सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी

प.पू. डॉक्टरांवर अपार श्रद्धा आणि प.पू. डॉक्टरांच्या सतत अनुसंधानात असल्याने गुरु हेच अवघे विश्‍व असलेल्या रत्नागिरी येथील श्रीमती मंगला खेरआजी संतपदी विराजमान !

pu_mangala_kher
पू.(श्रीमती) खेरआजी यांचा भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सन्मान करतांना सौ. मीनल खेर
वर्ष १९९८ पासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणार्‍या श्रीमती मंगला खेर यांनी त्यांच्या मुलांवर केलेेल्या उत्तम संस्कारांमुळे त्यांच्या दोन्ही मुली, तसेच मुलगा आणि सून हे सर्व जण साधना करत आहेत. वर्ष २०११ मध्ये खेरआजींनी ६० प्रतिशत आध्यात्मिक स्तर प्राप्त केला आणि वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेला त्यांचा आध्यात्मिक स्तर ६८ प्रतिशत झाल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगितलेे होते. त्यांच्या दोन्ही मुलीही आईच्या पावलावर पाऊल ठेवून साधनेची वाटचाल करत असून सौ. माधुरी दीक्षित, सातारा यांचा आध्यात्मिक स्तर ६३ प्रतिशत आणि सौ. रोहिणी ताम्हनकर, देवगड यांनी ६१ प्रतिशत स्तर प्राप्त केला आहे.
या कुटुंबाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे खेरआजींच्या सूनबाई सौ. मीनल खेर, तसेच जावई श्री. प्रकाश दीक्षित यांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचा टप्पा पार केला असून त्यांचे नातजावई देवद आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणारे श्री. विनायक आगवेकर यांनी ६३ प्रतिशत पातळी गाठली आहे.
रत्नागिरी, १३ सप्टेंबर (वार्ता.) – येथे १३ सप्टेंबर या दिवशी झालेल्या एका भावसोहळ्यात सनातनच्या साधिका श्रीमती मंगला खेरआजी (वय ८३ वर्षे) यांनी संतपद गाठल्याची आनंदवार्ता सनातनच्या प्रसारसेविका पू. (कु.) स्वाती खाडये यांनी सर्व साधकांना सांगितली. ही आनंदवार्ता ऐकून सर्व साधकांचा भाव जागृत झाला. या वेळी पू. (श्रीमती) खेरआजी यांच्या स्नुषा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मीनल खेर यांनी श्रीफळ देऊन आणि शाल अन् पुष्पहार घालून पू. आजींना वंदन केले. सौ. मीनल खेर यांनी सनातन-निर्मित श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन पू. (श्रीमती) खेरआजी यांचा सन्मान केला. या वेळी पू. (श्रीमती) खेरआजी यांचे पुत्र श्री. मिलिंद खेर, नातू श्री. रूपेश श्री. ताम्हनकर आणि अनिकेत खेर आणि सनातनचे साधक उपस्थित होते.

सेवा करतांना सतत नामस्मरण चालू ठेवा ! – पू. (श्रीमती) मंगला खेरआजी

आपणाला वाटते आपणच सर्व करत आहोत; मात्र श्रीकृष्णच सर्व करून घेत असतो. प.पू. डॉक्टर सर्व करत आहेत. त्यामुळे मी काळजी करत नाही. स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न करायला हवा, तरच आपली प्रगती होणार आहे. सेवा करतांना नामस्मरण चालू ठेवा. नामस्मरणही सेवा म्हणून करायला हवे. नामस्मरण करत सेवा केल्यास आनंद मिळतो. नामस्मरणाच्या वेळा पाळायला हव्यात. नामस्मरणाने पुष्कळ लाभ होतो. मन निर्विचार रहाते. मनातील विकल्प निघून जातात.

आजी सतत श्रीकृष्णाला आळवतात ! – सौ. मीनल खेर

श्रीकृष्ण आणि प.पू. डॉ. आठवले सतत सोबत आहेत, असा पू. आजींचा भाव आहे. त्या सतत श्रीकृष्णाला आळवतात. त्यांचा सतत नामजप होत असतो, तसेच प्रार्थना आणि कृतज्ञता होत असते. त्यामुळे त्यांना कशाचीच काळजी आणि भीती नाही. त्या आमच्या माऊली आहेत. त्या म्हणतात देव तुम्हाला भरभरून देणार आहे. काही अल्प पडणार नाही.
कोणताही बाका प्रसंग उद्भवल्यास पू. आजी धीर देते. पू. आजी सकारात्मक राहून प्रत्येक प्रसंग स्वीकारते, असेपू. आजींचा नातू श्री. रूपेश ताम्हनकर यांनी या वेळी सांगितले.

