विज्ञान ही अध्यात्माचीच एक शाखा

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना, तसेच सर्वसामान्य व्यक्तींनासुद्धा ‘विज्ञान’ आणि ‘अध्यात्म’ या दोन निरनिराळ्या गोष्टी वाटतात. अध्यात्म म्हणजे अनंताचे, सर्व विषयांचे ज्ञान ! मग अध्यात्मात विज्ञान कसे येणार नाही ? विज्ञान ही अध्यात्माचीच एक शाखा आहे.

 

१. ज्ञानाच्या वृक्षाला । विज्ञानाची शाखा । वृथा का भांडता । करूनी भेद ।।

‘विज्ञान’ आणि ‘अध्यात्म’ या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत, अशी समाजाची धारणा का बनली अन् वास्तवात तसे का नाही, याचा उलगडा पुढील विवेचनावरून होईल.

अ. आधुनिक विज्ञानाधिष्ठीत तंत्रज्ञानाचे दास्यत्व पत्करणारा मानव

आधुनिक विज्ञानाचा प्रभाव गेल्या दोन शतकांपासून निर्माण झाला. सुखाचे चोचले पुरवण्यासाठी विज्ञानाधिष्ठीत तंत्रज्ञान विकसित केले गेले आणि मनुष्याची प्रवृत्ती मुळातच भौतिक सुखाकडे, चंगळवादाकडे जाण्याची असल्यामुळे तो या तंत्रज्ञानाचा दास बनत गेला.

आ. ‘विज्ञान विरुद्ध सनातन हिंदु धर्म’ असे शत्रूत्वाचे चुकीचे चित्र निर्माण होणे

मनुष्याचे जीवन एखाद्या दासाप्रमाणे तंत्रज्ञानावर विसंबले, तसेच इतर काही कारणांमुळे आध्यात्मिक प्रवृत्तीच्या लोकांवरही विज्ञानाचा वेगळ्या प्रकारे प्रभाव पडला आणि त्यांनासुद्धा ‘विज्ञान हा त्यांचा मोठा शत्रू आहे’, असे वाटू लागले. त्यातच तथाकथित समाजसुधारकांनी ‘सनातन हिंदु धर्मातील विविध गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करून दाखवा’, असा घोष चालू केला. यामुळे ‘विज्ञान धर्माहून श्रेष्ठ आहे कि काय’, असा न्यूनगंड हिंदू समाजात निर्माण झाला. या न्यूनगंडाचा परिणाम असा झाला की, ‘विज्ञान विरुद्ध सनातन हिंदु धर्म’ असे चित्र रंगवून लढाई चालू झाली.

इ. विज्ञानाच्या योग्य विकासाला पोषक असा सनातन हिंदु धर्म

पुढे दिलेल्या काही उदाहरणांवरून हे लक्षात येईल.

१. वैद्यक क्षेत्र

आयुर्वेदाला पाचवा वेद मानतात. आयुर्वेदाचे महत्त्व आता सार्‍या जगाला पटू लागले आहे. भारत हे त्वचा रोपणाचे (प्लास्टिक सर्जरी) जन्मदात्रे ठिकाण आहे; कारण प्राचीन काळी भारतामध्ये तुटलेले नाक जोडणे, तुटलेले कान जोडणे, स्त्रियांच्या गालावर खळ्या पाडणे इथपर्यंत शल्यकर्मे होत होती.

२. गणित क्षेत्र

शून्य ही भारतियांची जगाला देणगी आहे. आपल्याकडे खर्व, निखर्व इत्यादींपर्यंत संख्या मोजण्याचे मापन आहे.

३. धातूशास्त्र

आपल्याकडे न गंजणारा लोहस्तंभ आहे.

४. खगोलशास्त्र

भारतीय शास्त्रांनी पुरातन कालापासून अनेक नक्षत्रादिकांचे वर्णन केले आहे.

५. वास्तूशास्त्र आणि शिल्पशास्त्र

वेरूळचे कैलास लेणे हे शिखरापासून खाली एकाच दगडामध्ये कोरलेले आहे.

६. विमानशास्त्र

१८९५ मध्ये श्री. तळपदे यांनी वेदांमधील ज्ञान वापरून विमान बनवले. त्यांनी ते विमान काही काळ आकाशात स्वतः उडवले होते. या प्रयोगाला लोकमान्य टिळकही उपस्थित होते.

७. नौकानयन

भारतियांचा व्यापार जावा-सुमात्रा इथपर्यंत, म्हणजे सध्याच्या इंडोनेशियापर्यंत समुद्रमार्गाने होत असे.

इतक्या शोध-विकासांचा विचार जी संस्कृती देते, ती विज्ञानाच्या विरोधी असेल का ? तात्त्विकदृष्ट्या बघितले, तर सनातन हिंदु धर्मामध्येच विद्यांचे दोन प्रकार सांगितले आहेत – परा विद्या आणि अपरा विद्या. परा विद्या म्हणजे श्रेष्ठ विद्या. अपरा विद्या म्हणजे कनिष्ठ विद्या. अपरा विद्येमध्ये वर सांगितलेल्या सर्व गोष्टी येतात. जर सनातन हिंदु धर्माचा विज्ञानाला विरोध असता, तर वरील प्रकारच्या विविध विद्याशाखांमध्ये अलौकिक अशा प्रकारचे कर्तृत्व बघायला मिळाले नसते. असे असतांनाही सध्याचा समाज विज्ञानाला सर्वश्रेष्ठ समजतो आणि अध्यात्माला मागासलेले समजतो.’

विज्ञानाची जेवढी प्रगती होत आहे, तेवढ्या प्रमाणात मानव विज्ञानावर अधिकाधिक अवलंबून रहात आहे. त्यामुळे मानवाच्या आत्महत्यांचेही प्रमाण अधिकाधिक वाढत आहे ! – प.पू. डॉ. आठवले (१२.१०.२०१४)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म’

Leave a Comment