युद्धकाळात उपयोगी पडणार्‍या आणि आपत्काळापासून वाचवणार्‍या या कृती आतापासूनच करा !

Article also available in :

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘रशिया-युक्रेन युद्ध चालू झाले आहे. युक्रेनमधील जनता ‘युद्धाची झळ काय असते ?’, हे अनुभवत असल्याचे प्रतिदिन येणार्‍या बातम्यांतून आपण वाचत आहोत. पुढे या युद्धात अन्य देशही सामील झाल्यास तिसरे महायुद्ध आरंभ व्हायला फार वेळ लागणार नाही. रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमधील जनतेची तिसर्‍या महायुद्धाचा सामना करण्याची थोडीफार सिद्धता झाली असेल. तेथील जनतेला शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण तेथील लष्कर देत आहे. त्यामुळे तिचे मनोबळ वाढून ती जनता रशियन सैन्याचा निकराने प्रतिकार करत आहे. त्यामुळे रशियाला युक्रेन कह्यात घेणे अवघड झाले आहे. युक्रेनमधील जनतेची ही सिद्धता कौतुकास्पद असली, तरी ती केवळ शारीरिक आणि मानसिक स्तरावरची आहे. सर्वांत महत्त्वाची सिद्धता असते, ती आध्यात्मिक स्तराची !

भारतातील जनतेने रशिया-युक्रेन युद्धाच्या बातम्यांतून ‘युद्धाचा प्रत्यक्ष सामना कसा करावा लागतो ?’, हे शिकावे. तिसरे महायुद्ध झाल्यास ते अनेक मास (महिने) चालेल. त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरील आपली सिद्धता होण्यासाठी कोणती ठळक सूत्रे लक्षात घ्यावीत, हे येथे दिले आहे. ही सिद्धता आजपासूनच गांभीर्याने करा !

 

१. शारीरिक स्तरावरील सिद्धता

अ. संकटाचा सामना करण्यासाठी आपले शरीर सक्षम हवे. तसे होण्यासाठी प्रतिदिन नियमित ३० मिनिटे तरी व्यायाम करा. सूर्यनमस्कार घालणे, हा सर्वांगाला सक्षम करण्यासाठी सुंदर व्यायामप्रकार आहे. नियमित १२ तरी सूर्यनमस्कार घाला. प्रतिदिन थोडेफार पळण्याचा व्यायाम करा. आपल्याला ५ – १० मिनिटे तरी पळता आले पाहिजे. आपल्याला झेपेल तेवढा व्यायाम नियमित करा आणि त्यात प्रतिमास थोडी वृद्धी करा.

आ. नियमित प्राणायाम करा. तो येत नसेल, तर शिकून घ्या. प्राणायाम केल्याने श्वास रोखून धरण्याचा (कुंभक करण्याचा) सराव होतो. हा सराव आपल्याला पाण्यातून कुणाला वाचवायचे असल्यास, धूर झाल्यास किंवा वायूगळती झाल्यास उपयोगी पडणार आहे.

इ. पोहता येणे, हे फार आवश्यक आहे. पाण्यात पडलेल्या दुसर्‍याचा किंवा आपला जीव वाचवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

ई. युद्धकाळात अन्न मिळणे कठीण होईल. तेव्हा आपल्याला १ – २ दिवस भुकेले (उपाशी) रहावे लागेल. याचा सराव होण्यासाठी काही न खाता-पिता एक वेळचा तरी उपवास करण्याची सवय आपल्याला हवी. यासाठी आठवड्यातून एक दिवस त्याचा सराव करा. पुढे ‘संपूर्ण दिवस केवळ पाणी पिऊन उपाशी राहू शकतो का ?’, हेही बघा.

उ. आपल्या शरिराच्या काही तक्रारी असतील, तर वेळीच वैद्य किंवा आधुनिक वैद्य (डॉक्टर) यांना दाखवून त्या दूर करा. छोटेसे जरी दुखणे असले, तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. ४० वर्षे आणि त्यावरील वयोगटातील व्यक्तींनी आपली सामान्य वैद्यकीय, डोळ्यांची आणि दंत चाचणी (routine checkup) करून घ्यावी. पुढे युद्धकाळात वैद्यकीय साहाय्य सहजासहजी मिळणार नाही.

ऊ. वरील चाचणीत दिसून आलेल्या व्याधींवर आवश्यकतेनुसार पुढील चाचण्या आणि उपचार करून आपली वैद्यकीय स्थिती शक्य तेवढी सामान्य करून घ्यावी, उदा. रक्तामधील जीवनसत्त्वांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा न्यून असल्यास, ते पूर्ववत् करण्यासाठी संबंधित जीवनसत्त्वे पूरक आहार आणि गोळी यांच्या रूपात घेणे इत्यादी.

ए. आपल्याला झालेले विकार, ‘ते केव्हा लक्षात आले ?’, त्यांची कारणे, त्यांवर घेत असलेले वैद्यकीय उपचार, पूरक आहार, पथ्य इत्यादींच्या नोंदी एका वहीत करून ठेवाव्यात. ‘एखाद्या विकारासंबंधी पुन्हा चाचणी केव्हा करायची ?’, याचीही नोंद वहीत करावी. नोंदींमध्ये आपल्याला एखादे औषध, पदार्थ, खाद्यपदार्थ, धूळ यांपैकी ज्या घटकांची ‘ॲलर्जी’ आहे, त्यांचीही नोंद करून ठेवावी.

ऐ. आपल्या विकारांशी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे, तसेच अहवाल यांची धारिका बनवून ठेवावी. एका विकाराची कागदपत्रे आणि अहवाल एकत्रित असावेत अन् त्यांचा क्रम दिनांकानुसार लावावा. अलीकडील कागदपत्रे सर्वांत वर ठेवावीत. तसेच ‘गत ३ वर्षांतील कागदपत्रे एका धारिकेत आणि त्याहून जुनी कागदपत्रे वेगळ्या धारिकेत’, असे ठेवले जाऊ शकते. शक्य असल्यास महत्त्वाची कागदपत्रे आणि अहवाल यांची भ्रमणभाषने छायाचित्रे काढावीत अन् ती भ्रमणभाष, ‘पेनड्राईव्ह’ इत्यादींमध्ये संरक्षित करावीत.

ओ. रक्तदाब, मधुमेह यांसारख्या प्रदीर्घ कालावधीसाठी (कदाचित् जन्मभर) औषधोपचार चालू ठेवावा लागू शकेल, असे विकार असल्यास आधुनिक वैद्यांच्या समुपदेशनाने त्यांवरील औषधे संग्रह ठेवावीत. चष्मा, ऐकू येण्यासाठीचे यंत्र यांसारख्या दैनंदिन जीवनासाठी आपल्याला अत्यावश्यक असणार्‍या प्रत्येक उपकरणाचा एक नग आपल्याकडे जास्तीचा असावा. तसेच त्या उपकरणासाठी लागणारी ‘बॅटरी’ इत्यादींचाही आवश्यक तेवढा साठा आपल्याकडे असावा. आपल्याला लागणारी उपचारांसाठीची औषधे, उपकरणे यांचे एक ‘इमर्जन्सी किट’ सिद्ध करून ठेवावे. त्यात किमान १५ दिवसांची औषधे असावीत. आणीबाणीच्या वेळी आपण ते ‘किट’ घेऊन लगेच निघू शकतो.

 

२. मानसिक स्तरावरील सिद्धता

अ. ‘एखाद्या कठीण प्रसंगाला आपण सामोरे जाऊ शकतो का ?’, हे पहावे. दुसर्‍यावर एखादा कठीण प्रसंग ओढवल्यास ‘आपण त्या वेळी काय केले असते ?’, असा प्रश्न स्वतःला विचारून त्या प्रसंगाचा सराव करावा, म्हणजे मनाची सिद्धता होते आणि आपल्यावर तसा प्रसंग घडल्यास आपल्याकडून त्या वेळी भरभर कृती होतात.

आ. स्वतःला किंवा दुसर्‍याला जास्त प्रमाणात कापले किंवा भाजले, तर आपण ते सहन करू शकतो का ? त्या प्रसंगात आपण नुसते विव्हळतो, घाबरतो कि त्यावर उपचार म्हणून काही कृती करतो ? ‘एखाद्याला अपघात झालेला बघितल्यास आपण त्याला साहाय्य करण्यासाठी धावून जातो का ?’, हे पहावे. अशा वेळी आपण मुद्दाम दायित्व घेऊन कृती करायला हवी.

इ. घरात किंवा आणखी कुठे छोटीशी आग लागली, तर आपण घाबरून पळ काढतो कि ती आग विझवण्यासाठी काही कृती करतो ? आपण गांगरून गेल्यास भले आपल्याला आगीचा सामना करण्याची तात्त्विक माहिती असली, तरी ‘त्या प्रसंगी काय करायचे ?’, हे आपल्याला सुचणार नाही; म्हणून अशा प्रसंगी मन खंबीर असणे महत्त्वाचे ठरते.

ई. ‘कुणी आपल्याशी गुंडगिरी करत असल्यास आपण हुशारीने त्याचा सामना करू शकतो का ?’, हे स्वतःला विचारावे. वेळप्रसंगी गुंडाशी दोन हात करण्याचीही आपली सिद्धता हवी. आपल्या ओळखीच्या व्यक्तीचे कुणाशी भांडण होत असल्यास ते सोडवण्याचा प्रयत्न करावा.

उ. दुसर्‍याला साहाय्य करण्याची वृत्ती आपल्यात हवी आणि ती नसल्यास प्रयत्नपूर्वक निर्माण करावी. आपल्यात ती वृत्ती असेल, तर आपल्यावरील कठीण प्रसंगात देव इतरांना आपल्या साहाय्याला पाठवेल.

ऊ. आपला स्वभाव एकलकोंडा नको. अशा व्यक्तीला आपत्काळात साहाय्य मिळणे कठीण जाते; कारण तिच्या परिचयाचे कुणी नसते. त्यामुळे सगळ्यांमध्ये मिसळण्याची, सर्वांशी बोलण्याची आणि एकत्रित रहाण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी. एकलकोंडी व्यक्ती केवळ स्वतःचाच विचार करते. याउलट दुसर्‍याचा विचार करण्याची सवय लावावी.

ए. मनात मातृभूमीप्रती अपार प्रेम वाढवा. जशी आई आपल्याला वाढवते, तशी आपली मातृभूमीही आपले पालनपोषण करते; म्हणून तिच्याप्रती आपल्याला कृतज्ञता वाटली पाहिजे. असे वाटले, तरच आपण तिच्यासाठी प्राणत्याग करायलाही मागेपुढे पहाणार नाही. स्वातंत्र्यविरांनी हेच केले; म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मातृभूमीप्रती प्रेम वाटणे, म्हणजेच देशप्रेम वाटणे. ते वाटले, तरच आपण वेळ आली, तर देशासाठी शत्रूविरुद्ध लढू शकू. रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनची जनता हेच करत आहे. मातृभूमीविषयी प्रेम वाटले, तर आपण स्वार्थासाठी आपल्या धर्मबंधूंना फसवून भ्रष्टाचार करू शकणार नाही कि शत्रूला विकले जाणार नाही. मातृभूमीतील सर्वांविषयी आपल्याला प्रेमच वाटेल. देशासाठी कर्तव्याने वागायला आपण सिद्ध होऊ.

 

३. बौद्धिक स्तरावरील सिद्धता

अ. युद्धकाळात दुसर्‍यांना साहाय्य करण्यासाठी प्रथमोपचार करता येणे आवश्यक आहे. शरिरावर जखम झाल्यास ‘बँडेज’ कसे बांधावे ?’, ‘अस्थिभंग झाल्यास कसे साहाय्य करावे ?’, ‘स्ट्रेचर’ उपलब्ध नसल्यास झोळीच्या साहाय्याने व्यक्तीला दुसरीकडे कसे न्यावे ?’,  इत्यादी गोष्टी शिकून घ्याव्यात. युद्धकाळात आपल्याला अशा प्रकारे साहाय्य करावे लागणार आहे. हे ज्ञान होण्यासाठी  सनातन संस्थेचे पुढील ३ ग्रंथ उपलब्ध आहेत.

१. रुग्णाचे जीवितरक्षण आणि मर्माघातादी विकारांवरील प्रथमोपचार

२. रक्तस्राव, जखम, अस्थीभंग आदींवरील प्रथमोपचार

३. गुदमरणे, भाजणे, प्राणीदंश, विषबाधा आदींवरील प्रथमोपचार

आ. रक्तातील शर्करा तपासायला, रक्तदाब मोजायला आणि ‘पल्स ऑक्सिमीटर’ वापरायला शिकून घेऊ शकतो.

इ. ‘युद्धकाळात एखाद्या ठिकाणी आग लागल्यास ती विझवायची कशी ?’, याचे थोडेफार ज्ञान असणे आवश्यक आहे. तेलामुळे लागलेली आग, विद्युत् उपकरणामुळे लागलेली आग, अशा वेगवेगळ्या आगी वेगवेगळ्या पद्धतीने विझवाव्या लागतात. याचे ज्ञान हवे. हे ज्ञान करवून घेण्यासाठी सनातन संस्थेचा ‘अग्नीशमन प्रशिक्षण’ हा ग्रंथ उपलब्ध आहे.

ई. युद्धकाळात वैद्यकीय साहाय्य लवकर मिळणे अवघड असते. अशा वेळी रुग्णाला आपण बिंदूदाबन करून, त्याच्यासाठी नामजप करून, त्याच्यावर प्राणशक्तीवहन पद्धतीने उपाय करून काही विकारांवर पूर्णपणे मात करू शकतो, तर काही विकारांमध्ये रुग्णाच्या वेदना न्यून करू शकतो. या उपायपद्धतींची माहिती होण्यासाठी सनातन संस्थेच्या पुढील ग्रंथांचा अभ्यास आताच करा, तसेच हे ग्रंथ हाताशी ठेवा.

१. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’

२. नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार (ताप, बद्धकोष्ठता आदी ८०हून अधिक विकारांवर उपयुक्त !)

३. विकार-निर्मूलनासाठी नामजप

४. नामजपांमुळे दूर होणारे विकार (नामजपाविषयीच्या सूचनांसह मुद्रा आणि न्यासही अंतर्भूत)

५. विकारांनुसार नामजप-उपाय (देवतांचे जप, बीजमंत्र, अंकजप इत्यादी)

६. विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?

७. प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय

उ. युद्धकाळात भूमीखालच्या तळघरात लपणे सर्वाधिक सुरक्षित असते. ‘अशी तळघरे आपापल्या शहरात कुठे कुठे आहेत ?’, याची माहिती करून घ्यावी. शहरातील ‘मेट्रो’ रेल्वे बहुतांशी भूमीखालून असतात. अशा भूमीखालच्या ‘मेट्रो’ स्थानकांमध्येही आपण काही काळ लपून राहू शकतो. काही वेळा मोठे चौपदरी रस्ते ओलांडण्यासाठी भूमीखालून पादचारी मार्ग असतो. अशा स्थानीही आपण लपून राहू शकतो. बाँबस्फोट, अणूबाँबच्या स्फोटामुळे पसरणारे घातक किरण अशांपासून ही भूमीखालची स्थाने आपले रक्षण करू शकतात.

ऊ. आपल्या गावात किंवा शहरात सेवाभावी वेगवेगळ्या संघटना असतील. त्यांची माहिती करून घेऊन त्यांच्याशी ओळख करून घ्या. आपल्यावर किंवा आपल्या आसपासच्या परिसरात एखादा कठीण प्रसंग घडल्यास त्यांचे साहाय्य घेता येईल. त्यांचे संपर्क क्रमांक घ्या. आपलाही संपर्क क्रमांक त्यांना द्या, म्हणजे वेळप्रसंगी आपल्यालाही त्यांच्या साहाय्याला जाता येईल.

 

४. आध्यात्मिक स्तरावरील सिद्धता

अ. हिंदु संस्कृतीतील ‘आचारधर्मा’चे पालन करावे. आचारधर्माचे पालन केल्याने आपली प्रत्येक कृती सात्त्विक होऊन आपल्याला चैतन्य तर मिळतेच, याखेरीज आपल्याला ईश्वरापर्यंत जाता येते. आचारधर्माचे पालन केल्याने, म्हणजेच धर्माचरण केल्याने आपली वृत्ती सात्त्विक बनते आणि आपली वाटचाल ईश्वराच्या दिशेने लवकर होते. आचारधर्माच्या पालनाने व्यक्तीचे व्यावहारिक जीवनही उन्नत होण्यास साहाय्य होते, उदा. ‘सत्याने वागावे’, या आचाराचे पालन केल्याने व्यक्तीला खोटे बोलण्याचे पाप लागत नाही, तसेच तिच्यात नैतिकता आणि सुसंस्कृतपणा या गुणांचा विकासही होतो. अशा सत्त्वगुणी व्यक्तीचेच ईश्वर कठीण काळात रक्षण करतो. ‘दिनचर्येतील आचारधर्माचे पालन कसे करावे ?’, हे समजण्यासाठी सनातन संस्थेचे पुढील प्राथमिक ग्रंथ वाचावेत.

१. आचारधर्माचे प्रास्ताविक

२. स्नानपूर्व आचारांमागील शास्त्र

३. स्नानापासून दिवेलागणीपर्यंतच्या आचारांमागील शास्त्र

ग्रंथ खरेदीसाठी भेट द्या – आचारधर्म

आ. प्रतिदिनी सूर्याेदय आणि सूर्यास्त या वेळी अग्निहोत्र करावे. दोन्ही वेळी शक्य नसल्यास कोणत्याही एका वेळी करावे. अग्निहोत्र केल्यामुळे आपल्या भोवतीचे वातावरण जंतूमुक्त, शुद्ध, प्राणशक्तीयुक्त आणि पवित्र होते. प्रतिदिनी घरी अग्निहोत्र केल्यास आपल्या घरातील सर्वांचे आरोग्य चांगले रहाते, कुणाला रोगराई होत नाही, तसेच प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे सर्वांना आध्यात्मिकदृष्ट्याही लाभ होतो. कोरोना महामारीच्या काळात अग्निहोत्र करत असलेल्या व्यक्तीस कोरोनाची लागण होत नसल्याचे लक्षात आले आहे. सध्या अनेक राष्ट्रांकडे रोगराई पसरवणारी जैविक अस्त्रेही आहेत. युद्धात त्यांचा वापर झाल्यास पसरणार्‍या रोगराईपासून, तसेच अणूबाँबच्या स्फोटामुळे पसरणार्‍या घातक किरणांपासूनही अग्निहोत्र केल्यामुळे रक्षण होणार आहे. यावरील अधिक माहितीसाठी सनातन संस्थेचा ‘अग्निहोत्र’ हा ग्रंथ वाचावा.

इ. देवाचा कृपाशीर्वाद मिळण्यासाठी प्रतिदिन किमान २ घंटे (तास) तरी आपल्या उपास्यदेवतेचा नामजप करावा. आपली कोणतीही उपास्यदेवता नसल्यास, भगवान श्रीकृष्णाचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करावा. दुःखाच्या, तसेच आनंदाच्या प्रसंगातही देवाचे स्मरण करावे; कारण ‘कठीण प्रसंगात तोच आपला तारणहार आहे’, हे लक्षात ठेवावे. त्याचे स्मरण केले नाही, त्याला आळवले नाही, तर तो तरी आपल्या साहाय्याला कसा धावून येणार ! देवाचे भक्त बनल्यास ‘तो आपले रक्षण करणार आहे’, ही दृढ श्रद्धा आपल्यात निर्माण होते आणि आपल्याला कठीण प्रसंगात स्थिर रहाता येते. ‘माझा भक्त नाश पावत नाही’, असे त्याचे वचनच आहे !

ई. धर्माचे रक्षण करा. ‘धर्माचा विनाश उघड्या डोळ्यांनी पहाणारा महापापी ठरतो, तर धर्मरक्षणाकरता धडपडणारा मुक्तीचा अधिकारी बनतो’, असे धर्मवचन आहे. तसेच ‘जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण स्वतः धर्म (ईश्वर) करतो’, असेही धर्मवचन आहे. धर्मरक्षण करणे, हे सध्या काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. धर्मरक्षणासाठी कौरवांशी लढल्यामुळे शिष्य अर्जुन गुरु श्रीकृष्णाला प्रिय झाला. थोडक्यात धर्मरक्षणासाठी कृती केली, तर आपल्यावर ईश्वरी कृपा होते. सध्या धर्मद्रोही आणि हिंदुद्वेषी मंडळी राजरोसपणे सनातन हिंदु धर्मावर आघात करत आहेत. त्यांचे कायद्याच्या चौकटीत राहून (वैध मार्गाने) प्रथम प्रबोधन करा आणि तरीही ते ऐकत नसले, तर त्यांचा निषेध करत त्यांना वैधपणे विरोध करा.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., गोवा.

Leave a Comment