विविध आध्यात्मिक गुणांनी युक्त असलेल्या आणि ‘ज्यांच्याकडून सर्वांनीच शिकावे’, असा चैतन्याचा स्रोत असलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

p_gadgil_kaku
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

१. सहजता

‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या सगळ्यांना शिकण्याचा एक स्रोत आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सहजता आहे. त्या स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचे वेगळे अस्तित्व जपत नाहीत. त्या सहजतेने सगळ्यांमध्ये मिसळून जातात.

२. प्रत्येक कृतीचे अध्यात्मीकरण करून स्वतःच्या आचरणातून इतरांना शिकवणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ प्रत्येक कृतीचे अध्यात्मीकरण करून सर्व कृती सहजतेने करतात. त्यांनी पूर्णवेळ साधनेला आरंभ केला, तेव्हापासून त्यांचा हा गुण पहायला आणि शिकायला मिळाला. प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करण्यास शिकणार्‍या आणि इतरांनाही ते आत्मसात करण्यास शिकवणार्‍या त्याच आहेत. या कृतींचे पैलू आपल्या आचरणातून इतरांना शिकवणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्या वेळी अनेक संतांनी त्यांना ज्या ज्या सेवा सांगितल्या, त्या त्यांनी शिकून घेतल्या होत्या. आरंभी त्यांनी आश्रमात शूद्र वर्णाची सेवाही केली आहे.

३. चतुर, सतर्क, संवेदनशील आणि तत्पर

त्या चतुरही आहेत. त्या एकाच कार्यपद्धतीत कार्यरत न रहाता प्रत्येक गोष्टीत तन्मयता ठेवतात. त्या कार्य करतांना मनाच्या स्तरावर पुष्कळ सतर्क आणि संवेदनशील असून तत्पर असतात. सर्वकाही करूनही त्या वर्तमानात असतात. त्यांच्यासह सेवा करतांना सर्वांनाच आनंद मिळतो. त्या आपुलकीने सर्वांची काळजी घेतात. त्या प.पू. डॉक्टरांच्या सात्त्विकतेचा लाभ करवून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांना अपेक्षित असे त्यांचे आचरण असते.

४. निर्मळ मन आणि सर्वांनाच पुढे घेऊन जाण्याची तळमळ

त्यांचे मन मोकळे आणि निर्मळ आहेे. त्यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर त्यांच्या मनाची निर्मळता त्यांच्या तोंडवळ्यावर जाणवते. तेथे ईश्‍वरी अनुसंधान असल्यामुळे त्या विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांतून जाणून घेऊन (ईश्‍वरी संकेतानुसार) कार्य करू शकतात. त्यांना सर्व जण समान आहेत. त्यांना सर्वांनाच पुढे घेऊन जाण्याची तळमळ असते. त्यांना जी काही माहिती झालेली असते, ती साधकांना आणि समष्टीला सांगून तिचा आस्वाद घेण्यास दिल्यावरच त्यांना शांती मिळते.

५. सर्वांशीच वेगवेगळ्या नात्यांनी जोडल्या जाणे

त्या ऋषिकन्या आहेत. त्या काहींच्या ताई आहेत, तर काहींच्या माई, आई, काकू आणि सखी आहेत. त्या आदर्श शिष्य आणि सर्वांच्या गुरुही आहेत.

६. त्यांच्या तोंडवळ्यावर उमटणार्‍या प्रतिक्रिया या तात्कालिक असतात, तसाच तो भाव समष्टीच्या कल्याणासाठीच असतो.

७. ‘आश्रम आणि गुरु यांच्याप्रती भाव कसा असायला हवा ?’,
याचे आदर्श उदाहरण म्हणजे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

‘आश्रम आणि गुरु यांच्याप्रती भाव कसा असायला हवा ?’, याचे त्या आदर्श उदाहरण आहेत. त्यांचे प्रसंगांकडे पहाण्याचे दृष्टीकोन हे मानसिक स्तरावरचे नसून त्या संदर्भात त्या सर्वांना आध्यात्मिक दृष्टीकोन देतात. त्यांनी सहजतेने काही बोललेलेही इतरांच्या मनावर बिंबते.

८. साधकांना घडवणे

दौर्‍याच्या कालावधीत त्यांच्यासमवेत असलेल्या साधकांमध्येही आता जाणवणारा पालट हा त्यांच्यामुळेच आहे. ‘त्याच त्यांना घडवत आहेत’, असे वाटते.

