भक्ताच्या हाकेला ईश्‍वर धावून येतो, याविषयी साधिकेला आलेली अनुभूती

१. गुरे राखावी लागल्यामुळे गुरुपौर्णिमेच्या सेवेला
जाता न येणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे

वर्ष २०१४ मध्ये मला गुरुपौर्णिमेच्या सेवेला जायचे होते आणि ती सेवा मनापासून करावी, असे मला वाटत होते. एक काकू आणि मी गुरुपौर्णिमेच्या सेवेला जायचो; पण घरातील कामे करायला कुणी नसायचे. माझे यजमान (पती) कामावर जात असल्यामुळे मलाच जनावरे घेऊन शेताकडे जावे लागे. सेवेला अधिकाधिक वेळ मिळावा, अशी मला तळमळ होती. त्यामुळे मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आळवत होते, गुरुदेव, जनावरे खुंटीला बांधून ठेवता येत नाहीत. त्यांच्यामुळे मला सेवेला जाता येत नाही.

 

२. ८ ते १० वर्षांचा एक मुलगा अकस्मात् घरी येणे,
त्याला गुरे राखण्यासाठी ठेवून घेऊया, असा विचार मनात येणे

माझे यजमान वाहन घेऊन येत होते. तेव्हा एका मुलाने हात दाखवून त्यांचे वाहन थांबवले. तो मुलगा ८ ते १० वर्षांचा होता. यजमानांनी विचारले, तुला कुठे जायचे आहे ? तो म्हणाला, मला तुळजापूरला जायचे आहे. त्यांनी त्याला तुळजापूरला नेऊन सोडले. तेव्हा तो मुलगा त्यांना म्हणाला, मला तुमच्या समवेत यायचे आहे. मग त्यांनी त्या मुलाला घरी आणले. घरी आल्यानंतर यजमानांनी मला सर्वकाही सांगितले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, मला सेवेला जायचे आहे आणि गुरे राखायला कुणी नाही; म्हणून त्याला ठेवून घेऊया. त्या मुलाला पाहून मी म्हणाले, त्याला ठेवून घ्या. माझ्या यजमानांनी त्याला विचारले तू रहाशील का ? तेव्हा तो हो म्हणाला.

 

३. त्या मुलानेे प्रतिदिन सर्व कामे केल्यामुळे गुरुपौर्णिमेची सेवा करता येणे

तो मुलगा प्रतिदिन शेतात जायचा आणि गुरे राखायचा. त्यामुळे मला गुरुपौर्णिमेच्या सेवेला जाता येत होते. तो गुरुपौर्णिमेपर्यंत राहिला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी तो उंबरठ्यापाशी अर्धा घंटा थांबला. मी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याने घरी खिचडी करून ठेवली. तो आणि माझे यजमान यांनी खिचडी खाल्ली. मला वाटलेे, आता घरी जाऊन स्वयंपाक करावा लागेल. मी गुरुपौर्णिमा झाल्यानंतर घरी आल्यावर त्याने ताटात खिचडी वाढली आणि मला आणून दिली.

 

४. गुरुपौर्णिमेनंतर तो मुलगा निघून गेल्यावर भक्ताच्या
हाकेला ईश्‍वर धावून येतो, तसेच स्वतःविषयी घडल्याचे जाणवणे

तेव्हा मी त्याला म्हणाले, तू कुठून आलास ? तुला आम्ही साहाय्य करू. तुझी कागदपत्र आणून दे. तुला कुठेतरी काम देऊ. त्याने अर्धा घंटा बाहेर जाऊन विचार केला आणि नंतर तो आलाच नाही. त्याने शेतातील सर्व कामे विनामूल्य केली. जसे भक्ताच्या हाकेला ईश्‍वर धावून येतो, तसेच माझ्याविषयी हे घडले होते; पण मला ईश्‍वराला ओळखता आले नाही.

– सौ. विजया पटोडे, तुळजापूर तीर्थ (१३.४.२०१७)

 

चहासाठी दूध नसल्याने साधकाला चहा कसा द्यावा ?, असा प्रश्‍न पडणे
आणि म्हशीला थोडा भुसा खायला दिल्यावर तिने तांब्याभर दूध दिल्यावर चहा करता येणे

एकदा सत्संग घेण्यासाठी श्री. रसाळदादा आले. मी शेतातून घरी आले आणि चहा पीत होते. घरी अधिक दूध नसल्याने रसाळदादांना चहा कसा करायचा ?, असा मला प्रश्‍न पडला. नंतर मी म्हशीला थोडासा भुसा टाकला. तेव्हा म्हशीने तांब्याभर दूध दिले. मी त्या दुधाचा चहा केला. तेव्हा आपल्या मनातील इच्छा गुरुदेवांनी ऐकली, असे वाटून मला कृतज्ञता वाटली.

– सौ. विजया पटोडे, तुळजापूर तीर्थ (१३.४.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक