‘स्मार्टफोन बाजूला सारा तो तुम्हाला उध्वस्त करू शकतो !’ – चेतन भगत यांचे भारतीय तरुणांना जाहीर पत्र

‘फोरगॉटन जनरेशन’ (‘फोर जी’ नेटवर्कच्या आहारी गेलेली किंवा पूर्णपणे सर्व विसरलेली)

श्री. चेतन भगत

तुमच्यापैकी बहुतांश तरुण तुमच्या ‘स्मार्टफोन’वर ध्वनिचित्रफीत पहाण्यात, खेळ खेळण्यात, तुमच्या मित्राशी गप्पा मारण्यात, सोशल मिडियावर (सामाजिक माध्यमांवर) तुमचे मत व्यक्त करण्यात मग्न असतील. दिवसातील एक तृतीयांश वेळ स्मार्टफोनवर वाया घालवणारी नवीन पिढी भारताच्या इतिहासात स्मार्टफोन वापरून त्यावर कोणतीही माहिती सहजपणे वाचू शकणारी तुमची पहिलीच पिढी आहे. तरुण पिढीचा स्मार्टफोन वापरण्याचा कालावधी सरासरी दिवसाला ५ ते ७ घंटे असा आहे. निवृत्त झालेले किंवा ज्यांनी जम बसवला आहे, असे लोक स्मार्टफोनवर अनेक घंटे घालवू शकतात; परंतु ज्याला स्वतःचे जीवन घडवायचे आहे, अशा तरुणाने ५ घंटे वेळ वाया घालवणे योग्य नाही. ५ घंटे हा कालावधी तुमच्या उपयोगात आणण्याच्या दिवसाभरातील कालावधीच्या एक तृतीयांश वेळ आहे. सिगारेट किंवा अमली पदार्थाप्रमाणे स्मार्टफोनचे व्यसन तुमच्या जीवनाचा कालावधी वाया घालवत आहे. तो तुमचे भवितव्य बिघडवत आहे, तसेच तुमच्या मेंदूमध्ये गोंधळ निर्माण करत आहे. जर हे असेच चालू राहिले, तर तुमची अख्खी पिढीसमोर काही ध्येय नसलेली आणि दिशाहीन म्हणजे ‘फोरगॉटन’ (‘फोर जी’ नेटवर्कच्या आहारी गेलेली किंवा पूर्णपणे सर्व विसरलेली) पिढी होईल.

 

स्मार्टफोन वापरण्याचे वाईट परिणाम आणि त्यावर करावयाच्या गोष्टी

स्मार्टफोनच्या आहारी जाण्याचे ३ वाईट परिणाम असून त्यावर काही गोष्टी करून मात करता येऊ शकते.

अ. स्मार्टफोनमुळे वाया जाणारा वेळ कौशल्य आत्मसात करणे किंवा चांगल्या गोष्टींसाठी देणे आवश्यक

पहिला म्हणजे वेळ वाया जातो. हाच वेळ जीवनात अजून चांगल्या गोष्टी करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. कल्पना करा, तुम्ही प्रतिदिन तुमच्या स्मार्टफोन वापरापैकी ३ घंटे शारीरिक व्यायाम, अभ्यास, एखादे कौशल्य आत्मसात करणे किंवा नोकरी शोधणे अथवा धंदा चालू करण्यासाठी घालवले, तर काय होईल ? तुम्ही असे केले, तर ते तुम्हाला कुठवर नेईल, याची कल्पना करा.

आ. मेंदू बधीर होण्यापासून थांबवून सकारात्मक गोष्टी करण्यात मन गुंतवा !

दुसरा परिणाम म्हणजे बुद्धी न वापरता कोणत्याही गोष्टी स्मार्टफोनवर पाहिल्याने तुमच्या मेंदूचा ज्ञान आकलन करण्याचा भाग मंदावतो. आपल्या मेंदूमध्ये दोन भाग आहेत. एक ज्ञान आकलन करणारा भाग आणि दुसरा भावनात्मक भाग. जेव्हा हे दोन्ही भाग चांगले चालत असतील, तेव्हा आपले मन चांगले रहाते. जेव्हा तुम्ही स्मार्टफोनवरून निरुपयोगी असे काहीही बघत असता, तेव्हा मेंदूचा ज्ञान आकलन करणार्‍या भागाला काम नसल्याने तो अल्प प्रमाणात वापरला जातो. असे झाल्यास तुमची विचार करण्याची क्षमता किंवा तर्कशुद्धरीत्या एखाद्या गोष्टीविषयी बोलण्याची क्षमता अल्प होते. एखाद्या विषयाचे विविध पैलू तुमच्या लक्षात येत नाहीत किंवा वेगळवेगळी परिस्थिती तुम्ही हाताळू शकत नाही, तसेच योग्य निर्णय घेण्यासाठी एखाद्या गोष्टीचा सर्वांगीण अभ्यास करू शकत नाही.

तुमच्या मेंदूच्या ज्ञान आकलनाचा भाग न वापरल्यामुळे तुम्ही केवळ तुमच्या मेंदूचा भावनात्मक भाग वापरता. सोशल मिडियावरून कायम दाखवले जाणारे क्रोधाचे प्रसंग, ध्रुवीकरण, राजकारणी आणि प्रसिद्ध व्यक्ती यांच्याविषयीचा तीव्र स्वरूपातील द्वेष, वृत्तवाहिन्यांवरून जोरजोरात ओरडणारे सूत्रसंचालक या सर्वांची दिशा अशा तरुण पिढीकडे आहे, ज्यांच्या मेंदूचा भावनात्मक भाग नियंत्रणात आहे; परंतु त्यांची संशोधनात्मक बुद्धी वापरली जात नाही. जे लोक केवळ मेंदूचा भावनात्मक भाग वापरतात, ते आयुष्यात चांगले काही घडवू शकत नाहीत. या सर्वांवरील उपाय म्हणजे तुमचा मेंदू बधीर होण्यापासून थांबवा आणि काही सकारात्मक गोष्टी करण्यात तुमचे मन गुंतवा.