९. इतर गुण

त्यांच्यातील अन्य गुणांव्यतिरिक्त अहं अल्प असणे, सगळ्यांना सहजतेने सामावून घेणे, क्षमाशीलता, प्रीती ही त्यांची ज्ञात झालेली काही वैशिष्ट्ये आहेत.

त्यांच्याविषयी जाणण्याची माझी क्षमता नाही; परंतु जे काही देवाने सुचवले, त्यांच्याविषयी अनुभवले, ते लिहिण्याचा प्रयत्न केला. ते सर्व देवाच्या चरणी अर्पण करत आहे.

१०. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या खोलीविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

अ. २०.१.२०१६ या दिवशी आश्रमातील त्यांच्या खोलीकडे पाहिल्यावर त्यांची खोली प्रकाशमान दिसली.

आ. खोलीच्या दाराभोवती पारदर्शक चंदेरी कड असलेली प्रभावळ दिसली.

इ. दार मध्येच पारदर्शक दिसत होते, जणूकाही त्यांच्या खोलीला दारच नाही.’
(त्यांच्याविषयी लिखाणास आरंभ केल्यावर मला पुष्कळ उत्साह वाटला आणि आलेली मरगळही दूर झाली.)

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०१६)

 

‘चराचरात ईश्‍वर कसा पहायचा ?’, हे स्वतःच्या
कृतीतून शिकवणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी केवळ विचार जरी मनात आला, तरी मला संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर, संत जनाबाई आणि संत मुक्ताबाई यांची आठवण होते. ‘या सर्व संतांची सहजावस्था, प्रीती आणि अजून बरेच काही जे या क्ष्रुद्र जिवाला कळतही नाही, ते सगळे सद्गुरु गाडगीळकाकूंमध्ये आहे’, असे जाणवते. १६.५.२०१७ ते २९.५.२०१७ आणि ८.६.२०१७ ते ७.७.२०१७ जुलै या साधारण दीड मासाच्या (महिन्याच्या) काळात सद्गुरु गाडगीळकाकूंना मर्दन करण्याची सुवर्णसंधी ईश्‍वराने या जिवाला दिली. त्या वेळी देवाने सद्गुरु काकूंना जवळून अनुभवायला मिळाले. ते पुढे दिले आहे.

 

१. परिपूर्णता

‘परिपूर्णता’ हा गुण सद्गुरु काकूंमध्ये विविधतेने नटलेला आहे’, याविषयी सांगतांना शब्दच थिटे पडतील. फुलाच्या सर्व पाकळ्या सुंदर, कोमल आणि रंगीत असतात, तसेच फुलात मधही असतो. त्याप्रमाणे सद्गुरु काकूंमध्ये ‘परिपूर्णता’ हा गुण आहे.

अ. कुणाला निरोप लिहून द्यायचा असल्यास सद्गुरु काकू कागदाला विभूती लावून मजकूर सुवाच्च अक्षरात लिहून त्या कागदाला (प्रत्यक्ष अथवा मानस) नमस्कार करून संबंधित साधकाला द्यायच्या. यातून ‘निरोप लिहिणे ही साधी कृतीही परिपूर्ण, सुंदर आणि आध्यात्मिक स्तरावर कशी करायची ?’, हे सद्गुरु काकूंनी यातून शिकवले.

आ. एकदा सद्गुरु काकूंना ‘ताक उपचार पद्धत’ चालू करायची होती. वैद्यकीय विभागातील साधिकेने त्यांना जेवणाचे पथ्य आणि उपचाराविषयीची माहिती एका कागदावर लिहून दिली. त्या वेळी सद्गुरु काकूंनी तिला सांगितले, ‘‘आपण लिहिलेली माहिती इतकी परिपूर्ण हवी की, समोरच्या व्यक्तीला कुठला प्रश्‍न विचारण्याची आवश्यकता वाटायला नको. प्रत्येक सूत्र बारकाईने लिहायला हवे. अशा सामायिक सूत्रांची धारिका करून त्याची प्रत काढल्यास अन्य कुणाला देता येईल.’’

इ. सद्गुरु काकू दौर्‍यावर असतांना प्रत्येक ठिकाणच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू आश्रमात घेऊन येतात. ‘साधकांना या वस्तू पहाता याव्यात’, यासाठी सद्गुरु काकू त्या वस्तूंचे प्रदर्शन लावतात. सद्गुरु काकू प्रत्येक वस्तूशेजारी प्रार्थना लिहून ठेवतात. साधकांना हे प्रदर्शन पाहतांना एक प्रकारे भावसत्संग मिळून साधक भावविश्‍वात रमतात.

 

२. साधकांना साहाय्य करण्याची तळमळ

२ अ. ‘साधकांचा नामजप आणि प्रार्थना चालू आहे ना ?’, याविषयी विचारपूस करणे

सद्गुरु काकू दौर्‍यावर नसतांनाही त्यांच्या समवेत दौर्‍यात असणार्‍या साधकांची विचारपूस करतात आणि ‘चित्रीकरण किंवा अन्य सेवा करतांना साधकांचा नामजप अन् प्रार्थना होत आहे ना ?’, याविषयी विचारणा करतात.

२ आ. मर्दन चालू असतांना आश्रमातील एका
साधिकेला त्रास होत असल्याचे कळल्यावर तिच्यासाठी प्रार्थना करणे

एकदा सद्गुरु काकूंचे मर्दन चालू असतांना त्यांना आश्रमातील एका साधिकेला त्रास होत असल्याचे कळले. त्यांनी त्याच वेळी तिच्यासाठी प्रार्थना केली. ‘साधकांना किती त्रास होत आहे’, याविषयी बोलतांना त्यांचा कंठ दाटून आला. त्या वेळी वाटले, ‘परात्पर गुरु आठवले यांना जशी साधकांचा त्रास दूर व्हावा, अशी तळमळ आहे; त्याप्रमाणे सद्गुरु काकू स्वतः त्रास अनुभवत असूनही ‘साधकांचा त्रास दूर व्हावा’, अशी त्यांना तळमळ आहे.’

 

३. प्रीती

साधकांवर प्रीती कुणीही करील; पण सद्गुरु काकू दौर्‍यावर असतांना जेथे जात, तेथील सगळ्या स्तरातील लोकांनाही क्षणात आपलेसे करतात.

३ अ. उपाहारगृहातील स्त्री कर्मचार्‍यांना गजरा किंवा वेणी देणे

सद्गुरु काकूंना मंदिरांत कधी फुलांच्या वेण्या किंवा गजरे मिळाल्यास त्या उपाहारगृहातील स्त्री कर्मचार्‍यांना गजरा किंवा वेणी आणि गजरा घालण्यासाठी पिनही देत. एकदा सद्गुरु काकू म्हणाल्या, ‘‘त्या स्त्रियांना पिनेसहित गजरा दिल्यावर त्यांच्या तोंडवळ्यावरील आनंद पहाण्यासारखा असतो आणि त्यांचा हा आनंदच आपल्यासाठी खरा आशीर्वाद असतो.’’

३ आ. खोलीत खाण्याचे पदार्थ घेऊन येणार्‍या वेटरला त्यातील पदार्थ देणे

उपाहारगृहातील वेटरने खोलीत काही खाण्याचे पदार्थ आणल्यास सद्गुरु काकू त्या वेटरला थांबवून त्याला त्यातील पदार्थ स्वतःहून देतात. सद्गुरु काकू उपाहारगृहातून ज्या ठिकाणी जात, तेथील सगळेच सद्गुरु काकूंची पुष्कळ वाट पहातात. तेही सद्गुरु काकूंच्या प्रेमाने भारावून जातात.

३ इ. दौर्‍यावर निघतांना समवेत उपाहारगृहातील कर्मचार्‍यांसाठी घरचे आंबे नेणे

उन्हाळ्याच्या दिवसांत काही दिवस सद्गुरु गाडगीळकाकू आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी सांगलीहून त्यांच्या घरचे आंबे आले होते. सद्गुरु काकूंनी पुन्हा दौर्‍याला निघतांना समवेत उपाहारगृहातील सगळ्यांना एकेक आंबा तरी मिळेल एवढे आंबे नेले. तेव्हा त्यांचा विचार होता, ‘दक्षिण भारतातील लोकांना आंबे अधिक मिळत असतीलच, असे नाही. त्यांना घरचे हापूस आंबे आवडतील आणि आनंद होईल.’

३ ई. यज्ञाच्या ठिकाणी आलेल्या स्थानिक साधिकांना गजरे देणे

एके ठिकाणी यज्ञ होणार होता. त्या वेळी तेथील स्थानिक साधिकाही यज्ञाला आल्या होत्या. त्या वेळी सद्गुरु काकूंनी सर्व साधिकांना चहा आणि गजरा दिला. सद्गुरु काकूंची ही कृती पाहून सगळ्या साधिकांचा भाव जागृत झाला.

३ उ. बर्फाच्छादित भागातून घोड्यावर बसून जातांना घोड्यांसाठी प्रार्थना करणे

एकदा सद्गुरु काकू घोड्यावर बसून बर्फाच्छादित भागातून जात होत्या. त्या वेळी बर्फ पडत असल्याने कमालीची थंडी होती. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला, ‘घोड्यांना बर्फावरून चालावे लागत असल्याने त्यांना किती थंडी वाजत असणार !’ त्या घोड्यांसाठीही प्रार्थना करत.

३ ऊ. वयस्कर साधक सांगत असलेले आयुर्वेदीय
उपाय स्वतः लिहून घेणे आणि ते आश्रमातील वैद्यांना देणे

श्री. हनुमंत शिंदेकाका हे पूर्वी आयुर्वेदीय तज्ञांसह अनेक वर्षे राहिले होते. त्यांना पुष्कळ आजारांवर सोपे आयुर्वेदीय उपाय ठाऊक आहेत. एकदा ते सद्गुरु काकूंना भेटण्यासाठी आल्यावर त्यांनी सद्गुरु काकूंना अनेक आयुर्वेदीय उपाय सांगितले. त्या वेळी सद्गुरु काकूंनी स्वतः ते लिहून घेतले आणि आश्रमातील वैद्यांना दिले. सद्गुरु काकूंनी वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांना सांगितले, ‘‘काकांचे वय झाले असल्याने ‘त्यांना लिहून द्या’, असे सांगण्याऐवजी मी ते सांगत असतांनाच लिहून घेतले.’’ यातून सद्गुरु काकूंमधील प्रेमभाव आणि समष्टीचा विचार हे गुण शिकायला मिळाले.

३ ए. मर्दनाची सेवा करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची अनुभवलेली प्रीती !

३ ए १. मर्दन चालू असतांना दौर्‍यातील सूत्रे सांगणे

सद्गुरु काकूंना मर्दन करतांना आम्हाला वाटायचे, ‘मर्दन होतांना त्यांनी झोपावे, जेणेकरून त्यांना बरे वाटेल.’ त्या ‘आम्हाला कंटाळा येऊ नये’, यासाठी दौर्‍यातील काही सूत्रे सांगत. त्या वेळी त्या देहाच्या वेदनेकडेे लक्ष न देता आमच्याशी बोलत असत.

३ ए २. त्यांना मर्दन करण्यापूर्वी ‘आम्ही नीट जेवलो का ? आम्हाला बसण्यास व्यवस्थित जागा आहे का ?’, याची त्या विचारपूस करायच्या.

३ ए ३. सद्गुरु काकू मर्दन करणार्‍या साधिकांचे मानसरित्या हात-पाय चेपून देत असल्यामुळे साधिकांना मर्दनाची सेवा केल्यावर चैतन्य जाणवणे

मर्दनाची सेवा केल्यावर आम्हाला पुष्कळ चैतन्य जाणवायचे. तेव्हा एकदा त्याचे रहस्य आम्हा साधिकांना उलगडले. एके दिवशी सद्गुरु काकूंचे मर्दन करतांना त्या म्हणाल्या, ‘‘तुम्ही किती सेवा करता, दमता आणि रात्री पुन्हा मला मर्दन करायला येता. मीच खरेतर तुमचे मर्दन करून द्यायला हवे. तुम्ही मर्दन करतांना मी मानसरित्या तुमचे हात-पाय चेपून देते. तुम्हाला तेल लावते.’’ हे सगळे ऐकल्यावर आम्हाला ‘काय बोलावे ?’, ते सुचले नाही. केवळ कृतज्ञताच दाटून आली. सद्गुरु काकूंची सहजावस्था, अहंशून्यता, भाव आणि प्रीती यांचे दर्शन त्यांच्या त्या एका वाक्यावरून आम्हाला घडले आणि आम्ही धन्य झालो.

३ ए ४. दौर्‍यावर जायला निघतांना मर्दन करणार्‍या साधिकांना चॉकलेट आणि प्रसाद देणे

१६ ते २९.५.२०१७ या काळात सद्गुरु काकूंना मर्दन केल्यानंतर त्यांना पुन्हा दौर्‍यासाठी निघायचे होते. त्या वेळी त्यांनी मर्दनाच्या सेवेतील सर्व साधिकांना चॉकलेट आणि प्रसाद स्वरूपात एक वस्तू दिली. त्या वेळी त्यांनी आमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

३ ए ५. साधिकांच्या वेळेनुसार मर्दन करून घेणे

मर्दन सेवा करणार्‍या दोन साधिका आश्रमाबाहेर रहातात. त्यांचे यजमान त्यांना नेण्यासाठी थांबतात. त्यांतील एका साधिकेला लहान मुलगी आहे. ‘या दोन्ही साधिकांना उशीर व्हायला नको’, यासाठी मर्दनाच्या सेवेतील त्या साधिकांना त्यांचा सेवेतील टप्पा पूर्ण करून जाण्यास सांगतात.

 

४. अहंशून्यता

सद्गुरु काकूंची अहंशून्यता पराकोटीची असून ती अनुभवतांनाही अंतर्मन कृतज्ञतेने दाटून येते.

४ अ. प्रतिदिन सकाळी उठल्यावर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मानस पाया पडणे

सद्गुरु काकू प्रतिदिन सकाळी उठल्यावर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मानस पाया पडतात. सद्गुरु बिंदाताई संस्था स्तरावरील सर्व बघत असल्याने सद्गुरु काकू त्यांच्या पाया पडून एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतात. हे सूत्र मला त्यांच्या समवेत असणार्‍या एका साधकाने सांगितल्यावर माझे मन भरून आले आणि त्या वेळी दोन्ही सद्गुरूंच्या चरणी माझे हात मनोमन जोडले गेले.

४ आ. प्रतिष्ठित व्यक्तींना भेटल्यावर स्वतःची
ओळख ‘संत’ अशी करून न देता त्यांच्याशी सहजतेने वागणे

सद्गुरु काकू दौर्‍यावर असतांना तेथील लोकांना अथवा प्रतिष्ठित व्यक्तींना भेटण्यास गेल्यावरही स्वतः संत असल्याची ओळख कधीच करून देत नाहीत आणि समवेतच्या साधकांनाही तसे न करण्यास सांगत. सद्गुरु काकूंनी सांगितले, ‘‘आपण आपली ओळख सांगून दुरावा निर्माण करतो. आपण सहजावस्थेत राहिल्यास लवकर जवळीक साधू शकतो.’’

४ इ. ती. भाऊकाकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे

ती. भाऊकाकांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) एकदा सद्गुरु गाडगीळकाकूंना साष्टांग नमस्कार सांगितला. तेव्हा सद्गुरु काकू म्हणाल्या, ‘‘मीच त्यांना साष्टांग नमस्कार करायला हवा. ते आमच्यापेक्षा मोठे आहेत. ती. भाऊकाका आणि काकू यांच्यात किती नम्रता आहे !’’ त्यांनी ती. भाऊकाकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

५. सूक्ष्मातील जाणण्याचे अफाट सामर्थ्य

५ अ. साधिकेच्या केवळ स्पर्शाने तिचे शारीरिक
त्रास आणि त्यासाठी करावयाचे उपाय, यांविषयी सांगणे

एकदा एक नवीन साधिका सद्गुरु काकूंच्या पायांना मर्दन करायला आली. तेव्हा तिच्या केवळ स्पर्शाने सद्गुरु काकूंनी ‘तिला कोणता शारीरिक त्रास होतो ? तिने कोणते उपाय करायला हवेत ? कुठला जप करायला हवा ?’, हे संगितले. तिला ‘त्यांच्या घराण्यात कुणाचा अकाली मृत्यू झाला आहे का ?’, याची घरी विचारणा करण्यास सांगितले. हे पाहून आम्ही आश्‍चर्यचकित झालो.

५ आ. समोरच्या व्यक्तीच्या मनातील विचार अचूक ओळखणे

साधक सद्गुरु काकूंच्या समोर गेल्यावर त्या त्यांच्या मनातील विचार अचूक ओळखतात आणि त्यानुसार आवश्यक ते बोलतात. तेव्हा वाटते, ‘सद्गुरु काकूंना आपल्या मनातील विचार कसा समजला ?’

