पितृपक्षाच्या काळात रामनाथी आश्रमात श्राद्धविधी करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती


गुरुकृपेने रामनाथी आश्रमात श्राद्धविधी करण्याची संधी लाभली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा, रामनाथी आश्रमातील चैतन्य आणि पुरोहित-साधकांचा भाव यांमुळे मला अनुभवायला आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

 

१. ‘सर्व पितरांचे आशीर्वाद, तसेच ज्या गोत्रात जन्म झाला आहे, त्या ऋषींचा
आशीर्वाद मिळण्यासाठी श्राद्धविधी केला जातो’, हे समजल्यावर त्यांना प्रार्थना करणे

श्राद्धविधी चालू झाल्यावर आरंभापासूनच माझे मन शांत आणि भावस्थितीत होते. माझा मधूनमधून दत्तगुरूंचा नामजप होत होता. ‘आपल्याला पितरांचा आशीर्वाद लाभावा आणि ज्या गोत्रात आपल्या जन्म झाला आहे, त्या ऋषींचा कृपाशीर्वादही मिळावा’, यासाठी आपण श्राद्धविधी करतो’, असे एका साधकाने मला सांगितले. त्यामुळे मी मधूनमधून तशी प्रार्थना करत होतो. माझे ‘अत्रि’ हे गोत्र असल्याने अत्रिऋषींच्या चरणी माझी प्रार्थना होत होती.

 

२. श्राद्धविधी चालू असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२ अ. श्राद्धविधीच्या वेळी ‘स्वतःच्या मागे बरेच पितर बसले असून त्यांच्या मागे उच्चासनावर
अत्रिऋषि बसले आहेत आणि साधकासमवेत पितरही दत्तात्रेयांना प्रार्थना करत आहेत’, असे जाणवणे

श्राद्धविधी चालू झाल्यावर मला ‘माझ्या मागे कुणीतरी बसले आहे’, असे जाणवले. नंतर काही वेळाने ‘माझ्या मागे बरेच जण बसले आहेत आणि ते सर्व माझे पितर आहेत’, असे जाणवले. ‘ज्यांना आता मुक्ती मिळणार आहे किंवा ज्यांना त्रास होत आहे, ते मागे माझ्या जवळ बसले आहेत. त्यांच्या मागे चांगली आध्यात्मिक पातळी असलेले आणि सर्वांत शेवटी एका उंच आसनावर अत्रिऋषि बसले आहेत’, असे मला जाणवले. पुरोहित-साधकांनी सांगितल्याप्रमाणे मी दत्तात्रेयांना प्रार्थना करत होतो. तेव्हा ‘सर्व पितरही माझ्या समवेत हात जोडून प्रार्थना करत आहेत’, असे मला जाणवले.

२ आ. पितरांना प्रार्थना केल्यावर ‘ते साधकाला
आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत’, असे सांगत असल्याचे जाणवणे

काही वेळाने मला वातावरणात थोडा दाब जाणवला आणि माझ्या मनात काळजीचे विचार आले. नंतर मी सर्व पितरांना प्रार्थना केली, ‘मी आपल्याला शरण आलो आहे. आपण माझ्यावर कृपा करा आणि माझ्या साधनेतील अडथळे दूर करा.’ त्या वेळी मला असे जाणवले, ‘सर्व पितर मला सांगत आहेत की, तू चिंता करू नकोस. आज आम्ही सर्व जण तुला आशीर्वाद देण्यासाठी येथे आलो आहोत.’

२ इ. ‘दत्तगुरूंनी ‘पितरांचे सर्व त्रास दूर करणार’, असे सांगितल्यावर
‘सर्व पितर आशीर्वादाच्या मुद्रेत साधकाकडे पहात आहेत’, असे जाणवणे

नंतर मी दत्तगुरूंना प्रार्थना केली. तेव्हा ‘मी या श्राद्धविधीच्या माध्यमातून पितरांचे सर्व त्रास दूर करणार असून तुझ्या साधनेतील अडथळेही न्यून होतील’, असे दत्तगुरु मला सांगत आहेत’, असे मला जाणवले. त्यानंतर ‘सर्व पितर आशीर्वादाची मुद्रा करून माझ्याकडे पहात आहेत’, असे मला जाणवले.

२ ई. पितृ-ब्राह्मणांना आवाहन केल्यावर ‘त्यांच्या आसनावर
कुणीतरी आहे’,असे वाटून दाब जाणवणे, परात्पर गुरु डॉक्टर आणि
दत्तगुरु यांना प्रार्थना केल्यावर दाब न्यून होऊन पितृ-ब्राह्मणांचे आसन रिक्त झाल्याचे जाणवणे

श्राद्धविधी चालू झाल्यावर आरंभी देव-ब्राह्मणांचे (देवस्थानी मानलेल्या ब्राह्मणांचे) पूजन चालू होते. तेव्हा मला चांगले वाटत होते आणि माझा भाव जागृत होत होता. पितृ-ब्राह्मणांसाठीच्या (पितृस्थानी मानलेल्या ब्राह्मणांसाठीच्या) आसनावर पितृ-ब्राह्मणांना आवाहन केले. तेव्हा ‘त्या आसनावर कुणीतरी आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर मला वातावरणात दाब जाणवू लागला. त्यामुळे मी परात्पर गुरु डॉक्टर आणि दत्तगुरु यांना ‘वाईट शक्तींपासून माझे अन् माझ्या सर्व पितरांचे रक्षण होऊ दे’, अशी प्रार्थना केली. काही वेळाने ‘दाब न्यून झाला’, असे वाटून ‘ते आसनही रिक्त झाले’, असे मला जाणवले.

कृतज्ञता

श्राद्धविधी चालू असतांना देवाने मला पूर्णवेळ भावस्थितीत ठेवले होते. मला परात्पर गुरु डॉक्टर आणि दत्तगुरु यांचे अस्तित्व जाणवत होते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला वैकुंठासमान रामनाथी आश्रमात श्राद्धविधी करण्याचे भाग्य लाभले आणि त्यांनीच तो विधी माझ्याकडून करून घेतला, याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !’

– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

पितरांना अन्न अर्पण केल्यावर ‘एखाद्या पदार्थातील
रस काढून घ्यावा’,तसे सर्व अन्न शुष्कझाल्याचे दिसणे अन् त्याविषयी
सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी पितरांनी वायुरूपात अन्न ग्रहण केल्याचे सांगणे

श्राद्धविधीमध्ये पितरांना अन्न अर्पण करण्यात आले. तेव्हा ‘ते अन्न पितरांपर्यंत पोचले’, हे मला कसे कळणार ?’, असा विचार माझ्या मनात आला. मी अन्नपदार्थ वाढलेल्या दोन्ही ताटांकडे पाहिले. तेव्हा मला ‘ते अन्न कुणीतरी ग्रहण केले आहे’, असे जाणवले. एखाद्या पदार्थातील सर्व रस काढून घेतला, तर तो पदार्थ कसा शुष्क दिसेल ?, तसे ते अन्न दिसत होते. (श्राद्धविधीनंतर मी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना हा प्रसंग सांगितला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘पितर वायुरूपातच सर्व अन्न ग्रहण करतात. एका साधिकेला अनुभूती आली होती की, ‘मी वर्षभर भुकेला आहे’, असे पितर तिला सांगत आहेत. पितर केवळ श्राद्धातील अन्न ग्रहण करू शकतात.’’)

– एक साधक, रामनाथी, गोवा.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment