गुण ग्रहण करण्याची / अंगिकारण्याची संधी आहे.

५. होळी संजीवनी आहे, जी साधकांची साधना पुनर्जीवित करते.

होळी तसेच अन्य सण योग्य प्रकारे कसे साजरे करावे ? त्यातून अधिकाधिक लाभ कसा करून घ्यावा ? आपली आध्यात्मिक उन्नती कशी करून घ्यावी ? यांविषयी जाणून घेण्यासाठी सनातनच्या ‘साधना संवाद’ या ऑनलाइन सत्संगात सहभागी व्हा !

सनातन संस्थेच्या ऑनलाइन सत्संगात सहभागी व्हा !

होळी पारंपारिक धार्मिक प्रथेनुसारच साजरी करा !

आदर्श होळी अशी साजरी करा ! होळी आणि रंगपंचमी यांतील अपप्रकार रोखा !
‘एक गाव किंवा एक वॉर्ड, एक होळी’ अशी होळी करा ! कचऱ्याची होळी करू नका, मोठी होळी करू नका !
चांगले वृक्ष न तोडता, वाळलेली लाकडे वापरा ! लाकूड, गोवऱ्या किंवा इतर वस्तू चोरू नका !
होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून उपस्थितांना नंतर तो प्रसाद म्हणून द्या ! स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांना पाहून अश्लील अंगविक्षेप करणे किंवा त्यांच्याशी असभ्यपणा करू नका !
राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी शक्ती मिळावी, अशी सामूहिकरित्या प्रार्थना करा ! पाण्याचे फुगे फेकून मारणे, तसेच आरोग्याला घातक असणारे रंग अंगाला फासणे टाळा !
पारंपरिक वेशभूषा करा, ग्राम देवता आणि स्थान देवता यांच्या दर्शनासाठी जा ! कर्णकर्कश आवाजात चित्रपट गीते लावणे, मद्यपान करणे, रेन डान्स आयोजित करू नका !

सध्या काही संघटना आणि लोक वृक्षतोडीचे कारण पुढे करून ‘कचर्‍याची होळी करा’, ‘होळीला अर्पण केल्या जाणार्‍या पोळ्या गरिबांना वाटा’ असे आवाहन समाजाला करतांना दिसतात. या दोन्ही गोष्टी शास्त्रविसंगत आहेत. हिंदूंना सणांचा आध्यात्मिक लाभ होऊ नये, यासाठी ही योजना आहे, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल.

१. होळी व्यतिरिक्‍त अन्य वेळी केली जाणारी वृक्षतोड न दिसणार्‍या आणि कचरा जाळण्याची बुद्धी न होणार्‍यांना हिंदु सणांच्या वेळीच त्याची आठवण का होते ? वर्षभर होणारी अनाठायी वृक्षतोड किती वेळा रोखली गेली ? वर्षभरात किती नवीन रोपटी लावली ?

२. ‘हॅरी पॉटर’ या पुस्तकाच्या लाखो प्रतींसाठी भारतातील आसाममधील तिन्सुकिया येथील एक महत्त्वाचे रान नष्ट झाले. या विषयावर कृती तर सोडाच, साधे भाष्यही कोणी केले नाही.

३. वर्षातून केवळ एक दिवस कचरा जाळून पालट होणार आहे का ? सांगणार्‍यांनी आपला परिसर, गल्ली कचरामुक्‍त करण्यासाठी वर्षभर किती  धडपड केली ?

४. होळीमध्ये अग्निदेवतेला अर्पण करायची पोळी गरिबांना वाटायला सांगणारे स्वतंत्रपणे त्या जमा करून का वाटत नाही ?

होळी सणातील गैरप्रकार रोखणे, हे आपले धर्मकर्तव्यच !

सांप्रत होळीच्या निमित्ताने गैरप्रकार होतात, उदा. वाटमारी होते, दुसर्‍यांची झाडे तोडली जातात, मालमत्तेची चोरी होते, दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. तसेच रंगपंचमीच्या निमित्ताने एकमेकांना घाणेरड्या पाण्याचे फुगे फेकून मारणे, घातक रंग अंगाला फासणे आदी गैरप्रकार होतात. या गैरप्रकारांमुळे धर्महानी होते. ती रोखणे हे आपले धर्मकर्तव्यच आहे. यासाठी समाजाचेही प्रबोधन करा. प्रबोधन करूनही गैरप्रकार घडतांना आढळल्यास पोलिसांत गार्‍हाणे करा. ‘सनातन संस्था’ यासंदर्भात जनजागृती चळवळ राबवते.’

पाण्याचा अतिरेक करणे म्हणजे एकप्रकारे पापच होय. त्यामुळे नैसर्गिक रंगांनी आणि पाण्याचा गैरवापर न करता रंगपंचमी साजरी करून उत्सवाचा आनंद घ्या. सामाजिक हानी करून रंगाचा बेरंग करू नका. हिंदूंनो, धर्मविरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता पर्यावरणपूरक, अपप्रकार विरहित; मात्र धर्मशास्त्र सुसंगत अशी होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

होळी उत्सवातील अन्य दिवसांची माहिती

धुलिवंदन

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन हा सण साजरा केला जातो. या दिवशी काय करावे, या विषयी जाणून घ्या !

रंगपंचमी

रंगपंचमीच्या दिवशी नैसर्गिक रंगांचीच उधळण का करावी ? नैसर्गिक रंग कसे तयार करावे ?, यांविषयी वाचा !

होळीचा रंग काढण्यासाठी १० घरगुती उपाय

होळी खेळल्यावर त्वचेचा रंग काढणे कठीण असते. अशा वेळी त्वचेला हानी होऊ न देता रंग काढण्यासाठीचे सोपे उपाय येथे वाचा.

होळी संबंधित सूक्ष्म चित्रे

सूक्ष्म ज्ञानाविषयीचे चित्रांकन : पू. (सौ.) योया वाले
सूक्ष्म ज्ञानाविषयीचे चित्रांकन : पू. (सौ.) योया वाले
सूक्ष्म ज्ञानाविषयीचे चित्रांकन : कु. प्रियांका लोटलीकर (आताच्या सौ. प्रियांका सुयश गाडगीळ)
सूक्ष्म ज्ञानाविषयीचे चित्रांकन : कु. प्रियांका लोटलीकर (आताच्या सौ. प्रियांका सुयश गाडगीळ)
सूक्ष्म ज्ञानाविषयीचे चित्रांकन : कु. प्रियांका लोटलीकर (आताच्या सौ. प्रियांका सुयश गाडगीळ)

होळी व्हिडिओ