१२ वर्षांतून एकदा येणार्‍या कन्यागत महापर्वाचे यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

१२ वर्षांतून एकदा येणार्‍या कन्यागत महापर्वाच्या वेळी गंगेचे प्रत्यक्ष किंवा सूक्ष्म पाणी कृष्णा नदीत प्रवेश करत असल्याने त्या काळात कृष्णा नदीच्या पाण्याची वैशिष्ट्ये अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर येथे आहे. गंगा नदी हिमालयात उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. भौगोलिकदृष्ट्या या दोन्ही नद्यांमध्ये शेकडो किलोमीटरचे अंतर आहे; पण ज्या वेळी गुरु ग्रह कन्या राशीत प्रवेश करतो, त्या मुहूर्तावर गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते, याला सर्वमान्यता आहे. त्या शुभमुहूर्तावर कृष्णा नदीच्या काठी कन्यागत महापर्वकाल आरंभ होतो. हे ११.८.२०१६ या दिवशी रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी घडले. प्रत्येक १२ वर्षांनी एकदाच हा चमत्कार घडतो. या गोष्टीचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास करण्याच्या उद्देशाने ११.८.२०१६ या दिवशी तीन विविध वेळी कृष्णा नदीच्या पाण्याचे घेतलेले नमुने आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी (काशी) येथील गंगेच्या पाण्याचा नमुना यांची वैशिष्ट्ये वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

२. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत गंगेच्या पाण्याने कृष्णा नदीत प्रवेश करण्यापूर्वीचे कृष्णा नदीचे पाणी, गंगेच्या पाण्याने कृष्णा नदीत प्रवेश केल्यानंतर ६ मिनिटांनी आणि १ घंटा ४६ मिनिटांनी घेतलेले कृष्णा नदीचे पाणी, तसेच वाराणसी (काशी) येथील गंगेचे पाणी यांचे परीक्षण करण्यात आले. या चारही परीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला की, गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते, याला सर्वमान्यता आहे. हा योग प्रत्येक १२ वर्षांनी येतो. यावर्षी हा योग ११.८.२०१६ या रात्री ९.२९ वाजता होता. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याचे पुढील सर्व नमुने ११.८.२०१६ या दिवशी ३ वेगवेगळ्या वेळी जेथे गंगा कृष्णेत प्रवेश करते, त्या ठिकाणाहून घेतलेले आहेत.

३ अ. गंगेने कृष्णेत प्रवेश करण्यापूर्वी १२ घंटे आधीचे पाणी

हे पाणी महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर येथे कृष्णा नदीच्या उगमस्थानचे आहे. ते सकाळी ९.३० वाजता, म्हणजे गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करण्यापूर्वी १२ घंटे आधीचे आहे.

३ आ. गंगेने कृष्णेत प्रवेश केल्यानंतर ६ मिनिटांनी घेतलेले पाणी

कृष्णा नदीच्या पाण्याचा हा नमुना रात्री ९.३५ वाजता, म्हणजे गंगेच्या पाण्याने कृष्णेत प्रवेश केल्यानंतर ६ मिनिटांनी घेतलेला आहे.

३ इ. गंगेने कृष्णेत प्रवेश केल्यानंतर १ घंटा ४६ मिनिटांनी घेतलेले पाणी

कृष्णा नदीच्या पाण्याचा हा नमुना रात्री ११.१५ वाजता, म्हणजे गंगेच्या पाण्याने कृष्णेत प्रवेश केल्यानंतर १ घंटा ४६ मिनिटांनी घेतलेला आहे.

३ ई. वाराणसी येथील गंगेचे पाणी

गंगा हिमालयात उगम पावते आणि उत्तर भारतातील विविध राज्यांमधून वहात बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तिच्या उत्तर प्रदेशातील मार्गात वाराणसी (काशी) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे गंगेचे पाणी तेथून आणलेले आहे.

४. यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

४ अ. यू.टी.एस् उपकरणाची ओळख

img_uts_4004_merया उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगण येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे, असे ते सांगतात.

४ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

४ आ १. नकारात्मक ऊर्जा

ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड)

यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट)

यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात.

४ आ २. सकारात्मक ऊर्जा

ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

४ आ ३. यू.टी.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे

प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, गंध, शेंदूर आदी.

४ इ. यू.टी.एस् उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत

यू.टी.एस् या स्कॅनरमध्ये प्रथम इन्फ्रारेड ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत इन्फ्रारेड ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ त्या वस्तूभोवती इन्फ्रारेड ऊर्जेची प्रभावळ नाही, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदने यांची प्रभावळ मोजतात.

५. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

६. यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) उपकरणाद्वारे
१३.८.२०१६ या दिवशी केलेली निरीक्षणे, त्यांचे विवेचन आणि निष्कर्ष

table_2टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो.

