सनातनच्या रामनाथी आश्रमातील स्थानदेवता म्हणून हनुमान कार्यरत असण्यामागील शास्त्र

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील श्री हनुमानाची मूर्ती
११.१.२०१८ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये कु. मधुरा भोसले यांचा सूक्ष्म ज्ञानावर आधारित ‘विविध देवतांचे कार्य आणि वैशिष्ट्ये’, हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखाच्या संदर्भात जळगाव येथील वाचक श्री. विजय पाटील यांनी विचारलेले प्रश्‍न आणि कु. मधुरा भोसले यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.
कु. मधुरा भोसले

प्रश्‍न

लेखात ‘रामनाथी आश्रमाची स्थानदेवता ‘हनुमान’ आहे’, असे म्हटले आहे आणि ‘स्थानदेवता स्थानाच्या बाहेर साहाय्य करू शकत नाही’, असेही म्हटले आहे. हनुमान ही तर उच्च देवता आहे, ती तर सगळीकडे साहाय्य करू शकते, स्थानदेवतेसारखी मर्यादा तिला कशी काय असू शकते ? उच्च देवता ही स्थानदेवता ही असू शकते का ? असेल, तर मग तिच्या कार्याच्या व्याप्तीला स्थानापुरती मर्यादा कशी येऊ शकते ? कृपया मार्गदर्शन करावे. – गुरुसेवक, श्री. विजय पाटील, जळगाव.

 

उत्तर

१. आवश्यकतेनुसार उच्च देवतांचे तत्त्व स्थानदेवतेच्या रूपाने कार्यरत होणे

‘काही वेळा उच्च देवतांचे तत्त्व आणि त्यांची प्रगट शक्ती यांची विशिष्ट स्थानाचे रक्षण करण्यासाठी आवश्यकता असते. अशा वेळी उच्च देवतेचे तत्त्व स्थानदेवतेच्या रूपाने काही प्रमाणात कार्यरत होते, उदा. सनातनच्या रामनाथी आश्रमातील परिसरात स्थानदेवतेच्या रूपाने कार्यरत असणारा हनुमान.

२. सनातनच्या रामनाथी आश्रमाची वैशिष्ट्ये

सनातनचा रामनाथी येथील आश्रम हा धर्मसंस्थापनेचा केंद्रबिंदू आणि स्फूर्तीस्थान आहे. तो साक्षात ज्ञानपीठ, धर्मपीठ आणि शक्तीपीठ आहे. या आश्रमातून संपूर्ण ब्रह्मांडात धर्मतेजानेयुक्त असणार्‍या चैतन्यदायी लहरींचे प्रक्षेपण होते.

३. हनुमान उच्च देवता असून त्याने रामनाथी आश्रमाची
स्थानदेवता म्हणून कार्यरत रहाणे आणि साधकांचे रक्षण करणे

सनातनच्या रामनाथी आश्रमाचे अद्वितीय महत्त्व लक्षात घेऊन धर्मसंस्थापनेच्या कार्यात अडथळे निर्माण करण्यासाठी पाताळातील बलाढ्य आसुरी शक्ती रामनाथी आश्रमावर सतत सूक्ष्मातून आक्रमणे करत असतात. या आक्रमणांपासून आश्रमाची वास्तू आणि आश्रमात रहाणारे साधक यांचे रक्षण करण्यासाठी स्थानदेवतेच्या रूपाने येथे संतांच्या सांगण्यावरून हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. आश्रम आणि आश्रमाभोवतीचा परिसर यांच्या रक्षणाचे दायित्व या हनुमानावर आहे. तो येथील स्थानदेवता असून अहोरात्र कार्यरत असतो. त्याच्या कृपेमुळे आश्रमावर होणार्‍या प्राणघातक आक्रमणांपासून साधकांचे रक्षण होत आहे.

४. हनुमानाचे कार्य

४ अ. उच्च देवतेच्या रूपाने कार्यरत असतांना कार्याला कोणतीही मर्यादा नसणे

हनुमान हा उच्च देवतांपैकी एक आहे. तो संपूर्ण ब्रह्मांडात तत्त्वरूपाने कार्यरत असतो. त्याच्या ब्रह्मांडव्यापी कार्याला कोणतीही मर्यादा नाही. तसेच तो ‘व्यष्टी स्तरावर मोक्ष देणे आणि समष्टी स्तरावर धर्मसंस्थापना करणे’, ही कार्ये समर्थपणे पूर्ण करत आहे.

४ आ. काळाच्या आवश्यकतेनुसार हनुमानाचे एक लघुरूप सनातनच्या रामनाथी आश्रमातील स्थानदेवतेच्या रूपाने कार्यरत असणे

हनुमान हा उच्च देव असला, तरी काळाच्या आवश्यकतेनुसार आणि संतांच्या संकल्पामुळे त्याचे एक लघुरूप सनातनच्या रामनाथी आश्रमातील स्थानदेवतेच्या रूपाने कार्यरत झाले आहे. हनुमानाची प्रगट शक्ती ७० टक्के इतकी असल्यामुळे सनातनच्या रामनाथी आश्रमाभोवती हनुमानाच्या शक्तीचे संरक्षककवच निर्माण झाले आहे. त्याचे मारक रूप कार्यरत असल्यामुळे आश्रमावर आक्रमण करणार्‍या वाईट शक्तींचा विनाश होत आहे.

४ इ. उच्च देवतेचे स्थानदेवता आणि उच्च देवता असे कार्य एकाच वेळी चालू असणे

हनुमानासारख्या उच्च देवता आवश्यकतेनुसार स्थानदेवता आणि उच्च देवता या दोन्ही स्तरांवर एकाच वेळी कार्यरत असतात.

४ ई. स्थानदेवता आणि उच्च देवता

– कु. मधुरा भोसले, (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१.२०१८, रात्री १०.२६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात