साधकांनो, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग या योगमार्गांनुसार प्रत्येक सेवा करून शीघ्र आध्यात्मिक उन्नती करा !

‘आश्रमातील, तसेच प्रसारात सेवा करणारे साधक विविध सेवा करतात. मिळालेली प्रत्येक सेवा साधकांनी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग या योगमार्गांनुसार केली, तर ती परिपूर्ण अन् भावपूर्ण होईल. ‘या योगमार्गांनुसार सेवा कशी करावी ?’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

 

१. कर्मयोग
(क्रियमाणाचा योग्य वापर करून सेवा करणे)

वेळेचे योग्य नियोजन करणे आणि त्यानुसार कृती करणे, उदा. परिपूर्ण सेवा होण्यासाठी स्वतःमध्ये विचारण्याची अन् सांगण्याची वृत्ती निर्माण करणे, मिळालेली सेवा झोकून देऊन परिपूर्ण करणे, सेवेसाठी आवश्यक कौशल्य (उदा. संगणक हाताळणे, वाहन चालवणे आदी) अंगी बाणवणे इत्यादी. कर्मयोगाद्वारे आपल्यात गुण निर्माण होतात, आपल्याकडून त्याग घडतो, आपल्यात शिकण्याची वृत्ती निर्माण होते. सेवेमध्ये इतरांना सामावून घेतल्याने दुसर्‍यांशी जवळीक होते आणि आपल्यात ‘प्रीती’ हा गुण निर्माण होतो.

 

२. ज्ञानयोग
(सेवा अभ्यासपूर्ण होण्यासाठी चिंतन करणे)

सेवेची व्याप्ती समजून घेणे, सेवेतील बारकाव्यांचा अभ्यास करणे, सेवेत येणार्‍या अडचणी अभ्यासणे इत्यादी करावे. ज्ञानयोगाद्वारे सेवेच्या संदर्भात नवीन नवीन कल्पना सुचतात, म्हणजेच आपल्याला ज्ञान होते. त्यामुळे आपली सेवा नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण होते.

 

३. भक्तीयोग
(भगवंताचे साहाय्य घेऊन सेवा करणे)

सेवा करतांना प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे, ‘भगवंतच माझ्या माध्यमातून ही सेवा करवून घेत आहे’, असा भाव ठेवणे, सतत अनुसंधानात रहाणे इत्यादी. भक्तीयोगाद्वारे आपली सेवा सहजतेने होते. सेवेत एखादी अडचण आल्यास देव साहाय्य करतो, तसेच सेवेत वाईट शक्तींनी विघ्ने आणण्यापासून आपले रक्षण होते. मुख्यत्वे भक्तीयोगामुळे आपली सेवा देवाला आवडते आणि देवाचे आपल्याकडे लक्ष रहाते.

 

४. गुरुकृपायोग
(सेवेद्वारे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे)

सेवेत झालेल्या चुकांविषयी चिंतन करून त्या चुकांसाठी संबंधितांची क्षमा मागणे अन् प्रायश्चित्त घेणे, सेवा परिपूर्ण होण्यामध्ये अडथळा ठरणारे स्वतःचे स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंचे निर्मूलन करणे इत्यादी. गुरुकृपायोगाद्वारे साधकाची आध्यात्मिक प्रगती होते आणि साधनेला खरी गती येते. आध्यात्मिक त्रास असल्यास तो उणावतो, तसेच गुरूंचा कृपाशीर्वाद मिळून मनुष्यजन्माचे सार्थक होते.

साधकांनी वरील प्रकारे प्रत्येक सेवा केली, तर एकाच वेळी अनेक योग साध्य होतील आणि त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नतीही होईल.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०२२)

Leave a Comment