(म्हणे) ‘सणांचा मुख्य उद्देश समजून घेण्यासाठी आणि समाजाला कर्मकांडापासून मुक्त करण्यासाठी हा कार्यक्रम !’

  • हिंदु धर्म आणि साधना यांविषयी काडीमात्र ज्ञान नसलेल्या अंनिसने हिंदूंना सणांचा उद्देश समजावून सांगणे, यापेक्षा हास्यास्पद ते काय असेल ? 
  • नासाच्या ‘आंतरराष्ट्रीय चंद्रनिरीक्षण रात्र’च्या निमित्ताने उपक्रम राबवण्याच्या नावाखाली अंनिसकडून हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचा आटापिटा !

मुंबई – खगोलशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या वतीने २६ सप्टेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय चंद्रनिरीक्षण रात्र’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. अंनिसच्या वतीने हा उपक्रम महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे; मात्र याविषयी अंनिसने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकावरून अंनिसला वैज्ञानिक कार्यक्रम राबवण्याऐवजी हिंदु धर्माची निंदानालस्ती करण्यात रस असल्याचे दिसून येते. कालगणनेसह सणांचा मुख्य उद्देश आणि आज निर्माण झालेले आर्थिक हितसंबंध समजून घेत कर्मकांडातून समाजाला मुक्त करण्याच्या उद्देशाने ‘अंनिस’ या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे, अशा गोंडस आणि वैज्ञानिक भाषेचा उपयोग या प्रसिद्धीपत्रकात करायला अंनिस विसरलेली नाही.(हिंदु धर्मातील प्रत्येक सण, उत्सव आणि व्रते यांमागे आध्यात्मिक भावार्थ आहे. अंनिस जर अध्यात्मच मानत नाही, तर सणांचा उद्देश कसा सागणार ? अनादि काळापासून चालू असलेली पूजा, व्रते आदी कर्मकांडे हिंदु समाज श्रद्धेने करत आहे. त्यांना अंधश्रद्धा ठरवून स्वत:ला अतिशहाणे समजणार्‍या अंनिसने हे मर्कटचाळे थांबून साधना करणे, हेच त्यांच्या हिताचे ठरेल ! – संपादक)

विशेष म्हणजे या प्रसिद्धीपत्रकात वैज्ञानिक उपक्रमाविषयी अधिक माहिती देण्याऐवजी अंनिस हिंदु धर्मातील धार्मिक गोष्टींवर घुसलेले आहे. या प्रसिद्धीपत्रकात ‘भारतीय कालगणना आणि सणांची सांगड प्रामुख्याने चंद्राच्या कलांशी जोडलेली आहे. चतुर्थी, अमावास्या, पौर्णिमा हे दिवस चंद्राच्या दिसण्यावर अवलंबून आहेत. एवढेच काय, अमावास्येला अशुभ ठरवण्यासाठी चंद्राचा दुरुपयोग करण्यात आलेला आहे’, असे नमूद करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत चंद्राचे निरीक्षण करणे, चंद्राविषयी कथा-कविता-घोषवाक्ये लिहिणे, चंद्रांच्या कलांची चित्रे काढणे, ‘ऑनलाईन’ चर्चासत्र किंवा व्याख्यान आदी उपक्रम करून त्याचा अहवाल पाठवण्याचे आवाहन अंनिसकडून करण्यात आले आहे.

(धर्म हा शाश्‍वत आहे. त्यामुळे धर्माचे अस्तित्व नाकारणार्‍यांवर असे उपक्रम राबवून स्वत:चे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा लागणे, यात नवल नाही ! – संपादक) 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment