भीषण रेल्वे अपघातातून केवळ गुरुकृपेनेच रक्षण होण्यासंदर्भात श्री. श्याम राजंदेकर यांना आलेली अनुभूती

श्री. श्याम राजंदेकर

१. साधक रेल्वेतच नोकरी करत असल्यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांनी त्यांना तातडीने ‘विदर्भ एक्सप्रेस’चे आरक्षण देणे आणि त्यांनी मुंबई येथील सेवाकेंद्रात गेल्यावर हिशोब देऊन लगेच दुसर्‍या दिवशी अकोला येथे परत जाणार असल्याचे साधिकेला सांगणे

‘पूर्वी मी लेखाच्या सेवेसाठी प्रत्येक मासात अकोला येथून मुंबई येथील सेवाकेंद्रात जात असे. डिसेंबर १९९९ मध्ये मी ‘गीतांजली एक्सप्रेस’ने रात्री ८ वाजता दादर रेल्वे स्थानकात पोहोचलो. दुसर्‍या दिवशी लगेचच अकोला येथे परत जाण्यासाठी आरक्षण मिळेल का, हे पहाण्यासाठी मी तिकीट तपासणी कार्यालयात विचारपूस केली. मी रेल्वेतच नोकरी करत असल्यामुळे मला एक बर्थ देण्याविषयी त्यांना सांगितले. त्यांनी मला ‘विदर्भ एक्सप्रेस’ या गाडीमध्ये ‘एस् ६’ या डब्यात (बोगीत) १२ क्रमांकाचा बर्थ दिला. मी आनंदात सेवाकेंद्रात गेलो आणि हिशोब देऊन परत जाणार असल्याचे तेथील साधिकेला सांगितले.

२. दादर रेल्वे स्थानकावर श्री. महाजन अचानक भेटून त्यांनी साधकाला त्यांच्यासह कल्याणला नेणे आणि कल्याण स्थानकावर गर्दी नसतांनाही श्री. महाजन कुठे गेले, हे साधकाला न कळणे अन् त्यामुळे साधक त्यांच्या पाहुण्यांकडे मुक्कामासाठी गेल्यावर त्या दिवशी सायंकाळीच महाजनवहिनींनी त्या पाहुण्यांना साधक त्यांच्याकडे येणार असल्याची पूर्वसूचना दिल्याचे सांगणे

दुसर्‍या दिवशी रात्री १२ वाजता ‘विदर्भ एक्सप्रेस’ दादरहून सुटणार होती. त्या गाडीतून अकोल्याला जाण्यासाठी मी रेल्वे स्थानकावर आल्यावर अचानकपणे कल्याण येथे रहाणारे साधक श्री. महाजन मला भेटले. ते मला म्हणाले, ‘‘मामा, इतक्या रात्री कशाला जाता ? माझ्यासह कल्याणला माझ्या घरी चला आणि सकाळी ‘गीतांजली एक्सप्रेस’ने अकोल्याला जा.’’ त्यांनी माझ्यावर काय जादू केली, ते मला कळलेच नाही. मी त्यांच्यासह लोकलने कल्याणला आलो. तेथे येण्यास आम्हाला रात्रीचे साडेबारा वाजले. रेल्वे स्थानकावर उतरतांना गर्दी नव्हती, तरीही महाजनकाका मला कुठेेच दिसले नाहीत. आता काय करावे ते मला कळेना. त्यांचे घरही मला ठाऊक नव्हते. शेवटी एक वाजता मी आमच्या एका पाहुण्यांकडे गेलो. वहिनींनी दार उघडताच मला सांगितले, ‘‘अहो, आज संध्याकाळीच महाजनवहिनी तुम्ही येणार असल्याचे मला सांगून गेल्या.’’ मला काहीच अर्थबोध होईना. मी चहा घेतला आणि झोपलो.

३. साधक आदल्या रात्री जाणार असलेल्या ‘विदर्भ एक्सप्रेस’ला शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाल्यामुळे सर्व गाड्या आठ ते दहा घंट्यांंच्या विलंबाने सुटणे

सकाळी ७ वाजता कल्याणहून ‘गीतांजली एक्सप्रेस’ने अकोल्याला जाण्यास निघालो. ‘गीतांजली एक्सप्रेस’ इगतपुरी स्थानकात पोहोचताच कळले, ‘रात्री गेलेल्या विदर्भ एक्सप्रेसला शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला असल्याने सर्व गाड्या पुढे जाणार नाहीत.’ नंतर आठ ते दहा घंट्यांंच्या विलंबाने गाड्या पुढे जाणे चालू झाले. दुसर्‍या दिवशी दुपारी तीन वाजता आमची गाडी अपघात स्थळावरील दुसर्‍या रुळावरून पुढे काढण्यात आली.

४. साधकाला देण्यात आलेल्या बर्थचा अपघातात चक्काचूर झाल्याने ‘देवाने भीषण अशा अपघातातून वाचवले’, या विषयी कृतज्ञता वाटणे

अपघातस्थळी काही कालावधीसाठी गाडी थांबली, तेव्हा मी बघितले की, ज्या डब्यात मला बर्थ दिला होता, तो बर्थ चक्काचूर झाला होता. ते पाहून माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. ‘देवाने मला भीषण अशा अपघातातून वाचवले’, याविषयी कृतज्ञता वाटली.

५. प.पू. डॉक्टरांचा साधकाने सेवाकेंद्रातून न निघण्याचा निरोप त्याला मिळण्यापूर्वीच तो निघाल्याने त्याच्या जिवावरचे संकट टाळण्यासाठी देवाने केलेले नियोजन पाहून साधकामध्ये शरणागत भाव निर्माण होऊन डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागणे

मी तिसर्‍या दिवशी अकोला येथे पोहोचल्यावर मुंबई सेवाकेंद्रात दूरभाषवर सर्व वृत्तांत कळवला. तेव्हा तेथील साधिका पुष्कळ हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘अहो मामा, तुम्हाला प.पू. डॉक्टरांनी रात्रीच परत बोलावले होते; पण तोपर्यंत तुम्ही निघून गेला होता. आम्हालाही तुम्हाला कळवता आले नाही. (त्या काळी भ्रमणभाषची सुविधा नव्हती.) माझा भाव पुष्कळ जागृत झाला. गुरुमाऊलींनी माझ्या जिवावरचे संकट टाळण्यासाठी काय नियोजन केले, हे लक्षात येताच कोटी कोटी वेळा कृतज्ञता वाटली आणि माझ्यात शरणागत भाव निर्माण झाला. माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.

६. केवळ गुरुकृपेमुळेच तीव्र प्रारब्धावर कशी मात करता येते, हे शिकणे

पुढल्या फेरीत सेवाकेंद्रात जाण्यापूर्वी मी महाजनकाकांना भेटून सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘अहो, आम्ही त्या दिवशी कल्याणला नव्हतोच. सर्व गुरुदेवांचीच कृपा आहे.’’ केवळ गुरुकृपेमुळेच तीव्र प्रारब्धावर कशी मात करता येते, हे या प्रसंगातून माझ्या लक्षात आले.

‘हे गुरुमाऊली, माझे प्राण वाचवण्यासाठी आपण केलेल्या अनंत कृपेचे ऋण मी फेडूच शकत नाही. ‘माझ्यावर अशीच कृपादृष्टी अखंड राहू द्या. मला शेवटच्या श्‍वासापर्यंत आपल्याच चरणांची सेवा घडू द्या’, अशी आपल्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

– चरणरज

श्री. श्याम राजंदेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.३.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

 संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Leave a Comment