प.पू. डॉ. आठवले आणि सनातनचे विविध संत यांनी सौ. उमा रविचंद्रन् यांच्या चित्रांविषयी काढलेले उद्गार

उमाक्कांनी काढलेल्या ‘कृष्णमय’ चित्रांतून साधिकेचा उत्कट भाव, दृढ श्रद्धा इत्यादी अनेक आध्यात्मिक गुण प्रकर्षाने जाणवतात. या लेखात सनातनचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. आठवले आणि सनातनच्या विविध संतांनी ‘बालकभावा’तील या अदि्वतीय चित्रांविषयी काढलेले उद्गार दिले आहेत. यांतून अध्यात्मातील ‘भावा’चे अनन्यसाधारण महत्त्व वाचकाच्या लक्षात येईल.

 

१. सनातनचे प्रेरणास्थान प. पू. डॉ. जयंत आठवले
यांनी सौ. उमा रविचंद्रन् यांच्या चित्रांविषयी काढलेले उद्गार

प. पू. डॉ. जयंत आठवले
प. पू. डॉ. जयंत आठवले

१ अ. साधनेने प्रतिभा जागृत झाल्याचे एक उदाहरण
म्हणजे सौ. उमा रविचंद्रन् यांनी काढलेली बालकभावातील चित्रे !

‘सौ. उमा रविचंद्रन् या गेल्या दोन मासांपासून (महिन्यांपासून) ‘श्रीकृष्णाची बालकभावातून उपासना’, अशी चित्रे काढत आहेत. सौ. उमा यांना चित्रकलेची आणि गायनाची आवड आहे; मात्र त्यांनी चित्रकलेचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. असे असतांना त्या चित्रे काढत आहेत, हे साधना करतांना साधकाची आध्यात्मिक पातळी वाढल्यानंतर त्याची प्रतिभा जागृत होण्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तसेच यातून आणखी एक सूत्र स्पष्ट होते, ते म्हणजे व्यक्तीला ज्या कलेची आवड आहे, त्या कलेच्या माध्यमातून तिची प्रतिभा जागृत होते आहे. सनातनच्या माध्यमातून साधना करणार्‍या गोपींचीही प्रतिभा जागृत झाल्याने त्या एखाद्या व्यासंगी लेखकाला अथवा भाषाप्रभूला लाजवतील, अशा समृद्ध भाषेत लिखाण, संभाषण आणि शीघ्र कविता करत आहेत.’

– (प.पू.) डॉ. जयंत आठवले (भाद्रपद कृष्ण पक्ष एकादशी (११.९.२०१२))

१ आ. श्रीकृष्णासमवेतच्या बालिकेच्या बालकभावातील चित्रांकडे पहातांना
तिच्याप्रमाणे स्वतःही निर्धास्त आणि आनंदी असल्याची अनुभूती प.पू. डॉक्टरांना येणे !

‘सौ. उमा रविचंद्रन् यांच्या श्रीकृष्णासमवेतच्या बालिकेच्या बालकभावातील पुढील चित्रांकडे पहातांना मला त्यांच्या संदर्भात विशेष जवळीक वाटत होती.

१. श्रीकृष्णाच्या मांडीवर बसून झोका खेळत आहे.

२. श्रीकृष्ण साधिकेला दहीभात भरवत आहे.

३. कठीण परिसि्थतीला सामोरे जातांना किंवा प्रवचन करतांना श्रीकृष्णाच्या पितांबराच्या मागे लपून आश्रय घेत आहे.

४. श्रीकृष्ण नेतृत्व करत असलेल्या धर्मयुद्धात बालिका सहभागी झाली असून अर्जुनाच्या ठिकाणी नमस्काराच्या मुद्रेत साधक उभे आहेत.

५. बालकभावातील साधिकेला कृष्णाने हातावर घेतले आहे.

बालकभावातील या चित्रांशी विशेष जवळीक वाटण्याचे कारण माझ्या लक्षात येत नव्हते. आज ते अचानक लक्षात आले. बालिकेला श्रीकृष्ण पित्यासमान वाटत असल्याने ती सदा निर्धास्त आणि आनंदी आहे. अगदी त्याचप्रमाणे मला श्रीकृष्ण साधकांचे रक्षण करणार आहे आणि हिंदू राष्ट्राची जगभर स्थापना करून समाज अन् राष्ट्र यांचे उत्थान करणार आहे, याची निशि्चती असल्याने मीही त्या बालिकेप्रमाणे सदा निर्धास्त आणि आनंदी आहे.’

– (प.पू.) डॉ. जयंत आठवले (अधिक भाद्रपद कृष्ण पक्ष त्रयोदशी, कलियुग वर्ष ५११४ (१४.९.२०१२))

१ इ. ‘बालकभावातील चित्रे काढत असतांना सौ. उमा या श्रीकृष्णाच्या सतत
अनुसंधानात असल्याने ते एकप्रकारचे जागृत अवस्थेतील ध्यानच असते’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे

(पू.) सौ. अंजली गाडगीळ
(पू.) सौ. अंजली गाडगीळ

‘सौ. उमाक्कांच्या बालकभावातील चित्र काढतांनाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांना चित्र काढतांना पहातांना ध्यान लागल्यासारखे होत होते. यावर प.पू. डॉक्टरांनी सांगितले की, जागृतावस्थेत त्यांचे श्रीकृष्णाशी अनुसंधान असल्याने ते एकप्रकारचे जागृत अवस्थेतील ध्यानच असते आणि म्हणूनच त्यांना चित्र काढतांना पाहून ध्यान लागत असल्याची अनुभूती येते.

१ ई. सौ. उमाक्कांच्या सर्वच चित्रांत भावाची ८ टक्के स्पंदने असल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे

सौ. उमाक्कांच्या सर्वच चित्रांत भावाची ८ टक्के स्पंदने असल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगितले आहे. यावरून उमाक्कांमध्ये भाव असल्याने त्यांच्याकडून भाव दर्शवणारे श्रीकृष्णाचे डोळे आणि तोंडवळाच आधी का काढले जातात, याचे कारण समजले. देहाच्या इतर अंगांपेक्षा डोळे आणि तोंडवळा यांतूनच भाव अधिक स्पष्ट होत असल्याने सौ. उमाक्कांकडून आपोआपच तशी कृती होते; म्हणूनच उमाक्कांची सर्वच चित्रे दैवी सौंदर्याने परिपूर्ण असतात.

(सर्वसाधारण व्यक्तीत भाव ० टक्के असतो. कलियुगातील सध्याच्या काळात चित्रांतील भावाची स्पंदने जास्तीतजास्त प्रमाणात १० टक्के एवढीच असू शकतात. – संकलक)

१ उ. सौ. उमा रविचंद्रन् यांच्यामध्ये इतर भावांसह क्षात्रभावही असणे

‘सौ. उमा रविचंद्रन् यांच्यामध्ये इतर भावांसह क्षात्रभावही असल्याने त्या समष्टीचे कार्यही तितक्याच तळमळीने करू शकतात’, असे प.पू. डॉक्टरांनी सौ. उमाक्कांचे कौतुक करतांना सांगितले.’

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१६.९.२०१२)

 

२. सनातनच्या विविध संतांनी सौ. उमा रविचंद्रन् यांच्या चित्रांविषयी काढलेले उद्गार

 (पू.) श्री. राजेंद्र शिंदे
(पू.) श्री. राजेंद्र शिंदे

२ अ. सौ. उमा रविचंद्रन् यांनी बालकभावातील रेखाटलेली चित्रे पाहून भावजागृती
होत असल्याने ती चित्रे संगणक आणि भ्रमणभाष यांवर संरक्षित करून साधकांनी भावजागृतीचे प्रयत्न करणे

‘सौ. उमा रविचंद्रन् यांनी बालकभावातील अनेक चित्रे रेखाटली आहेत. ती चित्रे पाहूनच अनेक साधकांची भावजागृती होते. आश्रमातील अनेक साधकांनी ती चित्रे संगणक आणि भ्रमणभाष यांवर संरक्षित करून ठेवलेली आहेत. इतर वेळीही भावजागृतीचे प्रयत्न करतांना किंवा प्रार्थना करतांना सौ. उमा रविचंद्रन् यांनी काढलेल्या चित्रांकडे पाहून साधक प्रयत्न करतात. जे साधक संगणकावर सेवा करत नाहीत, तेसुद्धा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या चित्रांच्या छायांकित प्रती जवळ ठेवून भावजागृतीचे प्रयत्न करत आहेत. सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेली चित्रे म्हणजे भावजागृतीचे उत्तम माध्यम आहे.

२ आ. श्रीकृष्णाकडे कान पकडून क्षमायाचना करणार्‍या
लहान मुलीचे चित्र पाहून साधकांमध्ये अपराधीपणाची जाणीव निर्माण होणे

एका चित्रामध्ये एक लहान मुलगी श्रीकृष्णाकडे कान पकडून क्षमायाचना करत आहे. काही साधक क्षमायाचना करण्यापूर्वी या चित्राकडे पहातात आणि नंतर क्षमायाचना करतात. या चित्राकडे थोडा वेळ पाहिल्याने अपराधीपणाची जाणीव निर्माण होऊन आर्ततेने क्षमायाचना होत असल्याचे साधकांना जाणवते.’

– (पू.) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (फाल्गुन शुक्ल पक्ष अष्टमी, कलियुग वर्ष ५११४ (२०.३.२०१३))

२ इ. ईश्वरी अनुसंधानात कृती केल्यास त्या सहजतेने, परिपूर्ण आणि
अनेक आध्यात्मिक गोष्टी शिकवणार्‍या होत असल्याने तसे करण्याचे महत्त्व लक्षात येणे

(पू.) डॉ. मुकुल गाडगीळ
(पू.) डॉ. मुकुल गाडगीळ

`सौ. उमा यांच्या भावचित्रांमधून पुढील गोष्टी लक्षात येतात.

१. सतत गोपीभावात असल्याने तृप्ती गावडे, दीपाली मतकर आणि वृषाली कुंभार या गोपींना काव्य, मार्गदर्शन, लिखाण यांपैकी कोणत्याही गोष्टी त्यांनी पूर्वी कधी केल्या नसूनही गोपीभावात सहज जमू लागल्या. त्यांना आता काहीही अशक्य असे वाटत नाही; कारण ‘कृष्णच करवून घेणार’, ही त्यांची श्रद्धा आहे. तसेच सौ. उमा रविचंद्रन् यांच्या संदर्भात घडले. त्या भावसि्थतीत सहजसुंदर चित्रे काढू शकल्या.

२. गोपींच्या कृती देवच करवून घेत असल्याने परिपूर्ण होतात. तशी सौ. उमा यांची भावचित्रे परिपूर्ण आहेत; कारण त्यात काढलेल्या प्रत्येक गोष्टीला आध्यात्मिक पाया आहे. कोणी बुद्धीने इतक्या बारकाव्यांसहित या गोष्टी काढू शकत नाही; कारण बुद्धीला त्यांच्या मागचा कारणभाव कळणार नाही. सौ. उमा यांनी काढलेली चित्रे ही त्यांनी ठरवून काढलेली नसल्याने आणि श्रीकृष्णानेच त्यांच्याकडून काढून घेतली असल्याने त्याने त्यांमध्ये अनेक पैलू आपल्याला उलगडून दिले आहेत.

३. या भावचित्रांतून अनेक आध्यात्मिक पैलू लक्षात आले. अध्यात्मात आधी अनुभूती येते अन् मग त्याचे शास्त्र कळते. तेच या चित्रांच्या संदर्भातही घडले.

वरील सूत्रांवरून आपल्याला भावाचे महत्त्व लक्षात येते. आपण जी काही कृती किंवा सेवा करतो, ती भावपूर्ण केल्यास ईश्वर प्रत्येक वेळी तिच्यातून नवनवीन पैलू आपल्याला शिकवील; कारण ज्ञान अनंत आहे. एकच सेवा आपण प्रतीदिन करत असलो, तरीही तिच्यातून ईश्वर आपल्याला प्रतीदिन नवनवीन गोष्टी शिकवू शकतो. यालाच ‘सनातन’, म्हणजे नित्यनूतन म्हणतात.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग २) (धर्मसंदेश देणारी श्रीकृष्णाची चित्रे अनुभूतींसह)’

Leave a Comment