५ इ. ‘शेकण्यासाठी वाळूच्या पुरचुंड्या करणार्‍या
साधिकेचा नामजप आणि प्रार्थना किती झाल्या ?’, हे ओळखणे

एकदा एक साधिका मर्दनानंतर शेकण्यासाठी वाळूच्या पुरचुंड्या करत होती. त्या वेळी सद्गुरु काकू तिला म्हणाल्या, ‘‘प्रत्येक पुरचुंडीतून मला तू किती नामजप केलास, प्रार्थना केल्या ?’, हे समजेल.’’ हे ऐकून आम्ही मर्दन करत असतांना अधिकाधिक प्रार्थना आणि नामजप करू लागलो.

५ ई. वेणी हवी असतांना साधिकेला ‘यज्ञस्थळी वेणी आहे
का ?’, ते पहाण्यास सांगणे आणि तेथे खरोखरच एक वेणी मिळणे

एक दिवस यज्ञ असतांना सद्गुरु काकूंना वेणी हवी होती. त्यांना मिळालेली वेणी त्यांच्या अंबाड्याहून मोठी होती. त्या वेळी त्या एका साधिकेला म्हणाल्या, ‘‘यज्ञस्थळी एखादी वेणी मिळते का ?’, ते पहा.’’ त्यानंतर साधिकेला खरोखर तेथे एकच वेणी दिसली आणि ती सद्गुरु काकूंच्या अंबाड्याला साजेशी होती. प्रत्यक्षात यज्ञकुंडाजवळ फुले होती, तरी तेथे एक वेणी मिळणे, म्हणजे ‘साक्षात् श्रीविष्णूने श्री महालक्ष्मीसाठी वेणी आणून ठेवली असावी’, असे वाटले.

 

६. भाव

६ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांची मर्दनाची
सेवा करणार्‍या साधिकांची विचारपूस केली’, असे समजल्यावर सद्गुरु काकूंनी काढलेले भावपूर्ण उद्गार !

एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या मर्दन सेवेतील साधकांना विचारले, ‘‘सद्गुरु गाडगीळकाकूंची मर्दन सेवा कोण करते ?’’ हे सद्गुरु काकूंना समजल्यावर त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘देवाच्या आकाशमंडलात तुमचे नाव कोरले गेले’, हीच केवढी चांगली गोष्ट आहे.’’ त्या वेळी सद्गुरु काकूंचे हे वाक्य ऐकल्यावर आमचा भाव दाटून आला आणि परात्पर गुरु डॉ. आठवले, तसेच सद्गुरु काकू यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

६ आ. भेटायला आलेल्या व्यक्तीला देव समजून मानसरित्या तिच्या पाया पडणे

सद्गुरु  काकूंना नेहमी कुणीतरी भेटायला येतात. त्या वेळी सद्गुरु काकूंचा ‘देवच त्यांना साधकांच्या रूपात भेटायला आला आहे’, असा भाव असतो. त्या वेळी त्या तोंडवळ्यावर कधीच ‘मला पुष्कळ सेवा आहेत. साधकांना कसे भेटू ?’, असे निदर्शनास आणून देत नाहीत. सद्गुरु काकू लगेच समोरील साधकांच्या मानस पाया पडतात. साधकांशी बोलतांना त्यांची मानस पंचारती करतात. हे करत असतांना त्या समोरील साधकाशी बोलतही असतात. यातून ‘चराचरात ईश्‍वर कसा पहायचा आणि अनुभवायचा ?’, याचा परिपाठच सद्गुरु गाडगीळकाकूंनी आम्हाला प्रत्यक्ष कृतीतून शिकवला.

‘हे श्रीकृष्णा, तू सद्गुरु गाडगीळकाकूंच्या सेवेतील हे सगळे क्षणमोती अनुभवायला देऊन मला जे काही ज्ञानमोती शिकण्यास दिले, त्यासाठी मी तुझ्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे. ‘सद्गुरु गाडगीळकाकूंची ही शिकवण मला आचरणात आणता येऊ दे’, अशी तुझ्या श्रीचरणी कळकळीची प्रार्थना !’

– कु. रजनी कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.७.२०१७)