चातुर्मासाचे महत्त्व

चातुर्मासाच्या काळात श्रीविष्णु क्षीरसागरात निद्रा घेत असतो, तसेच या काळात पडणार्‍या पावसाच्या पाण्यासह मातीतून नैसर्गिक शक्ती नदीत मिसळत असल्याने या काळात तीर्थक्षेत्री नदीमध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते. वातावरणात रज-तमाचा प्रभाव वाढल्याने उपवास, व्रतवैकल्ये केल्यास ती अधिक फलद्रूप होऊन सात्त्विकता वाढवतात. चातुर्मासाचे विविध दृष्टीकोनातून असलेले महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.

 

श्रीविष्णु आणि महालक्ष्मी

श्रीविष्णु आणि महालक्ष्मी

 

१. श्रीविष्णूच्या उपासनेसाठी उत्तम काळ

वर्षाऋतूच्या चार मासांना ‘चातुर्मास’ म्हणतात. या चार मासांच्या काळामध्ये श्रीविष्णु शेषशय्येवर योगनिद्रा घेत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवसांमध्ये सूर्य कर्क राशीत स्थित असतो. श्रीविष्णूच्या उपासनेसाठी हा काळ उत्तम मानला जातो. सर्व तीर्थस्थाने, देवस्थाने, दान आणि पुण्य चातुर्मास आल्यावर श्रीविष्णूच्या चरणी अर्पण होतात.

२. तिर्थक्षेत्री नदीत स्नान केल्याने पापांचा नाश होणे

जो मनुष्य चातुर्मासात नदीत स्नान करतो, विशेषतः तीर्थस्थानावरील नदीत स्नान करतो, त्याच्या अनेक पापांचा नाश होतो; कारण पावसाचे पाणी ठिकठिकाणांहून मातीच्या माध्यमातून प्राकृतिक शक्तीला आपल्यासह वाहत आणत नदीच्या वाहत्या पाण्यासह समुद्राकडे घेऊन जाते. चातुर्मासात श्रीविष्णु जलावर शयन करतो; म्हणून जलामध्ये त्याचे तेज आणि शक्ती यांचा अंश असतो. त्यामुळे त्या तेजयुक्त जलात स्नान करणे सर्व तीर्थस्थानांपेक्षाही फलप्रद असते. चातुर्मासात एका बालदीत १ – २ बिल्वपत्रे टाकून ‘ॐ नमः शिवाय ।’ हा मंत्र चार-पाच वेळा जपून स्नान करणे विशेष लाभदायी असते. त्याने शरिराचा वायूदोष दूर होतो अन् आरोग्याचे रक्षण होते.

 

गंगास्नान

गंगास्नान

३. काळे आणि निळे वस्त्र परिधान करू नये

चातुर्मासात काळे आणि निळे वस्त्र परिधान करणे हानीकारक असते; कारण या दिवसांत वातावरण निर्मळ असल्याने सूर्याचे किरण तीव्र होतात आणि हे दोन्ही रंग सूर्याच्या किरणांमधील अन्य सर्व रंगांना समाविष्ट करून घेतात. वर्षाऋतूत सूर्याचे किरण अधिक तीव्र असल्याने शरिराला ते हानीकारक असतात आणि म्हणून हे दोन रंग वस्त्रांसाठी वर्जित ठरतात.

४. परनिंदा करू नये

या काळात पानावर भोजन, नामजप, मौन, ध्यान, दान-धर्म आणि उपवास विशेष लाभदायी असतात. चातुर्मासात परनिंदेचा विशेष रूपाने त्याग केला पाहिजे; कारण परनिंदा ऐकणाराही पापाचा धनी होतो. परनिंदा एक महापाप आहे आणि या दोषाचा पापी पुढल्या जन्मीही यशापासून वंचित राहतो.

५. चातुर्मासातील उपवासाचे महत्त्व

चातुर्मासात एकाच प्रकारच्या अन्नाचे भोजन करणारा मनुष्य निरोगी रहातो. केवळ एकवेळ भोजन घेणार्‍याला बारा यज्ञांचे फळ मिळते. जो केवळ पाणी पिऊन रहातो, त्याला प्रतिदिन अश्वमेघ यज्ञाचे फळ मिळते. जो केवळ दूध किंवा फळ खाऊन रहातो, त्याची सहस्रो पापे तात्काळ नष्ट होतात. जो पंधरा दिवसांतून एक दिवस उपवास करील, त्याच्या शरिरातील अनेक दोष नष्ट होतात आणि चौदा दिवसांमध्ये त्याच्या शरिरात भोजन केल्यानंतर जो रस निर्माण होतो, त्याचे शक्तीत रूपांतर होते; म्हणून एकादशीचा उपवास महत्त्वपूर्ण असतो. हे चार मास नामजप आणि तपस्या यांच्यासाठी अतीयोग्य आहेत.

६. चातुर्मासातील व्रतवैकल्यांचे महत्त्व

पावसाळ्यात आपण आणि सूर्य यांच्यात ढगांचा एक पट्टा निर्माण झालेला असतो. त्यामुळे सूर्याचे किरण, म्हणजे तेजतत्त्व, तसेच आकाशतत्त्व एरव्हीइतके पृथ्वीवर पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे वातावरणात पृथ्वी आणि आप तत्त्वांचे प्राबल्य वाढलेले असते. त्यामुळे वातावरणातील विविध जंतू, रज-तम किंवा काळी शक्ती यांचे विघटन न झाल्यामुळे या वातावरणात साथीचे रोग पसरतात आणि आळस किंवा मरगळ जाणवते.

व्रतवैकल्ये करणे, उपवास करणे, सात्त्विक आहार घेणे आणि नामजप करणे यांमुळे आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या रज-तमाचा प्रतिकार करण्यास सक्षम होतो; म्हणून चातुर्मासात व्रतवैकल्ये करतात.

७. चातुर्मासाच्या काळात केस कापल्याने होणारी आध्यात्मिक स्तरावरील हानी आणि त्याचे परिणाम

अ. प्रक्रिया

केस कापल्याने केशनलिका उघडी पडते. यामुळे केशनलिकेतील सूक्ष्म रज-तमात्मक नादाचे बाह्य वायूमंडलात वेगाने उत्सर्जन होऊ शकते.

आ. परिणाम

या नादाकडे वाईट शक्ती मोठ्या प्रमाणात आकृष्ट होऊ शकतात आणि जिवाच्या देहमंडलावर आक्रमण करू शकतात.

इ. आध्यात्मिक स्तरावरील हानी

१. देहमंडल ज्या वेळी रज-तमात्मक लहरींनी भारित होते, त्या वेळी जीव स्वैराचारी बनू शकतो.

२. चातुर्मासात रज-तमात्मक लहरींचे बाह्य वायूमंडलात आधिक्य असल्याने या काळात केस कापल्यास केसांच्या उघड्या पडलेल्या केशनलिकांतून मोठ्या प्रमाणात तामसिक स्पंदने जिवाच्या देहात प्रवेश करून जिवाच्या अंतःस्थ पोकळीला दूषित बनवू शकतात.

३. यामुळे वाईट शक्तींच्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या त्रासाला जिवाला सामोरे जावे लागल्याने त्याला तीन प्रकारच्या तापांना बळी पडावे लागते. तीन प्रकारचे ताप म्हणजेच वासनादर्शक, कृतीदर्शक आणि कर्मदर्शक ताप. हे ताप वाईट शक्तींच्या हस्तक्षेपाने निर्माण होतात.

८. तीन प्रकारच्या तापांचे महत्त्व आणि त्यांचे जिवावर होणारे तामसिक परिणाम

अ. वासनादर्शक ताप (अतृप्त आत्मे, तसेच पूर्वज वाईट शक्ती यांचा त्रास)

कृतीदर्शक इच्छाशक्तीच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या तापांना ‘वासनादर्शक ताप’ म्हणतात. यात शारीरिक त्रासांचे प्रमाण अधिक असते. या प्रकारात अतृप्त आत्मे, तसेच अनेक पूर्वज वाईट शक्ती यांच्या तापांना, म्हणजेच त्रासांना मानवाला सामोरे जावे लागते.

आ. कृतीदर्शक ताप (भूते, पिशाच यांचा त्रास)

हे ताप मानवाच्या रज-तमात्मक क्रियमाणातून निर्माण होतात. यात विकृतीदर्शक कृतींचा समावेश अधिक असतो. हे ताप भूते, पिशाच यांच्या उपद्रवापासून उद्भवणारे असतात. यांत शारीरिक त्रासांसह मानसिक त्रासही उद्भवतात.

इ. कर्मदर्शक ताप (राक्षस, तसेच बलाढ्य मांत्रिकांचा त्रास)

वरिष्ठ प्रकारचे ताप हे सर्वस्वी आध्यात्मिक प्रकारचे असतात. यांनाच ‘कर्मदर्शक ताप’ असे संबोधतात. विकृतीदर्शक विचारांतून हे ताप निर्माण होतात. यात राक्षस, तसेच बलाढ्य मांत्रिकांच्या शक्तींचा समावेश असतो. कर्मदर्शक तापांत तन, मन आणि बुद्धी यांवर आवरण येण्याचे प्रमाण अधिक असते.’

– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, कार्तिक कृ. ४, कलियुग वर्ष ५१११ (६.११.२००९), रात्री ८.३०)