स्वतः निखळ आनंद अनुभवत इतरांवर चैतन्यमय मधुर वाणीने आनंदाची उधळण करणार्‍या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी (वय ९३ वर्षे) !

अनुक्रमणिका

सनातनच्या ३६ व्या संत पू. शालिनी नेनेआजी यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

‘पू. नेनेआजींनी देवद आश्रमात रहायला येऊन साधकांना सेवेची जी संधी दिली आणि जो आनंद दिला, त्याबद्दल साधकांच्या वतीने मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि वाढदिवसानिमित्त त्यांना नमस्कार करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

nene_ajji_col
पू. शालिनी नेने

‘१८.१०.२०१६ ते २२.१०.२०१६ या कालावधीत मला देवद आश्रमात वास्तव्यास असणार्‍या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांचा चैतन्यमय सत्संग प्रतिदिन एक घंटा लाभला. त्या सतत आनंदी असतात. त्यांची चैतन्यमय आणि मधुर वाणी त्यांच्या संपर्कात येणार्‍यांना मोहून टाकते आणि आनंदाची उधळण करते. आज त्या ९४ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने त्यांचे विविध विषयांवरील विचार आणि त्यांनी सांगितलेल्या काही आठवणी पुढे देत आहे.

 

१. पू. आजींचे तेजस्वी विचार

पू. आजी अंथरुणाला खिळून आहेत, तरीही त्या प्रतिदिन दैनिक सनातन प्रभात संपूर्ण वाचतात. दैनिकातील राजकीय घडमोडींवर त्या विचार करतात. त्यांच्या विचारांतून त्यांच्यातील प्रतिभाशक्ती जाणवली. पू. आजींनी विविध विषयांवर प्रकट केलेले विचार पुढे दिले आहेत. या वयातही त्यांचे विचार ऐकल्यावर त्यांच्यातील देशाभिमान प्रकर्षाने लक्षात येतो.

१ अ. भारत देशातील गांधी आणि नेहरू यांच्या कारभाराविषयी पू. आजींचे मत

गांधी आणि नेहरू यांनी सांगितले, ‘‘येथे (भारतात) एकही हिंदू डोके ठेवू नका.’’ मी म्हणते, ‘हे इथे आलेच का ? सावरकर किती चांगले होते ! सावरकरांनी सगळे सांभाळले असते. त्यांचा पातंजली योग होता. ते जेव्हा समुद्र पार करून आले, तेव्हा नेहरूंनी त्यांना विचारलेसुद्धा नाही. त्यांचा अपमान केला. नेहरूंना ते नकोच होते. नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांनाही हाकलून लावले. नेहरूंना भारत देशाचा पैसा हवा होता. तेव्हा भारतासाठी इंग्लंडहून चांदी भरून बोट आली होती. आपले सगळे पैसे खाऊन नेहरूंनी वाट लावली. त्यांनी आपली सर्व वाट लावली आणि भारताला भिकारी केले. ‘आपला देश एवढा श्रीमंत असून आपल्या देशात एवढे भिकारी आणि भुकेलेले का ?’, हे पाहून मला रडू आले.
गांधींनी आपल्याला ‘अहिंसा परमो धर्मः।’ मंत्र दिला आणि स्वतः काय केले ? त्यांनी आपले सगळे चैतन्य घालवून टाकले.

१ आ. पू. आजींनी धर्मांधांविषयी व्यक्त केलेली चीड !

मला काही वेळा वाटते, ‘काय आहे हे ? इतका चांगला देश असूनही आपल्या देशाच्या नशिबी असे का आले ?’ सगळीकडे हिंदूंना मारत आहेत. एक माणूस देवाच्या देवळात लपला होता. त्याला तेथून बाहेर काढला आणि उभे चिरले. आपल्याला असे ऐकवतही नाही; पण ते इतक्या निर्घृणपणे वागतात. त्यांना माणसांना मारायला काहीच कसे वाटत नाही ? हिंदू असे नाहीत. पाल, मुंगी मारायची म्हटले, तरी आपल्याला भीती वाटते की, आता कुणाचा जीव कसा घ्यायचा ! ते लोकच तसे निर्दयी ! भारतात असे चालले आहे.’

१ इ. चीन हा आपला वैरी आहे

चीन हा आपला वैरी आहे. त्याच्याकडून आपल्याकडे खेळणी इत्यादी येतात; पण त्यांची खेळणी चांगली नाहीत.

 

२. पू. आजींचा सनातनच्या गुरुपरंपरेतील
संतांविषयी आणि प.पू. डॉक्टरांविषयीचा भाव

अ. प.पू. डॉक्टर देवच आहेत. श्रीविष्णु, श्रीकृष्ण आणि श्रीराम अशा ३ देवतांचे तत्त्व त्यांच्यात आहे.

आ. प.पू. डॉक्टरांना सर्व कळते. आता सप्तर्षीही साहाय्याला आले आहेत.

इ. आपल्याला हिंदु राष्ट्र आणायचे आहे. ‘हिंदु राष्ट्र येणारच आहे’, असे संतांनी सांगितले आहे.

ई. प.पू. डॉक्टर आणि प.पू. पांडे महाराज पुष्कळ छान लेख लिहितात. सध्याच्या स्थितीला अनुसरून लिहितात.

 

३. पू. आजींनी सांगितलेल्या हृद्य आठवणी

पू. आजी वयोवृद्ध असूनही त्यांची स्मृती पूर्णपणे जागृत आहे. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. पू. आजींनी त्यांच्या जीवनातील आठवणी कथन केल्या. हे सांगत असतांना त्या कुठेही भावनावश झाल्या नव्हत्या. त्या त्यातूनही आनंद घेत होत्या.

३ अ. बालपण

३ अ १. माझी आई मी ६ वर्षांची असतांनाच गेली. मी ११ वर्षांची असतांना मला सावत्र आई आली. तेव्हा ११ वर्षांच्या मुली ८ वारी साड्या नेसत.

३ अ २. आजीने ८ मुलींच्या लग्नाचे दायित्व पार पाडणे : माझ्या आजीला ८ मुली आणि २ मुले होते. पहिला मुलगा गेला. मग तिची प्रकृती खालावत गेली. वैद्यांनी सांगितले, ‘‘यांना मुलगा झाला, तर या सुधारतील. कुठल्याही औषधाचा यांना उपयोग होणार नाही.’’ मग काय करणार ? मग माझ्या वडिलांचा जन्म झाल्यावर ती आपोआप सुधारली. मग आठ मुलींची लग्न करायचे दायित्व हिच्यावरच पडले. आठही मुली सुरेख अणि दणकट होत्या. स्थळ आले की, ती सांगायची, ‘‘हे बघा. माझ्याकडे पैसे नाहीत. नारळ आणि मुलगी. माझ्या मुली पुष्कळ कामसू आहेत. तुमच्याकडे वाट्टेल ते काम त्या करतील. पसंत असेल, तर करा.’’ तेव्हा हुंडा इत्यादी एवढे काही नव्हते. तिने आठही मुलींची लग्न केली. त्या वेळी माझे वडील लहान होते.

३ अ ३. वडिलांचे शिक्षण आणि नोकरी : आम्ही लहान असतांना प.पू. डॉक्टरांचे वडील आमच्याकडे येत. माझे वडील आणि ते एकत्र शिकले. रेवदंड्यात काही शाळा नव्हती; म्हणून माझ्या वडिलांना नाशिकला पाठवले. ते दोघे नाशिकला शिकले. माझे वडील म्हणाले, ‘‘माझी आई एकटी आहे. झाले एवढे शिक्षण पुरे झाले.’’ मग माझे वडील आजीकडे गेले. प.पू. डॉक्टरांच्या वडिलांना पुढे शिकायचे होते; म्हणून ते तिकडेच राहिले आणि पुढे शिकले. नंतर त्यांचे शिक्षण झाले. ते मॅट्रिक झाले. नाशिकहून आल्यावर माझ्या वडिलांनी शिक्षकाची नोकरी धरली. ते चित्र काढून उत्तम प्रकारे शिकवायचे. ते विद्यार्थ्यांना समजावून सांगून इंग्रजी शिकवत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण पक्के झाले. हे सर्वत्र कळल्यावर अनेक जण यायचे आणि म्हणायचे, ‘‘आमच्या मुलीला-मुलाला दामल्यांच्या (माझ्या वडिलांच्या) तुकडीत टाका.’’ तेव्हा हेड मास्तर म्हणाले, ‘‘सगळ्यांनाच दामल्यांच्या तुकडीत जायचे, तर आता कसे करायचे ? मग आता ४ तुकड्या करूया. दामले, ४ तुकड्यांना तुम्हीच शिकवा.’’ माझे वडीलच सगळ्यांना शिकवायचे.

