थायलंडची राजधानी बँकॉक मधील राजमहालाची वैशिष्ट्ये !

‘प्राचीन काळी ज्याला ‘श्याम देश’ म्हटले गेले, तो भूभाग म्हणजे आताचा थायलंड देश. या भूभागावर आतापर्यंत अनेक हिंदु आणि बौद्ध राजांनी राज्य केले. येथील संस्कृती हिंदु धर्मावर आधारित होती. येथील राजाला प्रभु श्रीरामाचे रूप मानले गेले आणि त्यांच्या राजधानीला अयोध्येचा दर्जा दिला गेला. रामायणाला येथे राष्ट्रीय साहित्य मानले जाते. कालांतराने बौद्धांच्या सांस्कृतिक आक्रमणाने येथे बौद्ध धर्म प्रचलित झाला. मवर्ष १७८२ मध्ये चक्री साम्राज्याचा ‘राजा राम १’ याने रत्नकोसी (बँकॉक) शहराची स्थापना केली. वर्ष १७८२ मध्ये राजा राम १ याने रत्नकोसी (बँकॉक) शहराच्या मध्यभागी ६० एकर परिसरात मोठा राजवाडा बांधला.

 

राम १ या राजाने बांधलेल्या राजमहालाची वैशिष्ट्ये

रामायणात नील वानराने मोठे रूप धारण करून स्वतः सेतू बनल्याचे चित्र. नील वानराचे मुख गोलात दाखवले आहे.
वानरसेनेसह युद्धाला जातांना प्रभु श्रीराम (गोलात दाखवले आहेत.) रथाच्या मागे वानरसेना आहे.

राजवाड्याच्या भिंतींवर रामायणातील प्रसंगांची चित्रे रंगवलेली असणे

राम १ या राजाने बँकॉक शहरात राजवाडा बांधल्यावर या राजवाड्याच्या भिंतींवर रामायणातील विविध प्रसंगांची सुंदर चित्रे रंगवून घेतली आहेत. या चित्रांमध्ये नैसर्गिक रंगांचा वापर केला असून आवश्यक तेथे सोने आणि चांदी यांचाही उपयोग केला आहे. चित्रांमधील राम, लक्ष्मण इत्यादी व्यक्तीरेखांचे तोंडवळे आणि सर्वांचे पोषाख थायलंडमधील पद्धतीनुसार आहेत.

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

 

मुख्य राजवाडा चक्री महाप्रसात

चक्री साम्राज्याच्या मुख्य राजवाड्याचे नाव ‘चक्री महाप्रसात’ असे आहे. चक्री साम्राज्याचा ‘राजा राम ९’ भूमीबोल अतुल्यतेज आणि त्याच्यानंतर आता त्याचा मुलगा ‘राजा राम १०’ याचे हे निवासस्थान आहे. ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिच्या राजवाड्याच्या स्थापत्य शैलीनुसार हा राजवाडा बांधलेला आहे; मात्र त्याचे छप्पर आणि शिखर थायलंड शैलीचे आहे.’

राजमहालाच्या रक्षणासाठी उभा केलेला राक्षसाचा पुतळा
राजमहालातील मंदिरात असलेली पाचूच्या बुद्धाची मूर्ती
राजमहालात लावलेले श्री हनुमानाचे चित्र (हनुमानाचा तोंडवळा आणि पोशाख थायलंडमधील पद्धतीनुसार आहे.)

१. चक्री साम्राज्याचा ‘राजा राम १’ याने चाओ फ्राया नदीच्या
दोन्ही तिरांवर वसवलेले रत्नकोसी शहर, म्हणजेच आजचे बँकॉक शहर !

