आध्यात्मिक प्रगतीसाठी साहाय्यभूत असलेली ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ !

साधारणपणे आपल्या प्रत्येकातच राग, चिडचिडेपणा, आळस, विसराळूपणा इत्यादी स्वभावदोष अल्प-अधिक प्रमाणात असतात. स्वभावदोष असलेली व्यक्‍ती ईश्‍वराशी कधीही एकरूप होऊ शकत नाही. स्वभावदोषांमुळे साधनेत हानीही होते. स्वभावदोष असण्याचा आणखी एक तोटा म्हणजे स्वभावदोषांचा फायदा उठवून आसुरी शक्‍तींना त्रास देणे सोपे होते. यासाठी साधकानेच नव्हे, तर प्रत्येकानेच स्वभावदोष दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्‍न करणे आवश्यक असते.

 

१. स्वभावदोषांमुळे स्वतःच्या आणि इतरांच्या साधनेची हानी कशी होते ?

साधना चांगली होण्यातील मुख्य अडथळा म्हणजे व्यक्‍तीतील स्वभावदोष ! समजा, एखाद्याचा स्वभाव अतिशय रागीट आहे आणि लहान लहान गोष्टींवरूनही तो दुसर्‍यांवर रागावत असतो. त्यामुळे त्याची मनःस्थिती बिघडल्याने सेवा करतांना त्याला मनाची एकाग्रता साधता येत नाही आणि त्याच्या हातून चुका होऊन त्याची कार्यक्षमता घटते. तसेच रागावण्यामुळे साधकाला साधनेतून मिळणारे समाधान टिकवता येत नाही. असा मनुष्य जेव्हा इतरांशी रागावून बोलतो, तेव्हा इतरांना वाईट वाटते किंवा ते दुःखी होतात. याची परिणती इतरांचीही मनःस्थिती बिघडण्यात होते. पुढे इतरांना त्याच्याशी बोलतांना एकप्रकारचा ताण जाणवतो, म्हणजेच इतरांना त्याच्याशी सुसंवाद साधता येत नाही. याचा परिणाम समष्टीच्या एकूण कार्यक्षमतेवर होतो.

स्वभावदोष-निर्मूलनासाठी करायचे काही प्रयत्‍न पुढे दिले आहेत.

 

२. स्वभावदोष-निर्मूलनाच्या दृष्टीने कृतीत आणावयाचे तीन टप्पे

स्वभावदोष असणे, हा अहंचाच भाग आहे. स्वभावदोष घालवण्यासाठी पुढील तीन टप्प्यांत प्रयत्‍न करावे.

२ अ. पहिला टप्पा

बर्‍याचदा आपले इतरांच्या चुकांकडे किंवा दोषांकडेच लक्ष जाते. दुसर्‍याला दोषी समजणे म्हणजे स्वतःला त्याच्यातील ब्रह्म न पहाता येणे होय. इतरांच्या चुकांकडे किंवा त्यांच्यातील दोषांकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांच्यातील गुणांकडे लक्ष दिल्यास ते साधनेच्या दृष्टीने उपयुक्‍त ठरते. या टप्प्यात इतरांच्या दोषांकडे लक्ष न देता स्वतःमधीलच दोष शोधावे. यासाठी शक्य असल्यास इतरांचेही साहाय्य घ्यावे. जे दोष साधनेत मुख्य अडथळा ठरतात, ते दूर करण्यावर सर्वप्रथम लक्ष केंद्रित करावे.

२ आ. दुसरा टप्पा

आपल्या दोषांचे रूपांतर साधनाविषयक वा ईश्‍वरविषयक विचार किंवा कृती यांत करावे. पुढील उदाहरणांवरून ही गोष्ट लक्षात येईल. इतरांचा लवकर राग येणे हा स्वभावदोष असल्यास जेव्हा राग येईल, तेव्हा असा विचार करावा, ‘ईश्‍वराने मला साधना करण्याची संधी दिली आहे, ती आनंदप्राप्तीसाठीच. मग मी रागावून ईश्‍वराने दिलेला आनंददायी क्षण का वाया घालवू ? मग माझ्यात आणि साधना न करणार्‍यात काय भेद राहिला ?’ तसेच ‘जितका वेळ मला राग आला, तितका वेळ मला देवाचे विस्मरण झाले’, या विचाराने स्वतःचाच राग यायला हवा. कोणत्याही गोष्टीचे लवकर दुःख वाटणे, हा स्वभावदोष असल्यास असा विचार करायचा, ‘मला दुःख वाटते म्हणजे ‘मी कोणीतरी आहे’, ही जाणीव तीव्र आहे आणि ही जाणीव आहे, याचा अर्थ मी ईश्‍वरापासून दूर आहे.’ याउलट ‘माझी ईश्‍वराविषयी, त्याच्या नामाविषयी ओढ अजून वाढत नाही’, याचे दुःख वाटायला हवे.

२ इ. तिसरा टप्पा

स्वभावदोष उफाळून आले, तरी त्याविषयी विचार करून दुःख वाटून घेऊ नये, उदा. एखादी कृती करतांना कुणाचा राग आला असेल, तर ‘मला राग का आला’, याचा विचार करून त्याविषयी दुःख वाटून घेऊ नये. त्यापेक्षा ज्या प्रसंगातून माझा स्वभावदोष उफाळून येतो, तो प्रसंग मला शिकण्यासाठी ईश्‍वराने घडवून आणल्याविषयी ईश्‍वराप्रती कृतज्ञता व्यक्‍त करावी आणि लगेच तो क्षण विसरून वर्तमानकाळात रहाण्यास शिकावे. जसजसे चित्तामधील आवड-नावड, वासना, स्वभाव इत्यादी केंद्रांतील संस्कार न्यून होतात, तसतसा अहं घटतो. हे संस्कार अल्प करायचा एक उपाय म्हणजे स्वयंसूचना देणे होय. याचे विवेचन स्वभावदोष निर्मूलन विषयक ग्रंथात केले आहे. व्यक्‍ती स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्‍न करत असेल, तर तिच्या स्वभावदोषांशी संबंधित असलेल्या अहंचे निर्मूलन होण्यास साहाय्य होते.

 

३. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिका !

स्वभावदोषांना क्षुल्लक समजून त्यांची उपेक्षा करू नका; कारण बारीक भोकही महाकाय जहाजास जलसमाधी देते. तसेच सद्वर्तन न करणार्‍या माणसावर परमेश्‍वर कृपा करत नाही; म्हणून आजच सनातन संस्था शिकवत असलेली ही प्रक्रिया जाणून घ्या आणि स्वत:चे अन् कुटुंबियांचे जीवन सुखी आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करा.

करा स्वभावदोषांचे निर्मूलन, अन् सद्गुणांचे संवर्धन ।

सुखी होईल जीवन, अन् समृद्ध बनेल राष्ट्रजीवन ।।

संदर्भ : सनातन-निर्मित ‘स्वभावदोष-निर्मूलन’ विषयक ग्रंथमालिका

Leave a Comment