श्रीमती मंगला खेर यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. उतारवयातही घरातील सर्व कामे करणे
आईचे वय ८३ वर्षे असूनही ती घरातील सर्व कामे करत असते. तिला विश्रांती घेण्यास सांगितल्यावर ती म्हणते, ही माझी सेवाच आहे. प.पू. डॉक्टर मला शक्ती देतात ! तिची सेवा चैतन्याच्या स्तरावर चालू असते. – सौ. रोहिणी ताम्हनकर, देवगड (कन्या), सौ. माधुरी दीक्षित, सातारा (कन्या) आणि सौ. मीनल खेर, रत्नागिरी
२. वक्तशीरपणा
प्रत्येक कृती वेळेत होण्याकडे आईचा कटाक्ष असतो. दिवसभरातील प्रत्येक कृती करण्याची तिची वेळ ठरलेली असते आणि त्या वेळेतच ती सर्व गोष्टी करते, उदा. नामजप करणे, सेवा करणे, जेवण करणे, दिवा लावणे. – सौ. मीनल खेर आणि श्री. मिलिंद खेर, रत्नागिरी
३. आसक्ती नसणे 
अ. आईला कोणत्याच गोष्टीविषयी आसक्ती नाही. स्वतःसाठी काही घ्यावे, असेही तिला पूर्वीपासूनच कधी वाटले नाही. – सौ. रोहिणी ताम्हनकर आणि सौ. माधुरी दीक्षित
आ. आई घरातील कोणत्याही गोष्टींत अडकत नाहीत. आधी त्यांना अनिकेतची (नातवाची) थोडी काळजी वाटायची. आता तशी वाटत नाही. – सौ. मीनल खेर आणि श्री. मिलिंद खेर
४. स्थिर असणे
आजींचा रक्तदाब अल्प असला, तरी त्या स्थिर असतात. एरव्ही रुग्ण घाबरलेले दिसतात; मात्र आजींचे एवढे वय असूनही त्या आतून स्थिर असतात. – डॉ. मंदार भिडे, रत्नागिरी
५. सतत आनंदी असणे
आजींचे वैशिष्ट्य म्हणजे इतरांची साधना चांगली व्हावी, यासाठी त्यांची धडपड असते. त्या सतत आनंदी असतात. त्या लवकरच संत होणार, असे वाटते. – सौ. मंजिरी बेडेकर, रत्नागिरी
६. प.पू. डॉक्टरांप्रती असलेला भाव !
सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक कृती ती प.पू. डॉक्टरांना सांगून करते. ती सतत मनातून किंवा वैखरीतून त्यांच्याशीच बोलत असते. तिच्या बोलण्यात प.पू. डॉक्टरांविना दुसरा कोणताच विषय नसतो. ती नेहमी बोलतांनाही प.पू. डॉक्टरांच्या संदर्भातील अनुभव सांगत असते. कठीण परिस्थिती उद्भवल्यास ती सर्वांना प.पू. डॉक्टरांचे आपल्याकडे लक्ष आहे. तेच आपली काळजी घेत आहेत, असे सांगून सकारात्मक रहायला सांगते !
– सौ. रोहिणी ताम्हनकर, सौ. माधुरी दीक्षित आणि सौ. मीनल खेर
७. जाणवलेले पालट
७ अ. त्वचा तेजस्वी आणि मऊ होणे
आईची त्वचा तेजस्वी आणि मऊ झाली आहे. तिचा तोंंडवळा मधे मधे गुलाबी दिसतो. – सौ. रोहिणी ताम्हनकर, सौ. माधुरी दीक्षित आणि सौ. मीनल खेर
७ आ. शांत आणि स्थिर
आईचा नामजप अखंड चालू असतो. तिच्याकडे पाहून पुष्कळ शांत आणि स्थिर वाटते. आई सर्वांमध्ये असूनही नसल्यासारखीच वाटते. आईच्या वाणीतील चैतन्यामुळे आणि अस्तित्वामुळे वातावरणात पुष्कळ चैतन्य जाणवते. – सौ. रोहिणी ताम्हणकर आणि सौ. माधुरी दीक्षित
७ इ. प्रार्थना करतांना देवतांचे अस्तित्व जाणवणे
आई घरात असल्या की, घरात देवत्व जाणवते. त्या प्रार्थना करतांना देवतांचे अस्तित्व जाणवते. आईमुळे साधकांवर उपाय होत असल्याचे साधक सांगतात. काही वेळा आई सहजच काहीतरी सांगतात आणि पुढे तसेच घडते. – सौ. मीनल खेर आणि श्री. मिलिंद खेर

सहजावस्थेत असलेल्या श्रीमती मंगला खेरआजी !

श्रीमती मंगला खेरआजी जून २०१५ मध्ये पनवेल येथे आमच्या घरी रहायला आल्या होत्या. त्या वेळी लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
१. सहजावस्था : आजींकडे पाहून त्या पुष्कळ शांत असून सहजावस्थेत असल्याचे जाणवले. त्या प्रत्येक वेळी साधनेच्या अनुषंगानेच बोलतात.
२. कसलीही तक्रार नसणे : जेवण आणि झोप यांच्या वेळांच्या संदर्भात आजींची कोणतेच गार्‍हाणे नसायचे. आमच्या घरातील एका व्यक्तीला जेवायला येण्यास विलंब होणार होता. तेव्हा आजीही दुपारी २ पर्यंत आमच्या सर्वांसमवेत जेवणासाठी थांबल्या. आजींकडे पाहिल्यानंतर नामजप चालू झाला.
– सौ. मनीषा गाडगीळ, सनातन संकुल, देवद, पनवेल. (जून २०१५)

श्रीमती मंगला खेरआजी संत होणार, असा विचार ४ – ५ वेळा मनात येणे

गुरुपौर्णिमेच्या सारणीची सेवा करतांना ज्या ज्या वेळी श्रीमती मंगला खेर यांचे नाव माझ्यासमोर यायचे, तेव्हा आता त्या संत होणार, असा विचार मनात यायचा. ४ – ५ वेळा हा विचार माझ्या मनात येऊन गेला. तेव्हा मी त्यांचे छायाचित्रही पाहिले नव्हते. आता धारिकेचे संकलन करतांना आकस्मिकपणे येणार्‍या या विचाराचा उलगडा झाला. – सौ. सुजाता मधुसूदन कुलकणी, रामनाथी आश्रम, गोवा. (११.९.२०१५)