श्री दत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न असणे आणि एकसारखी असणे यांमागील, तसेच श्री दत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी आणि एकमुखी’ असण्यामागील आध्यात्मिक कारणे !

१. श्री दत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न
असणे आणि एकसारखी असण्यामागील आध्यात्मिक कारणे

‘वर्ष २०१९ च्या ‘सनातन पंचाग’ च्या डिसेंबर मासातील पानावर श्री दत्ताचे नवीन चित्र प्रसिद्ध झाले आहे. या चित्रामध्ये श्री दत्ताच्या संपूर्ण देहाची कांती आणि श्री दत्ताच्या तीन मुखांची कांती सोनेरी रंगाची दाखवली आहे. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या श्री दत्ताच्या चित्रात श्री दत्ताच्या त्रिमुखांची कांती भिन्न रंगाची होती, उदा. ब्रह्मदेवाची सोनेरी, श्रीविष्णूची निळ्या आणि शिवाची राखाडी रंगाची होती. श्री दत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न असणे आणि एकसारखी असणे यांमागील आध्यात्मिक कारणे  पुढीलप्रमाणे आहेत.

१ अ. श्री दत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न असणे

श्री दत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची कांती भिन्न रंगाची दाखवल्यामुळे त्रिदेवांमध्ये द्वैत असल्याचे जाणवते. जेव्हा त्रिमूर्तींचे कार्य श्री दत्तरूपातही स्वतंत्रपणे चालू असते, म्हणजे त्रिमूर्तींमध्ये द्वैतभाव असतो, तेव्हा त्रिमूर्तींची कांती भिन्न असते.

१ आ. श्री दत्ताच्या चित्रातील त्रिदेवांची एकसारखी असणे

जेव्हा श्री दत्तातील ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिमूर्तींचे कार्य श्री दत्तरूपात स्वतंत्रपणे चालू न रहाता एकत्रितपणे, म्हणजे अद्वैत भावाच्या स्तरावर चालू असते, तेव्हा श्री दत्तातील त्रिमूर्तींची कांती एकसारखी असते.

 

२. श्री दत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी आणि
एकमुखी’ असण्यामागील आध्यात्मिक कारणे

श्री दत्ताच्या अनेक मंदिरांमध्ये श्री दत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी’ असते. पुण्याजवळील ‘नारायणपूर’ येथे श्री दत्ताची एकमुखी मूर्ती आहे. श्री दत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी आणि एकमुखी’ असण्यामागील आध्यात्मिक कारणे पुढील प्रमाणे आहेत.

२ अ. श्री दत्ताची मूर्ती त्रिमुखी असणे

जेव्हा श्री दत्तातील ब्रह्मा, विष्णु आणि महेश ही तिन्ही तत्त्वे सगुण स्तरावर कार्यरत असतात, या तिन्ही रूपांमध्ये द्वैतभाव असतो आणि त्यांचे स्वतंत्र अस्तित्व कार्यरत असते, तेव्हा श्री दत्ताची मूर्ती ‘त्रिमुखी’ असते.

२ आ. श्री दत्ताची मूर्ती एकमुखी असणे


जेव्हा दत्तातील ब्रह्मा, विष्णु आणि महेश ही तिन्ही तत्त्वे निर्गुण स्तरावर कार्यरत असतात, या तिन्ही रूपांमध्ये अद्वैतभाव कायम राहून ती एकमेकांशी एकरूप झालेले असतात, तेव्हा त्यांची तीन भिन्न मुखे न दाखवता एकच मुख मूर्तीमध्ये दाखवलेले असते. त्यामुळे ती मूर्ती ‘एकमुखी’ असते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०१८ )

 

धर्माच्या अभ्यासकांना विनंती

सनातनच्या साधकांना मिळणारे नाविन्यपूर्ण ज्ञान
योग्य कि अयोग्य ?, याचा अभ्यास करण्याच्या संदर्भात साहाय्य करा !

आतापर्यंतच्या युगायुगांतील धर्मग्रंथांत उपलब्ध नसलेले नाविन्यपूर्ण ज्ञान ईश्‍वराच्या कृपेने सनातनच्या काही साधकांना मिळत आहे. ते ज्ञान नवीन असल्यामुळे जुन्या ग्रंथांचा संदर्भ घेऊन त्या ज्ञानाला योग्य कि अयोग्य ?, असे म्हणता येत नाही. ते ज्ञान योग्य कि अयोग्य ?, या संदर्भात धर्माच्या अभ्यासकांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यास मानवजातीला नवीन योग्य ज्ञानाचा लाभ होईल. एवढेच नव्हे, तर अयोग्य काय ?, हेही कळेल. यासाठी आम्ही धर्माच्या अभ्यासकांना या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. – सनातन संस्था

Leave a Comment