कपड्यांचा रंग

हिंदु धर्माने ऋतूमानाप्रमाणे, म्हणजेच काळाच्या स्तरावर कार्यरत असणार्‍या सृष्टीचक्रांच्या नियमांप्रमाणे त्या त्या काळात त्या त्या स्तरावर आध्यात्मिक लाभ जास्तीतजास्त मिळवण्याच्या दृष्टीने रंगांच्या वापराची योजना केलेली आढळते.

शुक्ल शांत्यर्थ जाण । रक्तासवे वशीकरण ।

अभिचारी कृष्णवर्ण । पीतवर्ण धनागमी ।।

अर्थ : पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे. वशीकरणासाठी लाल, तर वाईट कृत्ये करण्यासाठी काळ्या रंगाचा वापर करतात. पिवळा रंग धनसंपदेचे दर्शक आहे.

ऋतूनुसार कपड्यांचा रंग

ऋतू

कपड्यांचा रंग

१. ‘उन्हाळा आणि शरदऋतू पांढरा. पांढरे कपडे सूर्यकिरण परावर्तित करतात; त्यामुळे शरीर थंड रहाते.
२. पावसाळा पांढरा किंवा पिवळा
३. हिवाळा लाल, पिवळा किंवा काळा.
४. वसंतऋतू लाल किंवा अन्य गडद रंग’

प्रत्येक ऋतूत वापरावयाच्या कपड्यांच्या रंगांमागील शास्त्र

१. उन्हाळा आणि शरदऋतू

‘या काळात जास्त प्रमाणात उष्ण लहरींचे ब्रह्मांडात संक्रमण होत असल्याने या संक्रमणाच्या प्रवाहात अनेक प्रकारच्या वाईट शक्तींचेही ब्रह्मांडमंडलात आगमन होत असते. या वाईट शक्तींच्या तीव्र आगमनात्मक संचारापासून रक्षण होण्यासाठी निर्गुण स्तरावर लढू शकणार्‍या पांढर्‍या रंगाचे प्रयोजन या काळात केले जाते. हे संक्रमण वाईट शक्तींच्या आगमनाला पोषक असल्याने या काळात आगमनाच्या स्थितीतील वाईट शक्ती जास्त प्रमाणात अप्रकट स्थितीत असतात. प्रकट स्थितीपेक्षा अप्रकट स्थिती जास्त सूक्ष्म आणि धोकादायक असल्याने या सूक्ष्म अन् न कळणार्‍या आक्रमणाला तोंड देण्यासाठी पांढर्‍या रंगाचे प्रयोजन केले जाते.

२. पावसाळा

पावसाळ्यात ब्रह्मांडात आपतत्त्वरूपी सगुण लहरींचे प्रवाहात्मक प्राबल्य जास्त असल्याने या काळात सगुण-निर्गुण स्तरावर कार्य करणार्‍या अनेक कनिष्ठ आणि उच्च देवतांच्या तत्त्वांचे आगमन ब्रह्मांडमंडलात न्यून-अधिक स्तरावर होत असते; म्हणून या काळात सगुण-निर्गुण तत्त्वांच्या प्रवाहाला पोषक असा पिवळा आणि पांढरा रंग वापरण्याचे प्रमाण जास्त असते. त्या त्या परिस्थितीला पोषक असे ते ते रंग वापरल्याने त्या त्या काळात ब्रह्मांडात संचारण अवस्थेत असलेल्या त्या त्या देवतांची तत्त्वे ग्रहण होऊन जिवाची त्या त्या काळात आध्यात्मिक उन्नती झपाट्याने होण्याचे प्रमाण वाढते.

३. हिवाळा

हिवाळ्यात शक्तीरूपी लहरींचे वायूमंडलातील संक्रमण वाढते. या संक्रमणाचा कल जास्त प्रमाणात घनीभूत होण्याकडे असतो. लाल रंग हा शक्तीरूपी लहरींच्या घनीकरणाच्या प्रक्रियेला पोषक आहे, तर पिवळा रंग हा शक्तीचे चैतन्यात रूपांतर करून शक्तीचा उच्च स्तरावर लाभ मिळवून देण्यात अग्रेसर आहे. यामुळे पिवळ्या रंगाचे प्राबल्यही लाल रंगासह नेहमी आढळते; कारण पिवळ्या रंगातील सगुणरूपी चैतन्यता सूक्ष्म-स्तरावर शक्तीरूपी कार्याला सातत्याने चालना आणि वेग उपलब्ध करून देणारी असल्याने लाल-पिवळे हे रंग जोडीने आढळतात; म्हणून हळद-कुंकू ही जोडी नेहमीच पूजाविधीत लाभदायक ठरते.

याच काळात संक्रांत येत असते. मकरसंक्रांतीच्या दिवशी वातावरणात रज-सत्त्व कणांचे प्राबल्य असल्याने काळ्या रंगाचा त्रास होत नाही. काळा रंग हा तमोगुण घनीभूत करण्यास पोषक असल्याने आणि तमोगुणाचा स्पर्श उष्ण असल्याने हिवाळ्यातील गारव्यापासून देहाचे बाह्य स्तरावर रक्षण होण्यासाठी काळा रंग वापरला जातो. काळा रंग स्थूल स्तरावर कार्य करण्यास उपयोगी पडतो; परंतु या रंगातून सर्वसामान्य जिवाला त्रास होण्याचीच शक्यता जास्त असल्याने केवळ थंडीपासून रक्षण होण्यासाठी काळा रंग वापरणे घातक ठरते.

४. वसंतऋतू

वसंतऋतूत ब्रह्मांडमंडलात अधिकतम प्रमाणात देवतांच्या सगुण लहरी वास्तव्यास येत असल्याने या सगुण लहरींच्या कार्यरततेला पोषक असणारा, म्हणजेच सगुणाचे आधिक्य दर्शवणारा लाल रंग वापरला जाऊन अधिकतम प्रमाणात सगुण लहरींचा लाभ मिळवला जातो. गडद रंगही सगुण स्तरावर अल्प प्रमाणात का होईना; परंतु शक्तीरूपी स्पंदनांतून त्या त्या देवतेचे तत्त्व आकृष्ट करण्यासाठी पोषक ठरत असल्याने लाल रंग उपलब्ध झाला नाही, तर अन्य गडद रंगाचे वस्त्र वापरले जाते.

हिंदु धर्माने ऋतूमानाप्रमाणे, म्हणजेच काळाच्या स्तरावर कार्यरत असणार्‍या सृष्टीचक्रांच्या नियमांप्रमाणे त्या त्या काळात त्या त्या स्तरावर आध्यात्मिक लाभ जास्तीतजास्त मिळवण्याच्या दृष्टीने रंगांच्या वापराची योजना केलेली आढळते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, माघ कृष्ण एकादशी, कलियुग वर्ष ५११० (३.३.२००८, सकाळी ११.१२)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’

Leave a Comment