शबरीमला देवस्थानामध्ये महिलांना प्रवेशबंदी योग्य कि अयोग्य ?

‘केरळमधील शबरीमला देवस्थानात प्राचीन काळापासून १० ते ५० वर्षे वयोगटातील (या वयोगटातील महिलांना मासिक पाळी असते.) महिलांना प्रवेशबंदी आहे. या संदर्भात एका महिलेने विचारले असता, ‘त्रावणकोर देवस्वम मंडळा’चे शासकीय पदाधिकारी श्री. गोपालकृष्णन् यांनी ‘महिला भाविक रजस्वला आहेत कि नाही, हे पडताळणारे यंत्र निर्माण झाले की, त्याद्वारे ‘स्कॅन’ करून महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाईल’, असे विधान केले होते. या उत्तराच्या निषेधार्थ केरळमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनी निकिता आझाद यांनी सोशल मीडियावर ‘हॅपी टू ब्लीड’ ही चळवळ चालू केली आहे. ‘एबीपी माझा’सारख्या दूरचित्रवाहिन्यांनी या संदर्भात स्त्रीमुक्तीचा टाहो फोडला. या संदर्भातील सनातनचा दृष्टीकोन पुढे दिला आहे.

१. वाद निर्माण होण्यामागील २ महत्त्वाची कारणे 

अ. श्री. गोपालकृष्णन् यांनी सभ्य भाषेत उत्तर देणे अपेक्षित होते. त्यांनी शबरीमला देवस्थानामध्ये महिलांना असलेल्या प्रवेशबंदीमागील धर्मशास्त्र सांगितले असते, तर कदाचित् हा विवाद निर्माण झाला नसता !
आ. केरळमध्ये सध्या सत्तेमध्ये नसलेले डावे पक्ष हिंदु संस्कृतीच्या विरोधात अशा तथ्यहीन चळवळी राबवत आहेत. ‘बीफ फेस्टीवल’ (गोमांस महोत्सव), ‘किस ऑफ लव्ह’ (प्रेमाचे चुंबन), ‘हॅपी टू ब्लीड’ (मासिक पाळीचा आनंद) ही त्याची उदाहरणे आहेत. ‘राईट टू नॉट वेअर बुरखा’ (बुरखा न घालण्याचा अधिकार) किंवा ‘राईट टू नॉट गिव्ह तलाख’ (घटस्फोट न देण्याचा अधिकार) अशा चळवळी तेथे जन्माला येत नाहीत.

२. शबरीमला देवस्थानात स्त्रियांना प्रवेशबंदी असण्यामागील कारण

अ. भगवान अयप्पा हे भगवान शिव आणि श्रीविष्णुचा मोहिनी अवतार यांच्या तत्त्वापासून निर्माण झालेले आहेत. ते आजीवन ब्रह्मचारी होते. त्यांचे ब्रह्मचर्याचे पालन व्हावे, यासाठी तेथे १० ते ५० वयोगटांतील स्त्रियांना सरसकट प्रवेशबंदी आहे.
आ. भगवान अयप्पा स्वामींचे व्रताचरण करणार्योंना ब्रह्मचर्याचे पालन विशिष्ट कालावधीसाठी करावे लागते. हे व्रताचरणाचे अत्यंत कडक नियम आहेत. या काळात ते शबरीमला देवस्थानात दर्शनासाठी येतात. अशांच्या व्रताचरणात बाधा येऊ नये, हेही यामागील एक कारण आहे.

३. पाळीच्या काळात स्त्रियांना देवस्थानात न जाण्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारण

अ. अध्यात्मशास्त्र सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या आधारे प्रत्येक धर्मशास्त्रीय कृतीचे विवेचन करते. अध्यात्मशास्त्रानुसार स्त्रीला तिच्यातील रजोगुण वाढल्याने पाळी येते. अशी स्त्री सात्त्विक व्यक्ती, स्थान, वस्तू आदींच्या संपर्कात आल्यास तिच्यातील रजोगुणाचे प्रमाण न्यून होऊन पाळी अल्प होण्याचा संभव असतो. तसे होऊ नये; म्हणूनच पाळीच्या वेळी देवळात किंवा संतदर्शनाला जाऊ नये. तसे केल्यास ३० – ३५ वर्षे वयालाच सात्त्विकतेमुळे पाळी थांबू शकते. पाळी थांबली, तर स्त्रीची प्रजननक्षमता घटते. स्त्रीमध्ये उत्तम प्रजा निर्माण करण्याचे दायित्व असल्याने तिने पाळीचे नियम पाळावेत, असा धर्मशास्त्रांचा आग्रह असतो.
आ. मंदिरात देवतेच्या मूर्तीमुळे पुष्कळ सात्त्विकता असते आणि स्त्रियांच्या पाळीच्या वेळी रजोगुण वाढलेला असतो. अशा वेळी मंदिरात गेल्यानंतर त्या वास्तूतील महिलांना सात्त्विकता सहन होत नाही. रजोगुण अधिक असलेल्या मुलीला पुष्कळ त्रास होतो. रजोगुण अल्प असलेल्या मुलीला अल्प त्रास होतो.
इ. हिंदु धर्माने दैनंदिन साधनेच्या अंतर्गत भक्तीमार्गानुसार कर्मकांड आणि उपासनाकांड ही दोन अंगे सांगितली आहेत. देवपूजा, देवळात दर्शन, व्रताचरण, यज्ञ, स्तोत्रपठण ही कर्मकांडाच्या अंतर्गत येणारी साधना आहे. ही साधना करतांना धर्मशास्त्रांनी घालून दिलेले नियम, उदा. मासिक धर्म, सुवेरसुतक, शौच-अशौच पाळणे आवश्यक असते.

४. स्त्रीमुक्तीवाले हिंदु धर्मालाच लक्ष्य का करतात ?

देहलीचा सुप्रसिद्ध हजरत निजामुद्दीन दर्गा आणि तेथील जामा मशीद (ही भारतातील सर्वांत मोठी मशीद आहे.) येथेही महिलांना प्रवेशबंदी आहे. मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात जेथे चादर चढवतात, तेथे मुसलमान महिलांना प्रवेश नाही. याविषयी काही भाविक महिला कोर्टात गेल्यानंतर न्यायालयाने कुठलाही निकाल न देता हे सूत्र तुम्ही आपापसांत बोलून ठरवा, असा मोघम निकाल दिला. याविषयी स्त्रीमुक्तीवाले का आवाज उठवत नाहीत ?

५. धर्माचरणाचे पालन हेच सुखाचे मूळ आहे !

‘सुखस्य मूलम् धर्मः ।’ म्हणजे सुखाचे मूळ धर्माचरण हेच असते; म्हणून धर्मनिष्ठ लोक धर्मशास्त्राचे विधिवत् आचरण करतात. देवधर्म पाळायचा आहे, तर त्याचे नियमही पाळले पाहिजेत, तरच आध्यात्मिक लाभ होतो. मनानुसार नियम केले, तर केवळ मानसिक समाधान मिळेल; पण त्यातून आध्यात्मिक लाभ होणार नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.११.२०१५)