इ. स्मार्टफोन वापरणे उत्साह आणि शक्ती याला मारक असून परिश्रम आणि इच्छाशक्तीवर काम करणे आवश्यक !

तिसरा परिणाम म्हणजे सतत स्मार्टफोन वापरणे तुमचा उत्साह आणि शक्ती याला मारक आहे. एखादे ध्येय समोर ठेवणे, उत्साहाने ध्येय साध्य करण्यासाठी कठीण परिश्रम करणे यांमुळे जीवनात यशस्वी होता येते. या उलट केवळ स्मार्टफोन बघत रहाणे, तुम्हाला आळशी बनवते. तुम्ही प्रत्यक्षात काम करू शकता, अशी तुमची खात्री नसेल, तर तुमच्या मनात एक प्रकारची भीती रहाते. याला जुळवून घेण्यासाठी तुम्ही स्वतःला जीवनात यश का मिळत नाही ? याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्हाला अपेक्षित तुमचे जीवन न होण्यासाठी तुम्ही समाजातील वाईट प्रवाह किंवा व्यक्ती, राजकारणी, धर्मांध, बॉलिवूडमधील वशिलेबाजी, श्रीमंत व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती यांना उत्तरदायी ठरवता.

अर्थात् आपली समाजव्यवस्था समानता आणि न्याय या तत्त्वानुसार नाही. त्यामुळे सोशल मिडियावर स्वतःचा वेळ घालवल्याने तुम्हाला काही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा तुमच्या इच्छाशक्तीवर काम करा. तक्रार करणे सोडून देऊन काहीतरी नवनिर्मिती करा. तुमच्यासाठी एक चांगले जीवन आणि चांगली माणसे निर्माण करा. तुम्ही तुमची क्षमता पूर्णपणे वापरता का ? तुम्ही तुम्हाला शक्य होईल, तेवढे कठोर परिश्रम करता का ? जोपर्यंत तुम्ही जीवनात काहीतरी करून दाखवत नाही, तोपर्यंत स्मार्टफोन बाजूला ठेवा. वाईट परिस्थितीतही विजेते आपली वाट शोधून काढतात. तुम्हीसुद्धा करू शकाल.

 

अमली पदार्थांप्रमाणे जीवन उध्वस्त करणारा स्मार्टफोन !

अमली पदार्थांच्या तुलनेत विचार केला, तर ‘फोर जी स्मार्टफोन्स’ हे कायदेशीर आहेत. लहान मुले त्यांच्या खिशात बाळगू शकतात. स्मार्टफोन तसा उपयोगीही आहे. माहिती मिळवणे, ‘ऑनलाईन’ खरेदी करणे, ‘ऑनलाईन’ वर्ग घेणे वगैरे गोष्टींसाठी तो उपयोगी आहे; परंतु दुसर्‍या बाजूने तो अक्षरशः तरुणांचे, तसेच पूर्ण पिढीचे जीवन उध्वस्त करू शकतो.

भारताला कुठे न्यायचे आहे, हे तरूणांनी ठरवावे. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारी पिढी आठवा. ते किती शांत होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते बाहेर पडले. मला अजूनही मंडल आयोगाचा निषेध किंवा वर्ष २०११ मधील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन आठवते. तरुणांना राष्ट्रीय विषयांविषयी काळजी होती. आता आपल्यावर जे परिणाम होत आहेत, त्याविषयी आताचे तरुण सतर्क आहेत का ? कि सनसनाटी, मनोरंजनात्मक किंवा विचित्र बातम्या ऐकून भावनात्मक वागत आहेत ?

 

तरुण पिढीने कठोर परिश्रमाद्वारे देशाची अर्थव्यवस्था बळकट करणे आवश्यक !

सर्वांत महत्त्वाची आणि प्राधान्याने करण्यासारखी गोष्ट म्हणजे आम्हाला आमची अर्थव्यवस्था भक्कम केली पाहिजे. चीन आपल्यापेक्षा ५ पटीने श्रीमंत आहे. आपण गूगलवरून चीनमधील शहरे पाहू शकतो. तिथपर्यंत पोचण्यासाठी (प्रगती करण्यासाठी) आपल्याला पुष्कळ काही करावे लागेल. तुम्हाला चांगले जीवन कसे घडवायचे आहे ? आजच्या तरुणांनी या प्रश्‍नांची उत्तरे शोधली पाहिजेत. कोणताही नेता, अभिनेता किंवा प्रसिद्ध व्यक्ती तुमच्यासाठी काही करणार नाही. तुम्ही स्वतःला आणि देशाला जिथे जाणे आवश्यक आहे तिथे न्या. भारताला गरीब आणि अभिमान नसलेला देश करण्याचेे ध्येय ठेवू नका. देशाला आणि तुम्हाला श्रीमंत अन् नम्र करण्याचे ध्येय समोर ठेवा. त्यामुळे हे उपद्रव करणारे स्मार्टफोन्स बाजूला ठेवा आणि तुमचे मन सकारात्मक अन् सृजनशील करा. तुमच्या स्वतःच्या जीवनात आणि देशासाठी काहीतरी करून दाखवा. ही ‘फोर जी’ची पिढी नेहमीच अग्रेसर राहू दे. ही पिढी एक ‘फोरगॉटन’ पिढी आहे, असे होऊ देऊ नका.

संदर्भ : ‘टाइम्स ऑफ इंडिया’, २४.१०.२०२०

Leave a Comment