कोरोना महामारीची तीव्रता लक्षात घेऊन स्वत:सह कुटुंबियांचे रक्षण होण्यासाठी ‘कोरोना’विषयक सूचनांचे साधना म्हणून पालन करा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

 

‘सध्या कोरोना आणि ओमिक्रॉन प्रकाराच्या विषाणूचा संसर्ग पुष्कळ वेगाने पसरत आहे. त्यादृष्टीने कोरोनाचा संसर्ग पसरू नये, तसेच त्यापासून नागरिकांच्या जीविताचे रक्षण व्हावे, यासाठी शासन-प्रशासनाकडून विविध माध्यमांतून वेळोवेळी प्रबोधन करण्यात येत आहे; मात्र नागरिकांकडून या सूचनांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोना आणि ओमिक्रॉन प्रकाराच्या विषाणूच्या संसर्गाची भयानक परिस्थिती लक्षात घेता स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे अजून महत्त्वाचे ठरते.

Sanatan.org यावर आरोग्याच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी ? यासाठी ॲलोपॅथी, आयुर्वेदीय, होमिओपॅथी या वैद्यकीय शाखांनुसार आवश्यक त्या सूचना यापूर्वी प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार कोरोना महामारीपासून संरक्षण होण्यासाठी वैद्यकीय सूचनांचे, उदा. मुखपट्टी (मास्क) चा वापर करणे, दोन व्यक्तींमध्ये ६ फूट अंतर ठेवणे, वेळोवेळी हात साबणाने धुणे किंवा सॅनिटायझरने निर्जंतुक करणे, अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडणे, अनावश्यक गर्दी टाळणे, आदींचे काटेकोर पालन करावे.

या आपत्तीचा सामना करण्यासाठी मनोबल वाढावे, यासाठी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार स्वयंसूचना सत्रे कशी करावीत ?, याची उदाहरणासहित माहिती https://www.sanatan.org/mr/natural-disasters-and-survival-guide यावर देण्यात आली आहे. त्याचा लाभ साधकांसह हितचिंतक, वाचक यांना झाल्याचे लक्षात आले. याशिवाय आत्मबल वाढण्यासाठी ‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करावा. हा नामजप https://www.sanatan.org/mr/helpful_chant_in_corona वर उपलब्ध आहे.

 

ज्या क्षेत्रात ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण सापडले आहेत, त्या भागातील साधकांनी ओमिक्रॉनपासून रक्षण होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर बळ देणारा ‘‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार करावा. हा नामजप https://www.sanatan.org/mr/omicron-protection-chant वर उपलब्ध आहे. त्यासह परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेल्या ३ मंत्रांपैकी कोणताही एक मंत्र २१ वेळा म्हणावा. स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी वेळोवेळी प्रार्थना करावी.

जन्म-मृत्यू हे प्रारब्धानुसार निर्धारित असतात, तसेच संत आणि भविष्यवेत्ते यांनी वर्तवलेल्या भाकितानुसार आपत्काळात विविध आपत्तींमध्ये मोठी मनुष्यहानी होणार आहे. असे असले, तरी आपले योग्य क्रियमाण वापरणे हे ईश्वराला अपेक्षित आहे. आपत्काळाची तीव्रता लक्षात घेता आपत्तीविषयी वेळोवळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही साधना आहे. आपत्काळानंतर ईश्वरी राज्य अर्थात् रामराज्य अवतरणार आहे, असेही संतांनी आश्वस्त केले आहे. हे लक्षात घेता आपत्काळात तरून रामराज्यातील प्रजा होण्यास पात्र होण्यासाठी साधना म्हणून वरील सूचनांचे पालन व्हावे, यासाठी ईश्वरचरणी शरण जाऊन प्रयत्न करूया !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१.२०२२)

Leave a Comment