आत्महत्येमुळे समस्या सुटत नाहीत !

प्रतिकात्मक छायाचित्र

 

१. आत्महत्या करून आयुष्य संपवून टाकण्याचा तरुण पिढीने अवलंबलेला अविचारी मार्ग !

‘आजच्या काळात जन्मलेली पिढी सर्वच विषयांत अग्रेसर असली, तरी आयुष्याचे मोल जाणून घेण्यात कुठेतरी अल्प पडत असल्याचे चित्र दिसत आहे. अभ्यासाचा ताण, प्रश्‍नपत्रिका अवघड गेली, आई-वडील रागावले किंवा दूरदर्शन पाहू दिला नाही, यांसारख्या क्षुल्लक कारणांनी १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुले थेट मृत्यूला कवटाळत आहेत. क्षुल्लक कारणांवरून आत्महत्या करून आयुष्य संपवून टाकण्याच्या या पिढीचा टोकाचा अविचारी मार्ग चिंतेचा विषय बनला आहे.

 

२. मनाने दिलेल्या धोक्याच्या घंटेकडे दुर्लक्ष नको !

हिमनगाचे टोक आपल्याला दिसते; मात्र त्याच्या खोलीची आपल्याला कल्पना येत नाही. आपल्या मनाविषयीही तसेच होते. आपले मन धोक्याची चेतावणी देत असले, तरी आत खोलवर किती राग, द्वेष, उद्वेग उकळत असतो याचा अंदाज कधी आपल्याला येत नाही. लहान-थोरांच्या संदर्भात हे घडत असते.

 

३. मुलांनी आत्महत्या करण्याला ‘व्हिडिओ गेम्स’ उत्तरदायी !

नवीन पिढीची सहनशीलता अल्प झालेली आहे. दूरदर्शनवरील आततायी खेळ, ‘व्हिडिओ गेम्स’ आदी आभासी विश्‍वातील हिंसा, क्रौर्य यांच्या अनुकरणामुळे मुले आत्महत्या करत आहेत. आपल्या कृत्याच्या परिणामांची त्यांना माहिती नसते. वैद्यकीय भाषेत त्याला ‘पुअर इम्पल्स कंट्रोल’ अथवा ‘बिहेवियर मॉडिफिकेशन’, असे म्हणतात. मुलांच्या वागण्यात आत्मविनाशाची चिन्हे दिसल्यास पालकांनी तज्ञांशी संपर्क साधावा. योग्य उपचार, समुपदेशन यांनी त्यांना टोकाच्या निर्णयापासून परावृत्त करता येऊ शकेल. अपयशाच्या काही अनुभवानंतर जर व्यक्तीने स्वत:वर कमनशिबी आणि अपयशी म्हणून शिक्का मारला, तर त्यातून ‘डिप्रेशन’ची (निराशेची) निर्मिती होते.

 

४. आत्महत्येचे विचार येण्यापूर्वीची काही लक्षणे

अनेक दिवसांपासून निस्तेज आणि निरुत्साही रहाणे, विनाकारण भूक मंदावणे किंवा जेवण निरस वाटणे, दूर रहाणे, अचानक एखादी व्यक्ती एकलकोंडी होणे किंवा त्यांच्या प्रियजनांपासून दूर रहाणे, त्यांना प्रतिसाद न देणे, निराश रहाणे, अचानक व्यक्ती आपल्या अपयशाविषयी किंवा स्वत: निरुपयोगी असल्याचे म्हणणे, कोणत्याच कामात सहभाग न घेणे, अचानक आवडत्या कामातून आणि धंद्यातून मन काढून घेणे, झोप न लागणे, आवश्यकतेपेक्षा अल्प झोप घेणे, रात्री झोप न आल्याने अस्वस्थ रहाणे, जीवन संपवण्याविषयी बोलणे (काही वेळेस मस्करीत किंवा काही वेळेस गांभीर्याने) इत्यादीही आत्महत्येचे विचार मनात येणे, ही आत्महत्येच्या कृतीची पहिली पायरी आहे. त्यामुळे याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका ! अशा वेळी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत औषधोपचार आणि समुपदेशन केले जाते. ’

– रेश्मा खेमराज भाईप, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment