सनातनच्या ध्वनीचित्रीकरण विभागाचे विस्तारलेले स्वरूप अन् त्याअंतर्गत हाताळले जाणारे विविध विषय

चित्र १ : सुसज्ज आणि अद्ययावत यंत्रणा असलेले सनातन कलामंदिर (स्टुडिओ) / चित्र २ : स्टुडिओत चित्रीकरण होत असतांनाचा एक क्षण / चित्र ३ : स्टुडिओतील प्रॉडक्शन कंट्रोल खोलीतील अद्ययावत यंत्रणा

१. प्रथम भाडेतत्त्वावर यंत्रणा आणून केले जाणारे ध्वनीफिती निर्मितीचे कार्य आता प्रचंड प्रमाणात विस्तारले आहे.

२. सर्व सुविधांनी युक्त अन् अत्याधुनिक यंत्रणा असणारे भव्य कलामंदिर त्याचे सूचक आहे. त्यात प्रगत प्रकाशयंत्रणा अन् व्यावसायिक स्तरावर निर्मिले गेलेले २ स्टुडिओ, २ उत्पादन नियंत्रण कक्ष, ध्वनी रेकॉर्डिंसाठी स्वतंत्र खोली अन् ध्वनीचित्रफितींचे संकलन अन् त्यासंदर्भातील अन्य सेवांसाठी ८ खोल्या समाविष्ट आहेत. हा स्टुडिओ उभारतांना देश-विदेशातील तज्ञांचे समुपदेशन घेण्यात आले होते.

३. आतापर्यंत मराठी भाषेतील ३६, हिंदी भाषेतील ३८० हून अधिक, तर तेलुगु अन् कन्नड भाषेतून हिंदूंच्या सणांची माहिती देणार्‍या विविध धर्मसत्संगांच्या ध्वनीचित्रचकत्या निर्मिल्या आहेत. मराठी, हिंदी, तेलुगु अन् कन्नड भाषांतील या धर्मसत्संगांचे विविध १४ वाहिन्यांवरून नियमित प्रसारणही करण्यात येत आहे.

४. देवतांचा नामजप योग्य प्रकारे कसा करावा, आरतीसंग्रह आणि साधनाविषयक मार्गदर्शन, आदींसंदर्भात दिशादर्शन करणार्‍या ध्वनीचकत्याही वितरणासाठी उपलब्ध आहेत.

५. यांसह धर्म, अध्यात्म, मंदिरे, संतसन्मान, साधनाविषयक मार्गदर्शन, आध्यात्मिक उपाय, धार्मिक विधी यांसारख्या विषयांवरील विपुल ध्वनीचित्रफिती आज सनातनकडे उपलब्ध आहेत.

६. ध्वनीचित्रीकरण सेवा म्हणजे संहितालेखनाच्या प्राथमिक स्तरापासून प्रत्यक्ष चित्रीकरण, सादरीकरण, संकलन… सर्व काही शुद्ध धर्मसेवेच्या प्रेरणेचा अनोखा आविष्कार !

७. अत्यल्प साधनसामुग्रीतून चालू झालेला ध्वनीचित्रीकरण सेवेचा प्रवास आज अत्याधुनिक स्टुडिओपर्यंत येण्यामागे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन अन् हिंदु धर्माविषयीचे ज्ञान लवकरात लवकर जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची तळमळ आहे, यात शंकाच नाही !

ध्वनीचित्र-चकत्यांच्या माध्यमातून घरोघरी धर्मज्ञानाचा दीप लावणे, हे समष्टी ध्येय, तर अंतःकरण भक्तीभावाने प्रकाशमय करणे हे ध्वनीचित्रीकरण सेवेतील साधकांचे व्यष्टी स्तरावरील ध्येय !