साधकांना सेवेसाठी साहाय्यक असलेल्या भ्रमणभाष, संगणक,‘इअरफोन’ इत्यादी उपकरणांवर वाईट शक्तींनी आक्रमण केल्यामुळे साधकांच्या सेवेत अडथळे निर्माण होणे

‘सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. साधक सेवेसाठी वापरत असलेल्या उपकरणांवर, उदा. संगणक, भ्रमणभाष, ‘इअरफोन’ इत्यादींवर अनिष्ट शक्ती आक्रमण करून साधकांच्या सेवेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भ्रमणभाष संच आपोआप नादुरुस्त होणे, त्यांची गती न्यून होणे, भ्रमणभाषच्या नेटवर्कला आणि ‘इंटरनेट’ला अडचणी आल्याने साधकांना संपर्क करता न येणे, तसेच लघुसंदेश पाठवता न येणे अन् ‘व्हॉट्सॲप’सारख्या संदेशवहन प्रणाली (मेसेजिंग ॲपस्) आपोआप बंद होत असल्याने सेवेच्या निरोपांची देवाण-घेवाण करता न येणे; भ्रमणभाषवर आपला आवाज समोरच्याला ऐकू न येणे; संगणकीय धारिका किंवा तिच्यातील लिखाण आपोआप ‘करप्ट’ होणे, संगणक ‘हँग’ होणे इत्यादी अडचणी साधकांना येत आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य व्यापक स्तरावर शीघ्र गतीने चालू आहे. साधकांची सेवा गतीने होण्यासाठी भ्रमणभाषचा वापर करणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे अनिष्ट शक्ती उपकरणांवर आक्रमणे करून धर्मप्रसाराचे कार्य आणि सेवा यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे आणत आहेत. यावरून ‘वाईट शक्तींच्या त्रासाची तीव्रता किती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे’, हे लक्षात येते. यासाठी सर्व साधकांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय परिणामकारकतेने करणे आवश्यक आहे. त्यासाठी साधकांनी पुढील प्रकारे उपाय करावेत.

१. अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना लिंबाने भ्रमणभाष, तसेच संगणकाची दृष्ट काढावी अन् ते विसर्जित करावे.

२. ‘मॉनिटर’च्या मागे १ खोका, तसेच ‘सी.पी.यु.’च्या भोवती तीन खोकी लावून ठेवावीत.

३. रात्री झोपण्यापूर्वी भ्रमणभाष खोक्यामध्ये भारित करण्यासाठी ठेवावा किंवा त्याच्याभोवती खोकी लावून ठेवावीत.

४. संगणकाला किंवा भ्रमणभाषला काळानुसार दैनिकातील चौकटीत सांगितलेली नामपट्टी लावून ठेवावी.

५. आठवड्यातून एकदा उपायांसाठी वापरलेली खोकी उन्हात ठेवून त्यांची शुद्धी करावी.

६. संगणकाला किंवा भ्रमणभाषला अधिक अडचणी येत असल्यास लिंबाने दृष्ट काढावी आणि ते विसर्जित करावे.

७. संगणक किंवा भ्रमणभाष यांवर महत्त्वाची सेवा चालू असेल, तर त्यांच्या शेजारी लिंबू ठेवावे आणि ते खराब झाल्यावर विसर्जित करावे.

८. वरील उपाय करण्यापूर्वी पुढील प्रार्थना भावपूर्णपणे करावी – ‘हे श्रीकृष्णा, माझ्याभोवती आणि सर्व उपकरणांच्या भोवती चैतन्याचे कवच निर्माण होऊ दे. वाईट शक्तींचे आक्रमण त्यांवर होऊ नये.’ शेवटी कृतज्ञता व्यक्त करावी.

‘धर्मप्रसाराच्या कार्यासाठी भगवंताने उपलब्ध करून दिलेली उपकरणे म्हणजे गुरुसेवक आहेत’, असा भाव ठेवून त्यांच्यासाठी आध्यात्मिक स्तरावर उपाय करावेत !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०२२)

 

Leave a Comment