हिंदुत्‍वनिष्‍ठांना खोट्या आरोपांमध्‍ये नाहक गोवणार्‍यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात धिक्‍कार !

हिंदु धर्माच्‍या विरोधात लिखाण करणार्‍या प्रसिद्धीमाध्‍यमांना न्‍यायालयात
उत्तर द्यावे लागेल ! – अधिवक्‍ता नागेश जोशी, सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद, गोवा

अधिवक्‍ता नागेश जोशी

रामनाथी, १३ जून (वार्ता.) – ‘प्रसिद्धी आणि पैसे मिळवायचे असतील, तर हिंदु धर्म अन् धर्माभिमानी यांवर टिका करा’ हे षड्‍यंत्र अलीकडे मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. ‘माध्‍यमांद्वारे होणार्‍या अपकीर्तीला उत्तर द्यायचे नाही’, अशी भूमिका काही संघटनांची असते. त्‍यामुळे अशा प्रसारमाध्‍यमांचे अधिक फावते; परंतु सनातन संस्‍थेने प्रारंभीपासूनच अशा माध्‍यमांच्‍या विरोधात कायदेशीर लढा देण्‍याची भूमिका घेतली आहे. हिंदु धर्माच्‍या विरोधात लिखाण करणार्‍या प्रसिद्धीमाध्‍यमांना न्‍यायालयात उत्तर द्यावे लागेल, असे परखड प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्‍ता नागेश जोशी यांनी केले. ते येथील श्री रामनाथ मंदिराच्‍या श्री विद्याधिराज सभागृहात चालू असलेल्‍या दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात ‘सनातनवरील आरोपांचे खंडण’ या विषयावर बोलत होते. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनीही सनातनवर होणार्‍या आरोपांचे खंडण केले. ‘हिंदुत्‍वनिष्‍ठांवर नाहक होणार्‍या आरोपांना यापुढे वैध मार्गाने परंतु परखडपणे प्रत्‍युत्तर दिले जाईल’, असा निर्धार या वेळी उपस्‍थितांनी केला. उत्‍स्‍फुर्तपणे विविध जयघोष देऊन हिंदुत्‍वनिष्‍ठांना समर्थन दिले.

अधिवक्‍ता नागेश जोशी पुढे म्‍हणाले, ‘‘हिंदु धर्म, देवता यांची अपकीर्ती करणार्‍या आणि सनातन संस्‍थेवर खोटे आरोप करणार्‍या ५० हून अधिक प्रसिद्धीमाध्‍यमांच्‍या विरोधात आम्‍ही न्‍यायालयात खटले प्रविष्‍ट केले आहेत. हिंदु धर्म आणि सनातन संस्‍था यांची अपकीर्ती करणार्‍या मोठ्या नेत्‍यांच्‍या विरोधातही आम्‍ही न्‍यायालयात खटले प्रविष्‍ट केले आहेत. यामध्‍ये आम्‍हाला यशही मिळाले आहे. काही वृत्तपत्रांना चुकीच्‍या लिखाणाविषयी क्षमाही मागावी लागली आहे. जे राज्‍यघटनेच्‍या नावाने नेहमी गळा काढतात, त्‍यांना राज्‍यघटनेने दिलेल्‍या मार्गानेच आम्‍ही लढा देत आहोत. न्‍यायालयीन लढा हे धर्मजागृतीचे एक माध्‍यम आहे.’’

 

पूर्वग्रहदूषित अन्‍वेषणामुळे गजाआड गेलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांना न्‍याय मिळवून
द्यावा लागेल ! – अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर

हिंदुत्‍वनिष्‍ठांना खोट्या आरोपांखाली अनेक खटल्‍यांवर गोवले आहे. प्रत्‍येक खटल्‍यात चुकीच्‍या पद्धतीने अन्‍वेषण होत आहे. तुम्‍ही कुठेही गेला, तरी तुम्‍ही इतरांना विचारा की, ‘गौरी लंकेश कोण होत्‍या ? त्‍या विचारवंत होत्‍या, तर त्‍यांनी कोणता वैचारिक संघर्ष केला ?’ कुणालाच त्‍यांच्‍याविषयी काही सांगता येत नाही; कारण गौरी लंकेश यांनी समाजासाठी काहीच कौशल्‍याचे काम केलेले नाही. उलट गौरी लंकेश यांनी चुकीच्‍या पद्धतीने लेख लिहिल्‍याविषयी न्‍यायालयाने त्‍यांना शिक्षा केली होती.

अधिवक्‍ता इचलकरंजीकर पुढे म्‍हणाले

१. मालेगाव स्‍फोट प्रकरणी मुसलमानांची निर्दोष मुक्‍तता करून हिंदूंना गोवण्‍यात आले. या खटल्‍यातून ‘भगवा आतंकवाद’ असल्‍याचे सिद्ध करण्‍याचा प्रयत्न केला गेला.

२. ‘डॉ. दाभोलकर हत्‍या प्रकरणी अन्‍वेषण संपलेले नाही’, असे सांगून सनातनचे साधक श्री. विक्रम भावे यांना २ वर्षे कारागृहात ठेवण्‍यात आले.

३. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्‍ट्रीय सचिव तथा सुप्रसिद्ध अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर यांनाही अटक करून त्‍यांना ४२ दिवस कारागृहात ठेवण्‍यात आले.

४. कॉ. गोविंद पानसरे हत्‍या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना विनाकारण अटक करण्‍यात आली. श्री. समीर गायकवाड हे २२ मास कारागृहात राहिले. त्‍यांचा खटला लढण्‍यासाठी कोल्‍हापूरच्‍या न्‍यायालयातील अधिवक्‍त्‍यांनी वकीलपत्र घेतले नाही; मात्र दुसर्‍या दिवशी महाराष्‍ट्रातून ३१ अधिवक्‍ते हा खटला लढण्‍यासाठी संघटित होऊन कोल्‍हापूर येथे आले. वर्ष २०१६ मध्‍ये पोलीस सांगतात की, समीर गायकवाड यांनी हा खून केला नाही. सनातनचे साधक सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी हा खून केला आहे.

५. कोल्‍हापूरहून पुणे येथे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना वाहनातून आणल्‍यानंतर ‘डॉ. तावडे यांची छायाचित्रे काढावीत’, असे पोलिसांनी छायाचित्रकारांना सांगितले. हे नियमबाह्य आहे. पेशाने सुप्रतिष्‍ठित आधुनिक वैद्य असलेल्‍या व्‍यक्‍तीची ही जाणीवपूर्वक केलेली अपकीर्ती आहे. पोलिसांच्‍या अशा वर्तनातून चीड निर्माण होते.

अशा प्रकारे अनेक खटल्‍यांत सनातनचे साधक आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांना गोवून त्‍यांचा विनाकारण छळ करण्‍यात आला. याविषयी प्रसारमाध्‍यमांनी सत्‍य वृत्त दिले नाही. त्‍यांनी चुकीच्‍या बातम्‍या प्रसिद्ध केल्‍या.

६. वर्ष २०१८ मध्‍ये गौरी लंकेश हत्‍याप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना त्‍यांचा काही संबंध नसतांना अटक करण्‍यात आली.
देशात असे वातावरण निर्माण केले जात आहे की, ‘गांधी हत्‍येनंतर देशात शांतता होती; पण डॉ. दाभोलकर यांची हत्‍या झाल्‍यानंतर देशाचे वातावरण बिघडले आहे.’ ४ साम्‍यवाद्यांच्‍या हत्‍या झाल्‍या, तर देशात एवढे तणावाचे वातावरण निर्माण केले जाते; मात्र देशाला स्‍वातंत्र्य मिळाल्‍यापासून साम्‍यवाद्यांनी १४ सहस्रांहून अधिक निरपराध्‍यांना ठार मारले आहे. त्‍याविषयी कुणीही चर्चा करत नाही. त्‍यामुळे अशा अनेक प्रकरणांत आपल्‍याला मुळापर्यंत लढाई लढून न्‍याय मिळवावा लागेल.

Leave a Comment