रक्षाबंधन (राखी पौर्णिमा)

श्रावण पौर्णिमेला येणार्‍या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या रक्षाबंधन या सणामागील इतिहास, शास्त्र, राखी सिद्ध करण्याची पद्धत आणि या सणाचे महत्त्व या लेखातून विशद केले आहे.

राखी बांधणे

 

१. रक्षाबंधन : इतिहास

अ. ‘पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले आणि नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.’

आ. ‘बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले. आपली १२ वर्षे म्हणजे त्यांचे १२ दिवस. इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होत होते. इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली. गुरु बृहस्पति ध्यान लावून इंद्राणीला म्हणाले, ‘‘जर तू आपल्या पातिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्प केलास की, माझे पतीदेव सुरक्षित रहावेत आणि इंद्राच्या उजव्या मनगटावर एक धागा बांधलास, तर इंद्र युद्ध जिंकेल.’’ इंद्र विजयी झाला आणि इंद्राणीचा संकल्प साकार झाला.

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।
तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल ।।

अर्थ : ‘जे बारीक रक्षासूत्र महाशक्तीशाली असुरराज बळीला बांधले होते, तेच मी तुम्हाला बांधत आहे. तुमचे रक्षण होवो. हा धागा तुटू नये आणि तुमचे सदैव रक्षण होवो.’

इ. भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते. राखीची एक नवी पद्धत इतिहासकाळापासून चालू झाली.

 

२. राखी बांधण्यामागील शास्त्र

राखीपौर्णिमेच्या अर्थात् रक्षाबंधन या दिवशी वातावरणात यमलहरींचे प्रमाण जास्त असते. यमलहरी या पुरुष साकारत्व असतात. म्हणजेच त्या पुरुषांच्या देहात जास्त प्रमाणात गतीमान होतात. याच कारणास्तव यमदूत किंवा यमराज यांना प्रत्यक्ष चित्र-साकारतेच्या दृष्टीने साकारतांना पुरुष स्वरूपात साकारले जाते. पुरुषांच्या देहात यमलहरींचे प्रवाह वहाणे चालू झाले की, त्यांची सूर्यनाडी जागृत होते आणि या जागृत सूर्यनाडीच्या आधारे देहातील रज-तमाची प्रबलता वाढून यमलहरी पूर्ण शरिरात प्रवेश करतात. जिवाच्या देहात यमलहरींचे प्रमाण ३० प्रतिशतहून अधिक झाल्यास त्याच्या प्राणाला धोका उद्भवण्याची शक्यता असते; म्हणून पुरुषात असलेल्या शिवतत्त्वाला जागृत करून जिवाच्या सुषुम्नानाडीची काही अंशी जागृती करून प्रत्यक्ष शक्तीबिजाद्वारे, म्हणजेच बहिणीद्वारे प्रवाहित होत असलेल्या यमलहरींना, तसेच त्यांना प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी साहाय्य करणार्‍या सूर्यनाडीला राखीचे बंधन घालून शांत करण्यात येते.’

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ३०.७.२००६, दुपारी १.४५)

यमलहरींचे प्रमाण (प्रतिशत)

१. स्त्री १०
२. पुरुष ३०

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ३०.७.२००६, दुपारी १.४७)

 

३. भावनिक महत्त्व

रक्षाबंधन या दिवशी बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधायची असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, ही भूमिका असते. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने / पुरुषाने एखाद्या तरुणीकडून / स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषतः तरुणांचा आणि पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पालटतो.

 

४. राखी बांधणे

तांदूळ, सोने आणि पांढर्‍या मोहर्‍या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात राखी सिद्ध होते. ती रेशमी दोर्‍याने बांधली जाते.

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।

अर्थ : महाबली आणि दानवेन्द्र असा जो बलीराजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधते. हे राखी, तू चलित होऊ नकोस.

अ. तांदुळाच्या कणांचा समुच्चय राखी म्हणून रेशमी धाग्याने बांधण्याची पद्धत का आहे ?

तांदुळाच्या कणांची राखी
तांदुळाच्या कणांची राखी

‘तांदूळ हे सर्वसमावेशकतेचे प्रतीक, म्हणजेच ते सर्वांना आपल्यात सामावून घेणारे, तसेच ते सर्व लहरींचे उत्तम आदान-प्रदान करणारे आहे. तांदुळाचा समुच्चय पांढर्‍या वसनात बांधून तो रेशमाच्या धाग्याने शिवरूपी जिवाच्या उजव्या हातात बांधणे, म्हणजे एक प्रकारे सात्त्विक रेशमी बंधन सिद्ध करणे. रेशमी धागा सात्त्विक लहरींचे गतीमान वहन करण्यात अग्रेसर आहे. कृतीच्या स्तरावर प्रत्यक्ष कर्म घडण्यासाठी हे रेशमी बंधन प्रत्यक्ष सिद्ध केले जाते. राखी बांधणार्‍या जिवातील शक्तीलहरी तांदुळाच्या माध्यमातून शिवरूपी जिवाकडे संक्रमित झाल्याने त्याची सूर्यनाडी कार्यरत होऊन त्यातील शिवतत्त्व जागृत होते. तांदुळाच्या कणांच्या माध्यमातून शिवातील क्रियाशक्ती कार्यरत होऊन वायूमंडलात कार्यलहरींचे गतीमान प्रक्षेपण करून वायूमंडलातील रज-तमकणांचे विघटन करते. अशा रितीने रक्षाबंधनाचा मूळ उद्देश शिव आणि शक्ती यांच्या संयोगाने साध्य करून या दिवसाचा लाभ मिळवणे मानवजातीच्या दृष्टीने जास्त इष्ट ठरते.’

– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून १८.८.२००५, दुपारी १२.३६)

आ. भद्राकाळानंतरच राखी बांधणे योग्य !

ज्याप्रमाणे शनीची क्रूर दृष्टी हानी करते, तसेच शनीची बहीण भद्रा हिचा प्रभावही हानीकारक असतो. रावणाने भद्राकाळात शूर्पणखेकडून राखी बांधून घेतली आणि त्याच वर्षी त्याचा त्याच्या कुळासहित नाश झाला. भद्रेच्या कुदृष्टीमुळे कुळाची हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे भद्राकाळात राखी बांधून घेऊ नये. (संदर्भ : अज्ञात)

 

५. प्रार्थना करणे

बहिणीने भावाच्या कल्याणासाठी आणि भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्याबरोबरच दोघांनीही ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत’, अशी ईश्वराला प्रार्थना करावी.

 

६. रक्षाबंधन या दिवशी करण्यात येणार्‍या
कृतींचे महत्त्व आणि त्यांचे विवेचन

स्थूल कृती

महत्त्व (प्रतिशत)

कशाचे दर्शक ?

१. भावाने बहिणीच्या घरी जाणे १० प्रत्यक्ष आवाहनदर्शक कृती : ही कृती म्हणजे पुरुषत्वाद्वारे (शिवत्वाद्वारे) स्त्रीत्वाला (शक्तीला) प्रत्यक्ष कार्याच्या जागृतीसाठी ब्रह्मस्थितीत आवाहन करणे
२. बहिणीने भावाचे औक्षण करणे २० प्रत्यक्ष जागृतीत्मक आवाहनदर्शक कृती : ही कृती म्हणजे शिवत्वाला प्रत्यक्ष क्रियालहरींद्वारे स्वस्वरूपाला ब्रह्मस्थितीतील क्रियेत जागृत होण्यासाठी आवाहन करणे
३. बहिणीने राखी बांधणे ३० प्रत्यक्ष जागृतीसाठी क्रियाप्रदत्तदर्शक कृती : प्रत्यक्ष जागृती येण्यासाठी स्वतःच्या क्रियालहरी सगुणाच्या स्वरूपात शिवतत्त्वाला देणे आणि या माध्यमातून शिवत्वाला प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी अस्तित्वदर्शक क्रिया प्रदान करणे
४. बहिणीने नमस्कार करणे २० प्रत्यक्ष द्वैतदर्शक कृती : पुरुषत्वात जागृत झालेल्या कार्यरूपी शिवाला प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी शक्तीस्वरूपाने नमन करून त्याला प्रत्यक्ष चालना देणे
५. भावाला जेवण वाढणे किंवा भावाने भेट देणे इत्यादी २० प्रत्यक्ष क्रियेच्या स्तरावर असलेल्या प्रेमदर्शक कृती : द्वैतस्तराचे अस्तित्व निर्माण झाल्यामुळे द्वैतातील क्रिया म्हणजेच सगुण स्वरूपात प्रेमदर्शक कृती
एकूण १००

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ३०.७.२००६, दुपारी २.४०)

 

राखीच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन रोखा !

विडंबन

आजकाल रक्षाबंधन या सणाला राखीवर ‘ॐ’ किंवा देवतांची चित्रे असतात. राखीच्या वापरानंतर ती इतस्ततः पडल्यामुळे एकप्रकारे देवता आणि धर्मप्रतीक यांचे विडंबन होते. त्यामुळे पाप लागते. हे टाळण्यासाठी राखीचे पाण्यात विसर्जन करा !

रक्षाबंधन सणाचे आध्यात्मिक महत्त्व; बहिणीने भावाला राखी बांधतांना भाव कसा ठेवावा; कोणतीही अपेक्षा न बाळगता राखी बांधण्याचे महत्त्व; भावाने बहिणीला ओवाळणी देण्याचे महत्त्व इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण माहिती वाचण्यासाठी; तसेच रक्षाबंधन या सणाविषयी लघुपट (Video) पहाण्यासाठी ‘रक्षाबंधन सणाचे महत्त्व’ यावर ‘क्लिक’ करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment