श्री गुरूंची आरती : ज्योत से ज्योत जगाओ

शिष्याच्या जीवनात गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे; कारण गुरूंविना त्याला ईश्वरप्राप्ती होऊच शकत नाही. गुरूंचे भक्तवत्सल रूप, दयाळू दृष्टी, शिष्यावर कृपा करण्याची माध्यमे तसेच त्याला विविध माध्यमांतून शिकवणे यांमुळे शिष्याची आध्यात्मिक उन्नती होत असते. अशा थोर गुरुंची महतीचे वर्णन करणारी ‘ज्योत से ज्योत जगाओ’ ही स्वामी मुक्तानंद विरचित आरती येथे दिली आहे.

आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल. आरतीचा अर्थ आणि भावार्थ समजून घेऊन आरती म्हटल्यासही भाववृद्धी होण्यास साहाय्य होते; याकरिता अन्वय आणि अर्थही आरतीनंतर दिला आहे.

साधक अन् शिष्यांनी आरतीचा अर्थ समजून घेऊन ही आरती म्हटल्यास त्यांची भावजागृती होवो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना.

आता ऐकूया, श्री सद्‍गुरूंची आरती …..

श्री सद्‍गुरूंची आरती

ज्योत से ज्योत जगाओ ।

सद्‍गुरु ज्योत से ज्योत जगाओ ।

मेरा अंतर्-तिमिर मिटाओ ।

सद्‍गुरु ज्योत से ज्योत जगाओ ।। धृ० ।।

हे योगेश्वर, हे ज्ञानेश्वर, हे सर्वेश्वर, हे परमेश्वर ।

निज कृपा बरसाओ ।

सद्‍गुरु ज्योत से ज्योत जगाओ ।। १ ।।

हम बालक तेरे द्वार पे आये ।

मंगल दरस दिखाओ ।

सद्‍गुरु ज्योत से ज्योत जगाओ ।। २ ।।

शीश झुकाय करें तेरी आरती ।

प्रेम सुधा बरसाओ ।

सद्‍गुरु ज्योत से ज्योत जगाओ ।। ३ ।।

अंतर् में युग-युग से सोई ।

चित्शक्ति को जगाओ ।

सद्‍गुरु ज्योत से ज्योत जगाओ ।। ४ ।।

साची ज्योत जगे हृदय में ।

सोऽहं नाद जगाओ ।

सद्‍गुरु ज्योत से ज्योत जगाओ ।। ५ ।।

जीवन मुक्तानंद अविनाशी ।

चरणन शरण लगाओ ।

सद्‍गुरु ज्योत से ज्योत जगाओ ।। ६ ।।

– स्वामी मुक्तानंद

आरतीचा अन्वय, अर्थ आणि भावार्थ

ज्योत से ज्योत जगाओ, सद्गुरु, ज्योत से ज्योत जगाओ

(हे सद्‍गुरो, आपल्या ज्ञानज्योतीने माझ्या अंतरात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करा.)

मेरा अंतर्-तिमिर मिटाओ

(त्या ज्ञानाने माझ्या अंतरातील अंधकार, आत्म्याबद्दलचे अज्ञान आणि देहबुद्धी नाहीशी करा.) ।। धृ० ।।

हे योगेश्वर, हे ज्ञानेश्वर, हे सर्वेश्वर, हे परमेश्वर निज कृपा बरसाओ

(आपल्या कृपेचा माझ्यावर वर्षाव करा.) ।। १ ।।

हम बालक तेरे द्वार पे आये

(आध्यात्मिक दृष्टीने आम्ही बालकाप्रमाणे अज्ञानी आहोत. आम्ही आपल्या कृपेने या भवसागरातून पार होण्याची इच्छा मनात धरून आशेने आपल्या दारी आलो आहोत.)

मंगल दरस दिखाओ

(आम्हाला आपले, आत्मस्वरूपाचे मंगल दर्शन घडवा.) ।। २ ।।

शीश झुकाय करे तेरी आरती

(आम्ही तुम्हाला पूर्ण शरणागत होऊन आळवीत आहोत.)

प्रेम सुधा बरसाओ

(आपल्या प्रीतीरूप अमृताच्या वर्षावाने आम्हाला तृप्त करा.) ।। ३ ।।

अंतर् में युग-युग से सोई चित्शक्ति को जगाओ

(आमच्या अंतरात अनादिकाळापासून असलेल्या परंतु अविद्येच्या आवरणामुळे झाकल्या गेलेल्या चैतन्याला जागृत करा.) ।। ४ ।।

साची ज्योत जगे हृदय में, सोऽहं नाद जगाओ

(अंतरात आत्मज्ञानाची खरी ज्योत प्रज्वलित करून ‘सोऽहं’चा अजपाजप आपल्या कृपेने सुरू करा.) ।। ५ ।।

जीवन मुक्तानंद अविनाशी, चरणन शरण लगाओ

(स्वामी मुक्तानंद म्हणतात, माझे हे आपल्या कृपेने ज्ञान झालेले अविनाशी जीवन आपल्या चरणी समर्पित करून घ्यावे, अशी आपल्या चरणी प्रार्थना !) ।। ६ ।।

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘आरतीसंग्रह (अर्थासह)’

Leave a Comment