अयुद्धया ही थायलंडची आधीची राजधानी होती. वर्ष १७८२ मध्ये चक्री साम्राज्याचा ‘राजा राम १’ याने बँकॉक शहराची स्थापना केली. बँकॉक शहर हीच थायलंडची आताची राजधानी आहे. बँकॉक हे थायलंडमधील चाओ फ्राया या नदीच्या दोन्ही तिरांवर वसलेले मोठे शहर आहे. या शहराचे खरे नाव ‘रत्नकोसी’ होते.

२. राजाने रत्नकोसी शहराच्या मध्यभागी मोठा राजवाडा बांधणे

वर्ष १७८२ मध्ये राजा राम १ याने रत्नकोसी (बँकॉक) शहराच्या मध्यभागी ६० एकर परिसरात मोठा राजवाडा बांधला. या राजवाड्याच्या बाहेरच्या बाजूने उंचच्या उंच अशी भिंत बांधली आणि आतल्या बाजूला ३ महाल बांधले. त्यांपैकी बाहेरचा राजमहाल, दुसरा मध्य राजमहाल आणि दक्षिणेला तिसरा आतला राजवाडा आहे. त्यांतील काही वास्तू पुढे ‘राजा राम ५’ याने वर्ष १८६८ ते १९१० या कालावधीत बांधल्या.

३. राजमहालाची वैशिष्ट्ये

३ अ. राजमहालाच्या रक्षणासाठी असुरांचे पुतळे असणे

राजमहालाच्या बाहेर असुरांचे सहा मोठे पुतळे उभे केले आहेत. यांंना ‘रूप याक’ असे म्हणतात. हे असुर राजमहालाच्या रक्षणासाठी आहेत.

३ आ. काही ठिकाणी ऋषी, किन्नर, गरुड आणि अप्सरा यांच्या मूर्ती असणे

काही ठिकाणी ऋषींचे पुतळे आहेत. राजमहालाच्या आत मुख्य मंदिराच्या बाहेर किन्नर आणि किन्नरी यांच्या मूर्ती आहेत. काही ठिकाणी गरुड, तर काही ठिकाणी अप्सरा यांच्या मूर्ती आहेत.

३ इ. राजमहालात ३ बौद्ध मंदिरे असणे

राजमहालाच्या आत ३ मुख्य बौद्ध मंदिरे आहेत. यांपैकी योगमुद्रेत बसलेला ‘पाचूचा बुद्ध’ प्रसिद्ध आहे. याला स्थानिक भाषेत ‘वाट फ्रा कैव’ असे म्हणतात. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूंनुसार पाचूच्या बुद्धाच्या मूर्तीला घातलेले कपडे पालटले जातात. कपडे पालटण्याच्या उपचाराला उत्सवाचे रूप देण्यात आले आहे.

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

मूळ भारतीय रामायणात पालट केलेले थाय रामायण – ‘रामाकियान’!

थायलंडमध्ये रामायणाला राष्ट्रीय संपत्ती मानले आहे. सहस्रो वर्षांपूर्वी भारतातून व्यापारासाठी थायलंडला गेलेल्या हिंदूंमुळे तेथे रामायण पोहोचले. त्या वेळी गावागावांतील लोक रामायणावर आधारित कठपुतळ्यांचा खेळ सादर करायचे. १८ व्या शतकात मूळ रामायणातील अनेक गोष्टींमध्ये पालट करून ‘थाय रामायण’ लिहिले गेले. त्यामुळे थायलंडमधील रामायण भारतातील वाल्मीकि रामायणापेक्षा काहीसे वेगळे आहे. या रामायणाला ‘रामाकियान’ म्हणतात. या रामायणात हनुमंताविषयी अधिक वर्णन आहे. हनुमंताच्या साहाय्याने युद्ध जिंकल्याचा उल्लेख करतांना हनुमंत रावणाचा प्राण असलेले हृदय चोरून श्रीरामाकडे आणतो आणि विजय मिळवतो’, असे वर्णन केले आहे. या रामायणात रावणाचा ‘तोसोकंट’ (दशकंठ) असा उल्लेख आहे.

Leave a Comment