साधनेचे तीन प्रकार

साधनेत तीन प्रकार आढळतात.

क्रिया-आधारित, भाव-आधारित आणि बुद्धी-आधारित.

पू. अनंत आठवले

 

१. क्रिया-आधारित

जप, पूजा, आरती, भजन, स्तोत्रपठण, व्रते इत्यादी. ह्या सर्व साधना इंद्रियांच्या क्रियांशी संबंधित आहेत. भगवान श्रीकृष्ण सांगतात

‘इंद्रियाणि पराण्याहुः ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक ४२

अर्थ : ‘इंद्रिये श्रेष्ठ म्हटली जातात.’

इंद्रिये श्रेष्ठ अशामुळे म्हटली आहेत की आपण सर्व बाह्य क्रिया इंद्रियांच्या आधारेच करू शकतो. पण ह्या साधनांमध्ये ह्या क्रिया पुन्हा पुन्हा करीत राहावे लागते.

ह्या साधनांमध्ये थेट चित्तशुद्धीचा प्रयत्न केला जात नाही, पण परिणामी चित्तशुद्धी होऊ शकते.

 

२. भाव-आधारित

ईश्वराविषयी श्रद्धा, विश्वास, प्रेम इत्यादी भाव. भाव मनाचे, मनातील असतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात

‘इंद्रियेभ्यः परं मनः ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक ४२

अर्थ : ‘इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, सूक्ष्म आहे.’

पण भाव मनाची अवस्था असल्याने अनित्य असतात. भाव सतत राहत नाहीत, तर येतात जातात. भाव कमी-अधिक होत राहतात. मन सतत उत्कट भावावस्थेत राहत नाही.

ह्या साधनांमध्ये थेट चित्तशुद्धीचा प्रयत्न केला जात नाही, पण परिणामी चित्तशुद्धी होऊ  शकते.

 

३. बुद्धी-आधारित

ही साधना विवेकावर आधारित आहे. ह्यात नित्यानित्यवस्तुविवेक, वैराग्य, षट्संपत्ती (दम, शम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान) आणि मुमुक्षुत्व येते. भगवान श्रीकृष्ण सांगतात

‘मनसस्तु परा बुद्धिः ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक ४२

अर्थ : ‘मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे.’

ह्या साधनेत इंद्रियांच्या क्रियांचा किंवा मनाच्या भावांचा आधार घ्यावा लागत नाही; ईश्वराची प्रतिमा, नाम, गुण, रूप इत्यादींच्या स्मरणाचा आधार घ्यावा लागत नाही. ही साधना बुद्धीवर आधारित आहे.

चित्तशुद्धीची आवश्यकता जाणून ज्ञानमार्गात थेट चित्तशुद्धीचे प्रयत्न केले जातात.

३ अ. बोध

ही साधना परिपूर्णतेला गेली की त्या नित्य तत्त्वाची प्रचीती येते, अनुभूती येते; आपल्या आत्म्याच्या स्वरूपाचा, ब्रह्मस्वरूपाचा बोध होतो. भगवान् श्रीकृष्ण सांगतात ‘यो बुद्धेः परतस्तु सः ।’

अर्थ : जो बुद्धीपेक्षा श्रेष्ठ, सूक्ष्म आहे; तो आत्मा (ब्रह्म) आहे.

‘इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः ।

मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परतस्तु सः ।।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक ४२

अर्थ : ‘इंद्रिये श्रेष्ठ म्हटली जातात. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे. मनाहून बुद्धी श्रेष्ठ आहे. जो बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे, तो आत्मा आहे.’

टीप : कोणत्याही प्रकारच्या साधनेने चित्तशुद्धी झाल्याविना मोक्ष मिळत नाही.

– अनंत आठवले

(संदर्भ : लवकरच प्रकाशित होणारा ग्रंथ)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment