प्रयाग येथील कुंभमेळ्यामध्ये राजयोगी (शाही) स्नानाच्या वेळी गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमामध्ये स्नान केल्यामुळे होणारे आध्यात्मिक लाभ !

१. गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही पवित्र नद्या
म्हणजे भारताची अनुक्रमे इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्या असणे

‘प्रयाग येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. या नद्या म्हणजे भारताच्या अनुक्रमे इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्या आहेत. या नद्यांमध्ये कार्यरत असणारी दैवी ऊर्जा संगमाच्या ठिकाणी एकवटली आहे. त्यामुळे या नद्यांच्या संगमामध्ये पर्वकाळात राजयोगी स्नान केल्याने मनुष्याचा केवळ स्थूलदेहच नव्हे, तर त्याचा मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह शुद्ध अन् पवित्र होतात. अशा प्रकारे त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यामुळे व्यक्तीचा पिंड शुद्ध होऊन त्याचा लिंगदेह सात्त्विक आणि हलका होतो. अशा सात्त्विक झालेल्या व्यक्तीला मृत्यूत्तर चांगली गती प्राप्त होते.

 

२. गंगा नदीमध्ये शिव, यमुनेमध्ये  विष्णु आणि
सरस्वतीमध्ये ब्रह्म या देवतांच्या तत्त्वलहरी कार्यरत असणे

गंगेत शिव, यमुनेत विष्णु आणि सरस्वतीत ब्रह्मा या देवतांच्या तत्त्वलहरी कार्यरत असतात. अशा प्रकारे पर्वकाळात तिन्ही नद्यांच्या संगमामध्ये राजयोगी स्नान केल्यामुळे भाविकांना ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांच्या तत्त्वलहरी ग्रहण करता येतात. इतर दिवसांच्या तुलनेत कुंभमेळ्यामध्ये तिन्ही नद्यांमध्ये संबंधित देवतांच्या तत्त्वलहरी ३० टक्के अधिक प्रमाणात कार्यरत असतात. कुंभपर्वात राजयोगी (शाही) स्नान केल्यामुळे त्रिदेवांच्या तत्त्वलहरींचा लाभ भाविकांना होऊन त्यांची सात्त्विकता पुष्कळ वाढते आणि त्यांच्या पापांचे क्षालन होते.

 

३. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्यामुळे
भाविकांना अनुक्रमे वैराग्य, भक्ती अन् ज्ञान यांची प्राप्ती होणे

भाविकांना गंगेच्या प्रभावामुळे वैराग्य, यमुनेमुळे भक्ती आणि सरस्वतीमुळे ज्ञान यांची प्राप्ती होते. अशा प्रकारे त्रिवेणी संगमात स्नान केल्यामुळे भाविकांमध्ये ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या दैवी गुणांची वृद्धी होते अन् त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होण्यास साहाय्य होते.

 

४. योगमार्गानुसार साधना चांगली होणे

गंगेत स्नान केल्यामुळे ‘कर्मयोग किंवा ध्यानयोग’, यमुनेत स्नान केल्यामुळे ‘भक्तीयोग’ आणि सरस्वतीमध्ये स्नान केल्यामुळे ‘ज्ञानयोग’ या योगमार्गांनुसार साधना करणार्‍या भाविकांची साधना चांगली होते. त्यामुळे त्रिवेणी संगमात स्नान करणार्‍या भाविकांना त्यांच्या योगमार्गानुसार पुष्कळ अनुभूती येतात, उदा. ध्यान लागणे, देवतांची दर्शने होणे, भाव जागृत होणे, मनातील प्रश्‍नांची आतून उत्तरे मिळणे इत्यादी.

 

५. ‘जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती’, या तिन्ही अवस्थांना पार
करून ‘तुर्या’ ही उच्चतम आध्यात्मिक अवस्था लवकर प्राप्त होणे

मनुष्याच्या ‘जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती’, या तीन अवस्था असतात. भाविकांनी कुंभपर्वात तिन्ही नद्यांच्या संगमामध्ये स्नान केल्यावर त्यांना या तिन्ही अवस्था पार करून ‘तुर्या’ ही उच्चतम आध्यात्मिक अवस्था लवकर प्राप्त होते. ‘तुर्या’ अवस्थेच्या प्राप्तीमुळे भाविकांची देहबुद्धी लवकर न्यून होते. त्यामुळे भाविकांंना ‘थंडी, तहान, भूक यांची जाणीव न होणे, ‘दैवी शक्ती समवेत आहे’, असे जाणवणे, भावावस्था प्राप्त होणे, सतत आनंद अनुभवण्यास मिळणे’, यांसारख्या अनेक आध्यात्मिक अनुभूती येऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती शीघ्र होते.

 

६. प्रत्येक राजयोगी स्नानाच्या वेळी संगमात स्नान केल्यामुळे
सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे प्रमाण न्यून होऊन निर्गुण तत्त्व वाढणे

भाविकांनी सातत्याने प्रत्येक राजयोगी (शाही) स्नानाच्या वेळी प्रयाग येथील तिन्ही नद्यांच्या पवित्र संगमात स्नान केल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रथम सत्त्वगुणाची वृद्धी होते आणि नंतर सत्त्व, रज अन् तम या त्रिगुणांचे प्रमाण न्यून होऊन त्यांच्यामध्ये निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होते. त्यामुळे भाविकांच्या मनामध्ये मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त करण्याची मनीषा जागृत होते आणि त्यांच्याकडून देवाला ‘मला मुक्ती किंवा मोक्ष मिळू दे’, अशा प्रार्थना आपोआप होऊ लागतात.

 

७. गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही पवित्र
नद्यांमध्ये अनुक्रमे ‘इच्छा, क्रिया अन् ज्ञान’ यांच्या लहरी कार्यरत असणे

प्रयाग येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही पवित्र नद्यांमध्ये अनुक्रमे ‘इच्छा, क्रिया अन् ज्ञान’ यांच्या लहरी कार्यरत असतात. या नद्यांच्या त्रिवेणी संगमात स्नान केल्यामुळे भाविकांना इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती यांची प्राप्ती होते. त्यामुळे भाविकांकडून व्यष्टी स्तरावर नामजप, मनोनिग्रह करणे, कठोर धर्माचरण करणे इत्यादी व्यष्टी साधना आणि समष्टी कार्य करण्याची तळमळ वाढून धर्मप्रसार, धर्मजागृती अन् धर्मरक्षण करणे ही समष्टी साधना अधिक चांगल्या प्रकारे होऊ लागते.

 

८. तिन्ही पवित्र नद्यांमध्ये त्रिदेवांशी संबंधित ‘उत्पत्ती, स्थिती
आणि लय’ यांच्याशी संबंधित तारक अन् मारक शक्ती कार्यरत असणे

प्रयाग येथे सरस्वती, यमुना आणि गंगा या तिन्ही पवित्र नद्यांमध्ये त्रिदेवांशी संबंधित ‘उत्पत्ती, स्थिती आणि लय’ यांच्याशी संबंधित तारक अन् मारक शक्ती कार्यरत असते. या तिन्ही नद्यांच्या संगमामध्ये स्नान करणार्‍या भाविकांमध्ये या तिन्ही कार्यांशी संबंधित असणारी तारक आणि मारक शक्ती अंशात्मकरित्या ग्रहण होते. त्यामुळे साधक, साधू आणि संत यांच्याकडून आवश्यकतेनुसार ‘उत्पत्ती, स्थिती आणि लय’ यांच्याशी संबंधित कार्य होऊन त्यांचा ईश्‍वरी कार्यातील सहभाग वाढतो.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment