ईश्वरी चैतन्यासाठी योग्य कपडे

हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे अंगभर वस्त्र परिधान केल्यामुळे ईश्वरी चैतन्याचा लाभ होतो. पण हल्ली ‘रिप्ड जिन्स’ या फॅशनच्या नावाखाली ज्या फाटलेल्या जिन्स वापरत आहेत त्यामुळे शारिरीक आणि अध्यात्मिक स्तरावर हानी होत आहे. विविध प्रकारचे कपडे, इतरांनी वापरलेले कपडे, संतांनी वापरलेली वस्त्रे यांविषयी पाहू.

 

१. कपडे अंगभर असावेत

अ. अंगभर कपडे घालण्याचे महत्त्व

’अंगभर कपडे घातल्यामुळे थंडी, वारा, ऊन आणि पाऊस यांपासून शरिराच्या अवयवांचे सहजपणे रक्षण होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते अन् ते निरोगी रहातात.’ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून,६.११.२००७, दुपारी २.३०)

आ. तोकड्या कपड्यांमधून रज-तम लहरींचे प्रक्षेपण होऊन
सभोवतीच्या भिन्न लिंगी व्यक्ती आणि वाईट शक्ती आकृष्ट होऊन व्यक्तीला त्रास होणे

अ. ‘अंगभर वस्त्रे धारण केल्यामुळे थंडी, वारा, ऊन आणि पाऊस यांपासून देहाचे संरक्षण होण्यासह लज्जारक्षणही होते. याउलट तोकडे कपडे घातल्यामुळे शरिराचे संरक्षण होत नाही आणि लज्जारक्षणही होत नाही.

आ. तोकड्या कपड्यांमधून रज-तम लहरींचे प्रक्षेपण होऊन अवतीभोवतीच्या भिन्न लिंगी व्यक्तींच्या वासना जागृत होतात. इतरांच्या वासना जागृत करण्याचे पातक तोकडे कपडे घालणार्‍या व्यक्तीला लागते.

इ. तोकड्या कपड्यांमधून होणार्‍या अंगप्रदर्शनामुळे वायूमंडलात वावरणार्‍या वाईट शक्तींच्या लिंगदेहांमधील वासना जागृत होऊन त्या वाईट शक्ती असे कपडे घालणार्‍या व्यक्तीकडे आकृष्ट होतात. त्यामुळे त्या व्यक्तीला वाईट शक्तींचा त्रास होऊ शकतो.

त्यामुळे हिंदु धर्मात संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे अंगभर वस्त्र परिधान करण्यास सांगितले आहे.’

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, सायं. ७.०५)

 

२. कपडे वापरायला सुटसुटीत असावेत

कपडे वापरायला सुटसुटीत असावेत ‘कपडे वापरायला सुटसुटीत असावेत, म्हणजे ते फार सैलही नसावेत किंवा अगदी घट्टही नसावेत, उदा. अंगरखा (सदरा) आणि पायजमा फार घेरदार नसावा. चुडीदार पायजम्यापेक्षा मध्यम घेर असलेला पायजमा चांगला.’ – सनातनच्या साधक-चित्रकार सौ. जान्हवी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अ. अतीस्पर्शात्मक (घट्ट) वस्त्रामुळे वायूमंडलातील त्रासदायक लहरी आकृष्ट होणे

‘जिवाचा देह आणि वस्त्र यांतील अती घर्षणामुळे निर्माण होणार्‍या सूक्ष्म वायूंच्या नादकंपनांमुळे वायूमंडलातील त्रासदायक लहरी जिवाकडे सहजतेने आकृष्ट होतात. जीन्ससारख्या वस्त्रांच्या जडत्वतेमुळे (तामसिकतेमुळे) वायूमंडलातील सूक्ष्म त्रासदायक लहरींचे घनीकरण होऊन त्या जिवाकडे आकृष्ट होतात.

आ. अल्प स्पर्श होणार्‍या वस्त्रामुळे वायूमंडलातील चैतन्यलहरी जिवाकडे आकृष्ट होणे

अल्प स्पर्श करणारे वस्त्र देहाशी संलग्न नसल्याने देहातील जडत्व वस्त्राशी कार्यरत होत नाही. उलट देह आणि वस्त्र यांच्यात एक सूक्ष्म-पोकळीची निर्मिती होऊन त्या पोकळीत वायूमंडलातील चैतन्यलहरी आकर्षिल्या जाऊन अल्प स्पर्श होणार्‍या वस्त्रांच्या वायूधारणेमुळे (सात्त्विकतेमुळे) जिवाकडून सहज ग्रहण होतात. तसेच जिवाची पातळी अधिक असल्यास जिवाकडे आकृष्ट होणारे ईश्वरी चैतन्य वस्त्रांच्या वायूधारणेमुळे सहजतेने अन्य जिवांकडे प्रक्षेपित होऊन अन्य जिवांनाही ईश्वरी चैतन्याचा लाभ होतो.’

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १८.६.२००७, सायं. ६.२७)

 

३. भारतियांचा कपड्यांच्या संदर्भातला इंग्रजाळलेला दृष्टीकोन

भारतियांचा कपड्यांच्या संदर्भातला इंग्रजाळलेला दृष्टीकोन ‘थंड प्रदेशात बंद गळ्याचा आणि लांब बाह्यांचा कोट, हातमोजे, पायमोजे अन् टाय असा वेश तेथील वातावरणाला पोषक म्हणून प्रचलित आहे. इंग्रज लोक तसा वेश तेथील वातावरणाला साजेसा म्हणून वापरतात; पण इंग्रज साहेब, गोरे लोक वापरतात म्हणून तसा वेश भारतासारख्या उष्ण कटीबंधातही भारतीय लोक वापरतात. हे किती हास्यास्पद आहे ! भारतातील वकील मंडळीसुद्धा कायद्याने संमत झालेला बंद गळ्याचा काळा कोट आणि टाय वापरतात. खरेतर त्यांना पांढर्‍या रंगाचा, मोकळेपणाने वावरता येण्यासारखा अंगरखा आणि पायजमा, असा आपल्या वातावरणाला अनुकूल वेश आवश्यक आहे; पण कोणीही वकील याचा विरोध करीत नाही. तुम्हा-आम्हाला दास्यात (गुलामगिरीत) रहायची एवढी सवय झाली आहे की, आजकाल सूट, बूट, कोट आणि टाय बांधल्याविना लग्नदेखील होत नाही !’

 

४. विटलेले (रंग उडालेले), फाटलेले किंवा उसवलेले कपडे वापरू नयेत;
फाटलेले किंवा उसवलेले कपडे घातल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता असणे

‘फाटलेल्या, तसेच उसवलेल्या कपड्यांच्या वेड्यावाकड्या भोकांतून रजतमात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने ही स्पंदने वायूमंडलातील वाईट शक्तींना आकृष्ट करण्यात अग्रेसर असतात. यामुळे जिवाला वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. फाटक्या आणि उसवलेल्या कपड्यांच्या भोकांत ती ती स्पंदने घनीभूत होतांना एक विचित्र प्रकारचा सूक्ष्म-नाद प्रक्षेपित करतात. या नादाकडेही वायूमंडलातील अनेक त्रासदायक स्पंदने आकृष्ट होण्याची शक्यता जास्त असल्याने शक्यतो असे कपडे वापरणे टाळावे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३.३.२००८, सकाळी ११.३३)

 

५. इतरांनी वापरलेली वस्त्रे वापरू नयेत

अ. इतरांनी वापरलेल्या वस्त्रांच्या माध्यमातून वाईट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता असणे

‘इतरांनी वापरलेल्या वस्त्रांत त्यांच्या देहातील सूक्ष्म रज-तमात्मक स्पंदने आणि वासनात्मक त्रासदायक स्पंदने असतात. ही स्पंदने वस्त्रांच्या माध्यमातून दुसर्‍या जिवात संक्रमित होण्याची शक्यता असते. पहिल्या जिवाला वाईट शक्तींचा तीव्र त्रास असेल, तर त्याचे कपडे वापरणार्‍या व्यक्तीलाही हा त्रास होण्याची दाट शक्यता असते आणि अशामुळे संपूर्ण जीवन वाईट शक्तींच्या त्रासाने ग्रस्त होऊन उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. कलियुगात बहुतांश जिवांना न्यून-अधिक प्रमाणात त्रास असल्याने शक्यतो दुसर्‍याचे वस्त्र वापरून त्याचा त्रास अतिरिक्त प्रमाणात ओढवून घेणे जीवनमानाच्या दृष्टीने धोकादायक ठरते.

आ. उन्नतांनी वापरलेली वस्त्रे वापरण्याचे लाभ

उन्नत (संत) हे चैतन्याचा स्त्रोत असतात. त्यांनी वापरलेल्या वस्तूंमध्येही चैतन्य येते. ‘उन्नतांनी वापरलेल्या वस्तू वापरणे, हे पुण्यप्राप्तीच्या दृष्टीने आणि देहाची शुद्धी होऊन वाईट शक्तींचा त्रास दूर होण्याच्या दृष्टीने फलदायी ठरते.’ – एक विद्वान(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ कृष्ण एकादशी, कलियुग वर्ष ५११० (३.३.२००८, सकाळी १०.४४)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’

Leave a Comment