३ अ ४. सावत्र भावाची आईप्रमाणे काळजी घेणे : मला सावत्र बहीण आहे. माझा सावत्र भाऊ मला ‘आई’ म्हणतो. तो जेव्हा जन्माला आला, तेव्हा त्याने १५ दिवस डोळे उघडले नव्हते. तेव्हा वैद्यांनी सांगितले, ‘‘आता तुम्ही आधुनिक वैद्यांकडे जा. याचे डोळे उघडले नाहीत, तर हा आंधळा होईल.’’ मी त्याला घ्यायचे आणि त्याला घेऊन आधुनिक वैद्यांकडे जात असे. तेव्हा आई-वडिलांना वेळ नसे. त्या वेळी माझ्या वडिलांना ३० रुपये पगार होता. आधुनिक वैद्यांंकडे गेल्यावर ते त्याचे डोळे धुवायचे आणि त्याच्या डोळ्यांत औषध घालायचे. तेव्हा मला एका बाईने विचारले, ‘‘तुझा का मुलगा ?’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘माझा नाही. माझं लग्न व्हायचे आहे अजून.’’ भाऊ म्हणतो, ‘‘तू नसतीस, तर मी आंधळा झालो असतो.’’

३ आ. वैवाहिक जीवन

३ आ १. सासूबाईंचा सुगरणपणा : माझ्या सासूबाई स्वयंपाक छान करायच्या. त्या बुंदीचे लाडूसुद्धा करायच्या. कारल्याची भाजी आणि कच्च्या आंब्याची भाजी फार सुंदर करायच्या. आम्ही जावा-जावा म्हणायचो, ‘‘आई, पातळ भाजी भरपूर करा हं. आम्ही पिणार आहोत.’’ तेव्हा त्या म्हणायच्या, ‘‘पातेलंभर करते. आज भाजी प्या !’’

३ आ २. पू. आजींनी त्यांच्या मुलाविषयी सांगितलेल्या आठवणी

३ आ २ अ. साधना करणार्‍या मुलाची गुणवैशिष्ट्ये

३ आ २ अ १. साधनेचे सर्व नियम पाळणे : माझा मोठा मुलगा विजू प.पू. गुळवणी महाराज यांचा शिष्य होता. त्यांनी त्याला सतरंजीवर झोपायला सांगितले होते. तो कांदा खात नव्हता. मी प.पू. डॉक्टरांनाही सांगितले होते. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘याची काळजी करायला नको.’’

३ आ २ अ २. स्वतःविषयी काहीही न सांगणे : तो महाविद्यालयात जायचा. तो स्वतःविषयी मला कधीच काही सांगत नसे. अगदी साधा होता. लहान असतांना मी त्याला पुलापर्यंत सोडायला जायचे. पुढे तो मित्रांसमवेत शाळेत जाई. शाळा लांब होती. त्यामुळे लांबून शाळेतून आल्यावर तो दमलेला असे. गरम पाण्याने पाय धुतल्यावर मी त्याच्या पायांना तेल लावत असे.

३ आ २ अ ३. बढाया मारायला न आवडणे : लहानपणी तो घरी काही सांगायचा नाही. एकदा त्याने मला सांगितले, ‘‘आई, शाळेने मला २०० रुपये दिले. ते तू ठेव.’’ मी विचारले, ‘‘विजू, ते कशाला दिले ?’’ तेव्हा म्हणाला, ‘‘मी चांगले वागतो. सगळ्यांना चांगले साहाय्य करतो; म्हणून.’’ त्याला बढाया मारता येत नव्हत्या. त्याला विचारले, तर सांगायचा. नाहीतर नाही. तो त्याला सांगितल्याप्रमाणे सगळी साधना करत होता.

३ आ २ अ ४. संगणकाविषयीची पुस्तके लिहिणे : एकदा मी १५ दिवस त्याच्याकडे रहायला गेले होते. तो प्रतिदिन काहीतरी लिहायचा. एके दिवशी मी त्याला विचारले, ‘‘विजू, तू सारखे काय लिहित असतोस रे ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘आई, मी संगणकाविषयी पुस्तके लिहितो. तीन पुस्तके लिहून झाली आहेत. आता चौथे लिहीत आहे.’’ त्याच्या लहानपणी मला वाटायचे, ‘हा अभ्यास करतो कि नाही, कोण जाणे ? घरी काही सांगत नाही’; पण त्याचा पहिला क्रमांक यायचा.

३ आ २ अ ५. आजारपण आणि मृत्यू : एकदा तो माझ्या मुलीकडे आला होता. तेव्हा त्याला चहा आणि बिस्किट खायला दिले. तेव्हा मी म्हणाले, ‘‘याला बिस्किट का उचलता नाही येत ? विजू, थांब. मी तुला बिस्किट उचलून देते.’’ नंतर तो त्याच्या घरी गेला. घरी गेल्यावर त्याच्या हातापायांतून शक्ती जातच होती. तो म्हणाला, ‘‘मला रुग्णालयामध्ये ठेवू नका. माझे मरण माझ्या हातात आहे. मला ठाऊक आहे, मी केव्हा मरणार आहे ते ! इथे बसलोय, असाच मी जाणार आहे.’’ पण हे पटते कुणाला ? त्याला रुग्णालयामध्ये ठेवले. तेथे त्याच्या नाकात नळ्या घातल्या. त्याच्या लहान भावाने त्याच्या हातात डायरी दिली आणि म्हणाला, ‘‘तुझ्या मनात काही आहे का ? यात लिही.’’ तेव्हा त्याने लिहिले, ‘‘घर. (म्हणजे मला घरी जायचे आहे.)’’ तिथेच तो गेला.

३ आ २ अ ६. मुलाच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी गेल्यावर त्रास होणे आणि दत्ताचा नामजप केल्यावर त्रास उणावणे : विजू गेल्याचा आम्हाला दूरभाष आला. तेव्हा मला पुष्कळ वाईट वाटले. मी आणि शीतल (माझी नात) तिकडे जायला निघालो. मी तिला म्हणाले, ‘‘शीतल, गाडीत बसल्यावर मी काही रडणार नाही. तुला त्रास देणार नाही.’’ शीतल, नातजावई आणि मी तिकडे पोचल्यावर माझा पाय आत जाईना. तेव्हा सगळ्यांनी मला ओढून आत नेले आणि कोचावर बसवले. मला भयंकर काहीतरी होऊ लागले. तसे त्यांनी पंखे लावले. पाणी प्यायला दिले. मग मी ‘श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त’ असा जप करायला लागले. जप करायला लागल्याबरोबर मी उठले आणि त्याच्याजवळ जाऊन बसले. त्याला आसंदीत बसवले होते. मी त्याला हात लावला. तेव्हा तो पुष्कळ गार लागला.

३ आ २ अ ७. प.पू. डॉक्टरांनी मुलाला पुन्हा जन्म-मृत्यू नसल्याचे सांगणे : तिथे आलेल्या काही बायका माझ्याविषयी म्हणत होत्या, ‘‘मुलगा गेला आणि आई रडत नाहीए.’’ तसे मी मुलीला म्हणाले, ‘‘त्यांना काय वाटेल, ते वाटू दे. आपल्याला काय वाटतंय, ते आपल्याला ठाऊक आहे.’’ ब्राह्मण बोलावून त्याच्यावर सर्व अंत्यसंस्कार केले. त्याला विद्युत् दाहिनीत नेले नाही. माझी सून म्हणाली, ‘‘तुम्ही अंघोळ करणार आहात का ?’’ मी म्हणाले, ‘‘नाही. मी घरी जाऊन अंघोळ करीन.’’ आम्ही घरी आलो, तर झोप आलीच नाही. प.पू. डॉक्टर त्याविषयी म्हणाले, ‘‘त्याची कशाला काळजी करता ? तो मोक्षाला गेला. त्याला पुन्हा जन्म नाही आणि मरणही नाही.’’ मग मी म्हणाले, ‘‘मिळवले त्याने !’’

३ इ. वयाच्या नव्वदाव्या वर्षापर्यंत योगासने करणे

मला हत्तीरोग झाला होता. हत्तीरोग बरा होण्यासाठी मी घरीच योगासने करत असे. मला कुणी शिकवले नव्हते. एकाने मला त्याचे पुस्तक दिले होते. त्यानंतर मी सगळीकडे सत्संग घ्यायचे. तेव्हा मी ठरवले की, कुणी बोलावले की जायचे. सत्संग म्हणजे ‘योगासने काय केलीत ? कशी केलीत ?’, ते विचारायचे. मंडळांमध्ये मला बोलावत असत. तेथे मी योगासनांविषयी सांगायचे.

 

४. वयाच्या ९३ व्या वर्षीही गोड आवाजात गाणार्‍या पू. आजी !

पू. आजींचा आवाज अतिशय गोड आहे. त्यांना ताला-सुराचे ज्ञान आहे. या वयातही सर्व गितांच्या चाली अजूनही त्यांच्या स्मरणात आहेत.

 

५. अंथरुणाला खिळलेल्या असूनही आनंदी असणार्‍या पू. आजींचे प्रेरणादायी बोल !

५ अ. हसण्यासाठी जन्म आपुला !

एक साधिका म्हणते, ‘‘आजी, मी तुमच्याकडे येईन. आनंद लुटायला ! मी तुम्हाला कधी दुर्मुखलेल्या पाहिलेच नाही.’’ मी म्हणते, ‘‘दुःख झाले, तर शरीर आहे ना सोसायला ! आपण कुठे सोसायचे आहे ते ? रडायचे कशाला ? मी मजेत आहे. प.पू. डॉक्टरांनी इकडे बोलावले आहे. माझे छान चालले आहे. हसण्यासाठी जन्म आपुला. रडण्यासाठी नाही !’’

५ आ. आता काहीच काळजी नाही. मी कृतज्ञ आहे. सगळे वेळेवर चालू आहे. काहीच न्यून नाही.

५ इ. मला मृत्यूची भीती नाही; पण हिंदु राष्ट्र पहाण्याची इच्छा आहे !

माणूस म्हातारा झाल्यावर त्याचे हिमोग्लोबिन वाढत नाही. मी एका मोठ्या आधुनिक वैद्यांकडे जात असे. ते म्हणाले, ‘‘मी पुष्कळ प्रयत्न केला; पण तुमचे हिमोग्लोबिन आता वाढणार नाही.’’ मी म्हणाले, ‘‘ठीक आहे. नाही वाढत, तर जायचे.’’ ते म्हणाले, ‘‘तुम्हाला भीती नाही वाटत ?’’ ‘‘नाही. प्रत्येकाचाच प्रवास तसा आहे. मी कशी चुकवू शकेन ? मीसुद्धा त्याच प्रवासात आहे. केवळ पुष्कळ उशीर झालाय. आता मला ९४ वे वर्ष लागेल. मी पूर्वी पुष्कळ व्यायाम केलेला आहे. १०० वर्षे नको; पण हिंदु राष्ट्र पहाण्याची इच्छा आहे; पण हिमोग्लोबिन कमी झाले आहे ना ?’’

प.पू. डॉक्टरांच्या या महान कुटुंबातील एकेका सदस्याच्या जीवनाचा पट पहाता ‘प्रत्येक जण दैवी इतिहास घेऊन जन्मला आहे’, असे लक्षात येते. ‘त्यांच्या आठवणीसुद्धा चैतन्याच्या उधळण करणार्‍या आहेत’, असेच जाणवते. संतांच्या मांदीयाळीतील पू. नेनेआजींच्या जीवनातील त्यांच्याविषयी मला अनुभवण्यास दिलेले हे क्षण इतिहास म्हणून गुरुचरणी समर्पित !

कृतज्ञता तव चरणी गुरुराया । चैतन्याच्या आठवणींची गुंफण कराया ॥
दिधलीस संधी या जिवाला । सार्थक झाले या क्षणाला ॥’

– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

६. सर्वांवर प्रीतीचा वर्षाव करणाऱ्या आणि अखंड
कृतज्ञताभावात रहाणाऱ्या पू. शालिनी नेनेआजी (वय ९४ वर्षे) !

‘पू. शालिनी नेनेआजी सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात वास्तव्यास आहेत. पू. आजी म्हणजे प्रेमभावाचे मूर्तीमंत प्रतीक ! त्यांचे वय ९४ वर्षे आहे. या वयातही त्या स्वतःच्या प्रकृतीविषयी काहीच तक्रार न करता आनंदी असतात. सतत स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार करणाऱ्या, प्रेमळ आणि अखंड अनुसंधानात अन् कृतज्ञताभावात रहाणाऱ्या पू. नेनेआजींकडून सर्वांनाच पुष्कळ काही शिकता येईल. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला पू. नेनेआजींची सेवा करण्याची संधी मिळाली. पू. आजींकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

 

७. आनंदी

पू. आजींचा तोंडवळा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखा तेजस्वी दिसतो. त्या नेहमी आनंदी असतात. एकदा त्या दंतवैद्यांकडे दाढ काढायला गेल्या होत्या. दाढ काढल्यावरही त्या तितक्याच आनंदी होत्या. त्यामुळे दंतवैद्यांनाही आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ‘‘अरे, दाढ काढूनही या इतक्या आनंदी कशा आहेत ?’’

 

८. सहजावस्थेत असणे

पू. आजी संत आहेत आणि त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आत्या आहेत, तरीसुद्धा त्या याविषयी कधीच काही बोलतही नाहीत. त्या अगदी सहजावस्थेत असतात.

 

९. जिज्ञासू वृत्ती

या वयात पू. आजी दैनिक सनातन प्रभात पूर्ण वाचतात. दैनिकाचे वाचन करतांना त्यातील एखादा भाग लक्षात आला नसेल, तर त्या त्याविषयी विचारून घेतात.

 

१०. निर्मळ मन

पू. आजींचे मन फार निर्मळ आहे.

 

११. सहनशीलता

एकदा पू. आजींच्या डोळ्यात मुंगी गेली होती. आधुनिक वैद्या (सौ.) पिंगळेकाकूंनी ती मुंगी काढली. त्या वेळी डोळ्यातून मुंगी काढेपर्यंत त्यांनी डोळ्याची पापणीही हलवली नव्हती. याविषयी पिंगळेकाकूंनाही फार आश्चीर्य वाटले होते.

 

१२. प्रेमभाव

१२ अ. साधिकांची प्रेमाने काळजी घेणे

पू. आजी अत्यंत प्रेमळ आहेत. त्या आम्हा खोलीतील सर्वच साधिकांची फार काळजी घेतात. त्या मला माझ्या सख्ख्या आजीपेक्षाही अधिक जवळच्या वाटतात. त्यांना सर्वांविषयीच प्रेम वाटते. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाशी त्या अत्यंत प्रेमाने बोलतात.

१. मला खोकला येत असेल, तर त्या मला त्यांच्याकडील मध खायला सांगतात.

२. एकदा माझ्या अंगाला खाज येत होती. तेव्हा लगेच त्यांनी त्यांच्याकडील औषध मला दिले.

३. मला बरे वाटत नसल्यास त्या लगेच विचारतात, ‘‘वैद्यांकडे जाऊन आलीस का ? औषध घेतले का ? विश्रांती घे. माझ्यामुळे तुझी फार धावपळ होते ना ?’’

४. मी एकदा एका सेवेसाठी ४ दिवस बाहेरगावी जाणार होते. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘थंडी आहे. स्वेटर घेतलास ना ? इतर सर्व साहित्य घेतलेस ना ?’’

५. माझी बॅग पाहून त्या म्हणाल्या, ‘‘अगं, तुला उचलते का बघ, नाहीतर कुणालातरी उचलायला बोलाव.’’

 

१२ आ. साधिकेच्या भाचीचे बारसे असल्याचे कळल्यावर
स्वतः पाळणा म्हणून आणि तो ‘रेकॉर्ड’ करून तिला पाठवणे

मी घरी असतांना ‘माझ्या भाचीचे बारसे आहे’, हे त्यांना कळल्यावर त्यांनी त्यासाठी एक पाळणा म्हटला आणि तो एका साधिकेने ‘रेकॉर्ड’ करून मला पाठवला होता. आम्ही तो चैतन्यमय पाळणा बारशाच्या दिवशी लावला होता.

 

१३. इतरांचा विचार करणे

अ. परात्पर गुरु डॉ. आठवले नेहमी त्यांच्यासाठी प्रसाद पाठवतात. तो प्रसाद त्या आम्हालाही देतात.

आ. एकदा मी माझे आवरून सेवेला निघाले होते. तेव्हा त्यांना त्यांच्या बॅगेतून वस्तू हवी होती. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तुला आता वेळ असेल, तर दे. नाहीतर तुला जेव्हा शक्य असेल, तेव्हा दिलीस, तरी चालेल.’’ कोणतीही सेवा सांगतांना त्या ‘तुझ्या वेळेनुसार कर’, असे सांगतात.

इ. इतरांकडे सारखे मागावे लागू नये; म्हणून त्यांनी त्यांना लागणारे साहित्य छोटी तिपाई आणि पलंग यांवर ठेवलेले आहे. पलंगपोस पालटतांना ते सर्व साहित्य काढून खाली ठेवावे लागते. पलंगपोस पालटल्यावर साहित्य मूळ ठिकाणी ठेवण्यात आमचा वेळ जाऊ नये; म्हणून थकवा असतांनाही ‘ते साहित्य मी लावते’, असे त्या सांगतात.

ई. पू. आजींना अंघोळ घालण्याची सेवा माझ्याकडे आहे; परंतु बहुतेक वेळा त्या स्वतःच अंघोळ करतात. अगदीच थकवा आला असल्यास आवश्यक तेवढेच माझे साहाय्य घेतात.

उ. पू. आजी स्वतः अत्यंत रूचकर स्वयंपाक बनवत असत. त्या आश्रमात रहायला आल्यानंतर प्रारंभी त्यांच्यासाठीच्या पदार्थांत काही पालट सांगत असत; परंतु आता त्या त्याविषयी काही सांगत नाहीत. आता त्या म्हणतात, ‘‘स्वयंपाकघरातील साधिकांना पुष्कळ सेवा असतात. त्यामुळे थोडे अधिक-उणे होऊ शकते.’’

ऊ. पू. आजी ‘स्वतःला काय वाटते ?’, यापेक्षा ‘इतरांना काय वाटते ?’, याचा विचार अधिक करतात. पू. आजींनी पलंगावरून खाली पाय ठेवल्यानंतर त्यांच्या पायाला लादी थंड लागू नये; म्हणून खोलीतील सहसाधिकेने एक कपडा ठेवला होता. ‘त्यावरून पाय घसरून पडेन’, अशी पू. आजींना भीती वाटायची. मी त्यांना म्हणाले, ‘‘आजी, त्या साधिकेला सांगून ते कापड काढू का ?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘नको. त्या साधिकेला ठेवावे वाटते, तर ठेवूया.’’

 

१४. दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेल्या
आणि वैद्यांनी सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे

अ. दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘प्रतिदिन सर्व अंगाला तेल लावून अंघोळ करावी’, अशी सूचना प्रसिद्ध झाल्यापासून पू. आजी अंघोळीपूर्वी नियमित अंगाला तेल लावतात.

आ. प.पू. पांडे महाराज यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पू. आजींना त्यांच्याशी बोलायचे होते. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘अगं, दैनिक सनातन प्रभातमध्ये सूचना असते, ‘संताना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दूरभाष करू नका.’ त्यामुळे मी त्यांना दूरभाष केला नाही.’’

इ. पू. आजींच्या खोलीत खिडकीतून सकाळी ९ नंतर भगवान सूर्यनारायणाचे दर्शन होते. दैनिक सनातन प्रभातमध्ये सूर्याचे दर्शन घेऊन प्रार्थना करण्याविषयी सूचना आल्यापासून त्या कितीही थकवा असला, तरी श्री सूर्यनारायणाचे दर्शन घेऊन त्याला प्रार्थना करतात.

ई. डोळ्यांच्या डॉक्टरांनी त्यांना ‘उपनेत्र लावूनच वाचन करा’, असे सांगितल्यापासून त्या नेहमी वाचतांना उपनेत्र लावतात. कधी विसरल्या, तर लगेच त्यांना त्याची जाणीव होते. वयाच्या ९४ व्या वर्षीही त्यांना उपनेत्र न लावता वाचता येते.

 

१५. दैनिक सनातन प्रभातमधील समाज
आणि धर्म यांवरील आघाताच्या वार्ता ऐकून हळहळणे अन्
लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी आर्ततेने प्रार्थना करणे

दैनिक सनातन प्रभातमध्ये कुणा महिलेवर अत्याचार झाल्याचे, भारतीय सैनिक मारले गेल्याचे किंवा गोवंशाची हत्या झाल्याचे वाचून त्यांचे मन फार हळहळते. तेव्हा ‘लवकरात लवकर हिंदु राष्ट्र यावे आणि सर्व समाज सुखी व्हावा’, यासाठी त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अत्यंत आर्ततेने प्रार्थना करतात.

 

१६. सतत साधनारत असणे

पू. आजी दिवसभर दैनिक वाचन, ग्रंथ वाचन, नामजप, आरती, भजन करणे इत्यादी साधना करत असल्याने ‘त्यांना कधी कंटाळा आला आहे किंवा त्यांचा वेळ जात नाही’, असे वाटत नाही.

 

१७. चुकांविषयी संवेदनशील असणे

१७ अ. इतरांकडून होणाऱ्या चुका स्वतःच्याच असल्याप्रमाणे हळहळणे

एकदा दैनिक सनातन प्रभातमध्ये शासकीय कार्यालये आणि रुग्णालये इत्यादी ठिकाणी वीज अन् पाणी यांचा अपव्यय होणे, अशा प्रकारच्या चुका आल्या होत्या. त्या चुका वाचून पू. आजी मला म्हणाल्या, ‘‘अगं, आज दैनिकात आपल्या चुका आल्या आहेत.’’ अशा चुका स्वतःकडून होत नसूनही त्या त्यांना स्वतःच्या वाटत होत्या.

१७ आ. स्वतःकडून झालेल्या चुकांविषयी तीव्र खंत वाटणे

पू. आजींकडे पूर्वीपासूनची एक भजनाची वही आहे. त्यात त्यांनी भजने आणि गाणी लिहून ठेवली आहेत. एकदा त्यांनी ती वही सद्गुरु राजेंद्रदादांना वाचायला दिली होती. वाचून झाल्यावर सद्गुरु दादांनी वही परत केली. ‘त्यांनी वही परत केली आहे’, याचे पू. आजींना विस्मरण झाल्यामुळे त्यांनी ‘ती वही सद्गुरु दादांकडेच आहे’, असे म्हटले. नंतर ती त्यांच्याच साहित्यामध्ये सापडली. तेव्हा त्यांना स्वतःच्या चुकीविषयी तीव्र खंत वाटत होती.

 

१८. अहं अल्प असणे

मी पू. आजींना नमस्कार करते. तेव्हा त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून मला म्हणतात, ‘‘मी एक सामान्य व्यक्ती आहे. मला नको, देवाला नमस्कार कर.’’

 

१९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणे

त्या प्रतिदिन खोलीतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे पाहून आत्मनिवेदन करतात. एकदा सद्गुरु बिंदाताईंचा त्यांना भ्रमणभाष आला होता. तेव्हा त्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नमस्कार सांगा’, असे सांगण्यास विसरल्या. याची त्यांना पुष्कळ खंत वाटत होती. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून त्यांना प्रसाद आल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘गौरी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मी इकडे केलेला नमस्कार पोहोचला बरं ! त्यांनी प्रसाद पाठवला आहे. आपण सर्व जणी तो प्रसाद घेऊया.’’

२०. सदैव कृतज्ञताभाव रहाणार्‍या पू. नेनेआजी !

अ. दैनिक सनातन प्रभातमधील पूर, भूकंप, दुष्काळ यांची वृत्ते वाचल्यावर त्यांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आपण आज चांगल्या स्थितीत आहोत’, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.

आ. एकदा सौ. गडकरीकाकूंनी त्यांच्या रजईची खोळ शिवून दिली. तेव्हा त्यांना काकूंप्रती फार कृतज्ञता वाटली. त्या म्हणाल्या, ‘‘त्यांनी माझ्यासाठी वेळ काढून शिवून दिले आहे, तर त्यांना खाऊ नेऊन दे.’’

इ. पू. आजींचा आधीचा पलंग थोडा लहान होता. त्यामुळे सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी त्यांच्यासाठी मोठा पलंग देण्यास सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘सद्गुरु बिंदाताई फार मोठ्या आहेत. त्यांचे सगळीकडे लक्ष असते.’’ त्यांना सद्गुरु बिंदाताईंविषयी कृतज्ञता वाटत होती.’

२१. आलेल्या अनुभूती

अ. पू. आजींच्या खोलीत गेल्यावर आपोआप नामजप चालू होतो.

आ. त्यांच्या खोलीतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र जिवंत झाल्यासारखे वाटते आणि ‘ते आपल्याशी बोलत आहेत’, असे जाणवते.’

– कु. गौरी मेणकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.२.२०१७)