६ अ. सारणीतील नकारात्मक ऊर्जेसंदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

६ अ १. नकारात्मक ऊर्जा न आढळणे

सर्वसाधारण घटकांमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; पण या चाचणीतील कोणत्याही घटकात (पाण्यात) नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही.

६ आ. सारणीतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

६ आ १. सकारात्मक ऊर्जा आढळणे

गंगेने कृष्णेत प्रवेश केल्यानंतर ६ मिनिटांनी घेतलेले कृष्णेचे पाणी आणि गंगाजल यांचे (सकारात्मक ऊर्जा नमुना वापरून) परीक्षण करतांना स्कॅनरच्या भुजा अनुक्रमे ९० आणि १६० अंशाच्या कोनात उघडल्या, म्हणजेच त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आढळली.

६ इ. सारणीतील वस्तूच्या प्रभावळीसंदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

६ इ १. गंगेच्या पाण्याने कृष्णेत प्रवेश केल्यानंतर ६ मिनिटांनी घेतलेल्या कृष्णेच्या पाण्याची प्रभावळ गंगेने प्रवेश करण्यापूर्वी आणि गंगेने प्रवेश केल्यानंतर १ घंटा ४६ मिनिटांनी घेतलेल्या पाण्यापेक्षा पुष्कळ अधिक असणे

गंगेने कृष्णेत प्रवेश करण्यापूर्वी आणि प्रवेश केल्यानंतर १ घंटा ४६ मिनिटांनी घेतलेल्या पाण्याची प्रभावळ अनुक्रमे १.४९ आणि १.६० मीटर आहे. महापर्वाच्या काळात म्हणजे ११.८.२०१६ या दिवशी ज्या वेळी गंगेने कृष्णा नदीत प्रवेश केला, त्यानंतर ६ मिनिटांनी घेतलेल्या कृष्णेच्या पाण्याची प्रभावळ २.१६ मीटर आहे, म्हणजे अन्य दोन वेळी घेतलेल्या पाण्याच्या तुलनेत पुष्कळ अधिक आहे. यातून गंगेने कृष्णेत प्रवेश केल्यानंतर लगेच (६ मिनिटांनी) घेतलेल्या कृष्णेच्या पाण्यात पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, असे लक्षात येते.

६ इ २. गंगाजलात सर्वांत अधिक सकारात्मक ऊर्जा असणे

चाचणीतील अन्य घटकांच्या तुलनेत गंगाजलाची प्रभावळ ३.३३ मीटर म्हणजे सर्वांत अधिक आहे. यातून गंगाजलाचे असाधारण महत्त्व लक्षात येते.

७. निष्कर्ष

७ अ. कन्यागत महापर्वाच्या वेळी प्रत्यक्ष गंगेचा प्रवाह दिसला नाही, तरी गंगेचे तत्त्व कृष्णेत प्रवेश करत असल्याचे कृष्णेच्या पाण्याने दाखवलेल्या गंगेच्या पाण्यासारख्याच प्रभावळीने सिद्ध होणे

मुहूर्ताला कृष्णेच्या पाण्यात गंगेचे तत्त्व प्रवेश करते. हे तत्त्व प्रकाशरूपाने येते. प्रत्येक वेळी प्रत्यक्ष पाणी येतांना दिसेल, असे नाही. १२ वर्षांपूर्वी पाण्याचा ओघ प्रवेश करतांना प्रत्यक्ष दिसला होता, असे जाणकार सांगतात. आता १२ वर्षांत भौगोलिक परिस्थितीही पालटली आणि भूगर्भातही अनेक पालट झाल्याने रज-तमाच्या प्रभावाने प्रत्यक्ष गंगेचा प्रवाह दिसला नाही, तरी ते तत्त्व पाण्यात येते, हे पाण्याने दाखवलेल्या गंगेच्या पाण्यासारख्याच प्रभावळीने सिद्ध केले.

७ आ. मुळातच सात्त्विक असलेल्या कृष्णेत गंगेने प्रवेश केल्यावर कृष्णेच्या पाण्यात अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

गंगाजल अतिशय पवित्र आहे, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. गंगाजलाचा एकेक थेंबसुद्धा गंगा नदीइतकाच पवित्र असतो; कारण आध्यात्मिकदृष्ट्या गंगा हेही एक तत्त्व आहे. कन्यागत महापर्वकालात ज्या वेळी गंगेचा कृष्णा नदीत प्रवेश झाला, त्या वेळी कृष्णेच्या पाण्यात गंगातत्त्व जागृत झालेे. मुळातच सात्त्विक असलेल्या कृष्णेत गंगेने प्रवेश केला, तेव्हा कृष्णेच्या पाण्यात अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, हे या चाचणीतून लक्षात येते.
– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (१२.९.२०१६)
ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात